५ एप्रिल २०१३
मथितार्थ
चित्रकथी
फोटो गॅलरी

एप्रिल-फूल विशेष
‘ब्रेकिंग न्यूज’.. : काँग्रेसचे ‘संकटमोचक’
एप्रिल फूल बनाया..
माझा कपडे धुण्याचा छंद
‘फूल डे’चे राडे!
मराठी भाषेतले एप्रिल फूल
चार दांडय़ा, एक फूल..
एप्रिलमधले ‘रावणायण’
रेडिओवरचे एप्रिल फूल
पक्या.. पिऊ आणि पाणी!
सेलिब्रिटी एप्रिल फूल

अर्थसंकल्प विशेष

क्रीडा

स्मरण
चर्चा
सेकंड इनिंग
आरोग्यम्
भन्नाट
कविता
पाठलाग
माझं शेतघर
शब्दरंग
संख्याशास्त्र
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
गृहप्रवेश
सिनेमा
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

चित्रकथी

टोकदार रेषेचा व्यंगचित्रकार
विनायक परब

सकाळी वर्तमानपत्र हाती आले की, काही बाबी प्रामुख्याने वाचकांकडून पाहिल्या जातात. या संदर्भात जगभरातील वाचकांचे एक मोठे सर्वेक्षण १९९५ साली पार पडले. त्या वेळेस असे लक्षात आले की, जगभरातील वाचकांमध्ये एका सवयीबाबत साम्य आहे. अनेकांची नजर सर्वप्रथम जाते ती त्या दिवशीच्या व्यंगचित्रावर! दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर भाष्य करणारा, प्रसंगी समाजाला चार गोष्टी कठोरपणे सुनावणारा किंवा लक्षात आणून देणारा अग्रलेखही वर्तमानपत्रात असतो, पण त्याहीपेक्षा अनेकदा खूप काही सांगून जाते ते हे व्यंगचित्र. भारतामध्ये आज व्यंगचित्र असे म्हटले की, सर्वप्रथम नाव घेतले जाते ते आर. के. लक्ष्मण यांचे. पण या पॉकेट कार्टुन्सना सुरुवात केली ती डीझी कुलकर्णी या प्रसिद्ध चित्रकार- व्यंगचित्रकारांनी. राजकीय वास्तवावर कोरडे ओढणारे व्यंगचित्र हा प्रकार भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे.
आज आपल्या देशाची प्रतिमा घोटाळ्यांचा देश अशी होऊ घातली आहे. या घोटाळे आणि गैरव्यवहारांचा इतिहास खूप मागे जातो. त्यातही लक्षात राहतो तो १९८२ साली इंदिरा गांधी यांच्या काळात झालेला मोठा घोटाळा. त्यांच्या नावे फोन करून त्या काळी ६५ लाखांची रक्कम हडपण्यात आली होती. देशभर गाजलेल्या त्या घोटाळ्याने अस्वस्थ झालेल्या तरुणाने त्याच्या मनातील भावनांना व्यंगचित्रांच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली.. आणि या देशाला एक चांगला व्यंगचित्रकार लाभला. आज केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर ज्या मोजक्या भारतीय व्यंगचित्रकारांचे नाव मानाने घेतले जाते, त्यात ज्यांचा समावेश आहे, ते म्हणजे प्रभाकर वाईरकर!
रेखाचित्रे, व्यंगचित्रे आणि अर्कचित्रे असे तीन महत्त्वाचे प्रकार आहेत. सर्वच्या सर्व कलावंतांना हे तिन्ही तेवढय़ाच तोडीने जमतातच असे नाही. पण वाईरकर हे बाळासाहेब ठाकरे किंवा आरकेंप्रमाणे या तिन्ही क्षेत्रांत लीलया वावरतात. जगभरातील सवरेत्कृष्ट ६० व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रे असलेला एक मोठा दस्तावेज १९९५ सालच्या आसपास प्रकाशित झाला. त्यात ज्या दोनच भारतीयांना स्थान मिळाले, त्यात वाईरकरांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर वाईरकरांची झेप पोहोचली ती १९८७ साली स्वित्र्झलड येथे झालेल्या इंटरनॅशनल कॉमिक फेस्टिवलच्या वेळेस. त्यानंतर मग वाईरकरांनी केलेले चित्रण आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकणे हे काही नवे राहिले नाही. निस येथील कार्निव्हलमध्ये त्यांनी केलेल्या रेखाचित्रांचा चित्ररथ साकारण्यात आला. त्यानंतर २००६, २००७ साली सलग दोन वर्षे आंतरराष्ट्रीय सन्मानही मिळाला. २००२ साली दूरदर्शनने विख्यात भारतीय व्यंगचित्रकार अशी एक मालिका सादर केली. त्यातील एक भाग हा पूर्णपणे वाईरकर यांच्यावर बेतलेला होता. तोपर्यंत त्यांना भारतातही अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. ज्या जाहिरातींच्या क्षेत्रात ते काम करीत होते, त्यात मानाचा समजला जाणारा कॅग पुरस्कारही त्यांना मिळाला होता. ‘इलस्ट्रेटर ऑफ द इअर’ हा पुरस्कार सलग दोन वर्षे मिळाला.
या सर्व पुरस्कारांमागे होती ती एक कडवी नजर! प्रभाकर वाईरकर सांगतात.. ‘घटना पाहत असताना किंवा घडत असतानाच त्यातील व्यंग लक्षात येते आणि मग मनात रेखाटनांचे खेळ सुरू होतात. त्याच क्षणी हातात कागद असेल तर ते थेट उतरत जातात. त्यात खाडाखोड नसते. कारण विचारांमध्ये सुस्पष्टता असते.’
वाईरकरांची रेषा इतर सर्व व्यंगचित्रकारांपेक्षा खूप वेगळी आहे. ती कधीही फारशी जाड होत नाही. ती म्हटले तर खूप लवचीक आणि बारीक आहे पण त्यात कुठेही तुटकपणा नाही. विचारांमधली स्पष्टता तिथे नेमकी कळते. शिवाय त्या चित्रांचे आणखी एक वेगळेपण आहे, ते म्हणजे ती थेट कथनात्मक वाटतानाच थेट भाष्यही करतात. वाईरकर त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये शब्दांचा वापर फार कमी करतात. अनेकदा समोरचे चित्रच पुरेसे बोलके असते. उदाहरणच घ्यायचे तर स्नूकरचा बोर्ड, त्यावरच्या गोल चेंडूंवर शिखांचा फेटा, मुस्लिमांची हिरवी टोपी आणि हिंदूंचा कपाळावरील नाम आणि शेंडी एवढेच दिसते. खेळणारा एखाद्या खलनायकाप्रमाणे डोळ्यांवर गॉगल चढवून आहे आणि सोबत एक राजकारणी.. याला शीर्षक नसले तरी विषय नेमका कळतो. त्यातही त्याला ‘नॅशनल हॉबी’ असे शीर्षक मिळते तेव्हा ते अधिक टोकदार होते! हे वाईरकरांचे सामथ्र्य आहे.
देशाच्या स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा होत असतानाच्या देशातील परिस्थितीवर नेमके भाष्य करणारे वाईरकरांचे व्यंगचित्र त्या वेळेस प्रसिद्ध झाले होते. ते अतिशय बोलके होते. वाळूच्या घडय़ाळात वरच्या बाजूस गांधीजी असून गांधीरूपी वाळू निसटून खाली जाते आहे आणि खाली त्यातून पैशांच्या गदेल्यावर बसलेला, एका हाती मदिरा आणि दुसऱ्या हाती मदिराक्षी असलेला राजकारणी, खालच्या बाजूस चिरडला गेलेला सामान्य माणूस असे ते चित्रण होते. असेच गाजलेले चित्रण होते ते इराकच्या सद्दाम हुसेनप्रती अमेरिकेने दाखविलेल्या दुजाभाव आणि दादागिरीचे. त्यात दंतवैद्यक अमेरिकी दाखवला असून तो सद्दामचे दात तपासत म्हणतोय, इथेच महाभयंकर नरसंहार करणारी शस्त्रास्त्रे लपविल्याचा संशय आहे आणि दंतवैद्यक असलेल्या अमेरिकेच्या आ वासलेल्या तोंडात दातांच्या जागी क्षेपणास्त्रेच दिसताहेत! या सर्व चित्रांचा एक महत्त्वाचा विशेष आहे तो म्हणजे ती थेट भाष्य करतात. अनेकदा त्यासाठी शब्दांची गरजही नसते! म्हणूनच वाईरकर अधिक भावतात.
हे सामथ्र्य आले कुठून असे विचारता वाईरकर सांगतात.. मुळात जाहिरात क्षेत्रात काम करताना असे लक्षात येत होते की, आपण इतरांच्या इशाऱ्यावर काम करतोय. म्हणजेच व्हिज्युअलायझर सांगतो त्याप्रमाणे स्केचिंग किंवा इलस्ट्रेशन्स करतो आहे. आंतरिक ऊर्मी होती ती स्वत:चे असे काही वेगळे करण्याची. त्यासाठी व्यंगचित्रांकडे वळलो होतो. इतरांची कामे पाहताना लेख वाचून त्याचे चित्ररूप केले जाते आहे, असे वाटायचे. ते मला टाळायचे होते. म्हणजे मुळात मला तसे करूच नये, असे वाटायचे. आपल्याला थेट त्यातला अर्थच पोहोचवता आला पाहिजे, असे वाटायचे. ते करून दाखविण्याची संधी ‘डेबोनेर’ या मासिकामध्ये मिळाली आणि त्याचे चीज झाले. कारण तिथे केलेले ते वेगळ्या शैलीतील काम लोकांच्या पसंतीस उतरले. त्या कामाने मला नाव दिले, परिचय दिला आणि प्रसिद्धीही दिली. नंतर मिळालेल्या आंतरराष्ट्रीय संधींच्या मागे हेच काम होते!
‘निस कार्निव्हल’मधील त्यांच्या रेखाटनांचे चित्ररथ झालेले पाहताना वाईरकरांना भरून आले होते. ग्लोबल वॉर्मिग हा विषय होता आणि इग्लूच्या बाजूने चाललेला माणूस त्या ध्रुवीय प्रदेशातून पेंग्विनसारख्या प्राण्याला घेऊन चालला आहे. मात्र तो पूर्ण पेंग्विन नाही तर पाठीवर तो उंटासारखा झाला आहे. येणाऱ्या काळात आपण तापमानवाढ रोखली नाही तर पेंग्विनचा उंट होईल किंवा दोन्हींचे एकरूप असलेला प्राणी अस्तित्वात येईल, असे त्यात चित्रित करण्यात आले होते. त्या रेखाचित्राची निवड करून तो कार्निव्हलमध्ये मिरवण्यात आला. तो क्षण वाईरकरांना खूप काही देऊन गेल्यासारखा वाटतो.
आता जगभर भ्रमंती झाली. मानसन्मानही मिळाले तरी लक्षात काय राहते, असे विचारता वाईरकर म्हणतात.. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे परफेक्शनिस्ट व्यंगचित्रकार होते. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर ‘मार्मिक’साठी व्यंगचित्रे करणे बंद केले. त्या जागी बाळासाहेबांनी माझी निवड करणे, ही माझ्यासाठी मोठी पावती होती. त्यांच्यासारखा परफेक्शनिस्ट व्यंगचित्रकार पाहिला नाही. त्यांच्या सोबत नंतर अखेपर्यंत म्हणजे सहा वर्षे काम करण्याची आणि ‘मार्मिक’चे मुखपृष्ठ करण्याची संधी मिळाली. हा माझ्यासाठी सारा शिक्षणाचा कालखंड होता. त्यांच्यासोबत वेळोवेळी झालेल्या चर्चा, रेखाटने यातून मला खूप काही शिकायला मिळाले. त्यांच्या व्यंगचित्राचा तोल कधीही ढळलेला मी पाहिला नाही, म्हणून त्यांना परफेक्शनिस्ट म्हणतो. अशा व्यक्तीकडून मोलाची सहा वर्षे मिळणे यासारखी माझ्या कामाची दुसरी पावती नाही. आयुष्यातील सुरुवातीचा कष्टप्रद काळ जेवढे शिकवून गेला, तेवढाच हा काळही शिकवून गेला. आता प्रभाकर वाईरकर नावाच्या पेन्सिलला बाळासाहेब ठाकरे नावाच्या शार्पनरने-कटरने अधिक तासून टोकदार केले आहे!
response.lokprabha@expressindia.com