५ एप्रिल २०१३
मथितार्थ
चित्रकथी
फोटो गॅलरी

एप्रिल-फूल विशेष
‘ब्रेकिंग न्यूज’.. : काँग्रेसचे ‘संकटमोचक’
एप्रिल फूल बनाया..
माझा कपडे धुण्याचा छंद
‘फूल डे’चे राडे!
मराठी भाषेतले एप्रिल फूल
चार दांडय़ा, एक फूल..
एप्रिलमधले ‘रावणायण’
रेडिओवरचे एप्रिल फूल
पक्या.. पिऊ आणि पाणी!
सेलिब्रिटी एप्रिल फूल

अर्थसंकल्प विशेष

क्रीडा

स्मरण
चर्चा
सेकंड इनिंग
आरोग्यम्
भन्नाट
कविता
पाठलाग
माझं शेतघर
शब्दरंग
संख्याशास्त्र
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
गृहप्रवेश
सिनेमा
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

वाचक-लेखक

चांगला लेखक चांगला वाचक असतो, तसंच चांगला वाचक चांगला लेखक होऊ शकतो.
‘लोकप्रभा’च्या वाचक-लेखकांसाठी हे नवे सदर.

डॉ. श. द. गोमकाळे
यंदा महाराष्ट्रातील हजारो खेडय़ांमध्ये पिण्याच्या पाण्याचे भयंकर दुर्भिक्ष जाणवत आहे. पाऊस यायला अजून तीन-चार महिन्यांचा अवधी असल्यामुळे संभाव्य गंभीर परिस्थितीची कल्पनाच करवत नाही. जेथे पाण्याची गरज आहे तेथील स्थानिक जलस्रोत पूर्णपणे कोरडे झाल्यामुळे आसपास उपलब्ध असलेल्या जलस्रोतातून पाइपलाइन टाकून किंवा टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. आधीच पाणीसाठा कमी, त्यात दबदबा असणारे व लोकहितास अव्हेरणारे काही जण बरेचसे पाणी स्वत:साठी काढून घेण्याचे समाजविघातक कृत्ये करीत आहेत. नव्याने जिथे बोअर खणले आहेत तिथे पाण्याच्या नवीन स्रोतातील पाण्याची गुणवत्ता तपासणे आवश्यक आहे, अन्यथा रोगराई पसरेल. जनावरांना पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची गुणवत्ता माणसांना पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्यापेक्षा कमी असलेली चालते. उदा. माणसासाठी योग्य असलेल्या पिण्याच्या पाण्यात द्राव्य क्षारांचे प्रमाण दर दहा लाखांत ५०० ते १००० भाग असते. जनावरे २००० भाग असलेले पाणी पिऊ शकतात. बरेचदा साध्या सोप्या प्रक्रिया करून पिण्यालायक पाणी लहान प्रमाणावर जागोजागी उपलब्ध करून देता येते. जिथे पाणीच नाही अशा ठिकाणी पाणी उपलब्ध करून दिले तर जनता यंत्रणेला सलाम करेल.
औरंगाबाद शहरात यंदा पाणीपुरवठा कमी आहे. जवळपास ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या जायकवाडी धरणातून शहराला पाणीपुरवठा होतो. औरंगाबादेत ऐतिहासिक अथवा प्रवासी दोन स्थळे आहेत. बिवीका मकबरा व मलिक अंबर राजाने १६१८-१६२० सालांमध्ये बांधलेली नहर-ए-अंबारी पाणीपुरवठा व्यवस्था. ती पूर्णत: गुरुत्वाकर्षणाच्या तत्त्वावर (दोन पृष्ठभागांच्या उंचीतील फरक) चालू आहे. या पाण्याच्या प्रवाहाच्या जोराने चालत असलेली पाणचक्की समुद्रसपाटीपासून जवळपास १८६८ फुटांवर आहे. त्यामुळे हे पाणी त्यापेक्षा खाली असलेल्या शहराच्या भागांत लोकांच्या वापरासाठी सहज उपलब्ध होऊ शकते. उपलब्ध माहितीनुसार पाणचक्कीवर रोज जवळपास दोन लाख लिटर पाणी काहीही उपयोग न होता नजीकच्या खाम नदीमध्ये वाहात जाते. याच शहरात हौदातूनही रोज लाखो लिटर पाणी शेजारच्या नाल्यात वाहात जाते. वाया जाणारे पाणी दुष्काळग्रस्त भागात का पाठवले जात नाही. या पाण्याची गुणवत्ता तपासून त्या पाण्याचा उपयोग करता येतो. त्यासाठी फार मोठी यंत्रणा लागत नाही. एका इंग्रजी वर्तमानपत्रात आलेल्या वृत्तानुसार औरंगाबादमधील वॉटर फोरमचे काही प्रतिनिधी माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची भेट घेणार आहेत आणि त्यांना नहर-ए-अंबरमधून वाया जाणारे पाणी जनतेला उपलब्ध करून देणाऱ्या योजनेबद्दल सांगणार आहेत व त्यांनी शासनाला ही योजना अमलात आणावी यासाठी गळ घालावी, अशी विनंती करणार आहेत. जिथे पाणी उपलब्ध आहे आणि वाया जाणारे पाणी वाचवून ते दुष्काळी भागामध्ये पाठवावे. पाण्याचे नियोजन करावे यासाठी लोकांना माजी राष्ट्रपतींकडे जावे लागणे योग्य आहे काय?

पालकांना डागण्या देऊ नका
राधा मराठे

मुलांची दुखणी, वाढ, संस्कार या विषयात तज्ज्ञ असलेली मंडळी जेव्हा पालकांसाठी मार्गदर्शनपर लेख लिहितात तेव्हा अनाहूतपणे पालकांना दोष दिला जातो. मुलांच्या देखभालीची जबाबदारी पालकांची असली तरी कोणी सुशिक्षित पालक आपल्या मुलांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असतील असं वाटत नाही. अलीकडे पालकवर्ग पुरेसा जागरूक होतो आहे, पण त्यांना परिस्थितीमुळे काही मर्यादा पडतात.
डिसलेक्सियासारखे आजार हे सर्दी-पडशासारखे सहज दिसणारे किंवा पोटदुखी, ताप यांसारखे सहज वर्णन करता येण्यासारखे नाहीत. या आजाराचं निदान नेहमीचे फॅमिली डॉक्टर करू शकत नाहीत. त्यासाठी विशेष तज्ज्ञांकडे जावं लागतं. आपल्या मुलात काही तरी दोष आहे हे पालकांना कळेपर्यंत मूल पाच-सहा वर्षांचं झालेलं असतं. त्याची प्रगती नीट, अपेक्षित वेगाने होत नाही हे लक्षात आल्यानंतर पहिला विचार येतो तो मूल आळशी असल्याचा. नोकरी-व्यवसाय सांभाळताना, वेळ आणि पसा यांची सांगड घालताना माणूस इतका मेटाकुटीला आलेला असतो की, वेगळा विचार त्याच्या डोक्यात येत नाही आणि करू म्हटल्याने होत नाही. शिवाय इतक्या गंभीर आजाराची कल्पना माणूस सगळे उपाय हरल्यावरच करतो. आपलं मूल इतर मुलांसारखं सामान्य नाही, हे पचवणं पालकांसाठी सोपं नसतं आणि एकदा आजार स्पष्ट झाला की सर्वस्व पणाला लावून, शक्य त्या सगळ्या मार्गानी आपलं मूल सामान्य मुलांत मिसळण्याइतकं सक्षम करण्यासाठी ते धडपड करतात.
कोणतीही क्षमता कमी असलेल्या मुलांना जशी वारंवार त्याची जाणीव करून दिली तर त्यांच्यात न्यूनगंड येतो, तसा तुम्ही कमी पडताय असं वारंवार पालकांना सांगून त्यांना नाही का न्यूनगंड येणार? मुलांची काळजी घ्या, असं सांगताना, सजग-जागरूक राहा, असं बजावताना त्यांच्या मनात न्यूनगंड पेरला जाणार नाही याची काळजी घेणं पण तितकंच महत्त्वाचं नाही का? परिस्थितीने गांजलेल्या पालकांना मुलांच्या आजाराने आधीच निराश वाटत असतं, त्यात असे लेख लिहून त्यांना अधिक निराश का करायचं?

केरसुणी..
डॉ. जयंत जुन्नरकर
एक लहानसे गाव. त्या ठिकाणी केरसुणी नावाची मुलगी राहत होती. तिचे आई-वडील तेथे राहत होते. साधे कुटुंब होते. तिचे केस हे केरसुणीसारखे असल्यामुळे तिचे नाव केरसुणी ठेवले होते. तिचे केस केरसुणीसारखे वाऱ्याच्या छोटय़ाशा झुळकीने भुरभुर उडायचे. केरसुणी खूपच हुशार होती, सुंदर होती. गोरी, चेहऱ्यावर तांबूस छटा, सकाळचा उगवता सूर्य बघितला म्हणजे जसे प्रसन्न वाटते तसा चेहरा. नाक चाफेकळीसारखे, डोळे कमलनयन. अशी ही सुंदर व बुद्धिमान मुलगी तिच्या आई-वडिलांची एकुलती एक. त्यामुळे खूप लाडात वाढली. अशा मुलीची आई-वडिलांना ती वयात आल्यामुळे लग्नाची काळजी लागली. त्यामुळे मुले पाहावयास सुरुवात केली.
या मुलीच्या कानावर ही गोष्ट आली. ती नाराज राहावयास लागली. जेवण सोडले. चेहऱ्यावरची तांबूस छटा मावळली, म्लान झाली. आई-वडिलांनी खोदून खोदून विचारले, पण प्रथम ती काहीच बोलली नाही. नंतर तिने कबूल केले की तिचे गावातील एका मुलावर प्रेम आहे. आई-वडिलांना धक्का बसला. पण त्यांनी स्वत:ला सांभाळले. तुम्हाला एक सांगायचे राहिले. केरसुणीची एक आजी होती (आईची आई). खूप म्हातारी नव्हती. असे ती स्वत:ला समजत होती, परंतु आजूबाजूचे लोक मात्र तिला वय झाले, असे म्हणत होते. पण ‘वर जा’ असे म्हणत नव्हते. कारण आजी फार लाघवी, मायाळू, प्रेमळ, कुणालाही मदत करणारी, चिडचिड न करणारी होती. त्यामुळे सर्व नातू, नाती तिच्याशी दिलखुलास बातचीत करायचे. त्यामुळे त्यांची सगळी गुपितं, सर्व काही तिला माहिती असायची. या केरसुणीने या आजीजवळ केव्हातरी मन मोकळे केले होते. तिचा जोडीदार हा राजबिंडा, सालस, प्रेमळ, तिला समजून घेणारा, चिडचिडा- संतापी नको, खटय़ाळ नको, ता म्हटल्यावर ताक समजणारा हवा, रुबाबदार चालणारा, तसेच मालदार पाहिजे. बंगला, बगिचा, नोकरदार, इकडे तिकडे हांजी हांजी करणारे पाहिजे वगैरे. हे विचार आजीला माहिती होते. नेहमीच्या प्रथेप्रमाणे चहा-पोह्य़ांच्या कार्यक्रमात मुलगा बघण्याचा कार्यक्रम झाला. दोन्ही कुटुंबाला सर्व पसंत होते. केरसुणीच्या विचारांप्रमाणे मुलगा मिळाला. त्यामुळे आनंद होता.
केरसुणीचे आई-वडील, केरसुणी, आजी घरी परत येताना गप्पा सुरू होत्या. हसत खिदळत चालले होते. आजी थोडी गंभीर झाली. आजी खुदकन हसली. केरसुणीने आजीला विचारले, ‘खुदकन का हसलीस?’ तिला माहीत होते. असे खुदकन हसणे म्हणजे आजीचा काहीतरी व्रात्यपणा असणार. आजीने उत्तर देण्याचे टाळले. ती म्हणाली, मला भलताच प्रश्न विचारू नको. तुला तुझ्या कल्पनेप्रमाणे मुलगा मिळाला ना. बस झाले. पण केरसुणीने खूपच हट्ट धरला. तुझ्या हसण्याचे कारण सांग. आजी म्हणाली, ‘कारण सांगितले तर लग्न तुटेल.’
काही वेळाने खूप आग्रह केल्यावर आजीने सांगतिले की, त्याचे नाव खराटे आहे. तुझ्या अटीमध्ये हे बसत नाही. केरसुणी तशी हुशार, बुद्धिवान. ती हसत हसत आजीला म्हणाली, ‘मी त्याचा विचार अगोदरच केला आहे. आम्ही कोर्टात प्रतिज्ञापत्र देऊन नावच बदलून टाकू.’
केरसुणीचे लग्न झाले. आनंदात आहे.

एफडीआय नको, एफडीओ हवे..
घनश्याम कवी

एफडीआयविरोधी आंदोलन सुरू आहे. सत्तारूढ सरकारने परदेशी कंपन्यांस भारतात शिरकाव करून दुकाने काढण्यास परवानगी दिली आहे. भाजीपाला ग्राहकोपयोगी वस्तू - कन्झ्युमर गुड्स इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे सर्व फार मोठय़ा प्रमाणात परदेशातून आयात करून अगर इथेच उत्पादकांकडून विकत घेऊन परत ग्राहकांस विकणे त्यांना शक्य होईल. पण यामुळेच एकदा मॉलधारकांचे बस्तान बसले की ते इतर छोटय़ा दुकानदारांना घरी बसवतील आणि नंतर खरेदीदारांस पर्याय उरला नाही की दर वाढवतील किंवा कोंडी करतील. अर्थात मालाची एकाधिकार विक्री सुरू झाल्यावर ते भाव वाढवतील. इतर देशात या सुपरमार्केटचा अनुभव वाईट आहे. कर्मचाऱ्यांना आठ तासांपेक्षा जास्त काम देणे, मधल्या वेळात विश्रांती न देणे, पगार कमी देणे आणि कधीही कामावरून काढून टाकण्याची दहशत यामुळे अमेरिकेतील नोकरवर्ग त्रासून गेलेला आहे. अजून एक महत्त्वाचा तोटा असा की, छोटे दुकानदार स्वत:च दुकान चालवीत आहेत आणि आपल्या सोयीच्या ठिकाणी घराजवळ आपल्या वेळेनुसार काम करीत आहेत आणि त्यांची संख्या लाखो आहे. सर्व धंदे दुकाने बंद पडून ते सर्वजण मॉलमालकांचे गुलाम होतील. अजून एक मोठा तोटा लक्षात आलेला नाही, तो असा की, सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता बडे राजकीय नेतेच त्या मॉलमध्ये भागीदारी करून सरकारचे सर्व कर बुडवतील किंवा अनेक सवलती मिळवतील. पर्यायाने देशाचे नुकसान होईल.
याऐवजी नवा पर्याय असा आहे की, एफडीआयऐवजी एफडीओ सुरू करावेत. अर्थात फार्मर्स डायरेक्ट आऊटलेट. शेतक ऱ्यांनी स्वत:च आपले कृषिउत्पन्न- भाजीपाला, फळे, धान्य वगैरे शहरात आणून विकणे. ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न शहरात व इतरत्र या प्रकारची असंख्य दुकाने आहेत. आपल्याकडे ग्रामीण भागात आठवडा बाजारात छोटे उत्पादक, फिरते दुकानदार स्वत:च ग्राहकांस माल विकतात. त्याऐवजी रोजच कायमस्वरूपी जागा ठरवून तिथे माल आणून विकणे, सध्या हाऊसिंग सोसायटीमध्ये भाजीपाला आणून विकण्यास सुरुवात झाली आहे. शेतकरी संघटना, स्वाभिमानी वगैरेंनी आपले सदस्य एकत्र करून परस्पर सहकार्याने शहरात सर्व प्रकारचा माल आणून विकावा. बँकॉकमध्ये फ्लोटिंग मार्केट आणि नाइट मार्केटमध्ये ठरवून दिलेल्या जागेवर हजारो उत्पादक, छोटे विक्रेते रोज माल विकतात. त्यातून सर्वाचाच फायदा होतो. माल अगदी ताजा मिळतो. पॅकिंगचा खर्च, दलाली वाचते. ‘एकमेका साह्य़ करू अवघे धरू सुपंथ!’

‘वाचक लेखक’ या सदरासाठी लेख पाठवताना मेल अथवा पाकिटावर ‘वाचक लेखक’ सदरासाठी असे स्पष्टपणे नमूद करावे. आमचा पत्ता: लोकप्रभाह्ण, प्लॉट नं. ईएल/१३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई-४००७१० फॅक्स : २७६३३००८ Email - response.lokprabha@expressindia.com