५ एप्रिल २०१३
मथितार्थ
चित्रकथी
फोटो गॅलरी

एप्रिल-फूल विशेष
‘ब्रेकिंग न्यूज’.. : काँग्रेसचे ‘संकटमोचक’
एप्रिल फूल बनाया..
माझा कपडे धुण्याचा छंद
‘फूल डे’चे राडे!
मराठी भाषेतले एप्रिल फूल
चार दांडय़ा, एक फूल..
एप्रिलमधले ‘रावणायण’
रेडिओवरचे एप्रिल फूल
पक्या.. पिऊ आणि पाणी!
सेलिब्रिटी एप्रिल फूल

अर्थसंकल्प विशेष

क्रीडा

स्मरण
चर्चा
सेकंड इनिंग
आरोग्यम्
भन्नाट
कविता
पाठलाग
माझं शेतघर
शब्दरंग
संख्याशास्त्र
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
गृहप्रवेश
सिनेमा
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

आरोग्यम्

रक्तदाबावर नियंत्रण
डॉ. प्रदीप आवटे

जागतिक आरोग्य दिनाचे या वर्षीचे घोषवाक्य आहे, कंट्रोल युवर ब्लडप्रेशर. बदलत्या जीवनशैलीमुळे आजकालच्या काळात रक्तदाबाची जणू साथ आली आहे असे वाटावे अशी परिस्थिती आहे. खरं तर थोडी काळजी घेतली तर आपण रक्तदाब टाळू शकतो.

अगदी परवाची गोष्ट! आम्ही काही मित्र घारापुरीची लेणी पाहावयाला गेलो होतो. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियापासून घारापुरीपर्यंतचा प्रवास सगळ्यांनी अगदी एन्जॉय केला. खरी गंमत आली घारापुरीत लेणी पाहण्यासाठी चढण चढताना..! खरे तर जेजुरी, लेण्याद्री अथवा महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ल्यांच्या तुलनेत एलिफंटा लेण्याची चढण काहीच नव्हे. पण आमच्यातील काही बहाद्दर पायथ्याशीच थांबले, काही धापा टाकत कसेबसे वपर्यंत पोहोचले. सगळी तिशी-पस्तिशीतील मंडळी. पण त्यांना हा पण जिंकता येत नव्हता आणि त्याच वेळी आमच्यातील आजोबा झालेले गोपाळे मात्र लीलया अवघड वाटणारी चढण चढत होते.
खरे तर कोणत्याही अनुभवाचे सहज सुलभ सामान्यीकरण करणे, शास्त्रीयदृष्टय़ा योग्य नाही. पण आज अनेक शास्त्रीय अभ्यास आपल्याला एक कटू सत्य सांगताहेत आणि ते म्हणजे, ‘बेबी बूमर्स’चे आरोग्य त्यांच्या मागच्या पिढीच्या तुलनेत निश्चितपणे ढासळलेले आहे. अमेरिकेतीलच एका अभ्यासाचा हवाला देऊन सांगायचे तर, मागच्या पिढीच्या तुलनेत (३२%) उत्तम आरोग्य असलेल्या बेबी बूमर्सचे प्रमाण (१३%) लक्षणीयरीत्या कमी आहे. ज्या वयात त्यांचे पालक अवघड चढण, जिने सहज चढायचे ते चढणे काफी बेबी बूमर्सके बस की बात नही रही. प्रौढांसाठी असलेल्या दुर्धर आजारांच्या एका रु ग्णालयातील एका नर्सचे निरीक्षण कोणालाही विचार करायला भाग पाडेल असे आहे. ती लिहिते, "माय पेशंट जस्ट कीप यंगर अँड यंगर." उच्च रक्तदाबाचे प्रमाणसुद्धा या नव्या पिढीत दुपटीने जास्त आहे. जनरेशन गॅप फक्त मूल्यांच्या बाबतीतच नव्हे तर आरोग्याच्या बाबतीतही सुस्पष्ट दिसते आहे.
या साऱ्या पाश्र्वभूमीवर येत्या जागतिक आरोग्य दिनाचे या वर्षीचे घोषवाक्य अधिक समर्पक ठरावे, "कंट्रोल युवर ब्लड प्रेशर." रक्तदाबावर नियंत्रण ही जागतिक निकड झाली आहे. जगभरात दरवर्षी उच्च रक्तदाबामुळे सुमारे ९४ लाख अकाली मृत्यू होतात. आजमितीला सुमारे एक अब्ज लोक उच्च रक्तदाबाने त्रस्त आहेत. २००८ साली २५ वर्षांवरील जवळपास ४०% लोकसंख्या उच्च रक्तदाबाने पीडित होती.'डोंट ट्रस्ट अ‍ॅनीबडी अबोव्ह ३०.' हे कधीकाळी वेगळ्या अर्थाने प्रस्थापितांची मूल्यव्यवस्था नाकारताना तरु ण पिढीच्या तोंडी असलेले वाक्य आज उच्च रक्तदाबाबाबतही खरे ठरते आहे. दक्षिण पूर्व आशिया आणि भारतातही परिस्थिती फारशी वेगळी नाही. दक्षिण पूर्व आशियात दरवर्षी सुमारे १५ लक्ष मृत्यू उच्च रक्तदाबामुळे होतात. भारतात गेल्या काही वर्षांत उच्च रक्तदाबाचे प्रमाण ज्या वेगाने वाढते आहे, ते चिंताजनक आहे. १९६० साली भारतातील उच्च रक्तदाबाचे प्रमाण ५% एवढे होते १९९० मध्ये ते १२% वर पोहोचले आणि २००८ साली सुमारे ३० टक्क्यांच्या आसपास..!
हे का होते आहे, हे सांगायला कोणा मोठय़ा तज्ज्ञाची गरज नाही. १९९० नंतर वेगाने होणारे जागतिकीकरण, वाढते शहरीकरण, प्रदूषण, ढासळती कुटुंबव्यवस्था, वैद्यकीय प्रगतीमुळे वाढते आयुर्मान आणि लोकसंख्येचे वाढते वय, नवे तंत्रज्ञान आणि सोयीसुविधांमुळे आलेली शारीरिक निष्क्रियता, त्यातून अर्थव्यवस्थेसोबत माणसालाही आलेला रोगट लठ्ठपणा, आहारात वाढते प्रोसेस्ड अन्न, जंक फूड, धूम्रपान, मद्यपान यांचे वाढते प्रमाण, वाढते मानसिक ताणतणाव या साऱ्यांचा परिपाक म्हणजे असूनही न दिसणारी ही उच्च रक्तदाबाची साथ..! लोकांची वृद्धिंगत झालेली आरोग्यविषयक जाणीव, आरोग्याच्या वाढत्या सुविधा, बदललेला सामान्य रक्तदाबाचा कट ऑफ पॉइंट, अशी इतरही काही कारणे आहेत, नाही असे नाही, पण त्यांचे एकूण योगदान अत्यल्प आहे.
उच्च रक्तदाब म्हणजे काय?
* रक्तवाहिन्यातून वाहणाऱ्या रक्तप्रवाहामुळे रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर पडणाऱ्या दाबाला रक्तदाब असे म्हणतात.
* रक्तदाब मिलिमीटर ऑफ मक्र्युरी या परिमाणात लिहिला जातो.
* सर्वसामान्यपणे हृदय आकुंचनाच्या वेळी रक्तदाब १२० एवढा तर हृदय प्रसरणाच्या वेळी ८० एवढा असतो.
* रक्तदाब १२०/८० मिमी ऑफ मक्र्युरी असा लिहितात.
* हृदय, मेंदू, मूत्रपिंड या महत्त्वाच्या अवयवांच्या निरोगी कामकाजाकरिता तसेच सर्वसाधारण आरोग्याकरिता रक्तदाब सामान्य पातळीवर असणे आवश्यक आहे.
* रक्तदाब हृदय आकुंचनाच्या वेळी १४० आणि हृदय प्रसरणाच्या वेळी ९० एवढा अथवा त्यापेक्षा जास्त असणे म्हणजे उच्च रक्तदाब होय.
* उच्च रक्तदाबाची लक्षणे : डोकेदुखी, धाप, छातीत दुखणे, चक्कर, छातीत धडधडणे, नाकातून रक्तस्राव.
* अनेक रु ग्णांमध्ये उच्च रक्तदाबाचे कोणतेही लक्षण आढळत नाही. त्यामुळेच रक्तदाब नियमित तपासून घेणे महत्त्वाचे..!
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी काय कराल?
* आरोग्यदायी आहार : ताजी फळे, तंतुमय पदार्थ, स्निग्ध पदार्थाचे कमी सेवन, मिठाचे प्रमाणात सेवन- दिवसाला कमाल ५ ग्रॅम.
* प्रोसेस्ड अन्न, लोणचे, पापड, चटणी, सॉस खाणे टाळा.
* वजन संतुलित राखा. रोज किमान अर्धा तास चाला.
* तंबाखू, धूम्रपान टाळा. (धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांना इजा होते, त्या अधिक कठीण होतात.)
* मद्यपान मर्यादित ठेवा.
* रक्तदाब नियमित तपासा.
* उच्च रक्तदाबाचे निदान झाले असेल तर नियमित उपचार घ्या.
* मधुमेहासारख्या आजारावर नियमित उपचार घ्या.
* मानसिक तणावावर नियंत्रण ठेवा. (योगासने, ध्यानधारणा)
उच्च रक्तदाबाचे दुष्परिणाम :
* हृदयविकाराचा झटका
* हृदयाचा आकार वाढून ते अकार्यक्षम बनते.
* रक्तवाहिन्यांना फुगवटे येणे, त्या कमकुवत बनणे. त्यामुळे रक्तवाहिन्या फुटणे, तुंबणे.
* मेंदूत रक्तस्राव झाल्याने पक्षाघात
* मूत्रपिंड निकामी होणे
* अंधत्व
* बौद्धिक क्षमता कमी होणे.

काळ झपाटय़ाने बदलतो आहे आणि त्याचबरोबर आपल्या भोवतालची आंतरिक व बाह्य़ अशी दोन्ही परिसंस्था बदलते आहे. या साऱ्याचा स्वाभाविक परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आहे. वेगाने वाढत जाणारे उच्च रक्तदाबाचे प्रमाण हा त्याचाच एक भाग आहे. या नव्या बदलांना आपण कसे सामोरे जात आहोत, हा कळीचा प्रश्न! आपल्या भोवतीची वेगाने बदलणारी परिस्थिती आपल्यासमोर नवनवी आव्हाने उभी करत आहे, पण काळाच्या गतीसोबत राहून आपण त्यानुसार धोरणात्मक बदल करतो आहोत का? आज देशातील एकतृतीयांशहून अधिक लोकसंख्या शहरात राहते आहे, पण तरीही अद्याप आपल्याला सुदृढ शहरी आरोग्य व्यवस्था उभी करता आलेली नाही. उच्च रक्तदाबाबाबतही आपली परिस्थिती वेगळी नाही. मुळात हा असंसर्गजन्य आजार म्हणजे ‘सायलंट किलर’ आहे. आजही आपल्याकडे निदान न झालेल्या उच्च रक्तदाबाचे प्रमाण बरेच अधिक आहे. उच्च रक्तदाबाचे वेळेवर निदान होण्याचे मूल्य आर्थिक आणि सार्वजनिक आरोग्याच्या परिभाषेत किती तरी मोठे आहे. उच्च रक्तदाबाचे निदान न होणे किंवा उशिरा होणे, यातूनच कितीतरी गुंतागुंती उद्भवतात. हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, मूत्रपिंड निकामी होणे, डोळ्यांना इजा-अंधत्व, अपंगत्व हे सारे भोग उच्च रक्तदाबाचे वेळेवर निदान न झाल्याने अथवा अनियमित उपचारामुळे भोगावे लागतात. घरातील कर्ता अशा गुंतागुंतीत सापडल्यास घरावर जणू आभाळच कोसळते. दरवर्षी लाखो कुटुंबे या कारणांमुळे दारिद्रय़ाच्या खाईत ढकलली जातात. हे सारे टाळण्याची क्षमता सक्षम आरोग्य व्यवस्थेत आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह यासारख्या साथीप्रमाणे पसरत असलेल्या असांसर्गिक आजाराच्या निदानाची आणि किमान प्राथमिक स्वरूपातील उपचाराची, याविषयी आरोग्यविषयक सल्लामसलतीची सुविधा प्राथमिक आरोग्य स्तरापासून असायला हवी. परंतु आजही प्राथमिक आरोग्य स्तरावर उच्च रक्तदाबावरील औषधे अभावानेच आढळतात. जणू काही ग्रामीण जनतेला असे आजार होतच नाहीत, असे आपण गृहीत धरले आहे. वास्तविक पाहता, ग्रामीण भागातही उच्च रक्तदाब, मधुमेह अशा आजारांचे प्रमाण वाढते आहे, हे विविध अभ्यासातून पुढे येते आहे. परंतु ग्रामीण जनतेला आणि शहरातीलही गरीब जनतेला आपण या बाबतीत खासगी स्पेशालिस्टांच्या भरवशावर सोडून दिले आहे. मुळात अशा विशेषज्ञाची उपलब्धता कमी, ग्रामीण भागात तर स्पेशालिस्ट म्हणजे उंबराचे फूल, त्यात त्यांची कन्सल्टिंग फी..! या साऱ्या कारणांमुळे छुप्या उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढते आणि गुंतागुंतीचेही.! मुळात सुमारे सहा दशकांपूर्वी प्राथमिक आरोग्य सेवेची संकल्पना मांडली गेली तेव्हा साथीचे आजार हे आपले मुख्य लक्ष्य होते. आज साथीचे आजार काही प्रमाणात कमी झाले असले तरी असांसर्गिक आजारांचे प्रमाण वाढते आहे. आपण एका संक्रमण काळातून जात आहोत. साथीचे आजार पुरेसे संपलेले नाहीत आणि विकसित जगातील आधुनिक जीवनशैलीतून उगवलेले आजारही वाढताहेत. या परिस्थितीत आपल्याला प्राथमिक आरोग्य सेवेचे प्राधान्यक्रम नव्याने ठरवावे लागणार आहेत आणि तेही लवकरात लवकर कारण विलंबाची किंमत आपल्याला न परवडणारी असेल.
आरोग्यविषयक माहितीचे प्रभावी व्यवस्थापन हा कच्चा दुवाही आपल्याला बळकट करावा लागेल. कोणत्याही आरोग्यविषयक आकडेवारीसाठी आपल्याला जागतिक आरोग्य संघटना अथवा पाश्चिमात्य देशांकडे पाहावे लागते. हे आपल्याला बदलावे लागेल. आपल्या समस्या आपण नेमक्या मोजल्या तर आपण नेमकी धोरणेही आखू शकू. म्हणूनच वैद्यकीय संशोधनाकडेही आपल्याला अधिक गांभीर्याने पाहायला हवे. सार्वजनिक आरोग्यावर व्यापक विधायक परिणाम करू शकणारे विषय प्राधान्याने संशोधनासाठी घ्यायला हवेत. उच्च रक्तदाब हा त्यापैकीच एक..!
राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय औषध कंपन्या आपल्या सार्वजनिक आरोग्याच्या प्राधान्यक्रमावर विपरीत प्रभाव टाकताना दिसतात. उच्च रक्तदाबाबाबतही हे पाहण्यात आले आहे. सामान्य रक्तदाब आणि उच्च रक्तदाब यांच्यातील सीमारेषा ठरवण्यापासून ते रक्तदाबाच्या कोणत्या पातळीवर औषधोपचार सुरू करावेत, अशा अनेक बाबतीत मार्गदर्शक सूचना तयार करताना औषध कंपन्या अर्थपूर्ण लुडबुड करताना दिसतात. हे टाळायचे असेल तर निष्पक्ष आणि गुणवत्तापूर्ण संशोधनास पर्याय नाही.
उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी काही धोरणात्मक निर्णयही आपल्याला घ्यावे लागतील. तंबाखू आणि मद्य यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करात सातत्याने वाढ करणे आवश्यक आहे, कारण रक्तदाब वाढविण्यात या दोन्ही घटकांचा वाटा मोठा आहे. आपल्याला ऑटोमोबाइल धोरणाचाही पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करून खासगी वाहनाच्या किमती वाढविणे नितांत आवश्यक आहे. प्रदूषण कमी झाल्याने केवळ उच्च रक्तदाबच नव्हे आरोग्याच्या इतर अनेक समस्या आपण कमी करू शकतो.
आरोग्यदायी आहार, नियमित व्यायाम, मानसिक ताण-तणावावर नियंत्रण, व्यसनमुक्ती अशा अनेक गोष्टींतून आपण वैयक्तिक पातळीवर आपला रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. पण रक्तदाबावरील नियंत्रण ‘दीवार’मधील अमिताभच्या ‘पहले उसकी साईन लावो..’ या सुप्रसिद्ध डायलॉगसारखे आहे.
पहले अपने लाइफ स्टाइल पे कंट्रोल रखो, अपने पेग पे, सिगरेट स्मोकिंग पे कंट्रोल रखो, अपने खाने-पीने पे कंट्रोल रखो, कंट्रोल रखो अपने आप पर, अपने जल, वायू प्रदूषण पर. फिर मेरे भाय, तुम्हारा ब्लड प्रेशर भी कंट्रोल में रहेगा..!
थोडक्यात काय, समाज, शासन आणि आपण या तिन्ही पातळीवरील प्रयत्नातूनच आपण आपला रक्तदाब नियंत्रणात ठेवणार आहोत.
response.lokprabha@expressindia.com