५ एप्रिल २०१३
मथितार्थ
चित्रकथी
फोटो गॅलरी

एप्रिल-फूल विशेष
‘ब्रेकिंग न्यूज’.. : काँग्रेसचे ‘संकटमोचक’
एप्रिल फूल बनाया..
माझा कपडे धुण्याचा छंद
‘फूल डे’चे राडे!
मराठी भाषेतले एप्रिल फूल
चार दांडय़ा, एक फूल..
एप्रिलमधले ‘रावणायण’
रेडिओवरचे एप्रिल फूल
पक्या.. पिऊ आणि पाणी!
सेलिब्रिटी एप्रिल फूल

अर्थसंकल्प विशेष

क्रीडा

स्मरण
चर्चा
सेकंड इनिंग
आरोग्यम्
भन्नाट
कविता
पाठलाग
माझं शेतघर
शब्दरंग
संख्याशास्त्र
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
गृहप्रवेश
सिनेमा
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

स्मरण

‘साजणवेळे’चा निर्मिक
मकरंद गजानन दीक्षित

२६ मार्च हा कवी ग्रेस यांचा प्रथम स्मृतिदिन. आपल्या जाण्याने मराठी रसिकांच्या मनात पोकळी निर्माण करणाऱ्या ग्रेस यांचे स्मरण..

‘‘मी महाकवी दु:खाचा, प्राचीन नदीपरी खोल
हलकेच होते दगडाचे, माझ्या हाती फूल’’

‘दु:खाचा सुखी कवी’ असे स्वत:चे वरीलप्रमाणे सार्थ वर्णन करणाऱ्या कवी ग्रेस यांचे माणिक गोडघाटेरूपी शरीर अनंतात विलीन झाले त्याला येत्या २६ मार्च रोजी एक वर्ष पूर्ण होईल. वयाच्या २७ व्या वर्षी इ.स. १९६७ मध्ये ग्रेस यांचा ‘संध्याकाळच्या कविता’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. तिथपासून ते ‘ओल्या वेळूची बासरी’ या २०१२ साली (मृत्यूच्या २ महिने आधी) प्रसिद्ध झालेल्या शेवटच्या ललित लेखसंग्रहापर्यंत म्हणजेच सुमारे अर्धशतकभर ग्रेस यांनी आपल्या विशिष्ट शैलीने, आशयाच्या वैविध्यतेने आणि गूढरम्यतेने मराठी साहित्य आणि रसिक यांना कधी भारावून, कधी हेलावून, तर कधी भांबावून टाकलेले आहे.
ग्रेस यांच्या पद्य आणि गद्य पुस्तकांची संख्या पाहिल्यास ती १२ इतकी आहे, पण कंटेंटच्या अंगाने विचार केल्यास त्यातील समृद्धतेला तोड नाही. त्यातही सात पुस्तके ही ललित लेखनात्मक गद्य स्वरूपाची आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्या ‘वाऱ्याने हलते रान’ या ललित लेख संग्रहाला ‘सााहित्य अकादमी’ मिळाला तेव्हा अनेकांनी ‘ही कवी ग्रेसला दिलेली हुलकावणी आहे’ अशी भावना व्यक्त केली, पण साहित्य अकादमीने ग्रेस यांच्यामधील ताकदीच्या आणि सर्जनशील सिद्धहस्त लेखकावर उशिरा का होईना पण अधिमान्यतेची मोहोर उठविली आहे. खुद्द ग्रेस यांना हा प्रश्न विचारला असता ग्रेस म्हणाले, ‘सर आय अ‍ॅम नॉट अ पोएट, आय अ‍ॅम नॉट अ रायटर! आय अ‍ॅम अ‍ॅन आर्टिस्ट अ‍ॅण्ड दॅट टू अ‍ॅन एन्शन्ट आर्टिस्ट’.
मराठी, िहदी, उर्दू आणि इंग्रजीवर प्रभुत्व असणाऱ्या आणि आपल्या बोलण्यात इंग्रजीचा मुक्त वापर असलेल्या ग्रेसनी व्यक्त होण्यासाठी मात्र मराठी भाषेची निवड केली आणि मराठी साहित्य समृद्ध केले. ग्रेस यांच्या लिखाणाचा अनुवाद करण्याचा फारसा प्रयत्न झालेला नाही आणि झालाच तर त्यांच्या शब्दांचा अनुवाद करता येईल, पण आशयाचा अनुवाद करता येणार नाही. ग्रेस यांनी इंग्रजी भाषेत लिखाण केले असते तर आज ते जागतिक स्तरावरील प्रख्यात साहित्यिक म्हणून गणले गेले असते. ग्रेस यांचे गद्य आणि पद्य असे दोन्ही लिखाण वाचल्यास हा एक थोर विचारवंत आणि तत्वज्ञ होता या निष्कर्षांपर्यंत आपण येऊन पोहोचतो.
‘संध्याकाळच्या कवितां’नी ग्रेसची नोंद घेतली गेली. ‘राजपुत्र आणि डाìलग’ने विचारप्रवृत्त केले आणि ‘चंद्र माधवीचे प्रदेश’ने त्यातील आक्रंदन शैली आणि प्रस्थापित वाटांना छेद देणाऱ्या कवितांनी विलक्षण अस्वस्थता निर्माण केली आणि खळबळ उडवून दिली. ग्रेस यांच्या ज्या कवितेचे पहिल्यांदा गाणे झाले ती कविता म्हणजे ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’मधली ‘आई’ ही कविता.
‘‘ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता
मेघांत मिसळली किरणे हा सूर्य सोडवीत होता.
ती आई होती म्हणुनी घन व्याकुळ मीही रडलो
त्या वेळी वारा सावध पाचोळा उडवीत होता’’
या कवितेने काही मूलभूत प्रश्न निर्माण केले. तोपर्यंत ‘आई’वर ज्या कविता झाल्या होत्या त्या केवळ आईशी निगडित असलेल्या माया, वात्सल्य.. ग्रेस यांच्या भाषेत दिव्यत्व, मांगल्य आणि पावित्र्य यांच्या अनुषंगाने. पण ग्रेस यांनी या कवितेतून आईच्या शरीरजाणिवांचा, स्त्रीत्वाचा निर्देश केलेला आहे आणि ती आई झाली म्हणून तिच्यातले ‘मादीपण’ संपत नाही हे सूचित केलेले आहे. ग्रेस यांचे म्हणणे असे की मादी हे आईचे आदिम स्वरूप आहे आणि ही ‘मादी’ उत्क्रांत होत होत तिची ‘आई’ बनते. पण तेव्हा तिच्या शरीरजाणिवा नष्ट होतात असे समजणे भाबडेपणाचे आहे. वरील कडव्यातील ‘ती आई होती म्हणुनी’चा अर्थ ‘ती आई नसती तर..’ असा आहे.
या कवितेने ग्रेसला लोकप्रियता मिळवून दिली आणि त्याबाबत उलटसुलट चर्चादेखील झालेली आहे. या कवितेचा समग्र आशय असा आहे की, आपल्या शरीरजाणिवा जागृत झालेली (कदाचित विधवा) आई, त्या जाणिवांचा आविष्कार करायला निघाली आहे, पण आपल्या मुलाला बालसुलभ भाषेत ती ते समजावू शकत नाही, म्हणून ती त्याला टाळून चालली आहे. पण त्या मुलाला पुसटशी का होईना, पण त्याची जाणीव होते, बालपण संपलं नाही, पण ते संपायची वेळ आली आहे हे उमजते (ग्रेस यांच्या भाषेत ‘गमते’). ते ग्रेस यांनी खालीलप्रमाणे मांडले आहे-
‘‘अंगणात गमले मजला संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता’’
या कवितेच्या मांडणीमुळे किंवा पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या आर्त स्वरांमुळे असेल, यातील आई निवर्तली आहे असा आभास निर्माण होतो. पण ते तसे नाही. गाण्यात नसलेल्या, पण मूळ कवितेत असलेल्या शेवटल्या कडव्यात आई परत येते. ते कडवे असे आहे
‘‘ते रक्त वाढतानाही मज आता गहिवर नाही
वस्त्रात द्रौपदीच्याही तो कृष्ण नागडा होता.’’
यातील द्रौपदी आणि कृष्ण या प्रतिमा आहेत आणि त्या स्त्री आणि पुरुष असे सूचन करतात. यातून ग्रेस असे सुचवतात की, ती आई परत आली आहे, पण त्या मुलाला तिच्याबद्दल द्वेष वाटत नाही. उलट आई-मुलाच्या नात्याप्रमाणेच स्त्री-पुरुष असा एक अनुबंध त्यांच्यात निर्माण होतो.
लेखक असो किंवा कवी, त्याने ‘अनुभवाची अलिप्तता’ जपली पाहिजे असे म्हणतात. हे एका मर्यादेपर्यंत योग्य असले तरी हे मान्य केले पाहिजे की लेखक किंवा कवी हा काही टाइपरायटर नसतो, तो एक हाडामांसाचा जिवंत माणूस असतो. त्यामुळे विशुद्ध ‘अनुभवाची अलिप्तता’ साध्य करता येत नाही. ग्रेस यांच्या बाबतीतदेखील हे लागू होते. स्वत: ग्रेस, त्यांचे बालपण, त्यांची आई याविषयी गूढतेचे वलय निर्माण झालेले आहे. ग्रेस यांनी कधी ते तोडायचा प्रयत्न केला नाही. उलट
‘‘आई माझी मत्त वासना संभोगाची भूल
क्रूर पशूच्या डोळ्यांमधल्या करुणेचेही फूल
त्यानंतरही आई निघते कळशी घेऊन दूर
तेव्हा कळतो खुळ्या नदीला या मादीचा सूर’’
अशा ‘सांजभयाच्या साजणी’मधल्या कवितेला ‘ग्रेसची आई’ असे नाव देऊन ते गूढतेचे वलय अधिक गडद आणि मिट्ट काळोखी करून ठेवले आहे.
ग्रेस हे एक कोडे आहे. उलगडलंय असं वाटत असतानाच ग्रेस चकवून जातो आणि आपण पुन्हा गुरफटलेले असतो. संकुचित परिघात राहून ग्रेसचा अर्थ लावायला गेलं तर माणूस भूलभुलयात अडकलाच म्हणून समजा. या ‘संध्यामग्न पुरुषाने’ ‘चंद्र माधवीच्या प्रदेशात’ ‘मृगजळाचे बांधकाम’ करून ठेवलेले आहे, त्यामुळे भास, आभास हे निश्चित आहेत.
ग्रेस कर्करोगावर उपचार घेत असताना दीनानाथ मंगेशकर इस्पितळात त्यांना भेटण्याचा योग तब्बल तीन वेळा आला. (ग्रेस यांची एकदा भेट होणे हेच कधीकाळी अत्यंत अशक्य अशी गोष्ट होती). तेव्हा जाणवले की हा माणूस फक्त ‘संध्यामग्न’ नाही तर ‘आत्ममग्न’देखील आहे. त्यांच्या खोलीत पं. हृदयनाथ मंगेशकरांचे एक-दोन फोटो सोडले तर चारही िभतींवर ग्रेस यांचेच विविध भाव मुद्रांतील फोटो लावलेले होते. ग्रेस यांच्या माणूसघाणेपणाविषयी आणि विक्षिप्ततेच्या वदन्तेविषयी त्यांच्याच तोंडून ऐकले. ‘‘सर, साहित्याचे संमेलन या गोष्टीवर माझा विश्वास नाही, त्यामुळे मी तिकडे कधी फिरकलो नाही. मी कुठली ‘प्रतिष्ठानं’ किंवा ‘कट्टे’ काढले नाहीत. आणि खरं सांगू का सर, आय अ‍ॅम जंटलमन, पण समोरच्या माणसाशी बोलताना मला पहिल्या पाच मिनिटांत समजतं की, या माणसाशी आपली तार जुळणार की नाही. आणि तार जुळणार नसेल तर तो दोघांच्याही वेळेचा अपव्यय असतो. म्हणून मी टाळतो अशा लोकांना आणि त्यातून कोणी पत्ता मागितलाच तर माझ्या घरापासूनच्या चार किलोमीटर इकडचा आणि चार किलोमीटर तिकडचा असा पत्ता एकत्र करून देतो.’’
कर्करोगामुळे ग्रेस यांचे शरीर कृश झालेले होते. आवाज क्षीण झालेला होता, पण स्पष्ट होता आणि तर्जनी आणि करंगळीच्या मधली दोन बोटं अंगठय़ाखाली दाबून, डोळे मिटून धीरगंभीरपणे बोलण्याची पद्धत मात्र तीच होती. एकदा बोलत असताना ग्रेसचा मोबाइल ‘निनादला’. त्यांची िरगटोन होती ती चर्चबेलच्या नादमय आवाजाची. ग्रेस रंगात आलेले होते, त्यामुळे त्यांनी फोन उचलला नाही. लगेच पुन्हा फोन वाजला. मी त्यांना ‘‘महत्त्वाचा फोन असेल. घ्या.’’ असे सुचवले तर ग्रेस म्हटले, ‘‘छे हो, महत्त्वाचा कसला. माझ्या मुलाचा राघवचा फोन आहे.’’ न बघताच कसं ओळखलंत, असं विचारल्यावर ग्रेस म्हणाले, ‘‘सर. मी पहिल्यांदा फोन घेतला नाही तरी लगेच दुसऱ्यांदा फोन करणारा आणि मी उचलीन अशी दुर्दम्य पण भाबडी आशा असलेला या अलम दुनियेत ‘राघव’शिवाय दुसरा कोणीच नाही. ‘डू यू नो सर, विच इज द मोस्ट डिफिकल्ट थिंग इन लाइफ?’ प्रश्न उत्तराच्या अपेक्षेने केलेला नव्हता, म्हणून मी गप्प बसलो. ‘टू अ‍ॅव्हॉइड सच पुअर रिलेटिव्ह्ज.’ नंतर थोडा वेळ पसरलेल्या शांततेचा भंग करत मी म्हटलो, ‘‘ग्रेस, तुम्हाला त्रास होणार नसेल तर ‘राघवची समजूत’ ही कविता म्हणाल?’’ ग्रेस थोडेसे चपापलेले दिसले. किंचित हसून ग्रेसने धीरगंभीर आवाजात दोन कडवी म्हटली.
‘‘राघवा सावलीपाशी कधी थांबू नये रे बाळा
मृगजळी वाजवी उन तृष्णेचा घुंगुरवाळा
वाटले मलाही तेव्हा आला तर नाही पूर
वाळूला दचकून पाणी का सोडून जाते दूर?’’
कर्करोगाचे निदान, उपचार याबाबतसुद्धा ग्रेस भरभरून आणि मिश्कीलपणे बोलत. ‘‘हृदयनाथशी फोनवर बोलत होतो तेव्हा त्यांना माझ्या आवाजात फरक जाणवला, म्हणून तपासणी करायला गेलो तर घशात शबरीच्या बोराएवढी गाठ. हृदयनाथचा आग्रह की माझा आवाज बदलता कामा नये, म्हणून शस्त्रक्रियेऐवजी प्रकाश किरणांचे उपचार केले. वाघ म्हटलं तरी खातो आणि वाघोबा म्हटलं तरी खातो. कॅन्सर तो कॅन्सर. घशातला मोठा आणि पोटातला छोटा असं काही नसतं. माझ्या पेशींशी युद्ध करून विजय मिळवलेला हा डिव्हाइन डिसिज आहे.’’
ग्रेस कर्करोगाशी दोन वेळा धीरोदात्तपणे लढले आणि ही लढाई चालू असताना त्यांच्यामधली सर्जनशीलता किंचितही कमी झाली नाही. ‘कावळे उडाले स्वामी’ आणि ‘ओल्या वेळूची बासरी’ अशी दोन पुस्तके त्यांनी या उपचाराच्या काळात लिहिलेली आहेत.
ग्रेस यांचा कक्ष प्रथमदर्शनी असल्यामुळे त्यांच्यावर नस्रेसचे कायम लक्ष असे. त्याबाबत ग्रेस एकदा सांगू लागले ‘‘मी असाच उपचार घेऊन आलो. आणि रात्री तीन वाजता अ‍ॅरिस्टॉटल, प्लेटो, ज्ञानेश्वर म्हणायला लागलो. मी ग्लानीत गेलोय असे समजून नर्सची धावपळ सुरू झाली. त्यांनी डॉक्टरला बोलावले. तेव्हा मीच म्हटले. ‘‘सर, जोपर्यंत माझ्या तोंडून हा ‘ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी’ येतोय तोपर्यंत मी पूर्ण शुद्धीत आहे असं समजा.’’
ग्रेस यांच्याशी झालेल्या तीन भेटींनंतर जाणवले की अनेक दंतकथांनी घेरलेला हा माणूस विलक्षण मनस्वी आहे आणि त्यांच्या विक्षिप्त वागण्यामागेही काही तात्त्विक कारणे आहेत, आणि त्या वागण्याला माणूसघाणेपणाचे सरसकट लेबल लावता येणार नाही.
ग्रेस यांच्या साहित्यिक, तात्त्विक योगदानाचे वैशिष्टय़ म्हणजे ते केवळ निर्मिती करून थांबले नाहीत तर त्या निर्मितिप्रक्रियेचा, त्या निर्मितीआधी निर्माण होणाऱ्या मानसिक आंदोलनांचा त्यांनी डोळस वेध घेतला. ‘मितवा’ असो ‘चर्चबेल’ असो वा अगदी शेवटचे ‘ओल्या वेळूची बासरी’ असो, हे ललितलेख संग्रह या निर्मितिप्रक्रियेच्या वेधाचे आविष्कार आहेत आणि त्यासाठी ग्रेसने पौराणिककथा, जातककथा, दंतकथांचा आधार घेतला. त्यामुळेच ग्रेस यांच्या कवितेत द्रौपदी, कुंती, ऊर्मिला, गांधारी ही पौराणिक पात्रे येतात, त्याचबरोबर घोडा, सांड, कावळा, हंस, गरुडसुद्धा प्रतिमारूपाने येतात. ग्रेस यांची कविता द्वैती आहे. त्यांचे महाभारताचे किंवा इतर पुराणकथांचे आकलन आणि निष्कर्ष प्रवाहास छेद देणारे आहेत. त्यामुळेच ग्रेस
‘‘गांधारी आंधळी का? याचा विषाद नाही.
धृतराष्ट्र आंधळा का? हा प्रश्न जीव घेई’’
असा विषाद व्यक्त करतात आणि काही प्रश्न उपस्थित करतात आणि असे करत असताना त्यांनी कविता म्हणजे काय याचे चिंतन ‘कावळे उडाले स्वामी’मध्ये केलेले आहे. इफ युअर रेसिप्रोकेशन सिजेस टू द वर्ल्ड, यू गो बॅक टू युवर बेसिक इटर्नल जर्नी अगेन अ‍ॅण्ड अगेन. टू धिस अ‍ॅक्ट समवन हॅड सेड पोएट्री’
ग्रेस यांच्यावर कोणाचाही प्रभाव नव्हता. पण आरती प्रभूबद्दल त्यांना आत्मीयता होती. जी.ए.बरोबर जुळलेले त्यांचे मत्र सर्वश्रुत आहे. स्वभाव, लेखनशैली आणि अगदी मृत्यूस कारण ठरलेला कर्करोग असो, जी.ए. आणि ग्रेसमधले हे समान धागे होते. हे सजातीय ध्रुव पत्रातून एकमेकांना भेटले, पण त्यांनी प्रत्यक्ष भेटणे टाळले. ग्रेसना याचे कारण विचारले असता ते उसळून म्हणाले ‘‘आमच्या अमूर्त भेटीला मूर्त स्वरूप दिले असते तर आम्ही दोघेही कोसळून, उन्मळून पडलो असतो’’. माझ्या निर्मितीचे केंद्र माझा मास्टर आणि माझ्या आईकडे आहे असे ग्रेसचे सांगणे होते.
संध्याकाळ ही कायम ग्रेसची निर्मिती वेळ राहिली. संध्याकाळ, कातरवेळ, सांजवेळ हे तिन्ही शब्द सूर्यास्ताच्या आणि चंद्रोदयाच्या मधल्या काळाचे सूचन करतात. पण त्यातल्या अर्थामध्ये सूक्ष्म भिन्नता आहे. ही भिन्नता ग्रेसच्या कवितेमध्ये ठळकपणे जाणवते. या तिन्ही शब्दांच्या अर्थाचा समुच्चय करून ग्रेसने ‘साजणवेळ’ या अनोख्या शब्दाचा उपयोग केलेला आहे.
अनेक प्रथितयश संगीतकारांना ग्रेसच्या शब्दांनी मोहिनी घातली. एकाच वेळी पराकोटीची टीका आणि वाचक, रसिकांचे उत्कट प्रेम वाटय़ाला आलेला ग्रेससारखा ‘कलाकार’ खचितच सापडेल. समकालीन कवींना निसर्गकवी, प्रेमकवी, सामाजिक कवी अशी बिरुदे मिळत असताना ग्रेसच्या माथ्यावर मात्र दुबरेधतेचा शिक्का बसला. ‘आय वॉण्ट टू सी माय क्रेडल अ‍ॅण्ड ग्रेव्ह, बोथ हॅंगिंग’. म्हणणाऱ्या ग्रेसनेदेखील तो शिक्का पुसण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला नाही. टीकेमुळे असो वा स्वभावामुळे ग्रेसचे लोकांत मिसळणे मात्र कमी कमी होत गेले. पण ग्रेसवर मनापासून प्रेम करणाऱ्या वाचकांनी ‘आंधळ्या वाटेवरून’ त्यांचा माग काढलाच. कदाचित हेच त्यांनी ‘फुंकर’ या कवितेच्या एका कडव्यातून (‘निवडुंग’ चित्रपटातील ‘घर थकलेले संन्यासी’ या गाण्यातून) सूचित केलेले असावे.
‘‘मी भिवून अंधाराला अडगळीत लपुनी जाई
ये हलके हलके मागे या दरीतली वनराई’’
यातील अंधार ही प्रतिमा टीकेसाठी आणि वनराई ही प्रतिमा वाचकांच्या टवटवीत हिरव्या प्रेमासाठी असू शकेल.
ग्रेसना हा अर्थ अभिप्रेत नसेलदेखील. पण ‘कवितेच्या अर्थावर माझा अधिकार नाही’ असे ग्रेसने नेहमीच सांगितले आहे. ग्रेसच्या कवितेचा प्रत्येक वेळी वेगळा अर्थ लागतो आणि ग्रेसच्या मनातील आंदोलन आणि वाचकाच्या मनातील आंदोलन यामध्ये ती एका विशिष्ट क्षणी सेतू निर्माण करते. हेच ग्रेसची कविता ‘समजली’ नाही तरी ‘आपली’ वाटण्याचे कारण असावे. जी.एं.च्या पत्रवेळेतील एका उल्लेखाप्रमाणे ज्या कवितेमुळे कायिक संवेदना उदा. अंगावर रोमांच येणे, स्तब्ध वाटणे, डोळ्यात पाणी येणे इ. निर्माण होतात ती कविता सर्वश्रेष्ठ असते. या निकषानुसार ग्रेस हे अभिजात आणि त्यांच्याच भाषेत प्राचीन कवी होते हे मान्य करावे लागते.
आपल्या पुरातन, प्राचीन साउल धर्माशी कायम एकनिष्ठ राहिलेल्या ग्रेसने आणि त्यांच्या कवितेने कधीच कोणाचे िमधेपण स्वीकारले नाही की पुरस्कार, मानमरातब यांची तमा बाळगली नाही. अधिमान्यतेची असूया बाळगली नाही. ‘व्हेन यू हॅव फिनिश्ड विथ अदर्स दॅट इज माय टाईम.’ हे ग्रेसचे वाक्य त्यांना मिळालेल्या पुरस्काराच्या आणि त्यांच्या वेळेच्या बाबतीत तंतोतंत लागू पडले. त्यामुळेच ‘विदर्भ भूषण’ पुरस्कार स्वीकारताना ‘‘आता या पशांचं मी काय करू? थोडे आधी मिळाले असते तर मी श्ॉम्पेन आणि सिगरेट तरी प्यायलो असतो आणि विदर्भभूषण दिलात म्हणून तुम्ही चिंता करू नका, मी आताच स्पष्ट करतो की मी ‘महाराष्ट्रभूषण’च्या शर्यतीत नाही.’’ असे ते थेट मुख्यमंत्र्यांना बोलू शकले. ‘साहित्य अकादमी’ पण त्यांनी गाजावाजा न करता स्वीकारला तो ‘द पोलाइटनेस ऑफ माय पोएट्री इज ऑलवेज बिहांइंड द कर्टन. बट इट इज ऑलवेज अबाव्ह द डोअर’ या नेमस्तपणामुळेच.
माणूस असो की देव, त्यांना कधी ना कधी दु:ख, वेदना यांच्याशी सामना करावा लागतो. त्यामुळे या दु:खाची जाणीव अत्यंत प्राथमिक अवस्थेत करून देणे इष्ट ठरते. या जाणिवेची व्यवस्था ग्रेसने आपल्या ‘निरोप’ या कवितेतून खालीलप्रमाणे केलेली आहे -
‘‘मी खरेच दूर निघालो तू येऊ नको ना मागे
तळहातावरचा फोड फुटणार अशा अनुरागे
वेदनेला नसते वीण पडछाया तुडवीत जाणे
अंगाईत मुलांना तू सांग इतकेच गाणे’’
वेदना, कारुण्य, दु:ख यांनी ग्रेसची कविता समग्र व्यापलेली आहे हे दु:ख व्यक्त करण्यासाठी, वेदनेचा आकांत करण्यासाठी प्रतिमांचा वापर केल्यामुळे. दुबरेधता हे ग्रेसच्या कवितेचे अटळ प्राक्तन ठरते. ग्रेसची कविता उमजण्यासाठी नाही, तर अनुभवण्यासाठी आहे हे ज्यांना समजले ते ग्रेसच्या कवितेत वितळले आणि एकरूप झाले आणि समृद्ध झाले.
२६ मार्च २०१२ रोजी ग्रेसचे कर्करोगाबरोबरचे युद्ध त्यांचे ‘रक्तगंधाचे दिवे’ मालवूनच संपले.
‘‘माझ्या कुळाप्रमाणे मृत्यू मला दुपारी
आईस दर्पणातून बोलावतात घारी’’
असे लिहिणाऱ्या ग्रेसला मृत्यू मात्र सकाळी आला. ग्रेस गेले आणि साहित्य विश्वात एक पोकळी निर्माण झाली.
‘‘घरभर सारणाचे पात्र सांडून जाई.
फिरूनी माझा पुन्हा र्निवश होई’’
असे ‘ओल्या वेळूच्या बासरी’तून प्रतिपादन करताना ग्रेसने आपला वारसदार सोडाच, पण उत्तराधिकारीदेखील कोणी नाही हे कदाचित सूचित केलेले आहे. त्यामुळे ही पोकळी भरून येणे खूप अवघड आहे.
परंतु आपल्याला जे समृद्ध केलेले आहे त्याची कृतज्ञता आज ग्रेस नाहीत तरी किंवा ग्रेस नाहीत म्हणूनच आग्रहीपणे व्यक्त केली पाहिजे, आणि त्यासाठी ग्रेसने माझ्या झोळीत टाकलेल्या शब्दांचाच आधार घेणे क्रमप्राप्त आहे.
‘‘आभाळातून गळते माती वारा उदास भटके
तू गेल्यावर साजणवेळी शब्द झाले पोरके.’’
चंद्रमाधवीच्या प्रदेशाचा शेवट करताना ग्रेसने रवींद्रनाथ टागोरांचे एक वाक्य उद्धृत केलेले आहे- ‘अ‍ॅण्ड व्हेन माय व्हॉइस इज सायलेंट इन डेथ, माय सॉंग विल स्पिक इन युवर लिव्हींग हार्ट ’ हे भा. रा. तांब्यांच्या ‘‘मी जाता राहील काय. जन पळभर म्हणतील हाय हाय’’ या विदग्ध सत्यापेक्षा निश्चित आशादायी आहे. हा आशावाद ग्रेसनेदेखील केव्हाच व्यक्त केला आहे
‘‘ते झरे चंद्रसजणांचे ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया’’
ग्रेस कुठेतरी उगवले असतील आणि ‘रहस्य शरणाची दैवी लिपी’ पुन्हा घेऊन येतील हा आशावाद आपण बाळगण्यास काय हरकत आहे?
response. lokprabha@expressindia. com