५ एप्रिल २०१३
मथितार्थ
चित्रकथी
फोटो गॅलरी

एप्रिल-फूल विशेष
‘ब्रेकिंग न्यूज’.. : काँग्रेसचे ‘संकटमोचक’
एप्रिल फूल बनाया..
माझा कपडे धुण्याचा छंद
‘फूल डे’चे राडे!
मराठी भाषेतले एप्रिल फूल
चार दांडय़ा, एक फूल..
एप्रिलमधले ‘रावणायण’
रेडिओवरचे एप्रिल फूल
पक्या.. पिऊ आणि पाणी!
सेलिब्रिटी एप्रिल फूल

अर्थसंकल्प विशेष

क्रीडा

स्मरण
चर्चा
सेकंड इनिंग
आरोग्यम्
भन्नाट
कविता
पाठलाग
माझं शेतघर
शब्दरंग
संख्याशास्त्र
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
गृहप्रवेश
सिनेमा
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

लग्नाची वेगळी गोष्ट

गृहप्रवेश
शैलजा कामत

‘लग्नाची वेगळी गोष्ट’ या उपक्रमांतर्गत कथा-

सरितेच्या लहानपणी, पत्रिका बनवतानाच, ज्योतिषांनी तिच्या लग्नाचा योग लवकरच आहे, असे सांगितले होते. सरिताच्या वडिलांना- गणेशरावांना, सारे लोक साहेब म्हणत. मोठा दरारा होता त्यांचा. वीणाताई, त्यांच्या पत्नी सुसंस्कृत, सोज्ज्वळ, कर्तव्यदक्ष गृहिणी होत्या. रतन मोठा मुलगा. सरितेचा लाडका दादा. नावाप्रमाणे दादागिरी न दाखवता बहिणीवर अपार माया करायचा.
मोठय़ा मुश्कीलीने गोड बोलून, मस्का मारून एका सहा महिन्यांच्या कोर्ससाठी सरिताने आईतर्फे वडिलांकडून परवानगी मिळवली. पण तो छोटासा कोर्सच पुढे तिची आयुष्यरेखाच पार बदलून टाकणार आहे, हे कुणाला कसे कळणार हो! ‘विधिलिखित ललाटम्’ म्हणतात ना तेच खरे! त्या कोर्समध्ये विष्णू नावाचा मल्याळी मुलगा तिचा पार्टनर होता. घरांत कधी कधी त्याचे फोन यायचे. पण तो माझा चांगला मित्र आहे असे सरिता सांगायची. तो वीणाताईंशी कधी कधी मोडक्यातोडक्या हिंदीत वा अस्खलित इंग्लिशमध्ये १५-१५ मिनिटे बोलायचा व हिंदी नीट शिकायचे आहे असे म्हणायचा. वीणाताईने रतनला त्याच्यावर बारीक नजर ठेवायला सांगितल्यावर, तो निव्र्यसनी, मिळून-मिसळून वागणारा, प्रेमळ, साधा-सरळ असल्याची सकारात्मक पावती मिळाली व वीणाताईंना हुश्श झाले.
पण एका सकाळी सरितेने विष्णू आता मला आवडू लागलाय व त्याच्याशी लग्न करण्याचे माझे ठरलेय असा गौप्यस्फोट केला. अचानक साहेबांना हे सांगायचे म्हणजे अ‍ॅटमबॉम्ब फुटण्यासारखे होणार होते. भविष्यकाळात कोणती ताटे वाढून ठेवली आहेत कोणास ठाऊक, असे वाटून वीणाताईंना त्यांच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखे वाटले.
साहेबांना रात्री शांतपणे सांगून पाहिले, पण जमदग्नीचा अवतार ते.. कसले बदलणार! त्यांनी चक्क फर्मान सोडले. हा मुलगा मला नामंजूर आहे! दुसऱ्या दिवशी सरिताने खूप विनवण्या केल्यावर त्यांनी चक्क अट घातली. मी गावाला जातोय. जमिनीच्या व्यवहाराबाबत काम आहे. एक महिनाभर तिथेच आहे. तोपर्यंत त्याच्याशी भेटायचे, बोलायचे नाही. फोनवरदेखील नाही. विचार कर तोपर्यंत, दोन्ही संस्कृतींचा मेळ बसेल का ते नीट ठरव आणि मग बघू..
सरिता तिच्या निर्णयावर ठाम होती. पठ्ठीने १५ दिवस असे न बोलून काढले. विष्णूलाही तिने बजावले होते. दोघांकडून ‘अळीमिळी गूप चिळी’ होती. पण रतनशी बोलताना वीणाताईंनी चोरून, दाराआडून ऐकले की, साहेबांनी परवानगी न दिल्यास ती पळून जाऊन विष्णूशी लग्न करेल. साहेबही १५ दिवसांतच आले. काम लवकर झाले आणि आता साहेबांकडून होणाऱ्या आकाशवाणीकडे साऱ्यांचे डोळे लागून होते. सरिता हटूनच बसल्याचे त्यांना वीणाताईंकडून समजले. म्हणून त्यांनी नाइलाजास्तव विष्णूला भेटायचे निश्चित केले. विष्णू पूर्वतयारीनिशी गड जिंकायला निघाला. सरिताकडून बरेच धडे घेतले होते. त्यांच्या पोटात मोठा गोळा आला होता. अखेर दोघेही भेटले. पण त्याला पाहताक्षणी साहेब त्याच्या प्रेमात पडले. ‘शूट अ‍ॅट फर्स्ट साईट’ म्हणतात ना तसे. त्यांना जावई एकदम पसंत पडला. जाताना विष्णू विनम्रपणे त्यांच्या पुन्हा एकदा पाया पडून म्हणाला,
‘सर..’..
‘अरे, सर नही, मुझे साहेब बोलो,’..
‘बरं साहेब! मी तुमच्या मुलीची काळजी तुमच्यापेक्षाही जास्त घेईन.’
त्यावर साहेब जोरजोराने हसत म्हणाले,
‘अरे, मला तिची काळजी वाटत नाही, मला तुझी काळजी वाटते.’
दोघेही सप्तसुरात बराच वेळ टाळ्या मारून मारून हसले. मेतकूट बऱ्यापैकी जमले. लग्नाची बोलणी करायला ते लोक भेटायला येण्याचा दिवस ठरला. त्या दिवशी रविवार होता. ठरल्याप्रमाणे आई-वडील, बहीण व मेव्हणा एवढे चार लोक आले. पार्वती अम्मा- विष्णूची आई मल्याळी पद्धतीची साडी नेसल्या होत्या. भारदस्त वाटल्या. वडील अप्पा बुटके, जाडे. अगदी पक्के साऊथ इंडियन वाटावे इतके काळेही होते. बहीण व मेव्हणेही बोलायला वगैरे सोज्ज्वळ, सज्जन वाटले. दोन ध्रुवांची भेट झाली होती. सरितेच्या अंगावर पटकन काटा आला, बापरे! या लोकांबरोबर आयुष्य काढायचे! कल्पनाच नव्हती मला. कसे होणार माझे? पण विष्णूसाठी तिने विचार झटकले. सगळं ठीक होईल. अम्मा एकसारख्या हसून ‘परवा नही’ असे म्हणत होत्या. शेवटी न राहवून सरितेने विष्णूला बाजूला घेऊन त्याबद्दल विचारले.
विष्णू म्हणाला, ‘ठीक आहे, अच्छा असं आपण म्हणतो ना, तसं..’
दुसरी कुठचीच भाषा त्या आलेल्या बायकांना येत नव्हती. शेवटी हातांनी खुणावून बोलणेच वीणाताईंना बरे वाटले व जमलेही. तशाच तासभर मजेत गप्पा झाल्या. लग्नाचा मुहूर्त काढायचे ठरवले व गोडीतच हसत-खेळत निरोप घेतले गेले. साखरपुडय़ाला चेन्नईला सर्वाना नातेवाईकांसकट खास आमंत्रण होते. मुलाचे कुटुंब केरळी असले तरी त्याच्या वडिलांच्या नोकरीनिमित्ताने गेली काही वर्षे चेन्नईत रहात होते. सगळे चेन्नईला गेले. भेटल्यावर अम्मा तिला खुणेने ‘सारी, सारी’ म्हणाल्या होत्या, म्हणजे बहुधा साडी नेसता येते का, असे त्यांना विचारायचे होते. परत ‘परवा नही’ म्हणत त्यांनी जाता जाता तिला कौतुकानं मांडीवर बसवून घेतले. साखरपुडय़ाचा थाट औरच होता. मूळ कल्पना अशी होती की ‘घरातल्या लक्ष्मीने दिव्याचा हातात प्रकाश घेऊन (म्हणजे पेटती समई न मालवू देता हातात धरून) घरात प्रवेश करायचा आणि सर्व घर तिच्या प्रकाशाने उजळून टाकायचे. तुळशीच्या पानांनी जवळजवळ या दोघांना गुरुजींनी स्नानच घातले. त्यांचे साखरपुडय़ाचे विधी दिवसभराचे होते. खूपच मजा आली. सरितेचे लाड चालले होते. दिसण्याचे कौतुक होत होते. २१ पंचपक्वान्ने केली होती. दोन मजली बंगल्याच्या गच्चीत सुंदर बहुरंगी मंडप घातला होता. सर्व तिला खूप भावले. मल्याळी भाषेत बोलताना येणारे ब्रह्मघोटाळे वाचवायला विष्णू अगदी देवासारखा सतत तिच्यासाठी धावून येत होता. विष्णूचे हिंदीही अफलातून होते. लहानापासून थोरांपर्यंत साऱ्यांना तो आदरार्थी संबोधित असे.
अखेर लग्नाचा दिवस ठरला. देणं-घेणं, खरेदी, दागिने, स्वत: साहेबांनी जातीने लक्ष घालून केले. वीणाताईंना फारच मोठा आश्चर्याचा धक्का बसला. हे कसं शक्य आहे! हे सर्व साहेबांनी जातीने केले? स्वत: केले?
लग्न म्हणजे फार मोठा सोहळा, पण सरितेसाठी मराठी की मल्याळी पद्धत, हा फार मोठा अडसर क्षणात दूर झाला. कारण त्या लोकांना आपल्या मराठी पद्धतीचे लग्न चालणार होते. भटजींना इंग्रजी, हिंदी येत असणारे असले तर बरेच सुलभ होईल का, हा प्रश्न वीणाताईंनी लीलया सोडवला. एकदा वीणाताईंच्या वेळेचे कॉलेजचे जुने वयस्क लायब्ररीयन जोशी सर रस्त्यात भेटले व बाईसाहेबांनी त्यांना लग्नाचे सांगितले, तर ते पटकन म्हणाले, ‘पौरोहित्य मीच करीन’. मग तर दुग्धशर्करा योगच म्हणायचा. अच्छा! असे म्हणून फोन नंबर घेऊन वीणाताई खुशीने त्यांना आमंत्रण देत्या झाल्या.
मुलाकडची मंडळी लग्नाच्या दिवशी सकाळी लवकरच पण वेळेवर आली. ९.५५ चा मुहूर्त. गौरिहार पुजणे म्हणजे काय? त्या लोकांना मोठे कुतूहल. मग विष्णूला वीणाताईंनी सारे समजावून सांगितले आणि ते आप्पांना सांगून अम्मा कंपनीपर्यंत पोहोचलेदेखील. आता अम्मा खुशीत दिसत होत्या, पण त्याला दुसरेच कारण होते. त्यांच्याकडे फुले माळण्याचा जो सोहळा लग्नात असतो तसेच विष्णूच्या सांगण्यावरून सरिताला केस लांब करून (गंगावनाने) सजवले होते. जोडीला काठापदराची हिरवीचुटूक साडी व हिरवागार चुडा भरला होता. मध्ये-मध्ये अम्माने पाठवलेल्या सोन्याच्या बांगडय़ा चुडय़ात उठून दिसत होत्या. पुढे वीणाताईंचे तोडे. नाकात डाव्या बाजूला घातलेली चापाची नथ त्यांच्या पद्धतीप्रमाणे उजव्या बाजूला तर घालायला लावणार नाहीत ना, या काळजीत वीणाताई होत्या पण सुदैवाने सर्व ठीक झाले. सरिता खूपच गोड दिसत होती. विष्णू डोळ्याच्या कोपऱ्यातून सारखा तिच्याकडे चोरून चोरून बघत होता. हे बऱ्याच जणांच्या नजरेतून सुटले नसावे. साहेबांची तारांबळ चालली होती. एरवी कडक, नेपोलियनसारखे असणारे साहेब अगदी सुतासारखे सरळ, नरम वागत होते. कर्तव्यतत्परता दाखवून व्याह्य़ांकडच्या मंडळींचे हवे-नको ते जातीने बघत होते. इतक्यात अच्चा, चेटा, चेटी अशा हाका मारीत त्यांच्यातील एक व्यक्ती आतल्या खोल्यांच्या दिशेने धावत आली. याचा अर्थ काय? साहेब बुचकळ्यात पडले. अच्चा म्हणजे अरेच्या तर नक्कीच नाही. चेटा, चेटी म्हणजे काय असेल, कोणाचे नाव असेल का? छे, कसे शक्य आहे! एखाद्या पदार्थाचे नाव? कोण जाणे! शेवटी ते ‘आ’ वासून बघेपर्यंत ती व्यक्ती त्यांच्यासमोरच येऊन थबकली व त्यांनी हे शब्द प्रश्नार्थकपणे साहेबांना विचारले. अर्थातच मोठा तोंडाचा चंबू करून साहेब त्यांच्याकडे बघतच राहिले. क्षणभर शांतता! इतक्यात विष्णू तातडीने तिकडे आला व त्याने सांगितले अच्चा, वडिलांना म्हणतात. अप्पादेखील. आणि चेटा-चेटी म्हणजे नणंदेचा नवरा व नणंद. सर्वत्र हशा पिकला. लग्नात थोडे हलकेफुलके वातावरण नकळतच अशा प्रकारे निर्माण होत होते.
आता आरशात तोंड बघण्याचा प्रसंग सुरू होणार होता. ‘सुनेला मांडीवर घ्या,’ गुरुजी गरजले. सरिता लाजत लाजत स्टेजवर आली. इतक्यात अम्मांनी तिला इरिकी, इरिकी, असे म्हणत हाताने मांडीवर बसवण्याचा प्रयत्न केला बहुतेक ‘बस’ म्हणत असावी असा ठोकताळा बांधून सरिता अवघडून त्यांच्या मांडीवर बसली.
मुख्य कार्यक्रम मुहूर्ताआधी सुरू झाला तो म्हणजे स्टेजवर मुलाकडच्या व मुलीकडच्या लोकांचे भटजींबरोबरचे पूजाविधी. एकापाठोपाठ व आळीपाळीने सर्व विधी यथोचित व यथासांग झाले पाहिजेत या साहेबांच्या म्हणण्याला विष्णूकडून पाठिंबाच मिळाला. एवढा शिकलेला मुलगा पण किती सुशील, विचारी, विनम्र सारे म्हणाले. आपलं कौतुक करताहेत एवढं विष्णूला कळत होतं व मूठभर मासही चढलं होतं एव्हाना!
जोशी गुरुजींनी नेहमीच्याच थाटात पूजा सुरू केली. आई-वडील आणि विष्णू शांतपणे पाटावर विराजमान झाले होते. गणपतीस्तोत्र म्हणून झाल्यावर, ‘नमस्करोमी! कुंकू लावावे वीणाताईंनी’, विहीणबाईंना गुरुजी म्हणाले. पण अम्मांनी खाली मान घातली होती. गुरुजी म्हणत होते, ‘हात हाताला लावा.’ इंग्लिशमध्ये म्हणाले, ‘टच युवर हॅण्ड टू युवर हसबंड्स हॅड! डोंट लीव्ह’ अम्मा त्यांचा हात हातात धरून घट्ट पकडू लागल्या आणि सर्व हसू लागले. जोशी गुरुजींनाही हसू आवरेना, अम्मा मात्र ओशाळल्या. ‘नॉट लाइक धिस.’ आप्पांनी असे सांगून खुणेने हात सोडायला सांगितले. अम्मांनी हात अलगद सोडवला. ‘एक्सप्लेन मी हाऊ?’ गुरुजींनी हातांना हात लावून दाखवले. ‘ओके ओके ’ आप्पा शांत झाले. गाडी पुढे सरकली. विष्णू, आप्पा अम्माला ते सावरून घेत होते. वेल्लम् वेल्लम् म्हणजे पाणी, आतापर्यंत साऱ्यांनाच समजले होते. पाणी सारखे ताम्हणांत सोडावे लागत होते. अम्मांनी साथ चांगली दिली. विष्णू धोती (लुंगी) घालून दिमाखात बसला होता. त्याने लग्न होईपर्यंत धोती नेसावी अशी आप्पा-अम्मांची इच्छा होती. तो वीणाताईंना त्यांचा राजबिंडा जावई खूपच राजबिंडा दिसत होता. वीणाताईंना जावई खूपच आवडला होता. माझीच दृष्ट त्याला लागणार नाही ना, असे त्यांना वाटत होते. गुरुजींनी ‘स्टॅँड अप, अ‍ॅण्ड टेक सर्कल्स अराऊंड यू’ असं म्हटल्यावर अप्पांनी अम्माला ‘शेरी शेरी’ असे काही तरी म्हणून गिरक्या घ्यायला हळूहळू फिरावयाचे होते पण अम्मा इतक्या जोरात गिरक्या घेऊ लागल्या की बापरे! केव्हाही पडल्या असत्या. तेवढय़ात वीणाताईंनी त्यांना अलगद थांबवले व हाताने ‘पुरे’ असे सांगितले.
सुनेची ओटी भरणे करताना अम्मांना कसे समजवायचे असे वीणाताईंना झाले, अम्मांची पद्धत गुरुजींना मान्य नव्हती. शेवटी त्यांनी ‘टेक सारी अ‍ॅण्ड कोकोनट ’ इतक्यात सॉरी, सॉरी म्हणत गुरुजी मोडक्या तोडक्या हिंदीत बोलू लागले ‘नारळ लेना और साडी लो, पदर पसरो..’ रतनच्या लक्षात आला हा सारा गोंधळ! व त्याने विष्णूला सर्व प्रकार नीट समजावून सांगितला व ओटी भरणे यथासांग पार पडले. नंतर कानपिळणी व आरशात सूनमुख बघणे हे विधी अजून व्हायचे होते. विष्णूला रतनने थोडक्यात विधी सांगितला. आणि कान पिळणार हे ऐकल्यावर, ‘व्हॉट?’ असे म्हणून विष्णू पाटावर ताडकन् उभा राहिला. ‘माय गॉड,’ विष्णू म्हणाला. पण रतनने हळुवारपणे त्याचा हात दाबून त्याला घाबरू नकोस असा दिलासा दिला. विष्णू तरीदेखील भीतभीतच पाटावर बसला व सरिताच्या मामेभावाने कानपिळीचा चांगलाच चान्स मारला. विष्णू ओरडला खरा पण भावाची वीणाताईंकडून कमाईही झाली त्याबदल्यात. स्वारी खूश होऊन परतली पण विष्णूचा आंबट-चिंबट झालेला चेहरा मात्र कायम लक्षात राहिला असेल सगळ्यांच्या.
अम्मा तर बऱ्याच बायकांच्या कानात या प्रकाराने वैतागून कुजबुजताना दिसल्या. पण आप्पा मात्र आपण या गावचेच नाही व सर्व काही ठीक चाललेय अशा आविर्भावात होते. हे सर्व होईपर्यंत साडेबारा वाजले. जेवायला खूपच उशीर होईल बहुतेक असे वाटत होते. आता आरशात तोंड बघण्याचा प्रसंग सुरू होणार होता. ‘सुनेला मांडीवर घ्या,’ गुरुजी गरजले. मराठीत बोललेले त्यांच्या लक्षातच आले नाही. ‘लवकर घ्या, लवकर घ्या.’ अम्मांच्या चेहऱ्यावर मोठे थोरले प्रश्नचिन्ह पाहून आपली चूक त्यांच्या लक्षात आली. इतक्यात कोणी तरी आप्पांकरवी हा प्रश्न सोडवला. सारेच आता भाषांतर करू पाहत होते. स्टेजवर हल्लागुल्ला वाढला होता. इंग्लिश- मराठी शब्दांचा शब्दकोश उलगडायची जणू स्पर्धाच लागली होती. इतक्यात गुरुजींनी सरिताला हाक मारली. सरिता लाजत लाजत स्टेजवर आली. इतक्यात अम्मांनी तिला इरिकी, इरिकी, असे म्हणत हाताने मांडीवर बसवण्याचा प्रयत्न केला. बहुतेक ‘बस’ म्हणत असावी असा ठोकताळा बांधून सरिता अवघडून त्यांच्या मांडीवर बसली. सासूबाई सारख्या तिच्या केसावरून व पाठीवरून हात फिरवत होत्या आणि गंगावन लावलेले केस सुटणार तर नाहीत ना या काळजीत ती होती. लवकर एकदा आरसा दाखवून आटपत का नाहीत हे? असं सरिताला वाटलं. क्षणार्धात आरसा तिच्या हातात आला, पण अम्मा मात्र गोंधळलेल्याच होत्या. त्यांना जेव्हा वीणाताईंनी शृंगार साहित्य ओटीत दिले व त्यांनी सुनेचे मुख आरशात एकत्र पाहिले तेव्हा अम्मा, खूपच गोंधळल्या. न राहवून त्यांनी सरितेच्या कपाळाचे चुंबन घेतले व दोन्ही हात कपाळावर मोडून नजर न लागण्याची खबरदारी घेतली. फोटोग्राफर त्यांचे काम करत होते. मांडीवरून उतरण्यापूर्वी सुनेला गोड घास भरवायचा रिवाज आहे. ‘गिव्ह स्वीट’ गुरुजी म्हणाले, अम्मा खुशीत मधुरम् मधुरम्? असे गुरुजींना विचारत्या झाल्या. ‘येस येस’. गुरुजींनी मान हलवली, अंदाजे. अम्मा हातातल्या पेढय़ाकडे बघत होत्या. पेढा कोणी तरी खायचा आहे हे नक्की, पण कोणी? सुनेने की त्यांनी? त्या गोंधळल्या व कावऱ्याबावऱ्या स्थितीत असतानाच गुरुजी खुणेनेच ‘भरवा सुनेला,’ असे म्हणाले. आता गुरुजींनी भाषेची दरी कमी करून खुणांचा वापर सुरू केला असावा, कारण तेच त्यांना पथ्यावर पडणार होते.
एकूण आरसा प्रकरण सरिताला खूप आवडले, म्हणजे ती अम्मांना आवडल्याची पावतीच तिला मिळाली होती. पहिल्या भेटीत वीणाताईंशी खुणावून बोलताना अम्मांना लांब केसाची मल्याळी मुलगीच हवी होती, असे त्यांनी निराशेने सांगितलेले सरिताला आठवले. पण आता तर चक्क त्यांना काहीच अडचण दिसली नाही. माझे केस आखूड आहेत हे त्यांना माहीत आहे ना, असो क्षणात तिने विचार झटकला व खूश राहायचे ठरवले. पुढे नाव बदलणे, मंगळसूत्र घालणे हे विधी होतेच. आप्पा गुरुजींना ‘स्टॉप फॉर समटाइम’ ‘नन्नी’ नेन्नी’ असे म्हणाले. गुरुजी आ वासून बघतच राहिले. इतक्यात विष्णूने सांगितले, ‘नन्नी म्हणजे थॅँक्स ’ हुश्श करून आप्पा-अम्मा जीव मुठीत घेऊन कधी एकदा मल्याळी बोलतोय असे वाटून आतल्या खोलीत त्यांच्या नातेवाईकांशी गप्पा मारायला गेलेही.
सरिताचं कसं होणार, किती वेगळे लोक, किती वेगळी संस्कृती, किती वेगळ्या चालीरीती, रीतीभाती, बाप रे! वीणाताईंना साहेब सांगत होते. एवढा वेळ गप्प असलेले साहेब गंभीर होऊन धडाधडा पाठ केलेल्या भाषणासारखे एकतर्फीच बोलत होते.
सगळेजण जेवायला बसले. गुरुजींनी हात जोडून ‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे’ हा श्लोक म्हटला, पण लोकांनी आधीच जेवायला सुरुवात केली होती. ‘थांबा!’ कोणीतरी ओरडले, विष्णूच्या हातातला घास नकळत खाली पडला. सरिताही घाबरली. जानकी काकू केवढय़ाने ओरडल्या होत्या.
दोन वेळा साडय़ा बदललेल्या सरिताला विष्णूचा धोतीतला अवतार बघून कंटाळा आला होता. पण गुरुजींनी कपडे बदलायला नकार दिल्याने (त्या लोकांच्या सांगण्यावरून) सरिताला ‘आलीया भोगासी असावे सादर’ असे म्हणून निमूटपमे गप्प बसण्याशिवाय गत्यंतरच नव्हते. विष्णूला लावलेल्या फुलांच्या मुंडावळ्यांचा अतिशय कंटाळा आला होता. त्याला सरिताचा चेहरा नीट बघता येत नव्हता. हाताने मुंडावळ्या धरून धरून तो जेरीस आला होता. वैतागून तो सरिताला म्हणाला ‘अब मैं ये फेक देनेवाला हूँ’ पहिल्यांदाच तो इतका चिडला होता. सरिताने घाबरून गुरुजींकडे पाहिले. त्यांनी मोत्याच्या मुंडावळ्या लावण्यास सांगून विष्णूला शांत केले.
आता मंगळसूत्र व सप्तपदी! विष्णू मंगळसूत्र हातात धरून सरितेच्या गळ्यात घालणार इतक्यात अम्मा, ‘ताली, ताली’ असे मोठमोठय़ाने ओरडू लागल्या. त्यांचा रोख विष्णूकडे होता. विष्णूकडे त्यांची आई टाळी का मागतेय असे साऱ्यांना वाटले. विष्णूच्या लक्षात आल्यावर त्याने तात्काळ साऱ्यांचे शंकानिरसन केले ‘ताली’ म्हणजे मल्याळीमध्ये मंगळसूत्र. एक सोन्याच्या चेनमध्ये शंकराच्या पिंडीसारखे दिसणारे लॉकेट घालतात व तेच बायकांचे मंगळसूत्र. विभूती लावण्याचा प्रकारही सरिताला अगदी आवडला नव्हता. सर्व बायका-पुरुष देवळात गेल्यावर, आंघोळ केल्यावर व कुठल्याही पवित्र वेळी हे कपाळाला लावतात. लगेचच दोन्ही मंगळसूत्रे विष्णूने सरितेच्या गळ्यात तत्परतेने घातले. आता खऱ्या अर्थाने सरिता विष्णूची झाली.
सुवर्णयोग साधल्यासारखा किंवा गड जिंकल्यासारखा आविर्भाव जोशी गुरुजींच्या चेहऱ्यावर दिसला. घाई लागल्याप्रमाणे, सप्तपदीची तयारी करा, असे ते मोठमोठय़ाने ओरडू लागले. एव्हाना लहान मुलं असलेली सरितेची नंणद नखशिखांत घामाने भिजली होती. मुंबईचा उन्हाळा त्या लोकांना सहन होईनासा झाला होता. थंड पेये भराभर संपत होती आणि इतक्यात गुरुजी चक्क हातात माईक घेऊन ‘कम कम, नाऊ सप्तपदी ’ असे नव्या दमात म्हणाले. या प्रकाराबद्दल सविस्तरपणे जोशींकडून समजून घेऊन विष्णूने आपल्या आत्त्या-मावशांना त्यांच्या भाषेत व्यवस्थित सांगितले. त्यांच्याकडे उच्चशिक्षित मंडळी फार कमी वाटली. साऱ्यांचा गराडा होमकुंडाभोवती झाला. अगोदर लाह्य़ा, तूप टाकून होमकुंडात अग्नी पेटल्यावर सप्तपदीची सुरुवात नवरा-नवरीच्या शेले-उपरण्याला गाठ मारून करायची होती. नाव घ्यायला नणंदेला बोलवले. पण तिला जमणार नाही म्हणून सरितेच्याच मावस बहिणीने नुसतेच यजमानांचे नाव घेऊन गाठ बांधली. विष्णूपंत तिळमात्रही कंटाळलेले चेहऱ्यावरून दिसत नव्हते. अगदी उत्साह पहिल्या क्षणापासून होता तसाच होता. कदाचित सुंदर सरिताकडे बघून बघून तो द्विगुणितही झाला असेल. सरिता मात्र पुरती वैतागली होती. होमकुंड पाहून ती मनोमनी घाबरली होती कारण इतर लग्नात हाच भयानक धूर तिला अल्लाउद्दीनच्या दिव्यातून येणाऱ्या धुरासारखा त्रासदायक वाटत असे. डोळे चोळून चोळून चेहऱ्यावरचा मेकअप तर कमी होणार नाही ना, अशी एक पुसटशी शंका तिच्या मनात डोकावली.
तूप आणि लाह्य़ा दोघांनी एकत्र ओंजळ करून हळूहळू कुंडात सोडायच्या होत्या. करताना तिला जरी शहारल्यासारखं वाटत असलं तरी मनातल्या मनात खूप गुदगुल्या होत होत्या. खरंच! आजचा दिवस किती छान आहे नाही, असा विचार मनात येतो न येतो तोच सूर इतका वाढला की डोळे चोळून चोळून विष्णू आणि ती अक्षरश: दमले. अम्मा घाबरली, ‘अय्यो, अय्यो ईश्वरा, विष्णू पूवा। सरिता पूवा ।’ असे सारखे म्हणू लागली. विष्णू सरिताला अम्मा मल्याळी भाषेत त्याला इथून जाण्यास सांगते आहे असे म्हणाला. पण ते शक्य नव्हतं. गुरुजींनी नकार दिला. पण साहेब आणि आप्पा मात्र बाहेर गेले. गुरुजींनी उगीचच काळा चष्मा लावला. सर्वजण पटापटा बाहेर जाऊ लागले. इतक्यात दुसरा एक भटजी हातात फुंकणी घेऊन आला व होमकुंडातील धूर फुंकर घातल्यामुळे हळूहळू विरून ज्वाला दिसू लागल्या. हायसे झाले. सगळ्यांना त्या लोकांना तर अग्निदिव्य पार पडल्यासारखे वाटले.
आता वेळ आली सप्तपदीची.
‘व्हॉट इज दॅट’ सप्तपदी! सप्तपदी?’ विष्णूने विचारले. गुरुजी म्हणाले ‘सी हिअर ’
गुरुजींनी सात ठिकाणी थोडे थोडे तांदूळ ठेवले होते.
विष्णू म्हणाला ‘इसको खाने का तो नही? माय गॉड गुरुजी’
हे ऐकून सगळेजण हसायला लागले. विष्णू गप्पच बसला, खजील झाला. तोंड साफ पडले. सरितेला गुरुजींचा राग आलेला वीणाताईंनी टिपले.
जोशींना जरा बाजूला घेऊन त्या म्हणाल्या, ‘सर, चिडवल्यासारखे किंवा खिजवल्यासारखे वाटेल मुलाकडच्या लोकांना असे कृपया काहीही करू नका. प्लीजऽऽऽ’
‘सॉरी.. सॉरी’ जोशी म्हणाले.
आप्पा-अम्मांना काय झाले समजलेच नाही, पण आत्तापर्यंत अनेक प्रश्नचिन्हांना बाजूला सारून ते चिकाटीने व निमूटपणे सर्व विधी करत होते, पण आता मात्र त्यांची सहनशीलता हळूहळू संपुष्टात येते की काय असे वाटत होते व विष्णू त्यांना थोडय़ा थोडय़ा वेळाने मल्याळीतून धीर देत होता. अखेर सरितेने विष्णूच्या हातात हात घेऊन हळुवारपणे होमाभोवती फिरत सप्तपदी सुरू झाली. लक्ष्मी नारायणाचा जोडा अगदी शोभून दिसत होता.
कुणीतरी म्हणालेही, ‘मेड फॉर इच अदर’. प्रत्येक फेरीनंतर अगोदर सरिता व हातात हात धरलेला विष्णू हसरा चेहरा ठेवून खाली मांडलेल्या तांदळाच्या सात भागांपैकी एक एक भाग पायाच्या बोटाने सरकवत होता व एकीकडे गुरुजी लग्नबंधनाचे नियम उदाहरणार्थ बायकोशी आयुष्यभर एकरूप होऊन कशा प्रकारे वागायचे व त्यांचे पालन कसे करायचे वगैरे वगैरे शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगत होते. पण दुसरीकडे विष्णू आणि सरिता मात्र त्या दोघांच्याच विश्वात हरवले होते. त्यांचे मुळी गुरुजींच्या बोलण्याकडे तिळमात्रही लक्ष नव्हते. एकदाचे सात फेरे झाले. बघणाऱ्यांना खूप वाटले. पण विष्णू सरितेला मात्र हातातले हात न काढता असेच आयुष्यभर रहावे असेच बहुधा वाटत असावे, कारण गुरुजी हात सोडा, फेरे संपले असे बराच वेळ त्यांना सांगत असूनही हातातले हात तसेच होते. आजूबाजूला हशा पसरला. गाठ सोडवण्यासाठी या वेळी सरिताच्या मैत्रिणीला लीनाला बोलावण्यात आले. आपल्याला साडी मिळणार म्हणून तिने दणदणीत उखाणा घेतला.
‘सरितेच्या लग्नाचा फार मोठा थाट।
विष्णुदादासाठी मी सजविला रंगीत पाट।।
झाले. सप्तपदी प्रकरण संपले. लीनाने खूश होऊन नवरानवरीला घशाला कोरड पडली असेल म्हणून धावत जाऊन दोन लिंबू सरबताचे ग्लास आणले व इतरांचीही सोय केली. अम्मांना दमल्यामुळे गदळल्यासारखं वाटत होते तर आप्पांना चक्कर आल्यासारखे वाटत होते. हे गुरुजींनी हेरले आणि दहा मिनिटांकरिता साऱ्यांनाच विश्रांती घ्यायला सांगितली. नवरीचे नाव बदलण्याचा कार्यक्रम पुढे वेळेचे भान ठेवून आखला होता. जेणेकरून साधारणपणे दोन वाजायच्या सुमारास पंक्तीला बसता येईल. थोडक्यात वेळात तांदळांनी भरलेले ताट आले. विष्णू मांडी घालता झाला. अम्मांनी प्रश्नार्थकपणे ‘माटी’ असे म्हटले. विष्णूने गोंधळ टाळण्यासाठी आईला गप्प रहा असे खुणेनेच सांगितले. माटीचा अर्थ मांडी होता हे नंतर सरिताला विष्णूने सांगितले. गुरुजींनी खुणेने त्याला हातात अंगठी घ्यायला सांगितले. त्याच्या हातात साखरपुडय़ाचीच अंगठी होती. तो बुचकळ्यात पडला. गुरुजींच्या व बाकीच्यांच्याही हे लक्षात आले. झटक्यात ‘नवऱ्यासाठी सारे काही’ हे जणू लक्षात ठेवून सरिताबाईंनी हातातली दुसरी खडय़ाची अंगठी त्याला पटकन डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच काढून दिली. वा! काय पण नवऱ्याची बाजू घेणे! लगेचच विष्णूचा चेहरा खुलला. ‘मी किती योग्य निवड केली आहे बायकोची’ असे वाटून त्याला स्वत:चा अभिमान वाटला असावा.
इतक्यात गुरुजी म्हणाले ‘नाव लिहा.’
‘व्हॉट? ट्रान्सलेट सर! ’ विष्णू झटकन म्हणाला.
‘विसरलोच की.. ही एक कटकटच बुवा’ गुरुजी पुटपुटले.
नशीब! कोणी ऐकले नसावे. विष्णूला हातात अंगठी कशी धरावयाची पासून नाव कसे लिहायचे इथपर्यंत गुरुजींनी दाखवले. त्यांनी इंग्लिशमध्ये ‘एल’ असे अक्षर काढून सुरुवात केली इतक्यात सरिता त्याच्या जवळ जाऊन लाडीकपणे म्हणाली, ‘प्लीज डोण्ट चेंज माय नेम.. प्लीज विष्णू.. अम्मांनी त्याला ‘लक्ष्मी’ लिहायला सांगितल्यामुळे तो ते लिहिणार होता, पण आता त्याने सरिताच लिहिले. अम्मा घुश्श्यातच तिथून निघून गेल्या. साहेब आणि आप्पा खूश होते. वीणाताई व सरिता अम्मांच्या पाठोपाठ धावत गेल्या. तोंड फुगवून आणि फुलवून बसलेल्या अम्मांची थोडय़ा वेळाने विष्णूने समजूत काढली.
देवळात जाऊन मग जेवणाचा कार्यक्रम होणार होता. जवळच्याच गणपती मंदिरात सर्वाना गोळा करून नेणे हा एक मोठा व्याप होता. रुसलेल्या अम्माही आल्या देवळातून परतल्यावर सारे थेट जेवावयास गेले. नवरा-नवरीच्या नातेवाईकांसाठी छोटीशी पंगत बाजूला मांडली होती. चांदीच्या ताट, वाटी, पेल्याभोवतीची सुंदर फुलांची रांगोळी, मिणमिणत्या समया, सुंदर उदबत्तीचा चंदनाचा सुवास यामुळे वातावरण प्रसन्न होते, कुणीतरी सुट्टय़ा पैशापासून केलेले विमानाचे मॉडेल मधोमध शोभून दिसत होते. गुरुजींनी हात जोडून ‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे’ हा श्लोक म्हटला, पण त्या लोकांनी आधीच जेवायला सुरुवात केली होती. ‘थांबा!’ कोणीतरी ओरडले, विष्णूच्या हातातला घास नकळत खाली पडला. सरितापण घाबरली थोडीशी. केवढय़ाने ओरडल्या जानकी काकू! या कुठेतरी मागच्या रांगेत बसल्या होत्या.
‘अगो, सरिते, नाव घ्यायचे असते ना जेवताना. मग घासही द्यायचा असतो बरे! तूही कशी विसरलीस गो वीणा म्हणते मी..’
जेवणारेही एकदम थबकले. एवढय़ात गुरुजींनी साऱ्यांना समजेल असे आधी हिंदीत व मग खुणेने घास देण्याबद्दल सांगितले. खोळंबा नको. म्हणून सरितेने पटकन न लाजता नाव घ्यायचे ठरवले. आता जिलबीचा घास घेऊन ती म्हणाली,
‘सारिपाट मांडला मी आयुष्याचा।
विष्णूचे नाव घेते अनोख्या दिवशी लग्नाच्या।।
आणि तिने लाजत मुरकत जिलबीचा घास विष्णूच्या तोंडाकडे न बघताच भरवला. त्याने चक्क तिचे बोट चावले व ती हाय हाय करू लागली. फारच मोठा विनोद झाला. नंतर विष्णूने नुसते सरिता असे तिचे नाव घेऊन घास मात्र जपून दिला. जेवल्यानंतर निरोप समारंभानंतर थोडय़ाच वेळात सारे संपणार होते. दोन्हींकडे सामानाची बांधाबांध झाली. संध्याकाळचा स्वागत समारंभ वेळेअभावी ठेवला नव्हता. एकाएकी त्या लोकांमध्ये कुजबुज सुरू झालेली दिसली. बघतात तर काय विष्णूच्या मोजडय़ा गायब! नवऱ्या मुलाची फजिती बघायला सर्व मुलं-मुली जणू उत्सुक होत, विष्णूला बिचाऱ्याला ह्य़ा कशाचीच कल्पना नव्हती. तो भिरभिरत्या नजरेने मोजडय़ा शोधू लागला. बापरे रे बाप! काय हा प्रसंग, किती जीवघेणा प्रकार आहे हा लग्नातला. थकला भागलेला, महाकंटाळलेला तो सरितेकडे गयावया करत बापूडवाण्या चेहऱ्याने पाहू लागला. सरितेला खरेच गलबलले! पण व्यर्थ! बाकीचे मात्र ह्य़ा क्षणी तिला नवऱ्याची बाजू घेऊ देणार नव्हते. अखेर विष्णू साऱ्यांना गुडघे टेकून शरण गेला व म्हणाला, ‘मांगों क्या मागनेंका है, जल्दी बोलो और मुझे यहाँसे छोडो! वन थाउजंड देदू?
‘नो, नो नहीं चलेगा, नहीं चलेगा, नही चलेगा.’ सारे हुप्प झाले. ‘ओके बाबा, फाइव्ह थाउजंड चलेगा?’
‘ठीक है। ठीक है। चला लेंगे।’ साऱ्यांनी जल्लोष केला. इकडे विष्णूने सुटलो एकदाचा म्हणून मोजडय़ांकडे डोळे लावले व डोळ्याचे पाते लवते न लवते तोच त्या समोर हजर। हा किस्सा संपतो न संपतो तोच हॉलची बेल झाली. लवकर आवरण्यासाठी दोन्हीकडे धोषा सुरू झाला.
सरिताकडच्या साऱ्या नातेवाईकांमध्ये एकमेकांना मिठय़ा मारून निरोप घेणे सुरू झाले. साहेबही मृदू होऊन डोळे पुसत होते. वीणाताईंचे रडूनरडून नाक डोळे लालेलाल झाले होते. आसवांचा बांध आवरत नव्हता. इकडे सरिता सासरच्या वडील माणसांना जोडीने नमस्कार करत होती. अम्मांनी तिला प्रेमाने मिठीत घेतले व धाय मोकलून रडू लागल्या. सासूला किती लागून आलेय सुनेचं, अशी सासू मिळणे महत्भाग्यच वगैरे वगैरे कुजबुज ऐकू येऊ लागली. आप्पा अम्मांना सून कायमची त्यांच्याकडे राहणार नसल्याचे दु:ख, तर साहेब, वीणाताईंना मुलगी कायमची परक्या घरी जाण्याचे दु:ख आवरत नव्हते.
सर्वजण गाडय़ांत बसल्यावर नवरा नवरीच्या गाडीत पाठराखीण म्हणून सरिताची मैत्रीण लीना धावत येऊन बसली. ‘बरं झालं बाई तू आलीस. मी तुझी वाटच बघत होते.’ सरिता म्हणाली. रडता रडता ती मध्येच हुंदके देत होती. विष्णूने एक हात हातात धरला होता. गाडी सुरू झाली.
सरिताच्या कानात लीना कुजबुजू लागली. ‘सरे- अगं मी मल्याळी शिकले हे माहीत आहे ना तुला, मुद्दामच मीही कोणाला सांगितले नाही, कारण ती लोकं तुझ्याबद्दल काय काय काहीबाही बोलत होती. बरंदेखील आणि वाईटदेखील. ते सर्व मी ते ऐकलं. अगदी अक्षरश: वाट्टेल ते तुझ्याबद्दल बोलत होते. त्यांना वाटलं इथे कोणालाच मल्याळी येत नाही. तुझी सासू तर तुला..’
पण सरिताने तिच्या तोंडावर हात ठेवला व म्हणाली, ‘लीने.. दुसऱ्या कोणाबद्दल असते व लग्नापूर्वी असते तर ठीक होते. गंमत म्हणून तरी ऐकले असते, पण आता माझे लग्न झाले आहे. आणि त्या माझ्या सासूबाई आहेत. कशाही असल्या तरी.. समजले? आता असे ऐकणे किंवा बोलणे ‘की होल मॉरल्स’ना धरून नाही. आपल्या आदर्शवादात बसत नाही. तेव्हा सॉरी, पण इथून पुढे असले विषय बंद!’
हे ती बोलून गेली खरी पण तिने स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून मनात म्हटले, सरिते ही एवढी अक्कल तुझ्यात कशी आणि कुठून आली? किती समजूतदार झालीस गं लग्नानंतर.
इतक्यात गाडीचा ब्रेक जोरात लागला. ती भानावर आली व तिच्या लक्षात आले की गाडी नवीन घराच्या समोर येऊन उभी आहे आणि क्षणात तिला उतरायचे आहे, विष्णूसोबत.. गृहप्रवेशासाठी!
response.lokprabha@expressindia.com