५ एप्रिल २०१३
मथितार्थ
चित्रकथी
फोटो गॅलरी

एप्रिल-फूल विशेष
‘ब्रेकिंग न्यूज’.. : काँग्रेसचे ‘संकटमोचक’
एप्रिल फूल बनाया..
माझा कपडे धुण्याचा छंद
‘फूल डे’चे राडे!
मराठी भाषेतले एप्रिल फूल
चार दांडय़ा, एक फूल..
एप्रिलमधले ‘रावणायण’
रेडिओवरचे एप्रिल फूल
पक्या.. पिऊ आणि पाणी!
सेलिब्रिटी एप्रिल फूल

अर्थसंकल्प विशेष

क्रीडा

स्मरण
चर्चा
सेकंड इनिंग
आरोग्यम्
भन्नाट
कविता
पाठलाग
माझं शेतघर
शब्दरंग
संख्याशास्त्र
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
गृहप्रवेश
सिनेमा
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

एप्रिल-फूल विशेष

चार दांडय़ा, एक फूल..
रवी भगवते

अमेरिकेत गेलेल्या अमितचे पत्र आले. त्याने एका आफ्रिकन मुलीशी लग्न केले होते म्हणे. ते कळल्यावर बबल्याच्या घरात हलकल्लोळ उडाला..

फुकटचा चहा पिण्यासाठी माझ्या काही मित्रांची घरं मी बांधून ठेवली आहेत. चंद्रकांत ऊर्फ बबल्या चुरमुरे हा त्यातलाच एक. बँकेत मोठा ऑफिसर असल्यामुळे बाकीचे असंख्य लोक त्याला चुरमुरेसाहेब म्हणत असले तरी मी बबल्याच म्हणतो. बबल्या म्हणत असलो तरी बबल्याचं आजचं वय एकोणसाठ आहे आणि त्याला एक बायको, एक अविवाहित मुलगा (अमित)आहे. अमित अमेरिकेत इंजिनीअर आहे आणि उत्तम कंपनीत नोकरी करतो.
थोडक्यात बबल्याची आíथक परिस्थिती उत्तम आहे. मी त्याच्याकडे चहा प्यायला गेलो तरी बऱ्याच वेळा भरपूर काही खाऊनपिऊनच त्याच्या घरून बाहेर पडतो.
त्या दिवशी नेहमीप्रमाणे मी त्याच्या घरी गेलो तर घरी सुतकी वातावरण! बबल्या आणि वहिनी, दोघेही प्रचंड चिंतेत. मी गेलो, बसलो. थोडा वेळ कोणीच काही बोलेना. मला वाटलं, बहुतेक जवळचं कोणी तरी गेलंय. मी बबल्याचे आई, वडील, काका, काकू जेवढे म्हणून अतिवरिष्ठ नातेवाईक माहीत होते तेवढे डोळ्यांसमोर आणू लागलो.
शेवटी बबल्यानं बर्फ फोडला. (‘टु ब्रेक द आइस’ म्हणतात ना.)
‘‘गंप्या, (हे माझं त्याच्या लेखी असलेलं नाव), अमितचं पत्र आलंय.’’
वहिनीनी सूचकपणे बबल्याकडे बघितलं.
‘‘हे बघ नंदा, गंप्या आपल्या घरातल्यासारखा. त्याला सांगितलं तर काय हरकत आहे? आणि नंतर सगळ्या जगाला कळणारच आहे की.’’
‘‘आता तुम्ही असं बोलल्यावर मी काय बोलणार? पण गंपुभावोजी, सध्या तरी टॉप सीक्रेट ठेवा हं! कोणाकोणाला म्हणून नका.. अगदी वहिनींनासुद्धा.’’ वहिनी म्हणाल्या.
‘‘मी हिच्यापासून काहीही लपवून ठेवत नाही. बबल्याला विचारा.’’ मी म्हणालो.
‘‘तरीसुद्धा ही गोष्ट लपवा.’’ वहिनी मला दटावत म्हणाल्या. ‘‘तसं वचन दिलंत तरच हे तुम्हाला ही गोष्ट सांगतील.’’
‘‘गंप्या, उगाच साळसूदपणाचा आव आणून नाटक करू नकोस.’’ बबल्या म्हणाला.
‘‘तुझ्या कित्येक गोष्टी मला माहीत आहेत आणि तुझ्या बायकोला माहीत नाहीत. त्या आता हिला सांगू का?’’
बबल्याचा हा आक्रमक पवित्रा पाहून मी माघार घेतली.
‘‘ठीक आहे वहिनी, मी माझ्या बायकोला तुम्ही मला आता सांगणार असलेल्या गोष्टीचं एक अक्षरही सांगणार नाही.’’
‘‘मग ठीक आहे.’’ वहिनी म्हणाल्या. ‘‘आता सांगा हो.’’
‘‘हं.. तर गंप्या..’’ बबल्या सांगू लागला, ‘‘अमितचं पत्र आलंय.. त्यानं लग्न केलंय.’’
‘‘काय? लग्न केलंसुद्धा?’’ माझा आश्चर्योद्गार.
‘‘हो, एका आफ्रिकन अमेरिकन मुलीशी.’’
‘‘अरे वा’’ अस्मादिक.
‘‘अरे, वा काय भाऊजी, पुढचं ऐका.’’
‘‘ती त्याच्यापेक्षा दीड फूट उंच आहे.’’
‘‘अरे, तिने दीड फुटांचे हाय हील घातले असतील.’’ मी.
‘‘नाही, हील सहा इंचाचेच आहेत. तिची हाइटच सहाआठ आहे.. असते त्यांच्यात.’’
‘‘हे बघ, अ‍ॅड्जस्ट करावं लागतं.. लग्न म्हणजे.’’ माझा पॉझिटिव्ह अभिप्राय.
‘‘आणि तिचं वजन पस्तीस किलोनी जास्त आहे.’’
‘‘इथे मात्र तिला अ‍ॅडजस्ट करावं लागेल’’.. माझा पॉझिटिव्हपणा चालूच.
‘‘ती म्हणे खूप टॅलेंटेड आहे. साल्सा, जाझ.. सगळे नृत्य प्रकार तिला येतात.’’
‘‘पिठलंभात करता येतो का तिला?’’ बबल्याकडे पाहात वहिनी तारस्वरात.
‘‘मेक्सिकन पद्धतीचं पिठलंभात बनवते ती’’.. बबल्या.
‘‘मग ठीक आहे.’’
‘‘ठीक आहे काय भाऊजी. अहो, आम्ही आमच्या सुनेची काय स्वप्नं पाहिली होती; नाजूक असेल, गोरी असेल, नक्षत्रासारखी असेल, सुगरण असेल. यांपकी एक तरी गुण हवा ना? अमितपुढे कशी दिसत असेल.. कल्पनाही करवत नाही.’’ - इति वहिनी।
‘‘पाहिलीस ना फेसबुकवर?’’ ..बबल्या.
‘‘पाहिलं. आधी वाटलं, एप्रिल फूल असेल, पण पत्र परवा आलंय.. आणि फेसबुकवर ती बया पाहिली ना, एवढे फनी दिसत होते दोघं . जाईच्या वेलीचं पिंपळाशी लग्न झाल्यासारखं वाटत होतं.’’
‘‘ए नंदा, जाऊ दे मरू दे, जे झालं ते झालं, आपण काय करणार? या गंप्याला खायला देऊ नको, पण चहा तर दे.’’
‘‘राहू दे बबल्या, अशा परिस्थितीत वहिनींना चहा..’’
‘‘चहा करायला काय जातंय .. जा गं, चहा टाक.’’
वहिनी चहा टाकायला उठल्या. मी बबल्याला म्हटलं, ‘‘मला पत्र दाखव तरी! मेल का नाही केला अमितनं?’’
‘‘म्हणे पत्रात थ्रिल आहे.. हे बघ.’’
बबल्यानं पत्र दाखवलं. अमितनं बायकोचं रसभरीत वर्णन केलं होतं. फोटोही होता. मी उगाचंच पत्र टय़ूबलाइटपुढे धरलं. मी प्रेसमध्ये नोकरी करत असल्यामुळे प्रत्येक पेपर बॉन्ड पेपर आहे का ते बघतो. बॉण्ड पेपरला वॉटरमार्क असतो.
आणि मला तो वॉटरमार्क दिसला. मी हळूहळू हसू लागलो. मोठय़ानं नाही हसलो, कारण वहिनींना कळलं असतं. मी फक्त तो वॉटरमार्क बबल्याला दाखवला.
आता बबल्याचा चेहराही उजळला. तोही हसू लागला.
‘‘नंदा, चहाचं राहू दे.. आम्ही बाहेर जातो.’’ आणि बबल्या मला घेऊन बाहेर आला.
बाहेर आल्यावर आम्ही दोघंही खोखो हसू लागलो. चार लोकं बघायलासुद्धा लागली.
‘‘बघितला ना वॉटरमार्क? चार दांडय़ा आणि एक फुलाचं चित्र. चवथा महिना म्हणून चार रेषा आणि फूल म्हणून फुलाचं चित्र.’’ मी बबल्याला म्हटलं, पण हे रहस्य अमितला कसं कळलं?
‘‘सोळा वर्षांनंतर मुलगा मित्रासारखा असतो म्हणतात. एका बेसावध क्षणी मीच त्याला सांगितलं होतं, जगात फक्त तू, मी, अमित आणि ‘लोकप्रभा’चे वाचक एवढय़ाच लोकांना ते कळेल, पण नंदाला कळता कामा नये हं गंप्या.’’
‘‘काळजी करू नको यार.’’
response.lokprabha@expressindia.com

वाचकांसाठी :
बबल्याची आणि नंदाची पत्रिका जुळत नव्हती. दोघं एकमेकांना जाम पसंत होती. मग मी म्हणजे गंप्यानं बबल्याला एक सल्ला दिला, त्या वेळचे संवाद असे.
‘‘बबल्या, छत्तीस गुण जुळणारी खोटी पत्रिका तिच्या वडिलांना पाठव. म्हणावं, पहिली चुकून चुकीची पाठवली होती.’’
‘‘नको रे गंप्या, तो फ्रॉड होईल.’’
‘‘अरे, परवा एक एप्रिल आहे. पत्रिकेवर कुठे तरी चार दांडय़ा आणि एक फुलाचं चित्र काढ, पण ते असं काढ की, तिच्या वडिलांच्या लक्षातच येणार नाही. काही तरी डिझाइनबिझाइन वाटेल. म्हणजे तू फ्रॉड केलेला नाहीस. तू एप्रिल फूल केलएस. आता त्यांच्या लक्षात आलं नाही तर तू काय करणार?’’
‘‘अरे पण..’’
‘‘बबल्या, महाभारतात युधिष्ठिरानंही ‘नरो वा कुंजरो वा’ केलं होतं. तसंच समज.’’
आणि बबल्यानं माझा सल्ला मानला. खोटी पत्रिका दिल्याचं नंदावहिनीच्या घरच्या माणसांना आजतागायत कळलेलं नाही.
बबल्या आणि नंदावहिनीचा सुखाचा संसार तीस र्वष चालू आहे.
* * *
अँटिक्लायमॅक्स :
चार दांडय़ा आणि एक फूल काय? अमित, तुला काय वाटलं, मला कळणार नाही? पण म्हटलं, आपण पण जरा त्या गंप्याला एप्रिल फूल करावं आणि यांनी एक एप्रिलला दिलेली पत्रिका खोटी होती हे माझ्या चाणाक्ष बाबांच्या लक्षात आलं नाही असं यांना अजूनही वाटतंय ते वाटू दिलेलं बरं.
मला हे पसंत होतेच आणि बाबांनाही जावई पसंत होता. त्या कटकटय़ा ज्योतिषाला शांत करायला ती खोटी पत्रिका मात्र छान बनवली होती.
नंदावहिनी स्वत:शीच विचार करत होत्या.