५ एप्रिल २०१३
मथितार्थ
चित्रकथी
फोटो गॅलरी

एप्रिल-फूल विशेष
‘ब्रेकिंग न्यूज’.. : काँग्रेसचे ‘संकटमोचक’
एप्रिल फूल बनाया..
माझा कपडे धुण्याचा छंद
‘फूल डे’चे राडे!
मराठी भाषेतले एप्रिल फूल
चार दांडय़ा, एक फूल..
एप्रिलमधले ‘रावणायण’
रेडिओवरचे एप्रिल फूल
पक्या.. पिऊ आणि पाणी!
सेलिब्रिटी एप्रिल फूल

अर्थसंकल्प विशेष

क्रीडा

स्मरण
चर्चा
सेकंड इनिंग
आरोग्यम्
भन्नाट
कविता
पाठलाग
माझं शेतघर
शब्दरंग
संख्याशास्त्र
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
गृहप्रवेश
सिनेमा
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

कविता

डाऊनलोडिंग
श्रीधर तिळवे

केवळ पोस्टमॉडर्निझमला शह म्हणून
मला नवा युटोपिया रचायचा नाहीये

मला फक्त नवे क्षण
नव्यानेच जालवत
स्वत:ला सर्वत्र विणायचे आहे

मला माझ्यातील केऑसचे ऑर्केस्ट्रेशन करून
नव्या साऊंडची ध्वनीनिरपेक्ष शांतता साधायचीये शांती साधायचीये

शक्यता नापास झाल्या म्हणून
त्यांच्यावर प्रयोग करणे मी
थोडेच थांबवू?

मीडिआटिक वास्तववाद
पोर्नोग्राफिक वास्तववाद
नंगानाच घालतायत म्हणून
मी थोडाच स्वत:चा ट्रान्सडान्स बंद करू?

माझ्या आत एक ट्रान्सबाला आहे
जी नाचते
आणि हे नवे युगही वाचते

तिचे हावभाव क्वोटेबल नाहीत
मेजरबेल तर मूळीच नाहीत
फक्त मूमेंटेबल आहेत
आणि मूमेंटफ्रेंडलीही आहेत

तिचा आऊटगोईंग एफर्ट ‘रटाळ’ इरेझ करत जातो आहे
तर तिचा इनकमिंग इफेक्ट ‘मेंदू’ रिचार्ज करतो आहे.

‘मी’ अनेक आहेत - रिचाज्र्ड-डिसचार्जड-कायम चार्जड-माझ्या मेंदूत
आणि ‘मी’ ह्य़ा शब्दाला पर्याय नाही
म्हणूनच अनेक ‘मी’च्या तोडांनी मी/आम्ही बोलतोय
माझे पोस्टर तुम्हाला भेटणार नाही
कारण पोस्टमॉडर्निझम सर्वाना पोस्टर बनवत असताना
मी स्वत:ची डीजीट्रेटस बनवत होतो
आणि डी जे बनून वाजवत होतो

लोक म्हणालेही की किती आत्मकेंद्रित हा
स्वत:चीच लाल करतो
त्यांना माहीत नव्हते की
ते त्याच रंगात रंगतायत
ज्या रंगात मार्केट त्यांना स्पॉन्सर करतयं

।।२।।

मी नगरकरही आहे खेडेकरही
उड्डाणही आहे आणि चट्टानही

मी चांगदेवांनी पाठवलेला कोरा कागदही आहे
आणि ज्ञानेश्वरांनी ज्या हाताने भिंत चालवली तो हातही

माझा आशय पहा
मी माझे गर्भाशय इनडिटेल त्यात मांडले आहे

मी मुळांना हात घालतोय
कुळांना लाथा
माझे घराणे केवळ श्वास घेत नाहीये
ते आख्खे वातावरण इकोफ्रेंडली सूरात गाते आहे

मी माणसाचे पाणी ईश्वरावर शिंपडून त्याला जिवंत करतोय
माझ्यात दोघेही जिवंत होतायत

मी अनेक विटांवर अनेक कटींवर
माझे अनेक हात ठेवतोय
आणि एक डीजिटल भाषा
एका नव्या युगाचा नवा अभंग म्हणून
मला तिच्यात डाऊनलोड करतीये

श्रीराम लागूंसाठी एक कविता

ईश्वर रिटायर करायला गेलो तर
लोक मलाच रिटायर करायला
देव पाण्यात बुडवून बसले
देव पाण्यात बुडाले
आणि मी तरंगून वर आलो
अंगावर टी शर्ट
आणि एक टॅगलाइन
‘‘मेड इन तुकारम
ईश्वर हा चायनीज मालासारखा असतो
स्वस्तात मिळतो
लगेच नष्ट होतो
आणि पुन्हा लगेच स्वस्तात मिळतो’’
००००
चौथ्या नवतेसारखी एक कविता मिळाली, पण तिच्यामागची संवेदनशिलता पारंपारिक असल्याने ती निवडली नाही इंटरनेटवर हळदीकुंकवाचा कार्यक्रम तोही पारंपारिक पद्धतीने कुणी शूट करून अपलोड केला तर त्याला अद्ययावततेच्या दृष्टीने महत्व नाही. कुठलीही नवता ही तुमच्या आतून काळजातून उमलत मेंदूतून फुलत स्वाभाविकपणे प्रकटली पाहिजे. केवळ फॅशन म्हणून चौथ्या नवतेची कविता लिहिण्याला अंतिमत: फारसा अर्थ नाही.

केशवसुतांनी सुरू केलेल्या रोमॅण्टीक नवतेत अलिकडच्या काळात सर्वाधिक गाजलेला कवी म्हणून ग्रेस यांचा उल्लेख करावा लागेल. ग्रेसचा वारसा सांगणाऱ्या या दोन कविता

।। आवरासावर।।
घनांची हले मोहमाया डोही
जलधुंद आकाश देई सावली
नदीच्या पल्याड हलकेच तेव्हा
पाऊले कुणाचीतरी वाजली
पाऊले वाजली नि:शब्द तेव्हा
तुटे पैंजणांचा नाद स्नेहमयी
जळावर कंसाची प्रवाही वर्तुळे
हलकेच उठती संध्यासमयी
मधाळ वारा फिरे रानी तेव्हा
सांज सगळी होई अगदी बावरी
नग्न वाऱ्याचा नाद विरळ इतका
दूरात ऐकू यावी जणू पावरी
पावरीचे सूर उत्कटतेने तुटले
नि सूरांसाठी आसुसले सारे रान
सुरांचे धुंद मध पिऊनही आता
अपुरीच राहिली सारी तहान

अपुऱ्या तहानेला कुठले पाणी अन्
कुठली शिल्लक राहिल भूक
तहानेच्या डोळ्यातील भूक भावनेने
मरून गेली तहानभूक आपसूक
तहानभूक मेली तेव्हा डुचमळले पाणी
नदीच्या डोळ्यात ते साचले भरभर
सूर्यास्तानंतरच्या श्यामल अंधारात चालली
आयुष्याची सारी आवरासावर
नि:शब्द अंधारात पुन्हा वाजली पाऊले
पुन्हा मृत्यूची ऐकू आली पैंजणे
आयुष्याची आवरासावर करतानाही
सुरू आहे जिंदगीला गोंजारणे
- हेमंत देशपांडे
देसाईगंज, गडचिरोली

।। उसासे।।
विषादाचे मनावर उमटती ठसे
दु:ख नाही जरी हे खोलसे
काय सांगू तुला अंतरीची व्यथा
शब्द नाहीत माझ्याजवळ फारसे
व्यथांची फुले लगडली मनाला
नि डोळ्यांस आसवांची तोरणे
वाटते संपवून टाकावे जिवाला
नको कणाकणाने ते हळू मरणे
क्षणाक्षणाने जीवन संपत आले
आता प्रतीक्षा कशाची नि कुणाची
जीवनाला अखेरचा निरोप देताना
डोळ्यांत गर्दी पुन्हा आसवांची
आसवांच्या गर्दीतून वाट काढताना
झाले समोरचे सारे दिसेनासे
आनंदाचे क्षण क्षणार्धात संपले
उरले फक्त असीम दु:खाचे उसासे
हेमंत देशपांडे, देसाईगंज, गडचिरोली

आधुनिक नवतेला जवळ जाणारी मेंदूतली कळ ही कविता
मेंदूतली कळ
स्वप्नांची वाट
आशेचा थाट
दैवाचा घाट
वारंवार..
अंधारी रात्र
भिजले नेत्र
थिजले गात्र
शरीराचे..
पोटातील भूक
जन्माचीच चूक
जखमा मूक
विव्हळती..
नैतिकतेवर आळ
यातनांचा जाळ
काळजात फाळ
घुसलेला..
पाठीवर वळ
मेंदूतली कळ
जगण्याचे बळ
संपलेले!.
- सुनील खवरे
डिलाईल रोड, मुंबई

तिसऱ्या नवतेला मान देणारी व दलित साहित्यातील ‘माय’ला जवळ जाणारी कविता.
माय अन् घुंगरू
माय,
करायची पूजा
दिवाळी, दसऱ्याला
घुंगराची

माय,
उपवासाच्या वेळोवेळी
दाखवायची नैवेद्य
घुंगराला

माय,
संकटाच्या दरवेळी
कवटाळून रडायची
घुंगराला
लहान असतांना मी
मायला प्रश्न केला
‘महा बाप कुठंय?’

तेव्हा मायनं न बोलता
मला दाखवल घुंगरू
मी न समजताच हसलो
आता माय गेल्यावर
तिला तिरडीवरून नेतांना
मी धरलय पाणी
मडक्याला घट्ट धरतांना
माझ्या हातात होतं
घुंगरू
आताशा माझं
लहानपणीच कोडं सुटलं
आता माझ्यासोबत
असते घुंगरू
पूजा, नैवेद्य
व संकटकाळी
माझ्या जातीत
कुंकवाचाच दर्जा
घुंगराला
- चाफेश्वर गांगवे
वाशीम
चौथ्या नवतेसारखी एक कविता मिळाली, पण तिच्यामागची संवेदनशिलता पारंपारिक असल्याने ती निवडली नाही. इंटरनेटवर हळदीकुंकवाचा कार्यक्रम तोही पारंपारिक पद्धतीने कुणी शूट करून अपलोड केला तर त्याला अद्ययावततेच्या दृष्टीने महत्व नाही. कुठलीही नवता ही तुमच्या आतून काळजातून उमलत मेंदूतून फुलत स्वाभाविकपणे प्रकटली पाहिजे. केवळ फॅशन म्हणून चौथ्या नवतेची कविता लिहिण्याला अंतिमत: फारसा अर्थ नाही.
response.lokprabha@expressindia.com