५ एप्रिल २०१३
मथितार्थ
चित्रकथी
फोटो गॅलरी

एप्रिल-फूल विशेष
‘ब्रेकिंग न्यूज’.. : काँग्रेसचे ‘संकटमोचक’
एप्रिल फूल बनाया..
माझा कपडे धुण्याचा छंद
‘फूल डे’चे राडे!
मराठी भाषेतले एप्रिल फूल
चार दांडय़ा, एक फूल..
एप्रिलमधले ‘रावणायण’
रेडिओवरचे एप्रिल फूल
पक्या.. पिऊ आणि पाणी!
सेलिब्रिटी एप्रिल फूल

अर्थसंकल्प विशेष

क्रीडा

स्मरण
चर्चा
सेकंड इनिंग
आरोग्यम्
भन्नाट
कविता
पाठलाग
माझं शेतघर
शब्दरंग
संख्याशास्त्र
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
गृहप्रवेश
सिनेमा
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

एप्रिल-फूल विशेष

माझा कपडे धुण्याचा छंद
शशिकांत सावंत

बारकाईने अनुभव टिपत अनिल अवचट जगण्यातल्या छोटय़ा-मोठय़ा गोष्टी डोळ्यांसमोर मूर्तिमंत उभ्या करतात. त्यांच्या आविष्कार पद्धतीचे विडंबन अर्थात त्यांच्याबद्दल आदर बाळगून..

एकदा मी वॉशिंग मशीन लावून बसलो होतो. मधल्या वेळात काय करायचं म्हणून बासरी वाजवत बसलो. किती वेळ गेला कळलंच नाही. मशीनचं काहीतरी बिघडलं होतं. त्यातून पाणी येऊ लागलं. घरभर पाणी झालं, मशीन बंद. मनात विचार आला कपडे हाताने का धुऊ नयेत. नगरला असताना मोलकरणीला कपडे धुताना पाहिलेलं. कुठं युक्रांदमध्ये असताना बाहेरगावी असलो की कपडे हाताने धुवायचो, त्यालाही अनेक र्वष झाली. मी वाण्याकडे गेलो. म्हटलं, ‘कपडे धुवायचा साबण द्या.’ तोही चकित झाला. म्हणाला, ‘आज हे काय?’ नेहमी मला ओरिगामीसाठी घोटीव कागद घेताना त्यांनी पाहिलं होतं. अनेक प्रकारचे साबण त्याने पुढय़ात टाकले. निळा कागद असलेला, ५०१ चा बार, निरमा, एरवी हे सगळं जाहिरातीतच पाहिलेलं. आज प्रत्यक्षच बघत होतो.
घरी दोन-तीन साबण आणले. निळं रॅपर काढलं, तर खाली आणखी एक पातळ ट्रेसिंग पेपरसारखा कागद. तो ओढला तर साबणाचा भाग चिकटून आला, दुसरा साबण उलगडला तेव्हा हाताने एक टोक धरलं. दुसऱ्या हाताने साबण घट्ट धरला आणि हळूहळू कागद ओढत गेलो जसा तो न फाटता, साबण न चिकटता येऊ लागला. तो बाजूला काढून ओरिगामीच्या कागदांमध्ये ठेवला.
साबण हाताला किंचित लागला होता. दोन शर्ट आधी धुवायचे ठरवलं. एक माझ्या ठाण्याच्या मानलेल्या मुलीने वाढदिवसाला दिलेला. न वापरता तो तसाच पडून होता. तरीही धूळ जमली होती. म्हटलं, आता धुऊन वापरावा. तिलाही बरं वाटेल. शर्ट भिजवून साबण लावू लागलो. दुसरा शर्ट वापरलेला होता. कॉलर, कमरेकडचा भाग, बाह्य़ा इथं जास्त मळलेला असतो, असं लक्षात आलं. जिथं जास्त मळलेला असतो तिथं जास्त साबण लावत गेलो. मग वाटलं, अरेच्या, जमलं की! उत्साहाने आणखी दोन शर्ट धुवायला काढले.
थोडा वेळ शर्ट नुसताच पाण्यात ठेवला, तर धुणं सोपं जातं असं लक्षात आलं. म्हणून थांबलो. परत धुवायला लागलो. आणखी शर्ट काढले. यात किती वेळ गेला कळलंच नाही. सुश्यो म्हणाली, ‘बाबा, तुला आता नवं वेड लागतंय.’ एरवी मला पाण्यात जास्त बसवत नाही. हात-पाय गारठतात, पण आता तासन् तास बसलो तरी काही वाटेना.
सगळेच शर्ट धुऊन टाकल्याने एक दिवस कुठंच जाता आलं नाही. तारेवर वाळत टाकलेले शर्ट ऑक्टोबरच्या उन्हात छान सुकून निघाले. संध्याकाळी मी इस्त्री करायला घेतली. इस्त्री करण्यासाठी टेबल कुठं होतं? शेवटी लिहिण्याच्या टेबलावरील पुस्तकं काढून तात्पुरतं टेबल तयार केलं. बराच काळ न वापरल्याने इस्त्रीचा काही भाग गंजू लागला होता. आता मात्र मी विचारात पडलो. शेवटी साध्या कपडय़ांवरून नुसतीच इस्त्री फिरवली. हळूहळू इस्त्री फिरवताना चुरगळ्या नाहीशा होतात अन् कपडा तयार होत जातो, ते बघताना वाटलं, अरे, कॅन्व्हासवर पेंटिंग करतानाही असंच होत असणार.
आता मी उत्साहाने कुठले कपडे धुवायचे आहेत ते बघितलं. विश्वकोश काढला. कपडे धुण्यावर काही नोंद आहे का ते पाहिलं. आजूबाजूला कपडे हाताने धुणाऱ्या माणसांची चौकशी केली. शेवटी वामनराव कुलकर्णी हाताने कपडे धुतात असं कळलं. स्कूटर काढली आणि निघालो. त्यांच्या दाराला कुलूप होतं. बराच वेळ उभा राहिलो. काही सुचेना. मग खाली आलो. तिथं एक शेंगदाणेवाला आहे. नेहमी भेटल्याने तो ओळखीचा. त्याच्याकडून शेंगदाणे घेतले आणि एका बाकावर बसून माणसांची वर्दळ पाहत राहिलो. थोडय़ा वेळाने वामनराव आले. दाराचं कुलूप काढलं. मी खालीच जाजमावर बैठक मारली. थोडासा धुरळा उडाला. पण म्हटलं, ‘पँट मळली तर बरंच आहे. धुवायला मजा येईल.’ वामनरावांनी कपडे धुण्याबद्दल बरंच सांगितलं. वाटलं, अरे! या माणसाला इतकं माहीत आहे. आपण कपडे धुतले नसते तर हे आपल्याला कळलं नसतं.
दुसऱ्या दिवशी धुतलेल्या, इस्त्री केलेल्या कपडय़ांचा ढीग रचला. उमा विरुपाक्षला बोलावलं. मुंबईहून सदाशिव (अमरापूरकर)ही बघायला आला. तेच कपडे घालून फिरायला निघालो. एरवी लोक सदाशिवकडे बघत राहतात, पण आज माझ्या कपडय़ांकडे बघत होते. किमान मला असं वाटत होतं.
कपडे धुवायला धोबी घरी यायचा तेव्हा त्याला बघताना पूर्वी काही विशेष वाटत नसे. आता वाटू लागलं. आपण दोन-चार कपडे धुताना दमून जातो, मग त्याला काय होत असेल.
वेगवेगळ्या साबणांचा वापर करताना पावडरीत कपडे धुणंही करून पाहिलं. सर्फ आणि इतर पावडर वापरताना पाणी खूपच लागत असे. शेवटी एक दिवस थोडं गरम पाणी वापरून पाहिलं. तरीही तितकंच पाणी लागत होतं. या पावडरीत कपडे लवकरच स्वच्छ होतात, पण खूप पाणी वाया जातं. शिवाय त्या पावडरी महागही होत्या. त्याच सुमारास थोरोचं ‘वॉल्डन’ वाचत होतो. मनात विचार आला, थोरो आज असता तर त्याने पावडर वापरली असती काय?
पुण्यात काही दुकानांत फक्त साबणाचं सामान विकत मिळतं असं कळलं. रविवार पेठेच्या बुकिंग हाऊसजवळ असं एक दुकान होतं. सुनंदाचा एक पेशंट तिथं काम करायचा. मी येतोय म्हटल्यावर तो म्हणाला, साहेब, मीच तुम्हाला घेऊन जातो. दुसऱ्या दिवशी त्याच्याबरोबरच गेलो.
रविवार पेठेत थोडं उंचावरतीच पायऱ्या चढून गेलं की हे दुकानं लागतं. बुकिंग ऑफिसशेजारीच. एक पोरगेलासा तरु ण ते दुकान चालवत होता. त्याची ओळख करून घेतली. तो म्हणाला, वडील दोन महिन्यांपूर्वीच गेले, आता दुकान मीच बघतो. दुकानात सर्व फळ्या लिक्विड सोपच्या बाटल्या, पावडर, वेगवेगळ्या प्रकारचे साबण, छोटी-मोठी रंगीत द्रवांनी भरलेली प्लॅस्टिकची कॅन्स यांनी भरलेल्या होत्या. सर्वत्र साबण, सेंट, तेलं असा मिश्र वास दुकानात दाटून भरला होता. मी लगेच वेगवेगळ्या आकाराचे, रंगांचे साबण विकत घेतले. अ‍ॅसिड स्लरी नावाचं द्रावण अनेक गॅलन्समध्ये होतं. त्यांचा अल्कलीशी संयोग होऊन डिर्टजट तयार होतो. हे मुख्य मळ काढणारं द्रव्य. सगळ्या साबणांत ते असतंच. पण वेगळ्या रूपात. आपण विकत घेतो त्या साबणात शुद्ध डिर्टजट द्रव्य थोडं असतं. मुख्य भरणा असतो व्हॅक्ससारख्या फिलर्सचा, अशी माहिती कळत गेली. खांद्यावरच्या पिशवीत पॅड होतं. त्यात मी नोंद करीत होतो.
काही ठिकाणी पावडर, बाटली, रंग असं काय काय मिश्रण होतं. मी विचारलं, हे काय आहे? तसं तो उत्साहाने सांगू लागला, हे सगळं एकत्र केलं की लिटरभर लिक्विड सोप तयार होतं. हे सगळं सुटं घेतलं की ३६ रु पयांना पडतं. मिश्रण बनवून ठेवावं लागतं. बाजारात मिळते तशी साबण पावडर आमच्याकडे ४० रुपये किलोने पडते. मी हिशोब केला. बाहेर लोक टीव्हीवर जाहिरात करतात, मॉडेल वापरतात आणि पावडर १६० रु . किलो भावाने विकतात. म्हणजे जवळजवळ एका किलोवर १०० रु पये नफा. ही तर शुद्ध पिळवणूकच.
वेगवेगळ्या रंगांचे आणि आकारांचे हात धुण्याचे साबण होते. कुठे काजूच्या आकाराचे, तर कुठे माशाच्या आकाराचे. मी म्हटलं, हे कुठं बनतं? त्याने दुकानाचं दुसरं दार सरकवलं. आतमध्ये तीन-चार कामगार काम करीत होते. गुळाची छोटी ढेप असते तशा आकाराची साबणाची ढेप एका मशीनखाली ठेवायची आणि पितळ दांडा फिरवायचा. कर्र आवाज करीत डाय लागलेला भाग खाली यायचा. खाली माशाच्या आकाराचा साबण. उरलेला चुरा शेजारच्या एका टबात पडत होता. मी विचारलं, हा वाया जात असणार. तो म्हणाला, नाही. हा आम्ही पॅक करून साबणचुरा म्हणून स्वस्तात विकतो. मूळत: मजूर हे याचे गिऱ्हाईक. त्याने पिशवीकडे बोट दाखवलं. पिशवीत शेवगाठी असतात तसा तो चुरा दिसत होता. मागे गडचिरोलीला एका कार्यकर्त्यांकडे अशी पिशवी पाहिली होती, तिचं रहस्य आता कळलं.
हे सगळं घेऊन मी घरी आलो. कित्येक दिवस हे सारं पुरलं. घरात अनेक ठिकाणी साबणाची घुडकी दिसू लागली. कपडे धुवायला दोऱ्या पुरेनात. एकदा कपडय़ांवर निळे डाग पडले. त्या दुकानात फोन केला. ते म्हणाले, साबण निळ्या रंगाचा होता. त्याचे डाग आहेत. साबणाचा स्वत:चा रंग असतो हे विसरलोच! मग लक्षात आलं, आपलंही तसंच होतंय की. बासरी, ओरिगामी मागे पडत चाललेली होती. शेवटी एक दिवस या छंदाला पूर्णविराम द्यायचं ठरवलं. मग साबणाचं काय करायचं? एक दिवस घरी आलो तो माझा नातू साबणातून काहीतरी आकार करीत होता. म्हटलं, अरे, हे आपल्याला कसं सुचलं नाही? लाकडाऐवजी यात शिल्पं घडवता येतील.
आणि साबणातून शिल्पकला नावाच्या नव्याच छंदाचा जन्म झाला. इतर दिवाळी अंकांत काय लिहायचं हा प्रश्नही सुटला.
response.lokprabha@expressindia.com