५ एप्रिल २०१३
मथितार्थ
चित्रकथी
फोटो गॅलरी

एप्रिल-फूल विशेष
‘ब्रेकिंग न्यूज’.. : काँग्रेसचे ‘संकटमोचक’
एप्रिल फूल बनाया..
माझा कपडे धुण्याचा छंद
‘फूल डे’चे राडे!
मराठी भाषेतले एप्रिल फूल
चार दांडय़ा, एक फूल..
एप्रिलमधले ‘रावणायण’
रेडिओवरचे एप्रिल फूल
पक्या.. पिऊ आणि पाणी!
सेलिब्रिटी एप्रिल फूल

अर्थसंकल्प विशेष

क्रीडा

स्मरण
चर्चा
सेकंड इनिंग
आरोग्यम्
भन्नाट
कविता
पाठलाग
माझं शेतघर
शब्दरंग
संख्याशास्त्र
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
गृहप्रवेश
सिनेमा
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

वाचक प्रतिसाद

विकासाच्या नावाखाली जलवैभव हरविले
दि. २२ मार्चच्या ‘लोकप्रभा’तील ‘पूर्वजांनी मिळवलेले पारंपरिक शहाणपण गेले कुठे?’ या मुखपृष्ठ कथेतील सर्व लेख अभ्यसनीय व डोळे उघडणारे आहेत. आपले राज्यकर्ते अल्पशिक्षित, वाचन न करणारे व गरिबांबद्दल आपुलकी नसलेले असल्यामुळे महाराष्ट्र उजाड झाला आहे. वसई-विरारचेच उदाहरण घ्या. या प्रदेशाला निसर्गाचे वरदान आहे. ब्रिटिश सरकारने तो ‘ना विकास क्षेत्र’ म्हणून जाहीर केला. ही परिस्थिती १९८८ पर्यंत कोयम होती. शेकडो वष्रे या भूभागाला तलाव, विहिरी यांतून पाणी पुरविले गेले. येथली खाण्याची पानं उत्तर भारतात जात. केळी व भाजीपाला मुंबईला रवाना होई. शरद पवार यांनी १९९० मध्ये येथील हजारो एकर जमीन शहरीकरणासाठी उपलब्ध करून दिली. अवघ्या तीस वर्षांत शेकडो विहिरी, तलाव बुजवले गेले. निर्मल येथील पुरातन तलावाभोवती झोपडपट्टय़ा उभ्या रहिल्या. वसई, पापडी व आगाशी येथे अजूनही त्या काळचे मोठे तलाव आहेत. पेशवे सरदार या तलावात स्नान करीत. आज ती घाणीची आगारे झाली आहेत. वसईत १९९०च्या दरम्यान भूगर्भातील पाणी उपसून विकण्याचा मोठा धंदा होता. त्याविरोधात हरित वसई संरक्षण समितीने मोठा लढा उभारला. तेव्हा पाणी उपसा थांबला. दुर्दैवाने आता पुन्हा बोळिंजजवळ उपसा चालू झाला आहे. प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ विल्यम बार्बर यांनी गुजरात ते रत्नागिरी या किनारपट्टीतील पाणी उपसा न थांबविल्यास येथे पुढील पन्नास वर्षांत हा भाग वाळवंट होईल, असा इशारा दिला आहे. याकडे सरकार लक्ष देईल काय?
मार्कुस डाबरे (ई-मेलवरून)

महिलांचे भविष्यचित्र स्पष्ट करणारा अंक.
‘लोकप्रभा’च्या महिला दिन विशेषांकाने नेहमीच्या चाकोरीबद्ध सोहळेबाजीपासून आपला वेगळा ठसा उमटवला आहे. महिलांच्या मुलाखतींतून प्रकर्षांने जाणवलेला मुद्दा म्हणजे त्यांचा प्रोफेशनलिझम. अनाघ्रात मातृत्व या संकल्पनेचे डॉ. शुभांगना अत्रे यांनी केलेले अभ्यासू विवेचन वाचकांना वेगळा विचार करायला प्रवृत्त करते. डॉ. उज्ज्वली दळवी यांनी जनुक विज्ञान व महिला हा संबध विज्ञानातील किचकटपणा दूर करून अतिशय सोप्या भाषेत उलगडून सांगितला आहे. त्यामुळे सामान्य वाचकदेखील या विषयाशी जोडला जातो आणि भविष्यातील घडामोडींविषयी आपोआप सजग होतो. अंकातील मथितार्थ तर या सर्वच लेखांचा परिपाक ठरला असून महिलांच्या भविष्यातील वास्तवाचा पुरुषांनादेखील विचार करण्यास प्रवृत्त करतो. दर्जेदार अंक दिल्याबद्दल धन्यवाद.
अनंत शिंदे, पुणे

शिक्षणाचा आनंदमार्ग राज्यातून कधी जाणार?
दि. ८ मार्च २०१३ लोकप्रभातील ‘जालना आणि फिनलँड शिक्षणाचा आनंदमार्ग’ कौतुकास्पद आहे. शिक्षण आनंददायी करण्यासाठी इतर कशापेक्षाही खरोखर केवळ इच्छाशक्तीचीच गरज आहे, परंतु आपल्या महाराष्ट्रात सरकारची इच्छाशक्ती पूर्णपणे गेली आहे. अनुदान असलेल्या मराठी शाळा बंद पडत आहेत. सरकार इंग्रजी शाळांचा धंदा करीत आहेत. केवळ एनओसीवर हजारो इंग्रजी शाळा महाराष्ट्रात आज सुरू आहेत. या शाळा कशा सुरू होतात ते सगळ्यांनाच माहीत आहे.
१ लाख ८८७ शाळांच्या पटपडताळणीत २० लाख ७० हजार ५२० विद्यार्थी दि. ३, ४ आणि ५ आक्टोबर २०११ ला बोगस विद्यार्थी सापडले. काहीही कारवाई झाली नाही. अनुदानित शाळांत शिक्षकभरती शासनामार्फत सीईटी घेऊन करणार, असे शालेय शिक्षणमंत्र्यांनी मागील वर्षी विधिमंडळात सांगितले होते. काय झाले त्याचे?
शिक्षणाबाबत सर्वाची इच्छाशक्ती मरण पावली आहे. आपले सरकार तर कशीबशी जिवंत असलेली ४३ शासकीय तंत्रनिकेतने बुडवायला निघाले आहे. या कॉलेजात २४७५ पूर्ण वेळ प्राध्यापकांची पदे मंजूर आहेत पैकी ११४३ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर आज ३३५ प्राध्यापक कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहेत. सन २००३ पासून हे प्राध्यापक अल्प मानधनावर (८००० रुपये) पूर्ण वेळ प्राध्यापकाइतकेच काम करतात. समान कामासाठी समान वेतन नाही. मागासवर्गीयांनाही बढती नाही. १० वर्षांनंतरही कंत्राटी प्राध्यापक गुणवत्ता असताना सेवेत नियमित होत नाहीत. प्रामाणिक निष्कलंक मुख्यमंत्रीही गरिबांसाठी, कामगारांसाठी, कंत्राटींसाठी योग्य निर्णय घेत नाहीत. हे दुर्दैव आहे.
आर. के. मुधोळकर, नांदेड

इतर धर्माचे समर्थन कशाला?
दि. २२ मार्चच्या अंकात ‘सत्यनारायणाचा भंपकपणा’ या लेखात लेखकाने जे मत मांडले त्याच्याशी काही काळापुरती संमती दर्शवली आणि भारतीय संविधान कोणत्याही धर्माची भलामण / समर्थन करीत नाही, म्हणून सर्व पूजा बंद केल्या तरी आपण एक गोष्ट विसरत आहात की, प्रत्येक भारतीय नागरिकाला देशभरात कोठेही स्वत:चा धर्म जोपासण्याची मुभा देण्यात आली आहे. मला खात्री आहे की, लेखक आजवर मुंबईतील बांद्रा उपनगरात कधीच गेलेले नसावेत. अन्यथा त्यांनी मुस्लिमांच्या धर्म आचरणाबत भाष्य केले असते. ते रहदारी थांबवून भररस्त्यात धार्मिक प्रार्थना करीत असतात. त्यांच्यावर टीका का करीत नाहीत? सत्यनारायण पूजा या फार फार तर वर्षांतून एक दिवस असतात, मुस्लिमांच्या रस्त्यावरच्या प्रार्थना तर रोजच असतात. रस्ते ही सार्वजनिक मालमत्ता आहे. एका िहदूने िहदू रीतिरिवाजांवर टीका करण्यात अभिमान मानावा, पण इतर धर्मातील रीतिरिवाजांवर मात्र मौन धारण करावे, ही खूप केविलवाणी गोष्ट आहे. आपले सरकार ख्रिसमस आणि ईद या सणांच्या दिवशीदेखील सार्वजनिक सुट्टी देत असते. पण जगातील इतर लोकशाही देशांमध्ये जेथे तेथील घटनेने कोणत्याही धर्माचे समर्थन केले नसते अशा ठिकाणी ख्रिसमसशिवाय अन्य कोणत्याही सुट्टय़ा देत नाही.
या लेखाचा एकंदरीतच विचार करता लेखकाने एका अतिशय मुख्य घटकाकडे म्हणजे प्रजेकडे आणि त्यांच्या देशपातळीवरील राजकारणाकडे दुर्लक्ष केले आहे, किंवा त्यांच्याबाबत माझा गरसमज झाला आहे.
शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धार्मिक आचरणाबाबत लेखकाने कोणत्या अधिकारातून टीका केली आहे? लेखक इतिहासकार आहे का? शिवरायांनी सत्यनारायण पूजा केलीच नाही असे ते कोणत्याही पुराव्याशिवाय कसे म्हणू शकतात? आपण जे ऐतिहासिक उल्लेख करतो त्याबाबत इतिहासातील योग्य दाखले व पुरावे जर देता येत नसतील तर त्याबाबत काहीही भाष्य करण्याचा अधिकार कसा पोहोचू शकतो?
पुष्कर समर्थ (ई-मेलवरून)

सत्यनारायणाचा भंपकपणा बंद करा
दि. २२ मार्चच्या अंकात ‘सत्यनारायणाचा भंपकपणा’ हा लेख वाचला. अतिशय सोप्या भाषेत हा मुद्दा मांडला आहे, त्याबद्दल प्रथम आपले अभिनंदन. आपण मांडलेला मुद्दा मला खूप आवडला. आज कोणत्याही सरकारी कार्यालयात जा. त्या कार्यालयाच्या आवारात एक तरी मंदिर दिसतेच. आणि जागेचा अभाव असेल तर हे मंदिर अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये असते. ही सरळ सरळ घटनेची पायमल्ली आहे. आपण सुचवल्याप्रमाणे जर सरकारी पातळीवरून तसे ‘सक्र्युलर’ निघाले तर याला आळा घालता येणे शक्य आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की, शक्य झाल्यास हा विषय आपण सरकारदरबारी मांडावा. सदरचे कर्मकांड थांबवण्यासाठी न्यायालयात आपण दाद मागू शकतो का? - संजय इंगळे (ई-मेलवरून)

दि. १५ मार्चच्या अंकातील ‘कलाव्रती’ हा लेख खूपच चांगला आहे. असे निर्मल काम करणारे लोकांसमोर आले पाहिजेत. या लेखामुळे नीना रेगेंसारखी व्यक्तिमत्त्वे समाजासमोर आली. चित्रकला-शिल्पकला दाखविणे ही एक प्रकारे कला व अभ्यास आहे.
भास्कर हांडे (ई-मेलवरून)

वाचनीय आणि माहितीपूर्ण शब्दरंग
‘लोकप्रभा’तील शब्दरंग हे सदर अतिशय माहितीपूर्ण व वाचनीय असे आहे. विविध विषयांवरील दर्जेदार लेखन असलेल्या ‘लोकप्रभा’मध्ये अशा लेखांचे स्थान आहेच. लेखिका सत्त्वशीला सामंत आणि ‘लोकप्रभा’चे मन:पूर्वक अभिनंदन!
दिलीप प्रभावळकर (ई-मेलवरून)

‘अँग्री यंग मॅन’वर चित्रपट बनवावा
दि. १५ मार्चच्या ‘लोकप्रभा’मध्ये प्रकाशित झालेली डॉ. संगीता गावंडे यांची ‘अँग्री यंग मॅन’ ही लग्नाची वेगळी गोष्ट खूप चांगली आहे. या व अशाच गोष्टीवर एक चित्रपट बनवावा, असे माझे मत आहे. असा चित्रपट नक्कीच चालेल.
अमर भणगे (ई-मेलवरून)

अँग्री यंग मॅन - हे गद्यकाव्य
दि. १५ मार्चच्या ‘लोकप्रभा’मध्ये प्रकाशित झालेले डॉ. संगीता गावंडे यांचे गद्यकाव्य वाचले. मजा आली. ही लग्नाची गोष्ट खरी असेल तर त्या ‘मी’चे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. मर्यादेत राहून तिने अनुनय केला आणि तो सफल होत नाही दिसल्यावर समंजसपणा दाखवून ती थांबलीदेखील. तिचे वैवाहिक जीवन सुखासमाधानाचे जावो. पण ही जर ‘गोष्ट’ असेल तर लेखिकेचे इतके सुंदर काव्य लिहिल्याबद्दल अभिनंदन! फडके-खांडेकरांच्या काळात गेल्यासारखे वाटले. त्यांना कवयित्री डॉक्टर असेच संबोधिले पाहिजे. त्यांनी लिहीत राहावे.
सुरेश देवळालकर, हैदराबाद (ई-मेलवरून)

सर्वोत्तम लग्नाची गोष्ट
दि. १५ मार्चच्या ‘लोकप्रभा’मध्ये प्रकाशित झालेली डॉ. संगीता गावंडे यांची ‘अँग्री यंग मॅन’ ही लग्नाची वेगळी गोष्ट खूप आवडली. ही कथा वाचण्यात वेगळाच आनंद होता. किंबहुना ‘लग्नाची वेगळी गोष्ट’ या सदरातील ही सर्वोत्तम कथा आहे. सदर लेखिकेने अन्य काही लिखाण प्रकाशित केले असल्यास वाचायला आवडेल.
- रामदास जाधव, मेरिलंड यूएसए (ई-मेलवरून)