५ एप्रिल २०१३
मथितार्थ
चित्रकथी
फोटो गॅलरी

एप्रिल-फूल विशेष
‘ब्रेकिंग न्यूज’.. : काँग्रेसचे ‘संकटमोचक’
एप्रिल फूल बनाया..
माझा कपडे धुण्याचा छंद
‘फूल डे’चे राडे!
मराठी भाषेतले एप्रिल फूल
चार दांडय़ा, एक फूल..
एप्रिलमधले ‘रावणायण’
रेडिओवरचे एप्रिल फूल
पक्या.. पिऊ आणि पाणी!
सेलिब्रिटी एप्रिल फूल

अर्थसंकल्प विशेष

क्रीडा

स्मरण
चर्चा
सेकंड इनिंग
आरोग्यम्
भन्नाट
कविता
पाठलाग
माझं शेतघर
शब्दरंग
संख्याशास्त्र
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
गृहप्रवेश
सिनेमा
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

एप्रिल-फूल विशेष

एप्रिलमधले ‘रावणायण’
पराग प्रकाश पुजारी

आजच्या प्रत्येक गोष्टीचं मूळ भारतीय मनाला रामायण-महाभारतात सापडत असतं. एप्रिल फूलचीही अशीच एक मिसिंग लिंक रामायणात सापडली..

विमान दिसलं की आपण भारतीय म्हणतो, ते आमच्या रामायणात होतं, नवी क्षेपणास्त्रं आली की आपण म्हणतो ती आमच्या महाभारतात होती.. मग एक एप्रिल जवळ आल्यावर मला वाटायला लागलं की त्याचंही मूळ आपल्या रामायण महाभारतात असणार. आपण त्याचा शोध घेतलाच पाहिजे. जय श्रीराम म्हणत भारत-श्रीलंका सीमेवर संशोधन कम पर्यटनास गेलो.
आणि तिथे रिसर्च करता अद्भुत.. अविश्वसनीय.. अघटित.. धक्कादायक वाटावे असे काहीसे हाती लागले. ते शिलालेख.. ती भूर्जपत्रे आणि त्यावरील तो मजकूर.. तो तपशील.. एक एप्रिलचा सण सुरू होण्यामागचे अगम्य कोडे हळूहळू उलगडू लागले. तो मजकूर येणेप्रमाणे : (कमकुवत मनाच्या पुरोगामी किंवा पुरोगामी मनाच्या कमकुवत लोकांनी आपापल्या जबाबदारीवर वाचावे.)
.....
आता युद्धात रावणाचा पराभव स्पष्ट होत चालला होता. त्याला नशिबाचीही साथ मिळत नव्हती. विमनस्क अवस्थेत तो आपल्या रात्रीच्या दालनात आला. पळवून न आणताही त्याच्याशी लग्न केलेली मंदोदरी त्याला दिसली. तिला स्पर्श करणार इतक्यात तो थबकला. चमकून मंदोदरी त्याला म्हणाली,
‘‘काय हो लंकाधिपती, थांबलात का? सोन्याची लंका आहे तुमची, पण तुम्ही म्हणजे कुणी मिडास नाही की मला हात लावाल आणि मी सोन्याची निर्जीव बाहुली होऊन जाईन.’’
रावण उत्तरला, ‘‘मी डास नाहीच मग, राजा आहे या लंका नगरीचा.’’
‘‘हां ते मी गुड नाईट, कछुआ छाप लावूनही आत आलात तेव्हाच सिद्ध झालं हो. आणि काय एवढं सोनं लागलंय त्या सीतेला, माझ्याकडे हल्ली मुळी लक्षच नाही तुमचं गडे.’’
‘‘अगं इथे वेळ काय? हरतोय मी युद्धात आणि तू रोमँटिक काय बोलत बसलीयेस मंद.’’
‘‘मला मंद म्हणू नका. कितीवेळा सांगितलं तुम्हाला.’’
‘‘गपे, तुझ्या नावाचा शॉर्टफॉर्म तोच होतो वेडे, त्याला मी काय करू? आधीच मी खूप अपसेट झालोय, मेघनाद गेला, इंद्रजीत गेला. जिवाभावाचा भाऊ कुम्भू पण त्याच कॉम्बो पॅकमध्ये गेला. बिभीषण काही कामाचा नाही. एकटा पडलोय मी. सध्या माझ्या सैन्यातलाही जो तो रडे आणि तुझं काय हे चाललंय गडे गडे. माझा कुंभूऽऽऽ..’’
‘‘चला आता शेकडो क्विंटल धान्य वाचेल. भावोजी राक्षस असले म्हणून काय झालं हो, एखाद्यानं किती ते खादाड असावं म्हणते मी. काही प्रमाण? आणि कसले भावोजी हे, मला एक पैठणीही नाही दिली कधी त्यांनी.’’
‘‘चूपे, वर्षांतून सहाच महिने तर खायचा तो. बाकी सहा महिने तर झोपलेलाच असायचा ना?’’
‘‘हम्म.. आणि काय हो, विचारीन विचारीन म्हणते.. कुंभकर्ण भावोजींच्या पिंडाला बराच वेळ कावळा शिवत नव्हता. काय बरं बोललात असं पिंडाशी जाऊन, लगेच शिवला की कावळा.’’
‘‘अगं मी म्हणालो की, लंकेतली एकूण एक गजराची घडय़ाळं नष्ट करेन. झोपलेल्यांसाठी काही करावं अशी खूप इच्छा होती गं त्याची, बिचारा कायमचा झोपला आता. मी आणि तो मिळून लंकेचं लँकेस्टर करणार होतो.. संपलं आता सगळं.’’
इतक्यात बाहेर पुन्हा कोलाहल सुरू झाला. डगआउटमध्ये बसलेले सैनिक लगेच पुन्हा फ्रंटवर लढायला गेले. आधीच गलितगात्र झालेले असूनही त्वेषाने लढले. पण त्यांच्या जोशात आता काही ‘राम’, म्हणजे दम राहिला नव्हता. त्यांची सातत्याने पीछेहाट होत होती. रामाचं सैन्य सॉल्लिड फॉर्मात होतं. तितक्यात दस्तुरखुद्द रावणच पॅव्हेलियनमधून बाहेर आला. रणांगणावर पोहोचला. त्याला पाहताच रामाने डरकाळीच फोडली,
‘‘दुष्टा चांडाळा, नराधमा रावणा, आता मी तुला सोडणार नाही. तू कपटाने हरण केलंस सीतेचं.’’
‘‘हाहाहा, अरे तू काय मला मारणार. मेरा राज तुमको कैसे मालूम होगा? हाहाहा.’’ उन्मत्त रावण गर्वाने म्हणाला. पण तेवढय़ात रावणाला एक वेगळाच पण ओळखीचा आवाज ऐकू येतो, तो बिभीषण होता.
‘‘दादा, ऐक, दाही जबडे घट्ट मिटून घे आधीच. कारण मी जे सांगणार आहे ते ऐकून तू आ वासणार आहेस. माउथ फ्रेशनर तर वापरत नाहीस. उगाच दहापट दुर्गंधी पसरायला नको.’’
‘‘मोठय़ा भावाला उपदेश नकोय.. बोल तू.’’
‘‘अरे मी रामाला तुझं सिक्रेट सांगितलंय, की तुझ्या बेंबीत तुझा प्राण आहे.. ’’ हे ऐकून रावण ऑलमोस्ट हतबुद्ध झाला.
‘‘तुझं गुपित कुणाला सांगणार नाही असं मला म्हणणारा तू. आज असं वागलास? मला फसवलंस? कुठं फेडशील हे पाप बिभीषणा?’’ रावण उसळून म्हणाला.
तितक्यात प्रत्यंचा ओढून सिद्धता करत राम पुढे सरसावला. इकडे हळूच बिभीषणाने रावणाचे धनुष्य काढून घेतले होते, रावण ते मिळवण्यासाठी त्याच्याशी भांडू लागला. त्या झटापटीत ते तुटले. राम ते तुटताना पाहून मनाने सीतेच्या स्वयंवरात जात क्षणभर नॉस्टॅल्जिक झाला. लगेच सावरून तो सीन पाहत म्हणाला की, ‘‘दोघे भाऊ धनुष्यबाणातून फुटून कसले एकमेकांशी भांडताय.’’
रावण म्हणाला, ‘‘अरे याने दगा दिलाय मला रामा. काय बोलतोस काही कळेना झालंय बघ मला.’’
राम उत्तरला, ‘‘अरे मी काळाची मिती ओलांडणारे डायलॉग मारत असतो.. हा डायलॉग तुम्हाला आत्ता जसा लागू पडतोय, तसाच कलियुगातही एखाद्या जोडीला लागू पडेल असं माझा सिक्स्थ सेन्स सांगतोय, यू नो. मरायला तयार हो रावणा.’’
‘‘मारा रामा रामा मारा रामा रामा मारा मारा..’’ दोनच अक्षरांचा अफलातून पण लॉजिकली अर्थपूर्ण अनुप्रास साधत लंकासत्तापिपासू बिभीषणाने रामाला आणखी प्रोत्साहन दिले. तेव्हा आता आपले मरण अटळ आहे हे रावण समजून चुकला. त्याने शेवटची इच्छा म्हणून रामाला आपल्यात त्यापूर्वी एक हेल्दी डिस्कशन व्हावे अशी विनंती केली. दयाळू रामाने ती मान्य केली. आणि मग सुरू झाला जगासमोर न येऊ शकलेला त्यांचा तो ऐतिहासिक संवाद :
हरणाचा मुद्दा आठवून आपण काही शापबिप देऊन कुणाचे उंदीर, मांजर, हरण केले नाहीये याबद्दल कॉन्फिडंट असणारा रावण ती लिंक पकडत गोंधळून रामाला म्हणाला, ‘‘काहीही काय बोलतोस? हां, हरण तर मी केलं होतं.. पण ते मारीचाला.’’
‘‘च्यामारी, अरे तो हरण होऊन आला म्हणूनच हरण करू शकलास ना तू सीतेचं.. हरणामुळेच अपहरणाचा घोटाळा झाला ना सगळा?’’
‘‘हे बघ राम, मी काही चुकीचं वागलेलो नाहीये. मी साधू आहे म्हणेन, नाहीतर टुरिस्ट गाईड आहे म्हणेन, त्यांनी लगेच बाहेर यायचंच कशाला माझ्यासोबत फिरायला.’’
‘‘हो रे. तेही खरंच. त्यात तिला सगळ्या स्त्रीसुलभ आवडीनिवडी.. दिसलं सोनं की कर हट्ट.’’
‘‘तोच तर प्लॅन होता. आणि धूर्त मारीचानेही तुझा आवाज काढत लक्ष्मणाला बरोबर फसवलं.’’
‘‘हे चतुर दानवा. त्या दिवशी तू माझी बायको का पळवू नयेस यावरचा तुझा हा युक्तिवाद तर अगदी बिनतोड आहे. कृत्ये सेन्सिबल करत नसलास तरी बोलतोस मात्र सेन्सिबल हे खरं. उगाच नाही भगवान शंकर तुझ्यावर प्रसन्न झाले.’’
‘‘थँंक्स रे.. लंकेत कुण्णाकुण्णाला कदर म्हणून नाही बघ माझ्या बुद्धीची.. तुला ती आहे यार..’’
‘‘हे बघ रावणा.. सांगण्याचे मुद्दे दोन. एक तर मला यार म्हणू नकोस. आपण शत्रू आहोत, विसरू नकोस. आणि दुसरं म्हणजे इमेज मॅटर्स रे. माझी मर्यादा पुरु षोत्तम, चांगला पुत्र, आदर्श पती, उत्तम बंधू ही एकत्रित इमेज आहे. तुझं बराय रे. राक्षसकुळ म्हणजे काय विदाउट लायसन्स फुल स्पीड.’’
‘‘हम्म.. कसं सांभाळतोस रे. खरंच कधी कधी कौतुक करावंसं वाटत तुझं, पण राक्षस पडलो ना. चांगले शब्द तोंडातून बाहेर पडूच नयेत असा प्रोग्राम सेट केलाय माझा आतून. आणि तुला तर लोक देव मानतात. सो तेरी तारीफ करना मेरी शान के खिलाफ है. तरीही एक्सेप्ट धिस.’’ एवढं भावनिक बोलून रावणाने त्याच्या डोक्यावरचा मुकुट काढला.
ते पाहून रामाला अगदी गदगदून आले. तो म्हणाला, ‘‘ओ त्तेरी. अरे हे काय करतोस? अजूनही लंकेचा राजा तूच आहेस.’’
‘‘अरे हो, पण हॅट नाही, त्यामुळं हॅट्स ऑफ म्हणता येत नाही.. म्हणून मुकुट ऑफ केला. असो, तुला राग येणार नसेल तर एक बोलू?’’
‘‘मला राग येईल का हा विचार तू कधीपासून करायला लागलास. सीतेला पळवलंस तेव्हा तरी केलास? चल बोल.. शेवटची इच्छा समजू तुझी?’’
‘‘आय गेस, तू इतर भूमिकांपेक्षा आदर्श सावत्र मुलगा या इमेजपायी अडकून वनवासात आलास.’’
‘‘जाऊ दे रे.. कैकयीमाताही शेवटी माझी आईच ना. पण तिचाच मुलगा भरत बघ किती मानतो मला. त्याने तर गाणंही गायलं होतं माझ्या लग्नात, वाह वाह रामजी, जोडी क्या बनाई, भय्या और भाभी को बधाई हो बधाई असेच काहीतरी शब्द होते.. खुर्ची मिळूनही वापरली नाही त्याने. उद्या कलियुगात लोक नसलेली खुर्चीपण बळकावतील बहुतेक आणि भाऊभाऊ त्यासाठी भांडत बसतील कदाचित. अरे हो, भावावरून आठवलं, आम्ही भाऊ एकमेकांना खूप भाव देतो बरं का. संस्कार रे. तुला म्हणून सांगतो, हा लक्ष्मण म्हणजे तर माझा एकदम व्हीव्हीएस भाऊ आहे रे.’’
‘‘व्हीव्हीएस?’’
‘‘अरे म्हणजे व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण आहे तो. संकटकाळी उपयोगी येतोच. तरी मारीच म्हणजे तेव्हा ते हरण होतं, कांगारू असतं तर जरा जास्तच चवताळून गेला असता. माझ्यासाठी काहीही करायला तुमच्यासाठी कायपण म्हणत तो एका पायावर तयार असतो रे. पण उगाच दोघे पळत सुटलो तिकडे आणि इकडे तू आमच्या हिला पळवलंस. साधूच्या गेटअपमध्ये संधिसाधू कुठला!’’
‘‘हाहाहा, अरे काय करणार. सीता स्वयंवरात मी आलो खरा, पण शेवटी तिथे भर सभेत पण पूर्ण करण्यात अनेकांप्रमाणेच मीपण मागेच पडलो. मग येनकेनप्रकारेण सीतेला मिळवायचीच म्हणून हा डाव खेळावा लागला.’’
‘‘तुमचा खेळ होतो रे, पण आमची बायको जाते त्याचं काय?’’
‘‘डोन्ट बी पॅनिक. आता काय तसंही तू मला मारणार आहेसच ना. आणि खरं तर खूप लकी आहेस रे तू, खूप जणांनी मनापासून मदत केली तुला. नाहीतर हे बघ माझा हा भाऊ गद्दार बिभीषण. अरे हाक बनावट असली म्हणून काय झालं, त्या हाकेला ओ देत धावणारा लक्ष्मण, माझी लंका जळणारा आणि सीतेला तुझा निरोप देऊन जाणारा हनुमान, सुग्रीव आणि त्याची सगळी वानरसेना, मी पंख छाटलेला तो जटायू, तो अंगद.. त्याच्या अंगात तर काय आलं होतं अचानक त्या दिवशी काय माहीत. गडय़ाचा पायच हलत नव्हता किती ताकद लावली तरी आणि ती खार.. हां खरंच, पूल बांधलास ते एक बेष्ट केलास बघ.. आता युगानुयुगे उपयोग होईल त्याचा.. द्रष्टा आहेस हो अगदी. म्हणजे कसंय, आपलं एक ठीक आहे रे. वेगवेगळ्या शक्ती आहेत आपल्याकडे.. बाणबिण सोडून पाऊस, आग, वीज, पाणी, रस्ते, नाग काय वाट्टेल ते निर्माण करू शकतो आपण.. कलियुगात हेपण कुणीतरी दाखवणार बहुतेक टीव्ही सीरियलमधून. पण सामान्य माणसांचं काय.. आता त्यांना ये-जा करता येईल तेवढीच.. तुझे आभार मानावेत तेवढे कमीच. पण मानू शकत नाही.. राक्षस म्हणून तसा प्रोग्राम्डच आहे ना मी. दुष्टपणा इनबिल्ट आहे, ठासून भरलाय नुसता.’’
‘‘जिंक रावणा..तोडलंस दुश्मना, तोडलंस.. चाबूक बोललास. इतका दुष्ट कुटील सुपर दळभद्री डुपर करंटा मेगा नतद्रष्ट असूनही सामान्य जनतेचा विचार करतोस. ग्रेट. मानलं राव. काही वेळा मलाच काळजी वाटते खरंतर. कलियुगात माझ्या देशात लोक पूलच काय, काहीही बांधताना आणि तोडतानाही परमार्थाऐवजी स्वार्थ साधण्यात मग्न होणार असं वाटतंय बघ.’’
‘‘ते बहुतेक सगळीकडेच होईल रे जगात.. अगदी माझ्या देशातही. हे जाणवतं तेव्हा डावा डोळा फडकतो ना माझासुद्धा, पण दहा डावे डोळे, त्यात नेमका कुठला ते चेक करण्यात वेळ कुठं घालवा. म्हणून तूर्तास फारसा विचार करत नाही एवढंच. आणि तुला सांगू का. हे चालायचंच. माणूस बदलत जातोच. तू देव नि मी राक्षस त्याला काय करणार.. माणूस हाच खरा डेंजर प्राणी.लिहून ठेव रे तू.’’
‘‘हो रे, मीही जाणतो ते. म्हणून तर फौज माणसांची न घेता त्याच्या पूर्वजांची घेऊन आलो ना इथे.’’
‘‘व्हॉट एन आयडिया सरजी. हुशार तर तू आहेसच रे. त्यात काही वादच नाही.’’
‘‘हम्म..पण तुझं एक मला पटलं नाही, म्हणे मला सगळी चांगली माणसं वाटय़ाला आली.. कैकयीमातेचं काय?’’
‘‘कै कै अपवाद असतात रे.. खरंतर अजूनही सगळ्यांना वाटतंय की आपलं युद्ध सीतेमुळं होतंय. मोठमोठय़ा लढाया. इन फॅक्ट, सारीच युद्धं बाईच्या पायात होतात हे खरंय. पण नीट विचार कर.. यामागे सीता नाहीये. किती निष्पाप पोर ती.तिचा काय दोष या सगळ्यात.’’
‘‘मग कोण जबाबदार आहे रे? काहीतरी हिंट तरी दे.’’
‘‘कैकयीमाता हीच हिंट.’’
‘‘ओह. गॉट इट. मंथरा ना. तिनेच चिथवलं होतं तिला.’’
रावणाने संमतीदर्शक मान डोलावली. राम भावनावेगात पुढे म्हणाला, ‘‘म्हणजे. अं. खरंतर बोलू नये, माझ्या सहिष्णू गुडी गुडी इमेजला शोभणार नाही, पण तिच्यामुळेच तर यावं लागलं ना मला वनवासात. आणि तूच सांग, वनवासात आल्यावर मला तरी कोण वाली उरला होता?’’
‘‘वाली नाही म्हणून मग सुग्रीवाला मदत केलीस वाटतं?’’
‘‘अरे ए वेडय़ा, आता कोणत्याही क्षणी मरणार आहेस तू आणि तरीही जोक करूच कसा शकतोस. हसतोस कसला. गप.. अरे गपतोस का आता?’’
‘‘अरे याला म्हणतात हसत हसत मृत्यूला सामोरं जाणं. असो, आजचा दिवस बनवण्याचा दिवस. तुम्ही मला बनवलंत.. बिभिषणा तू माझं गुपीत याला कधी सांगितलंस?’’ रावणाने काकुळतीने विचारले.
‘‘एक एप्रिल.’’ बिभीषण उत्तरला.
‘‘गुड वन.. रावणा, इनफ इज इनफ. आता हे घे.’’, असं म्हणत रामाने अखेर रावणाच्या नाभीत बाण मारला.
---
आणि अशा प्रकारे रावणाचा अंत झाला. तेव्हापासून हा दिवस एप्रिल फूल म्हणून पाळला जातो. पहा.. अशी आहे ती मिसिंग लिंक. तिचं ज्ञान वाटल्यावर आता कसं शांत वाटतंय. अहाहा!!!
एक एप्रिलच्या हार्दिक शुभेच्छा!
response.lokprabha@expressindia.com