५ एप्रिल २०१३
मथितार्थ
चित्रकथी
फोटो गॅलरी

एप्रिल-फूल विशेष
‘ब्रेकिंग न्यूज’.. : काँग्रेसचे ‘संकटमोचक’
एप्रिल फूल बनाया..
माझा कपडे धुण्याचा छंद
‘फूल डे’चे राडे!
मराठी भाषेतले एप्रिल फूल
चार दांडय़ा, एक फूल..
एप्रिलमधले ‘रावणायण’
रेडिओवरचे एप्रिल फूल
पक्या.. पिऊ आणि पाणी!
सेलिब्रिटी एप्रिल फूल

अर्थसंकल्प विशेष

क्रीडा

स्मरण
चर्चा
सेकंड इनिंग
आरोग्यम्
भन्नाट
कविता
पाठलाग
माझं शेतघर
शब्दरंग
संख्याशास्त्र
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
गृहप्रवेश
सिनेमा
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

सिनेमा्

१८५७ च्या समरावर सिनेमा बनवायचाय
हरनीत सिंग

साहब बिवी और गँगस्टर रिटर्नस् या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमाचे दिग्दर्शक तिग्मांशू ढोलकिया यांची विस्तृत मुलाखत.

‘साहब बिवी और गँगस्टर रिटर्नस्’ ला मिळालेल्या प्रतिसादानंतरची तुझी प्रतिक्रिया काय आहे?
- मी या क्षेत्रात ‘लहान बाळ’ आहे. माझ्याकडे केवळ सहा चित्रपटांचा अनुभव आहे. कोणताही चित्रपट तयार करताना, आपल्याला किमान शिव्या पडू नयेत.. आपली पत कायम राहावी, अशी अपेक्षा असते. चित्रपट उत्तम गल्ला जमा करू शकेल, न शकेल ते देवाच्या हाती आहे, पण चित्रपटकर्ता म्हणून माझे स्थान टिकले पाहिजे. प्रत्येकच चित्रपट प्रदर्शित होताना हीच भावना असते.
कोणताही नवीन चित्रपट तयार करताना आर्थिक गणितांचा तुझ्या मनावर कितपत पगडा असतो?
- संपूर्ण चित्रपट तयार होईपर्यंत डोक्यात ‘बजेट’चा विचार असतोच. एखाद्या खोलीत स्वत:ला कोंडून घेऊन आणि पुढय़ात लॅपटॉप घेऊन एखादे पुस्तक लिहिल्यासारखा चित्रपट तयार करता येत नाही, त्याची एक स्वतंत्र ‘गोम’ आहे. तुमच्या संकल्पनेची ताकद हीच खरी कळीची बाब आहे, कारण तुम्ही स्वत: आणि तुमचा चमू अशा सर्वामध्येच त्या कल्पनेने किमान दोन ते तीन वर्षे तरी सळसळते चैतन्य राहिले पाहिजे, तशी आकर्षणशक्ती त्या कल्पनेत असायला हवी. एकाच वेळी अत्यंत उत्तम संकल्पना आणि त्याच वेळी ती प्रत्यक्षात आणताना कोठेही उधळपट्टी होणार नाही याची काळजी घेणे अशी तारेवरची कसरत सिनेमा तयार करताना करावी लागते. आणि म्हणूनच चित्रपट नाही तर ‘बजेट’ कोसळते असे मी म्हणतो. म्हणूनच मला वाटतं की मी, ‘निर्मात्याचा’ दिग्दर्शक आहे.
तुझे सगळे चित्रपट पाहता तुला त्यापैकी कोणती संकल्पना बाजारपेठेत नेताना जास्त आव्हानात्मक वाटली?
- ‘पानसिंग तोमर’, याबद्दल दुमतच नाही. हाच चित्रपट माझा पहिला चित्रपट असावा असे मला मनापासून वाटत होते. त्यासाठी मी १९९१ पासून प्रयत्न करत होतो. पानसिंगबद्दल एका नियतकालिकामध्ये आलेला केवळ दोन पानी लेख माझ्या वाचनात आला होता. तो मोरेना या गावचा रहिवासी आहे एवढेच मला माहिती होते. चित्रपटासाठी माहिती संकलनास सुरुवात कोठून करावी हेही मला कळत नव्हते. इंटरनेटवरसुद्धा फारशी माहिती उपलब्ध नव्हती. मी अनेक निर्मात्यांना भेटलो, पण प्रत्येकाचे एकच उत्तर होते, आधी पटकथा लिहून आण मग बघू, पण पटकथेसाठी संशोधनाची गरज आहे आणि त्यासाठी पैशाची, ही बाब कोणी समजून घेण्यास तयारच नव्हते. मग मी ‘यूटीव्ही’कडे गेलो. त्यांना कल्पना आवडली आणि त्यांनी संशोधनासाठी आर्थिक पाठबळ पुरविण्याची तयारी दाखविली.
पटकथा लेखनाच्या दृष्टीने सगळ्यात अवघड चित्रपट कोणता वाटला?
- ‘साहेब बिवी और गँगस्टर रिटर्नस्..’ मला या चित्रपटाचा शेवट प्रचलित पद्धतीने व्हायला नको होता. सामान्यपणे कोणत्याही चित्रपटात एक पुरुष कोणावरही पिस्तूल रोखताना आपण पाहतो, मला हे चित्र नको होते.
तू जेव्हा-जेव्हा चित्रपटाची कल्पना लिहितोस तेव्हा तुला त्याचा शेवट माहिती असतो का? म्हणजे चित्रपटातील पात्रे तुझे कथानक आकारीत नेतात की तुझे कथानक पात्रांना आकार देते?
- प्रत्यक्ष लेखन सुरू करताना कोणतेही पात्र कोठे जाणार याबाबत मला काहीही कल्पना नसते. ती कोठे जातील, कोणापाशी थबकतील याची स्पष्टता माझ्या मनांतही नसते. मी त्या पात्रांना मुक्त स्वातंत्र्य देतो, पात्रेच माझे कथानक आकारीत नेतात.
‘तिग्मांशूच्या प्रेरणा अत्यंत शुद्ध आणि संपूर्ण भारतीय आहेत’, असे एक चित्रपट निर्माता म्हणून शेखर कपूर यांनी जाहीर मत व्यक्त केले आहे. खरोखरच, तुला प्रेरणा मिळते कुठून?
- मी लहानाचा मोठा होत असताना सामाजिक रचना ही अधिकाधिक एतद्देशीय धाटणीची होती. राजीव गांधी आणि उदारीकरणाच्या प्रक्रियेनंतर आपल्या समाजात मोठय़ा प्रमाणात बदल झाले. भारताने या कालावधीत आपली ‘सांस्कृतिक अस्मिता’ गमाविण्यास सुरुवात झाली. सामोशापेक्षा पिझ्झा स्वीकारला गेला. एकूण, आपली ‘चव’च बदलली. ‘शोले’ चित्रपटानंतरची पिढी या बदलावर पोसली गेली, पण माझे तसे नव्हते. अलाहाबादमध्येच मी लहानाचा मोठ्ठा झालो. जेव्हा हिंदुस्तान हा हिंदुस्तान होता त्या काळाचा माझ्यावर प्रचंड पगडा आहे. स्वाभाविकच, ती अस्मिता आणि त्याच्याशी जोडले गेलेले लोक यांच्याकडेच माझा सदैव ओढा राहिला.
तू निर्माण केलेल्या पात्रांपैकी तुझ्या मनावर कोरले गेलेले पात्र कोणते?
- मला वाटतं, ‘चरस’मधील इरफानचे पात्र. जोसेफ कॉनराड यांच्या ‘हार्ट ऑफ डार्कनेस’ या कादंबरीवर बेतलेल्या ‘एपोकॅलिप्स नाऊ’ या चित्रपटातील मार्लन ब्रँडो यांनी साकारलेली भूमिका आणि ‘काला पत्थर’ या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांची भूमिका या दोहोंचाही प्रभाव त्या भूमिकेवर पडला आहे. एखादी चूक घडते आणि ती सुधारण्याच्या प्रयत्नात एखादी व्यक्ती आपले स्वत:चे साम्राज्य उभे करते या संकल्पनेत मी इरफानचे पात्र अनेकदा रंगविले होते, पण मला वाटतं की मी त्या पात्राला ‘चरस’मध्ये न्याय देऊ शकलो नाही. मला आजही याचं शल्य आहे आणि आज ना उद्या मी त्याची भरपाई करेनच!
तू ‘चरस’चा उल्लेख केलाच आहेस तर त्याच अनुषंगाने.. त्या चित्रपटानंतर तुझा पुढचा चित्रपट ‘शागीर्द’ हा सात वर्षांनी प्रदर्शित झाला. ही मधली सात वर्षे तू कशी घालवलीस?
- या काळात अनेक आघाडय़ांवर माझे प्रयत्न सुरू होते, पण काही केल्या गाडी पुढे सरकत नव्हती. मी या काळात ‘किलिंग ऑफ अ पॉर्नस्टार’ हा चित्रपट तयार करण्याच्या प्रयत्नात होतो, पण माशी कुठे शिंकली ते कळलेच नाही. त्यानंतर मी आजवरचा माझा सर्वात महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘गुलामी’ तयार करायला २००५ मध्ये सुरुवात केली. २००७ मध्ये भारतीय स्वातंत्र्यलढय़ाच्या दीडशेव्या स्मृतिवर्षांचे निमित्त साधत मला तो चित्रपट प्रदर्शित करायचा होता. चित्रपटात सनी देओल, इरफान, समीरा रेड्डी असे कलाकार होते, साडेचारशे जणांचा चमू यासाठी काम करत होता. आम्ही पुण्याजवळील भोर येथे काही दृश्ये चित्रितही केली होती, पण निर्मात्याने निधी रोखला. त्यामुळे चित्रपट रखडला. त्यानंतर मी ‘शागीर्द’ लिहायला सुरुवात केली, तसेच राजकुमार संतोषी यांच्या ‘फॅमिली-टाइज् ऑफ ब्लड’ या चित्रपटासाठी संवादलेखन सुरू केले.
मी असे ऐकले आहे की त्या काळात तू एक लॅब्रेडॉर कुत्रा विकत घेतला होतास आणि त्याचे नाव ‘अ‍ॅक्शन’ असे ठेवले होतेस..
- (हसत.) कोणी सांगितलं हे तुला.. पण हे अंशत: खरे आहे. मला पाळीव प्राणी आवडतात आणि मी त्याचे नाव अ‍ॅक्शन ठेवले हे खरे, किंबहुना माझ्या कार्यालयात साहिबा नावाची कुत्रीपण आहे. खरं तर तिच्या आगमनानंतर सर्व काही सुरळीत होऊ लागलं. ‘पानसिंग तोमर’ आणि आता ‘साहेब बिवी और गँगस्टर रिटर्नस्..’ साहिबाने माझे नशीब बदलले. खरं तर ती एक बेवारस होती. तिची मी मुक्तता केली होती. पण वस्तुस्थिती ही आहे की, तिनेच माझी मुक्तता केली.
हा चित्रपटांचा किडा तुला कधी आणि कसा डसला तेही सांग जरा..
तीन भावंडांपैकी मी सर्वात धाकटा. आमच्यात आठ ते नऊ वर्षांचे अंतर आहे. मोठा होत असताना त्यांचे आणि माझे नाते मित्रत्वाचे नव्हते, उलट त्यांचा माझ्यावर कळत-नकळत प्रभाव पडत गेला. त्यांचा स्वत:चा बँड होता, ते उत्तम वाचक होते. मी दहावीत असताना आयर्विग स्टोन हिची ‘लस्ट फॉर लाइफ’ ही कादंबरी वाचल्याचे मला आजही स्पष्ट आठवतंय. मला वाटलं होतं की, ते पुस्तक म्हणजे अश्लील साहित्याचा नमुना असेल.. त्यानंतर मी चित्रपट क्लबचा सभासद झालो. १६ एमएम पडद्यावर मी बर्जमन, गॉडर्ड यांचे चित्रपट पाहू लागलो. मला त्या चित्रपटांचे तत्त्वज्ञान कधीच कळले नाही, पण त्यातील ‘इमेजेस्’नी माझ्या मनाचा ताबा घेतला होता. चित्रपट पाहण्याचा छंदच जडला तेव्हापासून. चित्रपटगृहात जाऊन नवीन चित्रपटाची पोस्टर पाहण्यातले कुतूहल तेव्हा जागृत झाले आणि झाले ते कायमचेच.
तुझ्या मते तू उत्तम अभिनेता आहेस की दिग्दर्शक?
- (हसत.) मी दिग्दर्शकच आहे, अभिनेता नाही. मला याची पहिल्यापासूनच जाणीव होती आणि मला दिग्दर्शनच करायला आवडते.
मग तू नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये (एनएसडी) प्रवेश का घेतलास?
- (हसत) तो फक्त एक अपघात होता. मी एनएसडीच्या परिसरात गेलो होतो तेव्हा तिथे मी सिगरेट ओढणाऱ्या - मुलांबरोबर भटकणाऱ्या मुली पाहिल्या, कोणी नाटकाच्या तालमी करीत होते. मला त्या मुक्त वातावरणाची भुरळ पडली, तेथील जीवनशैली आवडली म्हणून एनएसडीमध्ये प्रवेश घेतला.
तू दूरचित्रवाहिन्यांवरही येण्याचा प्रयत्न केलास. तिथे काय शिकायला मिळाले?
- मी दूरचित्रवाहिन्यांवर काम करत होतो तेव्हा मला माध्यमाची नेमकी जाण नव्हती. दूरदर्शन हे ‘क्लोजअप’चे माध्यम आहे असे अनेक जण सांगतात. मी मात्र तिथेही चित्रपट तयार करीत असल्यासारखेच काम केले. स्टार प्लससाठी मी ‘स्टार बेस्टसेलर्स’ हा कार्यक्रम करताना मी सहा कथांच्या मालिकेचे चित्रीकरण केले. हा अत्यंत हृद्य अनुभव होता. अनुराग कश्यप, इम्तियाझ अली, श्रीराम राघवन आणि मी सर्वानीच या मालिकेसाठी चित्रीकरण केले होते. त्या कार्यक्रमाचा स्लॉट वगळला गेला तेव्हा खूपच वाईट वाटलं..
एक कलाकार, पात्र रचनाकार, लेखक, दिग्दर्शक, निर्माता यापैकी कुठचा अनुभव सर्वात समृद्ध करणारा होता?
- मला वाटतं, ‘बँडिट क्वीन’ या चित्रपटासाठी शेखर कपूरांना साहाय्यक म्हणून मी जे काम केले तो सर्वात समृद्ध करणारा अनुभव होता. त्यांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. मला संवादलेखनाचे स्वातंत्र्यही होते आणि अ‍ॅक्शन दिग्दर्शनाचेही स्वातंत्र्य होते. ज्या साहाय्यक दिग्दर्शकाला ‘बॅकग्राउंड अ‍ॅक्शन’ कशा असाव्यात याचे उत्तम भान असते तो कधी ना कधी मोठा दिग्दर्शक होतोच. ‘बँडिट क्वीन’ हा माझ्या आयुष्याचा टर्निग पॉइंट म्हणावा लागेल.
तुझ्या कामापैकी सर्वात अवघड भाग कोणता?
- मला वाटतं लेखन.. कारण मी अत्यंत आळशी आहे, पण जेव्हा लेखन पूर्ण होते तेव्हा निम्मे काम पूर्ण झाल्याची माझी भावना होते. माझ्याकडे संपादन आणि संकलन करण्यासाठी आवश्यक तो संयम नाही. एकदा माझे लिखाण पूर्ण झाले की मला दुसऱ्या क्षणी सेटवर जाऊन अभिनेत्यांकडून काम करून घ्यायचे वेध लागतात. प्रत्येक कलाकाराला स्वतंत्रपणे हाताळावे लागते. कलाकार उत्तम असेल तर साधासा संदर्भही तो पटकन पकडू शकतो.
इरफान तुझा आवडता कलाकार आहे. त्याच्यामधलं तुला नेमकं काय आवडतं?
- इरफानच्या अभिनयात त्याचं चिंतन प्रतिबिंबित होतं. स्पष्टच बोलतो, भारतात अनेक कलाकार अत्यंत सुमार दर्जाचे आहेत. उत्तम ‘डायलॉग’ फेकणे म्हणजे चांगला अभिनय अशी आपल्या अनेक कलाकारांची धारणा आहे. पण अभिनय म्हणजे, दहा पानी संवाद धाडधाड फेकणे नव्हे. संवाद तर मी लिहिलेले असतात, पण टाळ्या मात्र अभिनेता घेतो, असे का? उत्तम अभिनेता तो, जो आपल्या पात्राच्या उभारणीमागील विचार समजावून घेऊन एक शब्दही न उच्चारता त्या भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवितो. दूरचित्रवाहिन्यांवर तर परिस्थिती याहून भीषण आहे. तिथे तर नुसती बडबड म्हणजेच अभिनय समजला जातो.
मग सैफ अली खान (बुलेट राजा) आणि इम्रान खान (मीलन टॉकीज) यांच्याबरोबर आगामी चित्रपटांमध्ये तू नेमकं काय करतो आहेस?
- मला वाटतं ते दोघेही उत्तम अभिनेते आणि स्टार आहेत. दोघांनाही बॉक्स ऑफिसवर मान आहे आणि त्यांचा अभिनयही उत्तम आहे. सैफची ‘दिल चाहता है’ आणि ‘ओमकारा’ या चित्रपटांमधील भूमिका मला फार आवडली होती. ते दोघेही दिग्दर्शकाच्या अपेक्षेनुसार काम करतात.
तुझ्या चित्रपटांमधील स्त्रीची व्यक्तिरेखा लिहिताना तुझ्या मनात कोणते विचार असतात? विशेषत: ‘साहेब बिवी और गँगस्ट’रसारखे चित्रपट करताना..
- मी स्वत: महिलांच्या सहवासात ‘कंफर्टेबल’ नसतो. मी ज्या भागातून आलो त्याचा परिणाम म्हणून असेल, पण माझ्यातील पौरुषत्व आपोआप माझ्या वर्तनात उतरतं, पण लेखन करताना मी ही चूक भरून काढण्याचा प्रयत्न करतो. विशेषत: महिला व्यक्तिरेखा रंगवताना मी या व्यक्तिरेखांना न्याय द्यायचा प्रयत्न करतो.
भविष्यात तू स्त्रीकेंद्रित चित्रपट करशील का?
- मी ‘बेगम सामरू’ या चित्रपटाच्या माध्यमातून तो प्रयत्न करतो आहे. मीरतजवळ असलेल्या सारडाणा येथील राज्यकर्त्यां मुस्लीम महिलेच्या आयुष्यावर हा चित्रपट आहे.
तुझ्या घमासान संवादांचे रहस्य काय?
- (हसत).. माझ्या घमासान संवादांचे रहस्य ज्या भागात मी लहानाचा मोठा झालो त्या अलाहाबादमध्ये आहे. भारतीय संवादांची ‘सभ्यता’ मी येथेच शिकलो. प्रत्येक व्यक्तिरेखा लिहिताना त्यात थोडासा का होईना पण मी डोकावतोच आणि स्वाभाविकच ते माझ्यासारखे बोलतात. आता घमासान या शब्दाबद्दल बोलायचे झाले तर उत्तर प्रदेशातील हा अत्यंत रुळलेला शब्द आहे. ‘वहा घमासान बवाल हो गया’ हे येथील सर्वसामान्यांच्या तोंडी येणारे वाक्य असते, पण नव्या चौकटींच्या पाश्र्वभूमीवर चित्रपटामध्ये हे वाक्य चपखल बसले.
एका ज्योतिषाने असं भविष्य वर्तविलं होतं की, सोळा चित्रपटांनंतर तू राजकारणामध्ये प्रवेश करशील म्हणून..
- मी पण ऐकलंय.. सहा झालेत, दहा बाकी आहेत.
मग राजकारणाबद्दल काय? काही विचार, पर्याय?
- हो मला राजकारणात यायचंच आहे, पण त्यापूर्वी मला चित्रपट क्षेत्राला देण्याजोगे काही उरले नाही याची खात्री पटायला हवी.
चित्रपट निर्मितीची पाठय़पुस्तके म्हणावीत अशा पाच चित्रपटांची नावे सांग.
- ‘गाईड’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन अमेरिका’, ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘शोले’ आणि ‘प्यासा’.
तुझ्या समकालीनांचे काम तुला कसे वाटते?
- सगळेच उत्तम प्रयत्न करणारेआहेत. अनुराग हा माझा जिवलग मित्र आहे. मी अजून एकदाही दिबाकर बॅनर्जीला भेटलेलो नाही, पण त्याचे काम मला आवडते. राजू हिरानी चित्रपटाची कथा समजावून सांगण्यात पटाईत आहे. मी जर ‘मुन्नाभाई’ चित्रपटाची पटकथा वाचली असती तर ही कधीच चालणार नाही अशी प्रतिक्रिया मी दिली असती, पण त्याने त्यातून परीकथा केल्यासारखा सिनेमा तयार करून दाखवला. इम्तियाझकडे संगीताचे चांगले अंग आहे. मला वाटतं आमच्या पिढीत अनुराग कश्यप हा सर्वात धाडसी आणि उत्तम दिग्दर्शक आहे.
तुला दिग्दर्शन करायला आवडले असते असा एखादा समकालीन चित्रपट?
- मला नाही वाटत, दिबाकरचा ‘लव्ह, सेक्स और धोका’ हा चित्रपट मी करू शकलो असतो. पण मला तो आवडला. तो अतिशय अवघड चित्रपट होता आणि त्याने तो उत्तमच बनविला.
जो चित्रपट तयार करण्यासाठी तू अत्यंत आतुर आहेस अशी एखाद्या चित्रपटाची कल्पना?
- मला ‘गुलामी’ या माझ्या जुन्याच चित्रपटाचे पुनरुज्जीवन करायला आवडेल. मी इतिहासाचा विद्यार्थी आहे आणि मला १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाचा कालावधी आकर्षक वाटत आला आहे. मला वाटतं भारताच्या इतिहासातील धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टीने तो सर्वात सुंदर कालखंड होता. हिंदू आणि मुस्लीम एक होते. आपण कल्पनाही करू शकणार नाही, पण लोक त्या वेळी रोटीवर कमळाची फुले गुंफून एका गावाहून दुसऱ्या गावाकडे पाठवत असत. ते त्यांच्या ऐक्याचं प्रतीक होतं. कमळ हे विष्णूला प्रिय फूल, तर रोटी हे इस्लाममधील चंद्राचं प्रतीक मानलं जायचं. हिंदुस्तान हा जेव्हा हिंदुस्तानच होता त्या वेळचं चित्रीकरण करणारा ‘गुलामी’ हा चित्रपट तयार करायला मला आवडेल. डॉ. व्हर्गिस कुरियन यांच्यावर चित्रपट तयार करायला मला आवडेल. कारण ते भारताचे राष्ट्रपती व्हावेत असं मला मनापासून वाटत होतं.
(अनुवाद- स्वरूप पंडित)
response.lokprabha@expressindia.com