५ एप्रिल २०१३
मथितार्थ
चित्रकथी
फोटो गॅलरी

एप्रिल-फूल विशेष
‘ब्रेकिंग न्यूज’.. : काँग्रेसचे ‘संकटमोचक’
एप्रिल फूल बनाया..
माझा कपडे धुण्याचा छंद
‘फूल डे’चे राडे!
मराठी भाषेतले एप्रिल फूल
चार दांडय़ा, एक फूल..
एप्रिलमधले ‘रावणायण’
रेडिओवरचे एप्रिल फूल
पक्या.. पिऊ आणि पाणी!
सेलिब्रिटी एप्रिल फूल

अर्थसंकल्प विशेष

क्रीडा

स्मरण
चर्चा
सेकंड इनिंग
आरोग्यम्
भन्नाट
कविता
पाठलाग
माझं शेतघर
शब्दरंग
संख्याशास्त्र
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
गृहप्रवेश
सिनेमा
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

पाठलाग

राखरांगोळी
निशांत सरवणकर

नांदेडमधील सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यातील. लोंढे सांगवी शिवारात एका कालव्यात ३० ते ३५ वर्षे वयाच्या अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला. जीन्स व टीशर्ट घातलेल्या मृतदेहाचा चेहरा जाळण्यात आला होता. सोनखेड पोलीस ठाण्याचे हवालदार हेमंत देशपांडे आणि शिपाई सुनील गट्टेवार घटनास्थळी आले. मृतदेह ताब्यात घेऊन त्यांनी पंचनामा केला. मृतदेहाला कोणी ओळखतो का, याचीही चौकशी केली. परंतु उपयोग झाला नाही. त्यानंतर मृतदेह शवचिकित्सेसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटावी, यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु काहीएक फायदा झाला नाही. त्यामुळे नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे मृतदेहाची छायाचित्रे काढून वर्णनासह ती राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना पाठविण्यात आली. परंतु बराच काळ काहीही माहिती मिळत नसल्यामुळे पोलिसांनीच मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. तोपर्यंत शवचिकित्सेचा अहवाल मिळाला. पोलिसांच्या संशयानुसार, सदर इसमाच्या डोक्यावर प्रहार करण्यात आला होता. त्याचा खून झाल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे अर्थातच खुनाचा गुन्हा दाखल करून अज्ञात मारेकऱ्यांचा शोध सुरू करण्यात आला.
हा तपास सहायक निरीक्षक एस. डी. नरवाडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. जिल्हा अधीक्षक व्ही. एन. जाधव, अप्पर अधीक्षक तानाजी चिखले, उपअधीक्षक यशवंत साळुंके यांनी कोणत्याही परिस्थितीत खुनाची उकल झाली पाहिजे, असे नरवाडे यांना बजावले. नरवाडे यांनी सर्व लक्ष याच प्रकरणावर केंद्रित केले होते. त्यासाठी मृतदेहाची ओळख पटणे आवश्यक होते.
संबंधित पोलीस ठाण्यांशी ते संपर्कात असतानाच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील एका तक्रारीने त्यांच्या आशा पल्लवित झाल्या. नरवाडे यांनी तात्काळ नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. श्रीनिवास देशपांडे हे आपले बंधू श्रीकांत याचा शोध घेत होते. त्यांना छायाचित्रे दाखविण्यात आली. श्रीनिवास यांना भावाला ओळखता आले नाही. मात्र त्यानंतर आलेल्या त्यांच्या लहान भावाने छायाचित्रातील मृतदेह आपल्याच भावाचा असल्याचे सांगितले.
अखेर मृतदेह श्रीकांत देशपांडे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. सोनखेड परिसरातील सिडको वसाहतीत राहणाऱ्या श्रीकांतचे जिंदमनगर येथे तुळजाभवानी मातेचे मंदिर होते. तेथे तो पुजाऱ्याचे काम करायचा. त्याचा छायाचित्रणाचा व्यवसायही होता. घराशेजारी राहणाऱ्या सुमन ठाकूर हिच्याशी त्याचे प्रेमसंबंध होते, इतकी माहिती मिळाल्यावर नरवाडे यांनी तपास सुरू केला होता. साध्या वेशातील पोलिसांना पाठवून मंदिर परिसरात त्यांनी माहिती घेतली. तेव्हा श्रीकांतचे दोन अनोळखी व्यक्तीबरोबर भांडण झाले होते, असे कळले. त्यातच मद्यपानाची सवय असल्याने श्रीकांतचे अनेकांशी विनाकारण वाजत असे, असेही चौकशीत निष्पन्न झाले.
श्रीकांतचा मृतदेह मिळाला त्या दिवशीही त्याचे सुमनशी क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते. दारूच्या नशेत तर्रर असलेल्या श्रीकांतचे त्यानंतर राजू निलावार आणि सुरेश मोरे यांच्याशीही वाजले होते. या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. तीन मुलांची आई असलेल्या सुमनवरही पाळत ठेवण्यात आली. नवरा प्रेमसिंग ठाकूर याला सोडून ती श्रीकांतसोबत राहत असल्याची माहिती मिळाली. तिचीही चौकशी झाली. परंतु काहीही निष्पन्न झाले नाही. तिच्या हालचालींवर पाळत ठेवण्यात आली. त्यातूनही काही संशयास्पद निष्पन्न होत नव्हते. पण दुसरा नवरा मेल्याचे या बाईला काहीही वाटत नाही, असे तिच्या वागण्यातून पोलिसांना जाणवत होते. त्यामुळे नरवाडे यांनी पुन्हा तिची चौकशी करायचे ठरवले. तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. नरवाडे यांच्या चौकशीपुढे ती फार काळ तग धरू शकली नाही.
तिचा पहिला नवरा प्रेमसिंग हा सुरक्षारक्षक होता. परंतु या दाम्पत्यामध्ये सतत भांडणे होत असत. प्रेमसिंग आणि श्रीकांत हे मित्र होते. ती नवऱ्याकडून होत असलेल्या अत्याचाराची कहाणी श्रीकांतला ऐकवत असे. अखेरीस उदरनिर्वाहासाठी तिनेही सुरक्षारक्षकाची नोकरी पत्करली होती. एकाच कंपनीत काम करीत असल्यामुळे दोघांमध्ये वारंवार खटके उडत. प्रेमसिंग कामावर निघून गेल्यावर सुमन आपले मन श्रीकांतपुढे मोकळे करीत असे. तब्बल सहा वर्षे हा प्रकार सुरू होता. अखेरीस २०१०मध्ये सुमनने नवऱ्याला सोडचिठ्ठी देऊन श्रीकांतशी लग्न करण्याचे ठरविले. आपल्या तीन अपत्यांसह ती श्रीकांतसोबत राहू लागली. परंतु श्रीकांतला अपत्यांबाबत काहीही वाटत नसे. विक्षिप्त वागणूक अन् सततचे मद्यपान करणाऱ्या श्रीकांतमुळे सुमनला आपण आगीतून फुफाटय़ात पडल्याची जाणीव झाली होती. एकदा तर श्रीकांतने सुमन ज्या कंपनीत सुरक्षारक्षकाची नोकरी करीत होती तेथे जाऊन तिला शिवीगाळ केली. त्यामुळे त्याला सोडचिठ्ठी देण्याचे सुमनने ठरविले होते. परंतु प्रत्यक्षात निर्णय होत नव्हता. एकेदिवशी मद्याच्या नशेत तर्र असलेल्या श्रीकांतने सुमनच्या १६ वर्षे वयाच्या मुलीला विचित्र पद्धतीने हात लावला. तेव्हा मात्र सुमनच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ‘ही काय माझी मुलगी आहे? काय झाले जरा हात लावला तर..’ हे शब्द ऐकून सुमनने ठरविले की, याला संपवून टाकायचे.
गुन्ह्य़ाच्या दिवशी स्वत:च सुमन दारूच्या बाटल्या घेऊन आली. श्रीकांतला घेऊन फिरायला गेली. शेताच्या बांधावर त्याला भरपूर दारू पाजली. दारूच्या नशेत रममाण झालेल्या श्रीकांतसमवेत प्रेमाचे नाटक केले. थोडय़ा वेळाने तो झोपला. तो झोपल्याचे पाहून तिने एक मोठा दगड उचलून दोन-तीन वेळा त्याच्या डोक्यात घातला. रक्तबंबाळ श्रीकांत निपचित झाल्यानंतर सुमनने दगडाला लागलेले रक्त धुऊन टाकले. त्यानंतर श्रीकांतच्या तोंडावर दारू ओतून चटईला आग लावली. आगीचा मोठा लोळ उठला. गावकरी जागे होतील या भीतीने श्रीकांतला फरफटत कालव्यात टाकले आणि ती शांतपणे घरी निघून गेली. तिच्या दुसऱ्या संसाराची तिने अशी राखरांगोळी केली. आज ती तुरुंगात आहे अन् तिची तीन मुले पोरकी झाली आहेत.
response.lokprabha@expressindia.com