१५ मार्च २०१३
मथितार्थ
चित्रकथी

महिला विशेष
तिच्या ऊर्जेला सलाम!
सुकाणू तिच्या हाती...
विलक्षण चळवळीचं नेतृत्व
२४ तास टांगती तलवार
आधुनिकतेची व्याख्या जगणारी!
योग्य माणूस मिळवणे हेच आमचे टार्गेट...
प्रभावी व्यवस्थापनामागची संवेदनशीलता

महिला विशेष
अनाघ्रात मातृत्वाचे संभाव्य अद्भुत!
स्त्रीधार्जिणे जनुकविज्ञान
माझा आवडता सण - ८ मार्च!

स्मरण

क्रीडा
यूथ
कविता
द्या टाळी...
आरोग्यम्
एकपानी
शब्दरंग
सिनेमा
लग्नाची वेगळी गोष्ट
माझं शेतघर
शून्य प्रहर
ट्रॅव्हलोग्राफी
संख्याशास्त्र
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

ट्रॅव्हलोग्राफी्

भूतान : आनंदी लोकांचा देश
आत्माराम परब

भूतान म्हणजे आपला सख्खा शेजारी देश. तिथला निसर्ग, तिथली स्वच्छता बघितली की, हा देश दरडोई उत्पन्नाला महत्त्व न देता, दरडोई आनंदाला का महत्त्व देतो ते कळतं.

पैसे किंवा दरडोई उत्पन्न याला जास्त महत्त्व न देता जिथे ‘आनंदाचा निर्देशांक’ ‘जीएनएच’ (ग्रॉस नॅशनल हॅपिनेस) किती आहे हे पाहिलं जातं तो जगातला एकमेव देश म्हणजे भूतान. थिंपू या देशाच्या राजधानीच्या शहरातही सिग्नल यंत्रणा नसलेला, पण वाहतुकीचे नियम अभावानेच मोडणाऱ्या लोकांचा देश म्हणजे भूतान. इतर सारं जग उत्पन्न कसं वाढेल याच्या चिंतेत असताना पर्यटकांची गर्दी नाकारणाऱ्या पर्यायाने पर्यटन उद्योगामुळे मिळणाऱ्या मिळकतीवर पाणी सोडणारा देश म्हणजे भूतान. सगळा देशच जागतिक वारसा आहे असं मानून मनापासून तसं वागणाऱ्यांचा देश म्हणजे भूतान. अखिल जगतात लोकशाहीचे वारे वाहत असताना राजेशाही पाहिजे म्हणून निदर्शन करणाऱ्या माणसांचा देश म्हणजे भूतान. सार्वजनिक ठिकाणीही कमालीची स्वच्छता असलेला आरोग्यदायी देश म्हणजे भूतान. टपरी किंवा झोपडपट्टी शोधूनही सापडणार नाही असा देश म्हणजे भूतान. हॉटेलपासून दुकानापर्यंत महिलांचाच दबदबा असलेला देश म्हणजे भूतान. देवभूमी हिमालयात वसलेला आपला नितांतसुंदर शेजारी देश म्हणजे भूतान.
बागडोगरा विमानतळावर विमान उतरत असतानाच खाली हिरवागार प्रदेश दृष्टीस पडतो आणि मन प्रफुल्लित होतं. चहाच्या बागांमधला तो गर्द हिरवेपणा पाहता पाहता विमान धावपट्टीवर हलकेच उतरतं, पण त्याआधीच तिथे आपलं मन पोहोचलेलं असतं. प. बंगाल राज्यातल्या दार्जिलिंग जिल्ह्यातला बागडोगरा हा विमानतळ लष्कराचा असला तरी नागरी विमानं तिथं उतरू दिली जातात. पाच तासांचा विमान प्रवास करून एवढय़ा दूरवर येऊनही विमान उतरतं ते आपल्याच देशात गुवाहाटीला. आपला देश खरंच खंडप्राय असल्याचं जाणवतं. ‘केल्याने देशाटन..’ या उक्तीचा प्रत्यय यायला लागतो.
आपल्या देशातील महानगरं सोडली तर इतर ठिकाणची विमानतळं गजबजलेली नसतात. आलेल्या विमानातून उतरलेले प्रवासी बाहेर विखुरले जातात आणि पुन्हा सगळा परिसर सामसूम होऊन जातो. आपण तिथून निघाल्यावर थोडय़ाच वेळात शहरातली वाट संपवून मोकळ्या प्रदेशात येतो. सभोवताली चहाच्या बागा, प्रसन्न करणारी प्रदूषणविरहित स्वच्छ हवा यामुळे विमानप्रवासाचा थकवा कुठल्या कुठे निघून जातो. अशा वेळी आपण नजरेने जे बघत असतो ते सारंच कॅमेऱ्यात टिपून घ्यावं असं वाटायला लागतं. थोडं अंतर गेल्यावर जलपायगुडीचा मैलाचा दगड दिसतो. रेल्वेनं आलं तर इथपर्यंत येऊन पुढचा प्रवास याच मार्गाने सुरू होतो. वाटेत तिस्ता नदीवरचा पूल लागतो. हिवाळ्यातच या नदीचं पात्र कोरडं पडलेलं असतं. गाडी आणखी पुढे जाते तसा जंगलाचा भाग सुरू होतो. आजूबाजूच्या प्रदेशाची मजा लुटत नेत्रसुख अनुभवत आपण जयगाव शहरात येऊन पोहोचतो. आता भूतानमध्ये प्रवेश करायला मन अगदी आतुर झालेलं असतं.
भारतातलं भूतानच्या सीमेवरचं शेवटचं शहर म्हणजे जयगाव. इथूनच आपल्याला भूतानमध्ये प्रवेश करायचा असतो. फुन्तशोलींग या भूतानच्या प्रवेशद्वारातूनच वेगळेपणाला सुरु वात होते. भारतातल्या कुठल्याही शहराचं व्यवच्छेदक लक्षण म्हणजे गलिच्छपणा, जयगावमध्ये तो भरून उरला आहे आणि काही पावलावर असलेल्या भूतानमध्ये त्याचे नामोनिशाणदेखील नाही.
एरवी अंथरुणात लोळत पडणारे आपण अशा ठिकाणी गेलो की, विशेषत: हिमालयात गेल्यावर लवकर उठतो. तिथल्या हवामानामुळेच आपल्याला ताजंतवानं वाटून लवकर जाग येते. हाती असलेला मोकळा वेळ सार्थकी लावण्यासाठी आपण जर बाहेर पडलो तर आदल्या दिवशी काळोखात नीट न पाहिलेला भूतान-भारत सीमेवरचा भाग पाहायला मिळतो. भूतानमधले रस्ते झाडून स्वच्छ केल्यासारखे असतात, तर पलीकडचे जयगावचे रस्ते कचऱ्याने भरून गेलेले दिसतात. हा वृत्तीतला आणि वागणुकीतला फरक आहे. सार्वजनिक स्वच्छतेबद्दल भूतानची जनता खूप जागरूक आहे.
शंभर-सव्वाशे मीटर अंतर गेल्यावर फुन्तशोलींग शहर संपतं आणि चढाव सुरू होतो. गाडी एक एक घाट चढायला सुरुवात करते. पुढे असे सात डोंगर पार करून आणि १८० कि.मी. गेल्यावर थिंपू या भूतानच्या राजधानीच्या शहरात आपण पोहोचतो. उंचावरून फुन्तशोलींगचं विहंगम दृश्य दिसतं तेव्हा कॅमेऱ्याचं काम सुरू होतं. असंच एका वळणावर भूतानमधलं एकमेव इंजिनीअरिंग कॉलेज दिसतं. संपूर्ण भूतान हिमालयात वसलेलं असूनही इथले रस्ते दृष्ट लागावेत एवढे उत्तम आहेत. हे भूतानचे रस्ते आपल्या लष्कराच्याच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या ऊंल्ल३ं‘ या कंपनीने बनवलेले आहेत. भूतानमध्ये १९६० पर्यंत मोटरवाहतुकीचे रस्तेच नव्हते. त्यानंतर भारताशी झालेल्या करारानुसार तिथे रस्ते बांधले गेले. भूतानची संरक्षण व्यवस्थाही भारतच पाहतो.
वाटेत भारतीय लष्कराच्याच एका कँटीनमध्ये जेवणही मिळतं. पुणे-साताऱ्याकडचे काही सैनिक आपल्याला तिथे भेटतात तेव्हा आपण आणि ते सैनिकही सद्गदित होतात. प्रसन्न करणारा गारवा आणि सृष्टिसौंदर्याची मजा घेत आपला प्रवास सुरू असतो. देखण्या हिमालयाच्या प्रेमात आपण केव्हा पडतो ते समजतही नाही. वाटेत कुठे तरी रस्त्याचं काम सुरू असलं म्हणजे गाडय़ा थांबतात. भूतानमध्ये वाहतुकीचे नियम कसे पाळले जातात त्याचा लगेच प्रत्यय येतो. रस्त्यात एकामागोमाग एक थोडं अंतर ठेवून थांबलेल्या गाडय़ा पाहून त्यांच्या शिस्तीचं कौतुक वाटतं. पुढे जायची गडबड नाही की कर्कश हॉर्नवाजवणं नाही. सूचीपर्णी वृक्षांचा संभार सांभाळणारे पर्वत न्याहाळत वळणावळणाच्या रस्त्याने होणारा दिवसाचा प्रवास आणि प्रसन्न वाटणाऱ्या हवेतला गारवा संध्याकाळ होते तसा वाढत जातो आणि काळोख होता होता कडाक्याच्या थंडीने गारठायला होतं. हिमालयाची हीच तर खासियत आहे.
थिंपू ही भूतानची राजधानी, थोडा बाजाराचा भाग आणि प्रशासकीय इमारती सोडल्या, तर हे रूढार्थाने शहर नाहीच. कुठलंही उत्तम हिलस्टेशन असावं असा हा परिसर, पण हेच शहर भूतानमधलं सर्वात मोठं शहर आहे. थिंपू शहरात लक्ष वेधून घेतात ती तिबेटी वास्तुकलेचा पगडा असलेल्या इमारती. त्यामुळे गाव असो वा शहर घरांची बाह्य रचना सारखीच भासते. प्रत्येकाने आपलं घर सजवलेलं असतं. चोहोबाजूंनी पर्वतरांगांनी वेढलेलं थिंपू शहर बघताक्षणीच आपल्या मनात भरतं. वांग चू किंवा थिंपू चू (चू म्हणजे नदी) या सुंदर वळणं घेत जाणाऱ्या नदीच्या किनाऱ्यावर हे शहर वसलं आहे आणि या नदीने शहराच्या सौंदर्यात आणखी भर घातली आहे. शहरातील सुंदर इमारती मुख्यत: मिनिस्ट्री हाऊस (जुना राजवाडा), डेचेंचोलिंग पॅलेस हे भूतान नरेशांचं अधिकृत निवासस्थान आपलं लक्ष वेधून घेतात.
संध्याकाळच्या वेळेस रोषणाईने नटलेल्या या इमारती पाहणं हा एक सोहळा असतो. मिनिस्ट्री हाऊसमध्ये होणारं ध्वजारोहण आणि अवतरण पाहणं हे पण आपल्याला आनंद देऊन जातं.
भूतानमधली सर्व जनता त्यांच्या भूतानी राष्ट्रीय ड्रेस कोडमध्ये पाहताना आपल्याला वेगळेपणा जाणवतोच, शिवाय आधुनिक फॅशनबरोबर वाहवत न जाता आपलं स्वत्व जपणारा हा समाज बघून त्यांच्याबद्दल ममत्वाची भावना आपसूकच तयार होते. इथली आणखी एक खासियत म्हणजे सगळीकडे असणारा महिलांचा वावर. हॉटेलमध्ये गेल्या गेल्या तिथल्या मुली आपल्या सामानाचा ताबा घेतात आणि ते तुमच्या खोलीत नेऊन ठेवतात. मॅनेजरपासून आचाऱ्यापर्यंत सगळ्या मुलीच कामं करताना दिसतात. अप्रतिम रूम्स आणि आतलं वातावरण पाहून प्रवासाचा शीण कुठल्या कुठे निघून जातो. गरम पाण्याने आंघोळ झाल्यावरही बुखाऱ्याजवळ गर्दी करून उभं राहण्यातच जास्त मजा येते. असं असलं तरी रात्रीच्या वेळी दिसणारं थिंपू शहराचं विहंगम दृश्य पाहण्याची संधी आपण सोडू नयेच.
बौद्ध धर्मीयांचा देश म्हणूनच भूतान ओळखला जातो. म्हणूनच स्वच्छ आणि सुंदर दिसणाऱ्या मॉनेस्ट्रीज हे भूतानचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणता येईल. लडाखच्या मॉनेस्ट्रीजपेक्षा थोडय़ा वेगळ्या प्रकारच्या आणि भव्य अशा या मॉनेस्ट्रीज आहेत. या ठिकाणी अनेक लोक मनोभावे सेवा करताना दिसतात आणि ते आपल्या कामात मग्न असतात. रम्य हिरवागार परिसर आणि विविध रंगांत उजळून दिसणाऱ्या मॉनेस्ट्रीज पाहताना मन अध्यात्माकडे वळलं नाही तरच नवल. थिंपू शहराजवळच टेकडीवर असलेला बुद्धाचा भव्य पुतळा दूरवरूनही आपलं ध्यान आकर्षित करीत असतो. नजरेच्या एका टप्प्यात येणारं थिंपू शहर आणि हा पुतळा जवळून पाहण्यासाठी या ठिकाणाला भेट देणं आवश्यक आहे. भूतान नरेश तिसरे जिग्मे वांगचूक यांच्या स्मरणार्थ हे स्थळ विकसित केलं गेलं असून चोरटन मेमोरियल म्हणून ते ओळखलं जातं.
भूतानचा राष्ट्रीय प्राणी ‘तकीन’ तिथल्या पार्कमध्ये पाहता येतो. भूतान प्राणी आणि पक्ष्यांच्या बाबतीतही समृद्ध असा देश असून शोधक नजरेने पाहिल्यास तिथल्या वन्य जीवनाचं सुरेख दर्शन आपल्याला घेता येतं आणि कॅमेऱ्याने ते टिपताही येतं. थिंपू हेरिटेज म्युझियमला भेट देणंही आवश्यक आहे, कारण भूतानी संस्कृती आणि परंपरांचा धावता आढावा आणि जुन्या प्रकारची व्यवस्था पाहण्याची ती एक संधी असते.
थिंपूपासून ८५ कि.मी.वर असलेली पुनाखा ही भूतानची पूर्वीची राजधानी तिथल्या अप्रतिम जुन्या राजवाडय़ासाठी प्रसिद्ध आहे. पो चू आणि मो चू दोन नद्यांच्या संगमावर पुनाखा डझोंग ही राजवाडय़ाची इमारत वसली आहे. रंगीबेरंगी झाडांनी वेढलेला हा राजवाडा आणि त्याला वळसा घालून जाणारी नदी हे दृश्य छायाचित्रणासाठी एक छान संधी आहे. थिंपूहून पुनाखाकडे जाताना वाटेत लागणारं १०८ योद्धय़ांचं स्मारक असलेलं चोर्टन मेमोरियल हे ठिकाण डोचूला पासवर असून तिथली स्मारकं पाहण्याजोगी आहेत आणि एवढय़ा उंचीवर (१० हजार फूट) असलेल्या या स्मारकांची देखभाल उत्तम रीतीने केलेली आहे.
पारो हे भूतानमधलं आणखी एक ठिकाण. गंमत म्हणजे देशाची राजधानी थिंपू असूनही भूतानमध्ये असलेला एकमेव विमानतळ मात्र पारो या शहरात आहे. तिथल्या छोटेखानी विमानतळाचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी पारो म्युझियमकडे जाताना एक व्ह्यू पॉइंट आहे. पुढे असलेलं पारो म्युझियमसुद्धा मुद्दाम भेट देण्यासारखं आहे. पारोमधली किचू मॉनेस्ट्री तिथल्या अप्रतिम मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. पारोपासून तीन तासांचा ट्रेक करून गेल्यास टायगर नेस्ट किंवा टकसंग मॉनेस्ट्री ही बांधकामातील आश्चर्य वाटणारी वास्तू पाहायला मिळते. हवा स्वच्छ असल्यास पारोमधूनही ती दुर्बिणीने पाहता येते.
छाम नृत्य हे भूतानचं आणखी एक वैशिष्टय़. वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे घालून नाच करणारे कलाकारच गाणी गाता गाता नाच करत असतात. तिरंदाजी हा भूतानचा राष्ट्रीय खेळ आहे. रविवारच्या दिवशी अनेक ठिकाणी पुरुषवर्ग तिरंदाजीचा खेळ खेळायला किंवा सराव करायला मैदानात जमतात. भूतानच्या पारंपरिक वेषात तिरंदाजी करणारे हे खेळाडू पाहून मन प्रसन्न होतं.
हिमालयाच्या अंगाखांद्यावर वसलेला हा आपला शेजारी देश पाहण्यासाठी वर्षभरात कधीही आपण जाऊ शकतो. भारताच्याच ‘सीमा सडक संघटन’ने बांधलेले रस्ते आणि त्या देशाला संरक्षणाचं अभेद्य कवच देणारे आपले शूर सैनिक आणि अर्थातच भूतानी लोक आपलं हसतमुखाने स्वागत करतील.
response.lokprabha@expressindia.com