५ एप्रिल २०१३
मथितार्थ
चित्रकथी
फोटो गॅलरी

एप्रिल-फूल विशेष
‘ब्रेकिंग न्यूज’.. : काँग्रेसचे ‘संकटमोचक’
एप्रिल फूल बनाया..
माझा कपडे धुण्याचा छंद
‘फूल डे’चे राडे!
मराठी भाषेतले एप्रिल फूल
चार दांडय़ा, एक फूल..
एप्रिलमधले ‘रावणायण’
रेडिओवरचे एप्रिल फूल
पक्या.. पिऊ आणि पाणी!
सेलिब्रिटी एप्रिल फूल

अर्थसंकल्प विशेष

क्रीडा

स्मरण
चर्चा
सेकंड इनिंग
आरोग्यम्
भन्नाट
कविता
पाठलाग
माझं शेतघर
शब्दरंग
संख्याशास्त्र
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
गृहप्रवेश
सिनेमा
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

क्रीडा

सहाव्या हंगामाचे कवित्व!
प्रसाद लाड

येत्या ३ एप्रिलला आयपीएलचा हंगाम सुरू होत आहे. त्याच्या जाहिराती टीव्ही वाहिन्यांवरून सुरू झाल्या आहेत. या वर्षीचं वेगळेपण म्हणजे डेक्कन चार्जर्सने एक्झिट घेतली आहे, तर हैदराबाद सनरायझर्स हा नवीन संघ दाखल होत आहे.

सोन्याची अंडी देणारी कोंबडी, असे जिचे वर्णन केले जाते त्या आयपीएल स्पर्धेच्या सहाव्या हंगामाचा ३ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. क्रिकेटच्या या कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी क्रिकेट जगतातून सारे क्रिकेटपटू भारतात दाखल झाले आहेत, त्यामुळे मैदानात होणाऱ्या चौकार-षटकारांची बरसात पाहण्यासाठी सारेच आसुसलेले आहेत. सध्याच्या ‘फास्ट’ लाइफमध्ये आयपीएल ही एक भूल आहे. दिवसातले फक्त तीन तास सामना बघावा आणि सारं काही विसरून आनंद लुटावा, हीच धारणा प्रेक्षकांच्या मनात असते. गतवर्षी कोलकाता नाइट रायडर्सने जेतेपदाला गवसणी घातली होती, त्यामुळे या वर्षी कोणता संघ जेतेपद पटकावणार याची उत्सुकता साऱ्यांनाच असेल. पण हे सारे आलबेल वाटत असले तरी आयपीएलचा यंदाचा सहावा हंगाम असला तरी या स्पर्धेने क्रिकेटला काय दिलं, याचं उत्तर सापडत नाही.
गेल्या वर्षी कोलकाताने आयपीएल जिंकली होती, त्यामुळे त्यांच्याकडून या वेळी मोठय़ा अपेक्षा असतील. कर्णधार गौतम गंभीर काविळीने त्रस्त असला तरी आपण आयपीएलमध्ये खेळणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे, त्यामुळे संघाच्या जिवात जीव आला असेल. जॅक कॅलिस हा खरं तर संघाचा अविभाज्य भाग आहे. कारण गेल्या वर्षीच्या विजेतेपदात त्याचा सिंहाचा वाटा होता. या वेळी फक्त एक बदल त्यांनी संघात केला आहे. वसिम अक्रमला त्यांनी गोलंदाजी प्रशिक्षकावरून दूर केले आणि ही जबाबदारी ब्रेट ली याच्याकडे सोपवली आहे. या दोघांच्या कारकीर्दीवर नजर टाकली तर वसिम हा ब्रेटपेक्षा कधीही उजवा आहे, त्यामुळे या वेळी कोलकाताची गोलंदाजी कशी होते, याकडे साऱ्यांचेच लक्ष असेल.
या वर्षी काही खेळाडूंवर साऱ्यांचेच लक्ष असेल आणि यामध्ये आघाडीवर असेल तो वेस्ट इंडिजचा सलामीवीर ख्रिस गेल. आपल्या घाणाघाती फटक्यांच्या जोरावर त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये बऱ्याच अप्रतिम खेळी साकारल्या आहेत. त्याचबरोबर किरॉन पोलार्ड या हातोडा फलंदाजावरही साऱ्यांचे लक्ष असेल. गेल्या मोसमात त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती, पण त्याच्याकडून नेहमीच मोठय़ा खेळीची अपेक्षा साऱ्यांनाच असेल. दक्षिण आफ्रिकेचा अब्राहम डि’व्हिलियर्स, श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान, कुमार संगकारा, महेला जयवर्धने, ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग आणि भारताचे सर्वच फलंदाज या वेळी रडारवर असतील. एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करलेला आणि कसोटी क्रिकेटमध्येही फॉर्मात नसलेला सचिन तेंडुलकर आयपीएलमध्ये कितपत यशस्वी ठरतो, याकडे साऱ्यांचेच लक्ष असेल. विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, शिखर धवन, मुरली विजय, सुरेश रैना हे संघातील युवा फलंदाज आपली छाप पाडण्यात यशस्वी ठरतात का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ समजला जात असला तरी या स्पर्धेत गोलंदाजांनीही कमाल केली आहे. लसिथ मलिंगा हा आयपीएलमधला सर्वात यशस्वी गोलंदाज मानला जातो. त्याचबरोबर डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल ही वेगवान जोडीही भेदक गोलंदाजी करताना दिसते. फिरकीपटूंच्या बाबतीत म्हणायचे तर आर. अश्विन, प्रग्यान ओझा, सुनील नरीन, इक्बाल अब्दुल्ला यांनी आयपीएलमध्ये आपली जागा बनवून ठेवली आहे. अष्टपैलूंच्या बाबतीत म्हणाल तर या वेळी लिलावात सर्वात महागडा क्रिकेटपटू ठरलेल्या ग्लेन मॅक्सवेलवर साऱ्यांच्याच नजरा असतील. आयपीएलच्या जोरावरच भारतीय संघात स्थान मिळवलेला रवींद्र जडेजा या वर्षी कशी कामगिरी करतो, याची उत्सुकता साऱ्यांनाच असेल.
यंदाच्या आयपीएलमध्ये काही बदल लक्षवेधी ठरणार आहेत. त्यातला पहिला बदल म्हणजे रिकी पॉन्टिंगला दिलेले मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद. संघात सचिन तेंडुलकर, हरभजन सिंगसारखे खेळाडू असताना पॉन्टिंगला संघात घेण्याचा आणि त्याला कर्णधारपद देण्याचा निर्णय अनाकलनीय वाटत आहे. पण या दोन्ही भारतीय कर्णधारांना एकदाही आयपीएलचे विजेतेपद पटकावता न आल्याने कदाचित परदेशी प्रशिक्षकाच्या धर्तीवर परदेशी कर्णधार संघाने आयात केला आहे. पॉन्टिंगकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरून त्याने निवृत्ती पत्करली आहे. त्याचे शेवटचे काही सामने आठवून बघा, वयपरत्वे त्यालाही फलंदाजी करणे सोपे दिसत नव्हते. हे माहिती असतानादेखील पॉन्टिंगला संघनायक बनवणे, हा मुंबई इंडियन्सचा निर्णय पटत नाही. त्याचबरोबर संघाच्या प्रशिक्षकांच्या गटात अनिल कुंबळे आणि जॉन राइट यांची भर पडली असून आता मुंबई इंडियन्सने आयपीएल जिंकली नाही तर या प्रशिक्षकांनाच मैदानात उतरण्याची वेळ येईल.
डेक्कन चार्जर्स आयपीएलमधून बाद झाल्यानंतर हैदराबाद सनरायजर्स हा नवीन संघ स्पर्धेत दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांच्या संघावर साऱ्यांच्याच नजरा असतील. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर काही खेळाडू दुखापतीमुळे किंवा काही अन्य कारणांमुळे संघाबाहेर असले तरी आयपीएलमध्ये त्यांची ‘एन्ट्री’ पाहायला मिळेल. पैशासाठी काहीही, हीच क्रिकेटपटूंची धारणा दिसत आहे.
‘लॉ ऑफ मार्जिनल युटिलिटी’नुसार आयपीएलची क्रेझ कमी होताना दिसते. पहिल्या मोसमात तर आयपीएलला विश्वचषकापेक्षा जास्त महत्त्व प्राप्त झालं होतं. प्रत्येकाला आयपीएलचे सामने काही करून बघायचे होते. पण हा उत्साह कालांतराने मावळत गेला. कारण या स्पर्धेत तोच तो पणा येत गेला, या स्पर्धेत काही नवीन असं प्रेक्षकांना मिळालं नाही. त्याचबरोबर ही स्पर्धा जवळपास दोन महिने चालत असल्याने प्रेक्षकांनी गेल्या वर्षी या स्पर्धेकडे जवळपास पाठच फिरवली होती. या वर्षी ऐन सुट्टीच्या मोसमात आयपीएल असल्याने या वेळी कदाचित स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळू शकतो. पण या स्पर्धेने नेमके क्रिकेटला किंवा भारताला काय दिले याचे उत्तर मात्र मिळत नाही. खरंतरं या स्पर्धेमुळे भारताचं नुकसानच झालं आहे. आयपीएल सुरू झाल्यापासून एकदाही भारताला ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकता आलेला नाही. जिंकणं-हरणं हा खेळाचा एक भाग असला तरी ज्या पद्धतीने आपण आयपीएलनंतर ट्वेन्टी-२० विश्वचषकात पराभूत होत आहोत, त्याचे वाइट वाटते.
गेल्या पाच वर्षांमध्ये आयपीएलमध्ये दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी काढली तर ही स्पर्धा का खेळवावी, हाच प्रश्न पडेल. खेळाडू पैशाच्या मोहापायी आयपीएलमध्ये खेळतात, या वेळी त्यांना दुखापती आणि देश यांचा विसर पडलेला असतो.
आयपीएल म्हणजे जशी धावांची, बळींची फॅक्टरी आहे, तशी ती दुखापतींचीही फॅक्टरीही आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये आयपीएलमध्ये दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी काढली तर ही स्पर्धा का खेळवावी, हाच प्रश्न पडेल. खेळाडूही पैशाच्या मोहापायी आयपीएलमध्ये खेळतात, या वेळी त्यांना दुखापती आणि देश यांचा विसर पडलेला असतो. आयपीएलसाठी जेवढे जिवाचे रान करून हे खेळाडू खेळतात, तेवढे हे खेळाडू देशासाठी खेळताना दिसत नाहीत.
आयपीएलच्या माध्यमातून कोटय़वधी रुपये बीसीसीआय कमवते, त्याचा विनिमय नक्की कशासाठी केला जातो, हे एक कोडेच आहे. एकीकडे कोटय़वधी रुपये कमवत असताना बीसीसीआय कर सवलत कोणत्या धर्तीवर मागू शकतात, हेच अनाकलनीय आहे. आयपीएल मनोरंजनाचा एक भाग आहे, त्यामुळे त्याच्यावर मनोरंजन कर लावायलाच हवा.
आयपीएलमुळे स्थानिक स्तरावर खेळणारे खेळाडू करोडपती झाले आणि त्यामुळेच स्थानिक सामन्यांपेक्षा ते आयपीएलला अधिक प्राधान्य देताना दिसतात. सध्या खेळापेक्षा पैसा महत्त्वाचा झाला आहे आणि हे आयपीएलचे दुष्परिणाम आहेत.
आयपीएलचे हे असे सारे क्रिकेटवर दुष्परिणाम होताना दिसत असले तरी बीसीसीआय मात्र ही स्पर्धा थांबवणार नाही. कारण वर्षांतले हे दोन महिने त्यांना अमाप पैसा मिळवून देतात. त्यामुळे पैशापुढे क्रिकेपटूंच्या दुखापती असोत किंवा स्पर्धेनंतर संघाची ढासळणारी कामगिरी असो त्यांना कसलेच सोयरसुतक नाही. कारण सोन्याची कोंबडी कापायची नसते, हे बीसीसीआयला चांगलेच माहिती आहे.
response.lokprabha@expressindia.com