८ मार्च २०१३
मथितार्थ
चित्रकथी

कव्हरस्टोरी
जालना आणि फिनलॅँड शिक्षणाचा आनंदमार्ग!
अभियानाने शिक्षकांना दिले चैतन्य..
आवडते मज माझी शाळा
मुलांची चौकसबुद्धी वाढली! - बी. राधाकृष्णन (आय.ए.एस.)
आनंदाने शिकता शिकता..

नियोजन

यूथ

सेकंड इनिंग
संमेलन
चिंतन
आरोग्यम्
वादविवाद
क्रीडा

स्टार रेसिपी

विज्ञान-तंत्रज्ञान
एकपानी
कविता
भंकसगिरी
शब्दरंग
सिनेमा
माझं शेतघर
लग्नाची वेगळी गोष्ट
आधी केले..
पर्यटन
क्राईम
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

यूथ

गुगलला ‘सर्च’ यंग टॅलेंटचा!
चारुता गोखले

अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी गुगलवर धाव घेणाऱ्या तरुण पिढीसाठी गुगलने एक टॅलेंट सर्च स्पर्धा जाहीर केली आहे. जग बदलून टाकणारी आयडिया आपल्याकडे आहे, असं ज्यांना वाटत असेल त्या तरुणांसाठी ही स्पर्धा आहे..

इंटेलने अमेरिकन तरुणांसाठी प्रायोजित केलेल्या सायन्स टॅलेंट सर्चविषयी त्यांच्याच एका उच्चपदस्थ अभियंत्याशी बोलत होते. ‘‘अमेरिकन पोरं प्रचंड टारगट असतात, त्यांना अशा प्रकारच्या स्पर्धाची अत्यंत गरज आहे.’’- ते सांगत होते. इंटेलपाठोपाठ आता ‘गुगल’नेही फक्त अमेरिकनच नाही तर जगातल्या सगळ्याच टारगटांना वठणीवर आणायचे ठरवले आहे. गुगलने मागच्या महिन्यात एका जागतिक स्तरावरच्या वैज्ञानिक स्पध्रेची घोषणा केली. या स्पध्रेत कोण सहभागी होऊ शकेल? तुमचे वय जर १३-१८ यादरम्यान असेल, कॉम्प्युटरचे थोडे फार ज्ञान असेल, जग बदलू शकेल अशी काहीतरी भन्नाट आयडिया मनात असेल आणि महत्त्वाचे म्हणजे ती कल्पना प्रत्यक्षात आणायची ईर्षां असेल, तर हेच काय ते तुमचे या स्पध्रेत उतरण्याचे भांडवल! याविषयीची अधिक माहिती गुगलने www.googlesciencefair.com या संकेतस्थळावर करून दिली आहे. स्पध्रेनिमित्ताने या साइटची स्वैर सर करणे हा एक अत्यंत सुखद अनुभव आहे. ही स्पर्धा दस्तुरखुद्द गुगलने आयोजित केली असल्यामुळे मनात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अत्यंत सोप्या पद्धतीने आपोआप मिळत जाते.
जगभरातील १३-१८ या वयोगटांतील शाळा आणि महाविद्यालयांत जाणाऱ्या किशोरवयीन मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टी निर्माण व्हावी आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही प्रश्नाची उकल करण्यासाठी आवश्यक असलेली संशोधनाची शास्त्रीय कार्यपद्धती विकसित व्हावी हा या स्पध्रेमागचा मुख्य उद्देश! ही स्पर्धा ऑनलाइन असणार आहे. जगभरातील सर्व स्पर्धक आपआपले प्रयोग एका विशिष्ट ठिकाणी अपलोड करतील. गुगलने नेमलेले तज्ज्ञ त्यांचे परीक्षण करतील आणि १३-१४, १५-१६ आणि १७-१८ अशा वयोगटांतील तरुणांना प्रत्येकी एक बक्षीस दिले जाईल.
स्पध्रेत उतरण्यासाठी विषयाचे कोणतेही बंधन नाही. गणित, भौतिकशास्त्र, समाजशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, पर्यावरण, अभियांत्रिकी असा कोणताही विषय संशोधनासाठी निवडता येईल. विषयाची निवड झाली की त्यातल्या नेमक्या कोणत्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हवं आहे ते निश्चित करायचं. त्या उत्तरापर्यंत येण्यासाठी तुम्ही केलेला प्रवास हाच तुमचा प्रयोग आणि तोच तुम्हाला जगापुढे आणायचा आहे! हा प्रवास तुम्ही कसा केलात, प्रश्न मुळात तुम्ही कसा निवडलात, निवडीमागची तुमची भूमिका, या विषयात आत्तापर्यत झालेले काम, उत्तरापर्यंत पोचण्यासाठी तुम्ही निवडलेली पद्धत, त्यातून हाती आलेले निकाल, फसलेले प्रयोग, त्यातील गमतीजमती, त्यातून मिळालेले धडे, या प्रवासातील तुमचे साथीदार, त्यांचे योगदान या सर्वाची सविस्तर मांडणी स्पर्धकाला अहवाल, एक यू टय़ूब व्हिडीओ किंवा स्लाइड्सच्या स्वरूपात अपलोड करायची आहे. तुम्ही सादर केलेल्या संशोधनाचा गोषवारा, तुमची कार्यपद्धती आणि निकाल या निकषांच्या आधारे परीक्षक तीन विश्वविजेत्यांची निवड करतील.

आर्किमिडीजचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, ‘मला पुरेसा मोठा तरफा द्या आणि पृथ्वीच्या बाहेर एक बिंदू द्या. मी या तरफेने अख्खी पृथ्वी उचलून दाखवीन’.

यासाठी गुगलने काही नियम पाळणे बंधनकारक केले आहे. सर्वप्रथम स्पर्धकाने जी-मेलचा अकाऊंट नसल्यास तो उघडावा व आपले नाव, वय, देश आणि आपल्याबरोबर या संशोधनात काम करणारे सहकारी असल्यास त्यांचे नाव लिहून आपली नोंदणी करून घ्यावी. आपल्या गटामध्ये ३ पेक्षा अधिक सहकारी नसावेत. आपल्या गटात कुणाला घ्यायचे हे निवडायचे स्पर्धकाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. सोलापूरचा मुलगा अगदी सोमालियातील मुलालाही आपला गटमित्र बनवू शकतो. नोंदणी करताना आपला मुलगा/मुलगी अशा प्रकारच्या स्पध्रेत सहभागी होत आहे याची आई-वडिलांना कल्पना असावी म्हणून त्यांची परवानगी अनिवार्य केली आहे. या सर्व औपचारिकता पूर्ण केल्यावर स्पर्धक स्पध्रेत उतरण्यास तयार होतो.
जर्मनीमधील शाळकरी मुलाला ही सर्व माहिती वाचून, त्यात सहभागी होऊन शिक्षकांच्या सहकार्याने यात बाजी मारणं कदाचित अशक्य वाटणार नाही. पण जळगाव जिल्ह्यातील एखाद्या खेडय़ातला मुलगा मात्र मार्गदर्शनाअभावी स्पध्रेत सामील होण्यापूर्वीच या प्रक्रियेतून बाद होऊ शकतो. असे होऊ नये याची खबरदारी गुगलने घेतली आहे. संशोधनासाठी विषय निवडण्यात मदत व्हावी म्हणून ‘सायन्स बडीज’ या मार्गदर्शकाची सोय गुगलने केली आहे. याअंतर्गत नेमक्या विषयाची निवड कशी करायची, त्याची कार्यपद्धती निश्चित कशी करायची या संबंधीची माहिती पुरवण्यात आली आहे. तुम्ही निवडलेला प्रश्न हा वरवर पाहता अत्यंत क्षुल्लक असू शकतो. उदा. साचलेल्या पाण्यावर मलेरियाच्या डासांची अंडी वाढतात. पावसाळ्यात डासांचे प्रमाण सर्वाधिक असते. पावसाळा कमी झाल्यानंतर जेव्हा थंडी सुरू होते त्यावेळी मलेरियाचे वर्षभरातील सरासरी सर्वाधिक रुग्ण हे ऑक्टोबर महिन्यात सापडतात. हे निरीक्षण महाराष्टातील गडचिरोली जिल्ह्य़ातील हीच आकडेवारी बांग्लादेशाला लागू पडू शकते? यामागचे कारण काय? त्याला उपाय काय? स्पर्धक हा विषय संशोधनासाठी घेऊ शकतात. भारतातील सर्व राज्यांमध्ये घरोघरी निर्माल्य तयार होते. या निर्माल्यापासून घरच्याघरी खताची बिस्किटे कशी करता येतील? मोठय़ा प्रमाणावर करायचे झाल्यास त्याचा खर्च किती येईल? हा एक संशोधनाचा विषय आहे.
३० एप्रिलपर्यंत स्पर्धक आपले संशोधन अपलोड करू शकतात. ११ जूनपर्यंत परीक्षक विभागवार ९० स्पर्धकांची निवड करतील. २७ जूनला जगभरातील १५ विजेत्यांची नावे जाहीर होतील. आणि सप्टेंबरमध्ये एकूण तीन विश्वविजेते जाहीर केले जातील. या विजेत्यांसाठी अनेक आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. गुगलबरोबर नॅशनल जिओग्राफिक, सायंटिफिक अमेरिकन लीगो ही मोठी नावे स्पध्रेशी जोडली गेली आहेत. विश्वविजेत्यांना नॅशनल जिओग्राफिकतर्फे गॅलापागस बेटांवर जायची संधी मिळेल. तेथे डार्वनिने अनेक वर्षांपूर्वी संग्रहित केलेल्या दुर्मीळ वनस्पती, प्राणी यांचे अत्यंत जवळून निरीक्षण करण्याची संधी मिळेल. विजेत्यांना ५०,००० डॉलर रक्कम शिष्यवृत्ती म्हणून दिली जाईल. तसेच अंतिम विजेत्यांना नॅशनल जिओग्राफिक आणि सायंटिफिक अमेरिकन या मासिकांचे एका वर्षांचे मोफत सदस्यत्व दिले जाईल.
या स्पध्रेचे वेगळेपण काय मानावे? एखाद्या प्रश्नामागची कारणमीमांसा करून शास्त्रीय पद्धतीने त्याच्या शेवटापर्यंत जाणे व तो सिद्धांत दाखल्यांच्या आधारे सुसूत्रतेने मांडणे ही एक मोठी कला आहे. भारतीय शिक्षणपद्धतीत बहुतांश वेळेला प्रश्नांना आयती उत्तरं दिली जातील. ती स्वत: शोधून काढण्याची मुभा फार कमी वेळा दिली जाते. मूल १५ व्या वर्षी महाविद्यालयात दाखल झाल्यानंतरच त्याला स्वत: मेहनत घेऊन उत्तरं शोधण्याची सवय करावी लागते. या स्पध्रेत मात्र ७-८ व्या इयत्तेतील मुले अशा प्रकारच्या कार्यपद्धतीशी परिचित होतील. या स्पध्रेत अखेरच्या फलिताबरोबरच तिथपर्यंत पोचण्याच्या प्रक्रियेलाही महत्त्व दिले आहे. अनेकदा फलित आपण सुरुवातीला योजलेले नसते, पण प्रक्रिया मात्र खूप काही शिकवून जाते. त्यामुळे संशोधन मात्र अयशस्वी ठरत नाही. वैज्ञानिक दृष्टी आणि संशोधनवृत्ती तरुणांच्या अंगी बाणण्यास ही स्पर्धा नक्की उपयोगी ठरेल. ही स्पर्धा संपूर्णपणे ऑनलाइन असल्यामुळे कॉम्प्युटरशी तोंडओळख नसलेला मुलगा क्षमता असूनही या स्पध्रेतून थेट बाद होऊ शकतो. त्यामुळे किमान संगणक साक्षरतेची जग आपल्याकडून अपेक्षा करत आहे. अशा स्पर्धामध्ये टिकाव धरण्यासाठी आपल्याला रोज प्रगत होत जाणाऱ्या तंत्रज्ञानाशी परिचित राहाणं गरजेचं आहे, असाही संदेश यातून मिळतो आहे.
या स्पध्रेतील महत्त्वाची अट म्हणजे तुम्ही सादर केलेल्या संशोधनाची उपयोगिता (Applicability) आणि हेच काम इतर ठिकाणी उभे करण्याची क्षमता (Replicability) तुम्हाला सिद्ध करता यायला हवी. अनेकदा आपल्याला पडलेल्या प्रश्नांत वास्तवाचे प्रतिबिंब नसते. खरे प्रश्न शोधावे लागत नाहीत. रोजचे आयुष्य जगताना ते सतत समोर उभे ठाकत असतात. जग बदलणाऱ्या आयडीयाज या दैनंदिन जीवनातील व्यवहार करताना सुचलेल्या असतात. त्यांची उपयोगिता सिद्ध करायला फार कष्ट पडत नाहीत. कारण त्यांचा जन्मच मुळी प्रत्यक्ष अनुभवातून झालेला असतो. असे सच्चे प्रश्न आणि त्यांच्या उकलेसाठी केलेले संशोधन पृथ्वीच्या पाठीवर जितक्या ठिकाणी कमीत कमी फेरबदल करून जसेच्या तसे वापरता येईल, तितके ते उच्च प्रतीचे. डासांपासून संरक्षण देणारी मच्छरदाणी ही गडचिरोलीपासून आफ्रिकेच्या जंगलातील आदिवासीपर्यंत सगळे वापरू शकतात. म्हणून असे संशोधन व त्यातून निर्माण झालेले उत्पादन अभिनव मानायचे! स्पध्रेसाठी हे दोन्ही निकष लक्षात घेतल्यामुळे यात सादर होणारे संशोधन नक्कीच ‘क्या आयडिया है सरजी’ असे म्हणण्यास भाग पाडेल यात शंका नाही.
गुगलसारख्या अब्जावधी डॉलर्सची उलाढाल करणाऱ्या कंपनीला जगभरातील किशोरवयीन मुलांसाठी मोफत विज्ञानस्पर्धा आयोजित करण्याची गरज का भासली असावी? प्रत्येकच मोठे उद्योजक आपल्या व्यवसायासाठी हुशार आणि होतकरू तरुणांच्या पुढच्या फळीच्या शोधात असतात. अशा काही स्पर्धामधून ते भावी उद्योजक हेरतात आणि त्यांना प्रशिक्षित करतात. न जाणो या स्पर्धामधून आपल्याला पुढचे स्टीव्ह जॉब्स, डार्वनि किंवा होमीभाभा मिळतील.
आíकमिडीजचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, ‘मला पुरेसा मोठा तरफा द्या आणि पृथ्वीच्या बाहेर एक बिंदू द्या. मी या तरफेने अख्खी पृथ्वी उचलून दाखवीन’. या वाक्यातील थोडीफार अतिशयोक्ती वगळता आजच्या काळात ज्ञानाच्या पुरेशा मोठय़ा तरफेने आपण खरच जग उलथेपालथे करू शकतो. हा ज्ञानरूपी तरफा कदाचित या स्पध्रेतील एका छोटय़ाशा कल्पनेतून जन्माला येईल आणि अत्यंत उपयोगी, असे संशोधन जगाला बहाल करून जाईल.
response.lokprabha@expressindia.com