५ एप्रिल २०१३
मथितार्थ
चित्रकथी
फोटो गॅलरी

एप्रिल-फूल विशेष
‘ब्रेकिंग न्यूज’.. : काँग्रेसचे ‘संकटमोचक’
एप्रिल फूल बनाया..
माझा कपडे धुण्याचा छंद
‘फूल डे’चे राडे!
मराठी भाषेतले एप्रिल फूल
चार दांडय़ा, एक फूल..
एप्रिलमधले ‘रावणायण’
रेडिओवरचे एप्रिल फूल
पक्या.. पिऊ आणि पाणी!
सेलिब्रिटी एप्रिल फूल

अर्थसंकल्प विशेष

क्रीडा

स्मरण
चर्चा
सेकंड इनिंग
आरोग्यम्
भन्नाट
कविता
पाठलाग
माझं शेतघर
शब्दरंग
संख्याशास्त्र
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
गृहप्रवेश
सिनेमा
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

एप्रिल-फूल विशेष

मराठी भाषेतले एप्रिल फूल
प्रशांत दांडेकर

मराठी भाषा आपल्याला हवी तशी वाकवता, वळवता येते. पण भाषेतली ही गंमत माहीत नसणारा मात्र रोजच एप्रिल फूल होऊ शकतो.

एक एप्रिल, जागतिक मूर्खदिन या दिवशी आपण निरनिराळ्या क्लृप्त्या लढवून इतरांना मूर्ख बनवायचे उपाय शोधत असतो. पण कधी कधी भाषेमधील गंमतच नकळतपणे आपली किंवा दुसऱ्यांची विकेट उडवत असते. भाषेतील काही शब्द, म्हणी यांच्यामुळे गोंधळ उडून एप्रिल फूल होणे म्हणजे क्रिकेटमधील हिट विकेटसारखाच प्रकार, कधी कधी शब्दांचा शब्दश: अर्थ घेतल्याने किंवा कधी कधी म्हणींचा मथितार्थ न कळल्याने तर कधी कधी एकाच शब्दाचे दोन वेगवेगळ्या भाषांमध्ये विभिन्न अर्थ असल्याने आपण एप्रिल फूल होऊ शकतो.
उदाहरणच द्यायचे झाले तर मराठीतील ‘महाराज’चे आधिपत्य राज्यावर असते, पण हिंदीतील ‘महाराज’ आधिपत्य मुदपाकखान्यावर असते. तेव्हा आज तुमच्याशी शेअर करतो, अशाच काही माझ्या आयुष्यातील गोष्टी जिथे एक तर मी एप्रिल फूल बनलो किंवा इतरांना तरी एप्रिल फूल बनताना अनुभवले. ही गोष्ट आहे माझ्या मावसभावाची, हेमंतची. तेव्हा त्याचे वय होते अवघे पाच - सहा. उन्हाळ्याची सुट्टी लहानग्या हेमंतला एक एप्रिलपासूनच मिळाली होती. सुट्टी एन्जॉय करायला हेमंत आजोळी आला होता. आमच्या आजोबांची स्वत:ची बििल्डग असल्याने, स्वतंत्र गच्चीचा थाटमाट आमच्या आजोळी असायचा. उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याची बेगमी म्हणून मग कुरडया, पापड यांचा घाट घातला जायचा, माती लावलेले कडवे वाल व धान्यदेखील सुकविण्यासाठी गच्चीवर पसरली जायची. माझी आई (हेमंतची मावशी) हेमंतला घेऊन याच कामासाठी गच्चीवर गेली होती. एवढय़ात आईला महत्त्वाचे काम आठवल्याने ती हेमंतला म्हणाली, ‘जरा बघ हं! या वाळवणाकडे. कबूतर, चिमण्या खात आहेत का, याकडे नीट लक्ष दे; मी परत येईपर्यंत.’ आई महत्त्वाचे काम आटोपून पंधरा मिनिटांनी गच्चीवर आली. बघते तर काय कबूतर, चिमण्या यथेच्छपणे वाळवणावर ताव मारीत होते व लहानगा हेमंत टक लावून काहीतरी बोटांनी मोजत होता. आईने विचारले तर म्हणाला कसा, स्नेहामावशी त्या पांढऱ्या कबूतराने जास्त खाल्ले व या उजवीकडच्या चिमणीने दहा वाल उचलले. बिचारा हेमंत. ‘नीट लक्ष दे’ याचे त्याने शब्दश: पालन केले होते. माझ्या आईला तर इतके हसू फुटले की विचारता सोय नाही. जेव्हा हा सर्व प्रकार आजी-आजोबांच्या कानी गेला. तेव्हा आजोबा पटकन म्हणाले, भाच्याने मावशीला एप्रिल फूल केले म्हणायचे.
भाषेची अशीच एक गमंत मीही अनुभवली होती, जेव्हा मी माझ्या ज्युनियरबरोबर मार्केटिंग कॉल करायला एका पुण्याच्या डॉक्टरांकडे गेलो होतो. वेळ दुपारी दीडची होती, पेशंट कमी असल्याने हीच वेळ सेल्स कॉलसाठी उत्तम असते. उत्तर भारतीय असलेल्या माझ्या ज्युनियरला मी म्हणालो, बघ ‘डॉक्टर आहेत का?’ रिसेप्शनिस्टने माझ्या ज्युनियरला उत्तर दिले, डॉक्टर विसावा घेत आहेत. मग भेटा. ‘ज्युनियर मला येऊन म्हणाला, सर आपला नंबर एकविसावा. बराच वेळ झाला तरी आत बोलावणे येईना म्हणून मग मीच उठून रिसेप्शनिस्टला विचारले, तेव्हा माझी टय़ूबलाइट पेटली की रिसेप्शनिस्टला ‘विसावा’ म्हणजे ‘विश्रांती’ अभिप्रेत होते व ज्युनियर मात्र वेगळेच समजला होता.
शाळेत असतानाही आठवते, एकदा आमच्या संपूर्ण वर्गालाच एप्रिल फूल व्हावे लागले होते. आम्ही सर्व जण पाचवीमध्ये होतो. हिंदी विषय नुकताच परिचयाचा होत होता. ‘आमच्या हिंदीच्या शिक्षिका आम्हाला निबंधासाठी दोन विषय सुचवून स्वत:च्या नोट्स काढत बसल्या होत्या. निबंधाचा विषय मुलांना होता. ‘शिक्षा का महत्व’ तर मुलींना ‘बगीचे में एक घंटा,’ सुमारे अध्र्या तासानंतर बाईंनी निबंध वाचूया असे सुचविले. पहिल्या बाकावरची सीमा वाचू लागली, ‘मैं मेरे माँ के साथ बगीचे में खेलने गयी। जब मेरी गेंद लुढककर एक बेंच के नीचे गयी तब मुझे एक चांदी की घंटा मिली, जो बेहद खूबसूरत और चमकिली थी।’ हे वाक्य पूर्ण होताच बाईंना हसू आवरेना. आम्ही सर्व वर्ग मात्र यात काय हसण्यासारखे म्हणून मख्ख चेहरा करून बघत होतो. बाईंना मग भाषेचा गोंधळ कळला व त्या म्हणाल्या, ‘घंटा म्हणजे मराठीतील घंटा नाही, हिंदीमधील तास’ हे कमी म्हणून की काय जेव्हा मंदारला त्याचा निबंध वाचायला सांगितला तेव्हा बाईंना हसावे की रडावे हेच कळेना. कारणही तसेच होते. मंदार वाचत होता. शिक्षा होणे हे प्रगतीसाठी कसे गरजेचे आहे. शिक्षा झाल्यावर मनुष्याला कसा योग्य धडा मिळतो वगैरे वगैरे. तेव्हा बाई म्हणाल्या, ‘मराठीतील शिक्षा नाही रे बाळांनो, हिंदीतील शिक्षा म्हणजे शिक्षण यावर लिहायचे होते. तात्पर्य, काय तर भाषेचा गमतीशीर गोंधळ कधीही आपल्याला एप्रिल फूल बनवू शकतो.
एखादी सासुरवाशीण आंतरजातीय विवाह करून सासरी पहिल्यांदाच जात असेल तर हा भाषेचा गोंधळ अजूनच मजेशीर रूप धारण करतो. माझ्या वडिलांचे मूळ गाव उंबरगाव. गुजरातमध्ये असल्यामुळे आमच्या आजोळी मराठीपेक्षा गुजरातीच जास्त बोलले जाते. माझी आई पहिल्यांदाच लग्न झाल्यावर सासरी जात होती. नवीन सुनेला स्वयंपाकात किती गती आहे, ही चाचपणी करणे म्हणजे प्रत्येक सासूचा जन्मसिद्ध हक्क. माझ्या आजीचा पहिला प्रश्न होता, ‘तने पुरनपोळी आवडे छे?’ आई बिनदिक्कतपणे म्हणाली, पुरणपोळी कोणाला आवडत नाही? मला तर ती खूपच आवडते. तेव्हा माझे बाबा आईच्या मदतीला धावले व म्हणाले, ‘गुजरातीमध्ये आवडे छे म्हणजे येते का व गमतु म्हणजे आवडते.’ ही गोष्ट वेगळी की माझी आई सुगरण असल्याने तिला पुरणपोळी नुसती आवडायची नाही तर तितकीच चांगली करताही यायची. मल्याळम् भाषेत मोरचा अर्थ ताक होतो. मग कल्पना करा, जर मराठी मुलगी केरळात गेली तर काय गमतीजमती होऊ शकते. आपली मराठी भाषा म्हणींनी इतकी समृद्ध आहे की तिच्यामुळेसुद्धा मजेदार गोंधळ उडू शकतो.
आई काम आटोपून गच्चीवर आली. बघते तर काय कबूतर, चिमण्या यथेच्छपणे वाळवणावर ताव मारीत होते व लहानगा हेमंत टक लावून काहीतरी बोटांनी मोजत होता.
आमच्या शेजारी राहणाऱ्या वझेकाकूंना सारखे काय ना काही तरी उधार मागण्याची सवय आहे. कधी साखरच तर कधी विरजण वगैरे वगैरे. त्या काही उधार मागायला आल्या की बऱ्याच वेळ इकडच्या-तिकडच्या वायफळदेखील गप्पा मारत बसायच्या. माझ्या आईला हा वेळकाढूपणा पसंत नसायचा. एकदा वझेकाकू असेच काहीतरी उधार मागण्यासाठी आईकडे आल्या. आई फोडणी देण्यात व्यस्त असल्याने पटकन म्हणाली, काकू ताकाला येऊन भांडे लपवू नका, पटकन काय ते सांगा. त्यावर वझेकाकूंचे उत्तर होते, ‘अगं तुला कसे कळले की मी भांडे आणले आहे, सोबत ते? पण भांडय़ात ताक नको. गव्हाचे पीठ हवे आहे.’ आईला कपाळावर हात मारून घेण्याशिवाय काही गत्यंतर होते का? वझेकाकूंना मात्र आपला एप्रिल फूल झाला आहे हे शेवटपर्यंत कळलेच नाही.
भाषेचा आधार घेऊन माझ्या बाबांनी पण एकदा असेच एकाला एप्रिल फूल बनविले होते. त्याचे झाले असे की आम्ही सर्व जण त्र्यंबकेश्वरला गेलो होतो. तेथील एक लोचट पुजारी बाबांच्या खूपच मागे लागला होता. आम्ही पाल्र्याचे आहोत हे कळल्यावर तो पुजारी कोणा ‘आगाशे’नामक व्यक्तीचा संदर्भ बाबांना देऊन तुम्हीसुद्धा त्यांच्यासारखा कालसर्पयोग विधी करा, असे सांगत होता. बाबांना आगाशे नावाची कोणतीच व्यक्ती आठवत नव्हती. पण पुजारी मात्र सारखा ‘तुम्ही स्मरणशक्तीवर जोर द्या. आठवाच’ म्हणून पाठी पडला होता. शेवटी बाबाही वैतागून म्हणाले, ‘हो, आताच आठवले. ते आगाशे ना आमच्या गच्चीवर राहतात. पुजारी समजून गेला की गच्चीला हिंदीत आगाशी म्हणतात व म्हणूनच बाबांनी हा एप्रिल फूल गुगली त्याच्या अंगावर सोडला आहे.
थोडक्यात काय तर भाषेवर प्रभुत्व असल्यास रोजच एप्रिल फूल साजरा करता येतो.
response.lokprabha@expressindia.com