५ एप्रिल २०१३
मथितार्थ
चित्रकथी
फोटो गॅलरी

एप्रिल-फूल विशेष
‘ब्रेकिंग न्यूज’.. : काँग्रेसचे ‘संकटमोचक’
एप्रिल फूल बनाया..
माझा कपडे धुण्याचा छंद
‘फूल डे’चे राडे!
मराठी भाषेतले एप्रिल फूल
चार दांडय़ा, एक फूल..
एप्रिलमधले ‘रावणायण’
रेडिओवरचे एप्रिल फूल
पक्या.. पिऊ आणि पाणी!
सेलिब्रिटी एप्रिल फूल

अर्थसंकल्प विशेष

क्रीडा

स्मरण
चर्चा
सेकंड इनिंग
आरोग्यम्
भन्नाट
कविता
पाठलाग
माझं शेतघर
शब्दरंग
संख्याशास्त्र
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
गृहप्रवेश
सिनेमा
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

चर्चा

कुठे आहे वैज्ञानिक प्रगल्भता?
शरद काळे
आजकाल ‘वेळ नाही’ या सबबीखाली आपण आयुष्यातल्या अनेक चांगल्या, साध्यासुध्या निखळ आनंदाच्या गोष्टींना नकार देतो.

भक्त प्रल्हादाच्या गोष्टीमध्ये त्याची नारायण भक्ती त्याच्या पिताश्रींना न आवडल्यामुळे ते त्याला मारण्याचा हुकूम देतात. जेव्हा हिरण्यकशिपूचे प्रल्हादाला मारण्याचे सर्व प्रयत्न फसतात तेव्हा चिडून तो विचारतो की ‘सांग, तुझा नारायण आहे तरी कुठे?’ त्यावर भक्त प्रल्हाद अगदी शांतपणे उत्तर देतो की माझा नारायण तर सगळीकडेच आहे.’ त्यानंतर राजमहालातील खांबात नारायण आहे असे जेव्हा प्रल्हाद सांगतो तेव्हा त्याचे पिताश्री महाराज त्या खांबाला लाथ मारतात व त्यातून नरसिंह प्रकट होतो व त्या प्रत्यक्ष श्री विष्णूच्या अवताराकडून त्या उद्दाम दैत्य राजाचा वध होतो. या गोष्टीतील नारायणाप्रमाणे विज्ञानदेखील सर्वत्र भरलेले आहे. विज्ञान नाही अशी एकही जागा आपल्याला दाखविता येणार नाही. प्रल्हाद त्याच्या भक्तिचक्षूंच्या माध्यमातून नारायण पाहू शकत होता, कारण नारायण म्हणजे काय हे त्याला समजले होते. चराचरात जे चतन्य भरलेले आहे ते म्हणजेच नारायण किंवा विज्ञान असते. जे आपल्याला समजते त्याला आपण विज्ञान म्हणतो व जे आपल्याला अजून समजलेले नाही त्याला आपण अध्यात्म असे म्हणतो.
विज्ञानाच्या आधारावर जीवन जगण्यात एक अनोखा आनंद आपल्याला मिळत असतो. गदिमा या नावाने उभ्या महाराष्ट्राला परिचित असलेले आधुनिक वाल्मीकी म्हणजे कविवर्य माडगूळकर. त्यांनी लिहिलेले गीत रामायण म्हणजे मराठीचे भूषण असलेले एक विज्ञान महाकाव्यच म्हणावयास हवे. त्यातील ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा’ हा भाग म्हणजे विज्ञान व अध्यात्म यांची सर्वोत्तम गुंफण आहे.
अंत उन्नतीचा पतनी होई या जगात
सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत
वियोगार्थ मीलन होते नेम हा जगाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्मजात
दिसे भासते ते सारे विश्व नाशवंत
काय शोक करिसी वेडय़ा स्वप्नीच्या फळांचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
या ओळींमधून गदिमांनी केवढे विज्ञान सांगितले आहे! त्यात पदार्थाच्या अविनाशित्वाचा नियम उकल करून तर सांगितला आहेच, शिवाय जीवनाच्या क्षणभंगुरतेची जाणीव करून दिली आहे. हे क्षणभंगुर असूनदेखील प्रत्येकाने आपापले काम करीत राहिले पाहिजे, क्षणभंगुर आहे म्हणून जीवन जगायचे नाही असे नाही! म्हणूनच श्रीराम भरताला सांगतात,
नको आसू ढाळू आता पूस लोचनांस
तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास
अयोध्येस तू हो राजा, रंक मी वनीचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
नियतीने ठरविले की १४ वष्रे आता मला वनात राहायचे आहे व तुला अयोध्येचा राजा व्हावयाचे आहे. आपण हे उत्तरदायित्व निभावालेच पाहिजे.
केशवसुतांची एक कविता होती, ‘तुतारी’.
एक तुतारी द्या मज आणुनी
फुंकीन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकीन सगळी गगने
दीर्घ तिच्या त्या किंकाळीने
आमच्या शिक्षकांच्या म्हणण्याप्रमाणे ही विज्ञानाची तुतारी केशवसुतांना अपेक्षित होती. ती वाजवून समाजातील अंधश्रद्धा त्यांना दूर करायची होती व एका प्रगल्भ समाजाची निर्मिती त्यातून अपेक्षित होती. केशवसुतांची ‘स्फूर्ती’ कविता शिकविताना तिच्या पहिल्या दोन ओळींचा अर्थ सरांनी विज्ञानाच्या भाषेत खूप छान सांगितला होता. त्या ओळी होत्या
काठोकाठ भरू द्या पेला फेस भराभर उसळू द्या
प्राशन करिता रंग जगाचे क्षणोक्षणी ते बदलू द्या.
विज्ञानाने भरलेला पेला कवी आपल्याला प्यायला सांगतो आहे. विज्ञानाचा हा पेला प्यायल्यावर जगाचे इतके विविध रंग आपल्याला समजू लागतात की त्यापुढे संगणकातील लक्षावधी रंग फिके पडावेत! हे रंग बघण्याची दृष्टी आपल्याला विज्ञान देत असते. त्यातील ज्ञान जसजसे उलगडत जाते तसतसे हे रंग अधिक खुलू लागतात. त्याच कवितेत कवी पुढे लिहितात की,
देव दानवा जने निर्मिले हे मत लोकां कळवू द्या
काठोकाठ भरू द्या पेला फेस भराभर उसळू द्या
प्राशन करिता रंग जगाचे क्षणोक्षणी ते बदलू द्या

यातील देव प्रवृत्ती विज्ञान उपासाकामध्ये सहजपणे फुलत जाते. मग त्या व्यक्तीला एखादे काम करवून घेण्यासाठी बळाचा वापर करावा लागत नाही. एखादे काम करताना त्यात सहसा चूक होत नाही. सारासार बुद्धी, तारतम्य, ज्ञान व सामान्य ज्ञान यांचा संगम आपल्याला वैज्ञानिक प्रवृत्तीच्या माणसात झालेला दिसून येतो. अशा वैज्ञानिक प्रवृत्तीचे लोक ज्या समाजात अधिक असतात तो समाज प्रगल्भ असतो म्हणावयास हरकत नाही. अशा लोकांना सर्व विज्ञान समजते असे नाही. पण एखादी नवीन गोष्ट समजावून घेण्याची त्यांची कुवत असते.
शालेय व महाविद्यालयीन शिक्षणात ही विद्यार्थ्यांमधील कुवत वाढविणे अपेक्षित असते. मात्र आपल्या आजच्या शिक्षणात ज्ञानार्जनापेक्षा गुणार्जनावर अधिक भर आढळून येतो. आपल्या देशात जितके मार्क्‍सवादी विद्यार्थी आहेत तेवढे जगात कुठेही नाहीत ही वस्तुस्थिती आहे. सर्वाना फक्त मार्क्‍स हवेत! कोणत्याही उच्च शिक्षणासाठी अधिकात अधिक गुण मिळवून प्रवेश परीक्षा देणे महत्त्वाचे ठरत आहे. देशाची पुढची पिढी घडण्यासाठी हा मार्ग नव्हे. आजकाल एखाद्या प्रज्ञा शोध परीक्षेला जेव्हा विद्यार्थी बसतो तेव्हा त्याचे पालक प्रथम त्याच्यासाठी कोणी खाजगी शिकवणी घेतात का याचा शोध सुरू करतात. वास्तविक प्रज्ञा शोध परीक्षेचा अर्थ असतो की विद्यार्थी एखाद्या प्रश्नाचे उत्तर मिळविताना आपल्या बुद्धीचा किती वापर करतो त्यावर तो प्रज्ञावान आहे की नाही हे ठरले पाहिजे, व त्यावर त्याला शिष्यवृत्ती दिली गेली पाहिजे. खाजगी शिकवणीत याच्या उलट त्याला त्या प्रश्नाचे तयार उत्तर दिले जाते. मग त्याची बुद्धी कशी विकसित होणार? आणि मग ती प्रज्ञा शोध परीक्षा तरी कशी म्हणावी? पण प्रत्येक जण आपल्या स्वत:मध्ये इतका गर्क आहे की या असल्या क्षुल्लक गोष्टींकडे लक्ष देण्यास त्याला वेळच नाही. प्रत्येक परीक्षेचे खाजगी शिकवणी वर्ग आपल्या देशाला कमकुवत बनवीत आहेत व त्यामुळेच साक्षरता वाढलेल्या या आपल्या देशात अंधविश्वासाचे व भक्तिहीन देवपूजेचे स्तोम वाढत चालले आहे. विद्यार्थी वर्गात जाण्याऐवजी गणपतीच्या देवळात दर्शनासाठी रांगेत तासन् तास उभा आहे हे दृश्य देशासाठी व त्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच शोभादायक नाही.
जीवनात आपल्याला काय मिळवायचे आहे याबद्दल गोंधळाची परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा या गोष्टींकडे अधिक लक्ष दिले जाते. गणपती दूध पितो हे ऐकल्यावर ते पाहण्यासाठी म्हणूनच मग आपल्याकडे मोठमोठय़ा रांगा लागतात. गणपतीदेखील या असल्या वागण्यामुळे आपल्याला हसत असेल! देवावर श्रद्धा असणे ही वेगळी गोष्ट आहे. ती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी नेमून दिलेले काम निष्ठेने व दिलेल्या वेळात पूर्ण करणे हेच प्रत्येकाचे कर्तव्य ठरते. रोजच्या कामात चुकारपणा करायचा व मग देवाचा धावा करायचा हे खरे नाही.
आपल्या देशात अपघातांचे प्रमाण अधिक आहे. अनेक ठिकाणी वाहनचालक बेजबाबदारपणे वाहन हाकीत असतात. रस्ते वाहतुकीत आपल्याकडे एवढी बेशिस्त का निर्माण झाली? याचे उत्तरदेखील विज्ञानाचा अभाव असेच द्यावे लागेल. मुळात रस्ते वाहतुकीचे नियम राबविले जातात ते वाहतूक सुरळीत व्हावी व लोकांना आपल्या ईप्सित स्थळी वेळेवर पोहोचता यावे म्हणून! पण हे सर्व नियम असूनदेखील अपघातांचे वाढते प्रमाण आपल्याला लाजिरवाणे आहे. आपण वाहन चालवायला घेतले की रस्ता फक्त माझाच आहे हे गृहीत धरूनच निघतो. माझे काम महत्त्वाचे आहे, इतरांनी मला वाट करून दिलीच पाहिजे या उद्देशाने मग आपण वाहन चालवू लागतो. तेव्हढय़ात भ्रमणध्वनी वाजू लागतो. तो तर घेतलाच पाहिजे! मग कानाला तो लावीत आपण एक हात धड वाहनावर नाही व धड भ्रमणध्वनी यंत्रावर नाही अशा अवघडलेल्या अवस्थेत पोहोचतो. समोरचा माणूस किंवा वाहन यांची सुरक्षा आपल्यासाठी मग दुय्यम महत्त्वाची ठरते. वाहतूक नियंत्रक दिवे चालू आहेत की नाहीत हे पाहण्यापेक्षा त्या चौकात पोलीस उभा आहे की नाही यावर आपल्या वाहनाचे रस्ता ओलांडणे अवलंबून असते. पोलीस नसेल तर लाल दिवासुद्धा आपल्यासाठी हिरवा असतो! मग पोलीसदेखील चौकात लपून बसतात व सावज शोधीत राह्तात. याच पोलिसांबरोबर आपणदेखील तेवढेच दोषी असतो हे लक्षात घ्यावयास हवे. दुचाकी वाहने बिनदिक्कतपणे पदपथावरून जोरात जातात व पादचारी मध्ये येतात म्हणून संतापतात!
एखादे वाहन ओलांडून जाण्यासाठी कर्णकर्कश िशग वाजविणे मग गरजेचे ठरते. वाहनचालक परवाना आपल्याकडे विकत मिळू शकतो व आपण तो विकत घेतो ही शोकांतिका आहे. साधे ४ ते ५ नियम म्हणून दाखवायचे असतात. पण ते म्हणून न दाखविता मला तो परवाना कसा मिळाला हे सांगण्यात जेव्हा आपल्याला भूषण वाटते ती आपली अधोगती आहे हे समजत नाही व मग अपघातांचे प्रमाण वाढते. भाडय़ाच्या गाडय़ा घेऊन त्याच्या चालकाला दिवस दिवस वाहन चालवायला लावायचे व मग त्याला झोप लागली तर आपण काळझोपेच्या स्वाधीन व्हावयाचे यात आपण काय साधतो? कोणत्याही वाहन चालकाने दिवसातून ८ तासांपेक्षा अधिक वेळ व ३ ते ४ तासांपेक्षा सातत्याने वाहन चालवू नये. कारण त्याने मानसिक थकवा येतो. अनेक अपघात रात्री १ ते ४ या वेळात होतात. कारण ही वेळ गाढ झोपेची असल्यामुळे मानसिकदृष्टय़ादेखील शरीर बंड करून उठते. ही वेळच अशी आहे की मानसिक शक्ती त्या वेळी थोडी क्षीण झालेली असते. या तीन-चार तासांत जवळजवळ प्रत्येकालाच गाढ झोप लागू शकते. व्यावसायिक चालकांच्या सवयी वेगळ्या असतात व त्यांचे शरीर अशा बदलांना स्वीकारतात. केवळ नवीन वाहन घेतले म्हणून शरीर थोडेच नवे असते? निसर्ग नियम किती अचूकतेने पाळले जातात. सूर्य कधी पश्चिमेला उगवत नाही, मग आपले वाहन चुकीच्या बाजूने कसे जाऊ शकते? नदीचा प्रवाह एकदिशा मार्ग कधी सोडत नाही, मग परवानगी नसलेल्या एकदिशा मार्गावर विरुद्ध बाजूने जाण्याची परवानगी आपल्याला कोणी दिली?
ही वैज्ञानिक प्रगल्भता आपल्या समाजात कमी असण्याची आणखी दोन उदाहरणे पाहू.
माझी आई घरी विरजण नियमाने लावायची व आम्हाला रोज घरचे दही खायला मिळायचे. हे दही इतके छान लागलेले असायचे की ठरवूनदेखील त्याची चव विसरणे अशक्यच म्हणावे लागेल. कडक उन्हाळ्यातदेखील आमच्या घरी दह्याची चव कधी बदलली नाही, कारण उन्हाळ्यात दूध कोमट करून तर हिवाळ्यात दूध गरम करून विरजण लावायचे असते हे फारसे विज्ञान न शिकलेल्या माझ्या आईला माहीत होते त्यामुळे! आता बाजारात किंवा मॉल्समध्ये आकर्षक स्वरूपात प्रोबायोटिक या किंवा तत्सम गोंडस नावाखाली हेच दही अवाच्या सव्वा पसे देऊन आम्ही खरेदी करायला लागलो हा दैवदुर्वलिास नाही तर काय म्हणावे? दही लावायला आम्हाला वेळ नाही हे अतिशय अवैज्ञानिक कारण देऊन आम्ही मोकळे होतो. विरजण हा शब्ददेखील काळाच्या पडद्याआड गेला तर आश्चर्य वाटायला नको.
आमच्या लहानपणी आम्हाला शाळेत जे बाळकडू मिळाले त्यात सहकाऱ्याशी किंवा मित्र मत्रिणींशी बोलताना हसरा चेहरा ठेवावा या मुद्दय़ाचाही समावेश होता. आजही समाजात असे हसरे लोक पाहायला मिळतात, पण ते अभावानेच!
त्यामुळेच ‘घरात हसरे तारे असता पाहू कशाला नभाकडे?’ या गाण्याने उभ्या महाराष्ट्राला जो संदेश दिला तो आता इतिहासजमा होतो की काय असे वाटू लागले आहे! दिवसभर एरंडेल प्यायल्यासारखा चेहरा करून िहडायचे, विशेषत: कनिष्ठ सहकाऱ्यांबरोबर किंवा मुलांशी बोलताना आरडाओरड करायची व रात्री मात्र हास्य क्लबमध्ये जाऊन मोठमोठय़ाने हसायचे याला जीवन म्हणत नाहीत. दिवसभर जर मानसिक तोल ढळू दिला नाही, विनोदबुद्धी शाबूत ठेवली व दिलेल्या किंवा स्वीकारलेल्या कामावर निष्ठा ठेवली तर जीवन जगावेसे तर वाटेल, शिवाय ते खूप मनोरंजकही असेल असे खात्रीने म्हणता येईल.
response.lokprabha@expressindia.com