५ एप्रिल २०१३
मथितार्थ
चित्रकथी
फोटो गॅलरी

एप्रिल-फूल विशेष
‘ब्रेकिंग न्यूज’.. : काँग्रेसचे ‘संकटमोचक’
एप्रिल फूल बनाया..
माझा कपडे धुण्याचा छंद
‘फूल डे’चे राडे!
मराठी भाषेतले एप्रिल फूल
चार दांडय़ा, एक फूल..
एप्रिलमधले ‘रावणायण’
रेडिओवरचे एप्रिल फूल
पक्या.. पिऊ आणि पाणी!
सेलिब्रिटी एप्रिल फूल

अर्थसंकल्प विशेष

क्रीडा

स्मरण
चर्चा
सेकंड इनिंग
आरोग्यम्
भन्नाट
कविता
पाठलाग
माझं शेतघर
शब्दरंग
संख्याशास्त्र
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
गृहप्रवेश
सिनेमा
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

एप्रिल-फूल विशेष

एप्रिल फूल बनाया..
प्रशांत दांडेकर

आपल्याला कुणी तरी मूर्ख बनवतं आणि तरीही आपण चिडत नाही, हसण्यावारी नेतो असा वर्षभरातला एकमेव दिवस म्हणजे एप्रिल फूल. पण एक एप्रिल याच दिवशी का साजरा केला जातो हा मूर्खशिरोमणींचा दिवस? काय कारणं आहेत त्यामागे? देशोदेशीच्या काय परंपरा आहेत?

एक एप्रिल म्हटले की, आपोआप हे गाणे आपल्या ओठांवर रेंगाळू लागते, ‘एप्रिल फूल बनाया, तो उनको गुस्सा आया’ आणि मग मनात दाटून येतात त्या असंख्य आठवणी, आठवणी ज्यांत आपण कोणाला तरी मूर्ख बनविलेले असते किंवा आपण तरी मूर्ख ठरलेलो असतो. हा मजेशीर जागतिक मूर्खदिन कसा चालू झाला हे आजही एक कोडेच आहे. ‘एप्रिल फूल डे’ला ऑल ‘फूल डे’ असेही म्हणतात. बहुतेक जणांच्या मते या दिवसाचा उगम १५८२ साली फ्रान्समध्ये झाला. पोप ग्रेगरी १३ वे यांनी जुन्या प्रचलित ज्युलियन कॅलेंडरच्या जागी नवीन ग्रेगरियन कॅलेंडर वापरात आणायचे ठरविले त्यामुळे नवीन वर्षांरंभ १ एप्रिल ऐवजी १ जानेवारी ठरला. त्या काळी काही कर्मठ लोकांनी हा बदल स्वीकारायचे नाकारले तर दळणवळण, संदेशवहनाच्या साधनाच्या अभावी काही जणांपर्यंत हा बदलच उशिरा पोहोचला. जे लोक एक एप्रिललाच नवीन वर्ष साजरे करायचे त्यांना इतर जण मूर्ख ठरवू लागले व अशा रीतीने ‘एप्रिल फूल’चा जन्म झाला.
फ्रान्समध्ये ज्यांना मूर्ख बनविले जाते. त्यांच्यापाठी पेपरचे फिश (मासा) चिकटवले जातात व मग मोठय़ाने ‘एप्रिल फिश’ म्हणून चिडविले जाते. काही लोकांच्या मते रोमन राजवटीत साजऱ्या केल्या जाणारा ‘हिलेरिया फेस्टिवल’ हा एप्रिल फूलचा जनक आहे तर स्पॅनिश बोलणाऱ्या देशांमध्ये ‘फिस्ट ऑफ फूल’ हा उत्सव एप्रिल फूलचा प्रथम अवतार आहे असे मानले जाते. पण या सर्वापेक्षाही जुना आहे तो इराणियन ‘सिजदा बेदर’ हा सण. इ.स. पूर्व ५३६ पासून हा सण पार्शियन नवीन वर्षांरंभाच्या ठीक १३ दिवसांनंतर साजरा केला जातो. ज्यात एकमेकांची भरपूर थट्टामस्करी केली जाते.
प्रत्येक देशागणिक एप्रिल फूल डे साजरा करण्याची पद्धत बदलते. उदा. स्कॉटलंडमध्ये हा दिवस दोन प्रकारे साजरा केला जातो. पहिल्या दिवशी 'हंट द गॉक' म्हणून तर दुसऱ्या दिवशी 'टेली डे' म्हणून. टेली डेला माणसाच्या पाश्र्वभागावर आधारित थट्टामस्करी, चेष्टा केली जाते. उदा. 'किक मी' सारखा नाठाळ स्टिकर पाश्र्वभागावर चिकटविणे किंवा एखादी लांबलचक शेपटीच चिकटविणे. पोर्तुगालमध्ये या दिवशी मित्र एकमेकांवर पीठ उडवतात. इंग्लंडमध्ये या दिवशी ज्या मूर्खाना फसविले जाते त्यांना गॉब्स किंवा गॉबी म्हणतात व ज्यांच्यावर विनोद केले जातात त्यांना ‘नूडल’ म्हणतात.
डेन्मार्कमध्ये एक मे हा ‘मे कॅट’ म्हणून साजरा केला जातो व हा दिवस विनोदासाठी राखून ठेवलेला असतो. स्वीडन व डेन्मार्कमध्ये, एक एप्रिलसोबत एक मे हा दिवस सारख्याच कारणासाठी साजरा केला जातो. पोलंडमध्ये तर एक एप्रिलला सार्वजनिकरीत्याही लोकांना मूर्ख बनविले जाते.
अफवा पसरविण्यात थट्टा-मस्करी करण्यात माध्यमांमधले लोक पण हिरिरीने भाग घेतात. हाच ट्रेंड पुढे अमेरिका, ब्रिटनमध्येही रुळला. याचे उत्तम उदाहरण म्हणजे १९५७ साली बीबीसीने प्रसारित केलेली बातमी. ज्यात स्विस लोक स्पॅगेटीचे पीक घेत आहेत व झाडाला नूडल्स लागल्या आहेत असे दाखविण्यात आले होते. माध्यमांच्या अशा सहभागामुळेच जेव्हा दिल्लीश्वरांनी एक एप्रिल हा संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचा दिवस ठरविला तेव्हा कॉ. डांगेंनी याला विरोध केला. कारण त्यांच्या मते लोकांना ही बातमी खोटी वाटली असती.
एक एप्रिलसारखाच एक दिवस अतिपूर्वेकडील कोरियामध्ये साजरा केला जातो. बर्फवृष्टी ज्या दिवशी चालू होते त्या दिवशी राजघराण्यातील व दरबारातील लोक एकमेकांची चेष्टा-मस्करी करतात, काही तरी खोटे-नाटे बहाणे करून बर्फाने भरलेला बाऊल ज्याला मूर्ख बनवायचे त्याच्याकडे पाठविण्याचा प्रयत्न होतो. जो तो बाऊल स्वीकारतो तो मूर्ख ठरतो. निसर्गप्रेमी लोकांनीही आपल्या तऱ्हेने एक एप्रिलचे विवेचन केले आहे. उत्तर गोलार्धात स्प्रिंग (वसंत) ऋतूचे आगमन एप्रिलमध्येच होते. ‘मदर नेचर’ आपले रंग बदलून सर्वाना चकित करते. म्हणूनदेखील हा दिवस आठवला जातो. थोडक्यात काय तर एप्रिल फूलचे माहात्म्य या दिवसाइतकेच मजेशीर आहे.
response.lokprabha@expressindia.com