५ एप्रिल २०१३
मथितार्थ
चित्रकथी
फोटो गॅलरी

एप्रिल-फूल विशेष
‘ब्रेकिंग न्यूज’.. : काँग्रेसचे ‘संकटमोचक’
एप्रिल फूल बनाया..
माझा कपडे धुण्याचा छंद
‘फूल डे’चे राडे!
मराठी भाषेतले एप्रिल फूल
चार दांडय़ा, एक फूल..
एप्रिलमधले ‘रावणायण’
रेडिओवरचे एप्रिल फूल
पक्या.. पिऊ आणि पाणी!
सेलिब्रिटी एप्रिल फूल

अर्थसंकल्प विशेष

क्रीडा

स्मरण
चर्चा
सेकंड इनिंग
आरोग्यम्
भन्नाट
कविता
पाठलाग
माझं शेतघर
शब्दरंग
संख्याशास्त्र
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
गृहप्रवेश
सिनेमा
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

एप्रिल-फूल विशेष

चार दांडय़ा, एक फूल..
रवी भगवते

अमेरिकेत गेलेल्या अमितचे पत्र आले. त्याने एका आफ्रिकन मुलीशी लग्न केले होते म्हणे. ते कळल्यावर बबल्याच्या घरात हलकल्लोळ उडाला..

‘‘किमया, अंकितने शेवटी तुला गाळात घेतलंच ना?’’ सुप्रियाच्या या शेरेबाजीवर किमया उद्गारली, ‘‘तसं म्हणा हवं तर! पण तो कधीपासूनचा माझ्यावर मरतोय, तुम्हा सर्वाना ठाउकच आहे.’’
‘‘पण कालपर्यंत तर तू त्याला कटवत आणि सटकवत होतीस, मग आज एकदम काय झालं?’’
‘‘अगं, आज सकाळी सकाळीच त्याचा एसेमेस आला. आय लव्ह यू, किमया!’’
‘‘आणि तू लगेच पाघळलीस? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आणि असंच करायचं होतं तर इतके दिवस त्याला कशाला टांगवलंस?’’
‘‘वाटलं, बिचारा आत्महत्या बित्महत्या करायचा! आणि पाप माझ्या माथ्यावर बसायचं!’’
‘‘कोणी आत्महत्या करत नाही आणि केली तर केली! असं पापबिप लागत नसतं.’’
‘‘माझ्यावर अंकितचं खरंखुरं प्रेम आहे. नाहीतर त्याने पहाटे पहाटे एसेमेस केला नसता, जाऊ दे. पण ही बातमी तुला कोणी दिली?’’
‘‘अंकितच सगळ्यांना सांगत सुटलाय. सबंध सोसायटीभर ही ब्रेकिंग न्यूज पोचली आहे. त्याने हे दोस्तांनासुद्धा कळवलं असणार. पण तुझ्या आई-बाबांना हे बोललीस का?’’
‘‘ते माझ्या शब्दाबाहेर नाहीत.’’
‘‘अंकित गेले अनेक दिवस किमयासाठी गळ टाकून आहे. तिच्या येण्याजाण्याच्या वेळी तो मुद्दाम वाटेत उभा राहून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. ती त्याला झिडकारते तरी त्याचे प्रयत्न चालूच आहेत. हे सबंध सोसायटी जाणून होती. परवाच्या व्हॅॅलेन्टाइनदिनी अंकितने देऊ केलेलं गिफ्ट तिने नाकारूनही त्याने प्रयत्न सोडले नव्हते. अंकितच्या या चिकाटीचं आणि सबुरीचं सर्वाना भारी कौतुक होतं. त्यामुळेच अखेर किमयाचा ‘आय टू!’ हा एसेमेस रिप्लाय त्याला गेल्याबरोबर अंकितवर अभिनंदनाचा वर्षांव झाला. त्याचे घरी पुष्पगुच्छांचा खच पडला. यापुढे अंकित - किमया एकत्र हिंडता फिरताना दिसतील. हॉटेलिंग करतील, एकत्र पिक्चर टाकतील आणि एका शुभमुहूर्तावर लगीनगाठ बांधतील ही सर्वाची अपेक्षा मात्र त्या दोघांनी फोल ठरवली.’’
दुसऱ्याच दिवशी सकाळी सकाळीच किमया अंकित समोरासमोर आली. आता ती दोघं काय करतात, हे पाहायला प्रभातफेरीवरून परतणारे गोडबोले तिथेच थबकले. अंकितने, ‘गुड मॉर्निग, किमया!’ ही केलं. पण किमया आधीप्रमाणे आतादेखील नाक उडवून तेथून निघून गेली, हे गोडबोल्यांनी पाहिलं आणि पाच मिनिटांत ही कटु बातमी जास्तीत जास्त जणांपर्यंत पोचवली. तासाभरात ती सोसायटीभर पसरली. भोंडलेनानांना तर किमयाच्या अशा वागण्यांचा भयंकर संताप आला. त्यात अंकितवर त्यांचा विशेष जीव. ते तडक किमयाकडे गेले आणि त्यांनी तिला अशा वागण्याबद्दल जाब विचारला. पण किमयानेच उलट नानांना विचारलं, ‘‘नाना, काल तारीख किती होती?’’
‘‘काल.. काल ना? एक एप्रिल.’’
‘‘म्हणजे काल ‘एप्रिल फूल डे’ होता ना?’’
‘‘होता. पण म्हणून अशी जीवघेणी मस्करी? असेच होते करायचे तर आधी ‘हो’ म्हणलीस का?’’
‘‘नाना, चालतं हो! एप्रिल फूलचा प्रयोग कोणावरही करावा!’’
भोंडलेनाना मग अंकितचं सांत्वन करायला व त्याला धीर द्यायला त्याच्याकडे निघाले. ‘किमयासारख्या पाषाणहृदयी मुलीचा नाद तू सोडून दे’ हेही त्यांना अंकितला सांगायचं होतं. पण अंकित घरी नव्हता.
.. आणि सायंकाळी वेगळंच आक्रित घडलं. अंकित परतला तो समोरच्या कॉलनीतल्या अवनीचा हात हातात घेऊनच! त्याने सर्वाशी ‘गर्लफ्रेंड’ म्हणून तिची ओळखदेखील करून दिली.
‘‘अरे पण..’’ गोडबोलेंना काहीतरी विचारायचं होतं. पण त्यांना थांबवून अंकित सांगू लागला, ‘‘आमची जोडी बघून तुम्हा सर्वाना आश्चर्य वाटणं साहजिक आहे. पण आता सांगतोच, ‘‘काल पहाटे पहाटे मी मोजून पाच मैत्रिणींना ‘आय लव्ह यू’ चे मेसेजेस पाठवले होते. पण मुलींना मी पक्का ओळखून आहे. किमयाचा होकाराचा एसेमेस हा ‘एप्रिल फूल’चाच प्रकार असणार हे मी लगेचच ताडलं आणि म्हणूनच तुम्ही मोठय़ा प्रेमाने दिलेले पुष्पगुच्छ काल दुपारीच फुलवाल्याला देऊन थोडी कमाईसुद्धा करून घेतली.’’
‘‘किमयातून कमाईची किमया!’’ गोडबोलेंच्या या कोटीला दाद देऊन अंकित पुढे म्हणाला, ‘‘आता बाकीच्या चौघींनी का केलं ते सांगतो. तिघींनी तारखेचं भान ठेवून, ‘हाच एसेमेस चार दिवसांनी केल्यास विचार करू’ असं कळवलं, उरली होती अवनी!’’
‘‘तिने लगेचच सकारात्मक प्रतिसाद दिला, असंच ना?’’
‘‘नाही,’’ पुढे येऊन अवनीच म्हणाली, ‘‘मी ‘सॉरी’ असं कळवून काल ह्य़ाला ‘फूल’ केलं आणि रात्री बारानंतर याला कालच्या ‘सॉरी’बद्दल ‘सॉरी’ म्हटलं.’’
‘‘आणि मला कायमसाठी ‘फूल’ केलं!’’ अंकितच्या या बोलण्यावर सर्वानी टाळ्या पिटल्या. अंकित एकदाचा मार्गाला लागला. म्हणून काहींनी निश्वास सोडला. तर यापुढे चघळायला मिळणारा एक विषय कायमचा बंद झाला म्हणून काहीजण चुकचुकले.
‘एप्रिल फूल डे’ हा बरेच जणांसाठी बरंच काही असतो, कोणी या दिवशी विशेष सावधानता बाळगतात तर कोणी दुसऱ्याचा पोपट करण्याची संधी साधून घेतात. एखादा मात्र, जुना एखादा हिशेब चुकता करण्यासाठी या दिवसाचा वापर करतो.
३१ मार्चची सायंकाळ, संग्राम राव रत्नाकर रणदिवेला म्हणाले, ‘‘हे बघा रणदिवे, मला उद्याच्या उद्या सबंध वर्षांचं सेल्स अ‍ॅनालिसिस हवंय.’’
‘‘हो, सर!’’ रत्नाकर आज्ञाधारकपणे म्हणाला.
‘‘नुसतं अ‍ॅनालिसिस नाही. प्रॉडक्टवाइज, मन्थवाइज तुलनात्मक स्टेटमेंट पाहिजे.’’
‘‘दिलं साहेब! तुम्ही मुळीच टेंशन घेऊ नका. काम पुरं झाल्याशिवाय उद्या मी ऑफिस सोडणार नाही.’’
‘‘शाब्बास! मी निर्धास्त राहू ना?’’
‘‘बेलाशक!’’
रत्नाकरच्या या शब्दावर संग्राम राव निर्धास्त झाले का? मुळीच नाही. रत्नाकर हा एक बेभरवशाचा प्राणी आहे याची त्यांना पूर्ण कल्पना होती. दांडय़ा मारण्यात आणि त्यासाठी दरवेळी नवीन कारण पुढे करण्यात रत्नाकर पटाईत होता. उदाहरणार्थ (आधी उशिरा पोचण्याची कारणं पाहा), (१) स्कूटरमधलं पेट्रोल संपलं. पंपावर प्रचंड रांग होती (२) सिग्नल तोडल्यामुळे ‘मामाने थांबवलं. अडीचशेची पावती फाडल्याविना सोडेना. खिशात फक्त पंधरा रुपयेच होते. घरी बसने जाऊन शंभरची नोट घेऊन परत येईपर्यंत उशीर झाला. (३) बायकोने डबा द्यायला उशीर केला. तसाच यायला निघालो. त्यावरून ती कावली. मग आमचं भांडण झालं. डबा तयार झाला. पण भांडण सोडून देता येईना.
दांडीची कारणे : (१) नातेवाईक, शेजारी वा मित्राचं दु:खद निधन. (२) कामवाली सुट्टीवर गेल्यामुळे घरची कामं उरकेपर्यंत उशीर झाला. थकायलाही झालं. बायकोच्या सीएल संपलेल्या आहेत. वगैरे.
अलीकडचीच गोष्ट ‘डोळे आल्याची’ थाप मारून रत्नाकर चार दिवस घरी राहिला. ‘दांडी’ या गोष्टीची संग्राम रावांना भयंकर चीड होती. त्यांनी रत्नाकरला फोन करून फैलावर घेतलं. रत्नाकरने सगळं निमूटपणे ऐकून घेतलं. प्रश्नांची उत्तरंही त्याने दिली नाहीत. तो बोलत नाहीसं पाहून साहेब अधिकच चिडून म्हणाले, ‘‘रत्नाकर, तुम्हाला डोळे आले आहेत की तुमचे कान गेले आहेत?’’
हा अपमान रत्नाकरच्या जिव्हारी लागला. त्याच क्षणी त्याने याचा बदला घ्यायचा निश्चय केला. ती संधी आज चालून आली होती. एक एप्रिल रोजी रत्नाकर बायकोला म्हणाला, ‘‘आज मी दांडी मारतो. आता मित्राकडे जातो. येताना मटण घेऊन येतो. एप्रिल फूल डे आपण साजरा करू.’’ असं म्हणून त्याने साहेबांना, ‘कुत्र्याची तब्येत बिघडली आहे. आज मी येऊ शकत नाही. असा एसेमेस पाठवून दिला. तो वाचून संग्राम रावांच्या अंगाचा तिळपापड झाला. कारणाची शहानिशा करण्यासाठी ते तडक रत्नाकरच्या घरी पोहोचले. रत्नाकर अर्थातच घरी नव्हता. दांडीची थाप त्याने बायकोला सांगितली नव्हती. साहेबांनी स्वत:ची ओळख करून देऊन विचारलं. ‘‘कुत्रा कुठे आहे?’’
हे ऐकून रत्नाची खोपडीच सटकली. पदर खोचून तिने विचारलं, ‘‘कुत्रा कोणाला म्हणतोस रे लांडग्या? आणि तेही इथे ! ऑफिसमध्ये तू त्याला कुत्रा, गाढव, डुक्कर, उंट, वाघ, ससा काहीही म्हण. पण इथे असलं मी काहीही ऐकून घेणार नाही, सांगून ठेवते.’’ रत्नावली एवढय़ावरच थांबली नाही, तिने संग्राम रावांना हाताला धरून घराबाहेर काढलं आणि दरवाजा धाडकन लावून घेतला. नंतर बायकोचा हा प्रताप ऐकून रत्नाकर बेहद्द खूश झाला. दुसऱ्या दिवशी झालेल्या प्रकाराबद्दल साहेबांची माफी मागून तो म्हणाला, ‘‘सॉरी सर! मी कुत्राबित्रा पाळलेला नाही. पण तुम्हाला एकदा तरी मी ‘एप्रिल फूल’ करून दाखवीन अशी स्टाफशी पैज लावल्यामुळे माझा नाइलाज झाला.’’
‘‘पण तुम्ही मला काम पुरं करण्याचं वचन दिलं होतं.’’
‘‘पण मी स्टाफला एप्रिल फूलचं वचन आधी दिलं होतं. साहेब, तुम्ही कसे क्रमाने फायली निकालात काढता, तीच सिस्टीम मी फॉलो केली!’’
अर्थात हे व्यक्तिगत स्वरूपाचे किरकोळ प्रयोग झाले. पम राजकारणातलं ‘एप्रिल फूल’ राजकीय भूकंप घडवून आणू शकतं.
३१ मार्च रोजी आमदार दौलतराव दिंडे यांनी विधानसभेत सत्ताधारी पक्षाचे वाभाडे काढणारं निष्क्रियता असे अनेक आरोप करून जवळजवळ सर्वच खात्यांची त्यांनी लक्तरं चव्हाटय़ावर आणली. एरवी शांत बसून राहणारे दौलतराव आज अचानक रुद्रावतार धारण करते झाल्याचं अनेकांना आश्चर्य वाटून राहिलं. सत्ताधारी पक्ष तर धास्तावलाच; पण त्यांच्या स्वपक्षीयांनादेखील, हे आपल्या पुढे जाऊ पाहताहेत म्हणून धडकी भरली. वर्तमानपत्रांनी दौलतरावांच्या भाषणाची मोठी बातमी केली. त्यावर अग्रलेखदेखील लिहिले गेले. आणि दुसऱ्याच दिवशी दौलतरावांनी त्याहून प्रचंड धक्का दिला. ते सत्ताधारी पक्षाच्या पक्ष कार्यालयात दाखल झाले. तेथे त्यांच्या स्वागताला स्वत: प्रदेशाध्यक्ष आणि अन्य ज्येष्ठ नेते उपस्थित होते. त्यामुळे तर्कवितर्काना उधाण आलं. बातम्यांच्या वाहिन्यांना मोठंच खाद्य मिळालं. आता कोणत्याही क्षणी दौलतराव पक्षबदल करतील, त्यांच्याबरोबर किती आमदार किती ज्येष्ठ नेते जातील, निवडणुकीनंतर ते कोणत्या खात्याचे मंत्री होतील यावर चर्चादेखील झडत राहिल्या. पक्षात दौलतरावांची प्रचंड घुसमट होत असल्याचा शोधदेखील एका वाहिनीने लावला. त्यांची समजूत काढायला दिल्लीचे नेतेदेखील मुंबईकडे धावले. दौलतरावांनी रात्री पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करण्याचं जाहीर केलं. त्यानुसार ‘सत्ताधारी पक्षभेट’ हा केवळ एप्रिल फूलचा प्रकार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि त्यांच्याकडून या प्रकरणावर पडदा पाडत असल्याचं जाहीर केलं.
response.lokprabha@expressindia.com