८ मार्च २०१३
मथितार्थ
चित्रकथी

कव्हरस्टोरी
जालना आणि फिनलॅँड शिक्षणाचा आनंदमार्ग!
अभियानाने शिक्षकांना दिले चैतन्य..
आवडते मज माझी शाळा
मुलांची चौकसबुद्धी वाढली! - बी. राधाकृष्णन (आय.ए.एस.)
आनंदाने शिकता शिकता..

नियोजन

यूथ

सेकंड इनिंग
संमेलन
चिंतन
आरोग्यम्
वादविवाद
क्रीडा

स्टार रेसिपी

विज्ञान-तंत्रज्ञान
एकपानी
कविता
भंकसगिरी
शब्दरंग
सिनेमा
माझं शेतघर
लग्नाची वेगळी गोष्ट
आधी केले..
पर्यटन
क्राईम
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

वाचक प्रतिसाद

डॉ. दाभोलकरांवर टीका करणे थांबवा
‘लोकप्रभा’च्या १५ फेब्रुवारीच्या अंकातील अनिरुद्ध बापू यांचे भक्त योगेश साटम यांचे ‘भावना दुखावणारा लेख’ हे पत्र वाचले. यामध्ये त्यांनी बापूंवरील आक्षेपांना सयुक्तिक उत्तर देण्याचा प्रयत्न केला असता तर बाब वेगळी होती, पण तसं न करता त्यांनी डॉ. नरेद्र दाभोलकर यांच्या कार्याबद्दल हास्यास्पद आक्षेप घेतले आहेत.
पत्रलेखकांचा आणखीन एक मुद्दा म्हणजे डॉ. दाभोलकर हे फक्त अंधश्रद्धा निर्मूलनाचेच काम करतात. भ्रष्टाचार, महागाई या विषयांवर ते काही करत नाहीत. वादाकरता आपण काही काळ हे मान्य जरी केले तरी समाजातील एखादा विषय निवडून त्यामध्ये कार्यरत राहाण्यात वाईट ते काय? म्हणजे पत्रलेखक बापूंचे टाळ कुटत राहणार आणि डॉ. दाभोलकरांनी सर्व क्षेत्रात कार्यरत राहावे. वा रे वा!
साटम यांचा (आणि बहुतांशी प्रतिगाम्यांचा) दुसरा आक्षेप असा की डॉ. दाभोलकर हे फक्त हिंदू धर्मातील अंधश्रद्धेविषयी बोलतात, इतर धर्मातील अंधश्रद्धेविषयी नाही. हेही म्हणणे खरे नाही. हे खरे आहे की भारतातील विशिष्ट परिस्थिती लक्षात घेतली असता कोणताही समाजसुधारक आपल्या स्वत:च्या धर्मातील वाईट गोष्टींवरच टीका करतो. कारण तो जेवढय़ा कठोरपणे स्वत:च्या धर्मातील अनिष्ट गोष्टींवर टीका करू शकेल तेवढय़ा कठोरपणे इतर धर्मातील अनिष्ट प्रथांवर करणार नाही. कारण त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होईल आणि मूळ मुद्दा बाजूला पडून त्याचा फायदा प्रतिगामी शक्तींनाच होईल. साटम यांनी अनिरुद्ध बापूंच्या चरणी लीन व्हावे, पण त्यांनी डॉ. दाभोलकरांवर वृथा दुगाण्या झाडू नयेत.
सागर पिलारे, कोल्हापूर.

‘मोबाइल टॉवर रेडिएशन’ माझा अनुभव
दि. १ फेब्र्रुवारीच्या ‘लोकप्रभा’ साप्ताहिकात आलेल्या ‘मोबाइल टॉवर व त्यामुळे होणाऱ्या रेडिएशनचे दष्परिणाम’ यावर आलेला लेख वाचला. या लेखात आपण वाचकांकडून त्यांचे अनुभव व मत मागविले होते, तरी मी माझे अनुभव या पत्राद्वारे आपणास कळवीत आहे.
गौतम धारा, गौतम दर्शन, बंगश्री टॉवर या तिघांची कंपाऊंड वॉल्स एकमेकांना लागून आहे. गौतम धारा व बंगश्री टॉवर एकाच कंपाऊंडमध्ये आहे. गौतम धारामध्ये तळमजल्यावर मी व माझे कुटुंब गेली १२ वर्षे राहत होते. बंगश्री टॉवर बांधून साडेतीन-चार वर्षे झाली व नवीन इमारतीत राहायला जायचे म्हणून खूप आनंद झाला. हवा तसा ९ वा मजला पण मिळाला. भरपूर उजेड, भरपूर हवा, त्यामुळे संध्याकाळी उशिरापर्यंत दिव्यांची आवश्यकता नसल्यामुळे पंखे चालवत नसू. कारण इतकी हवा की प्लास्टिकच्या खुच्र्या हवेच्या झोताने सरकत. हव्या तशा सोयीपण करून घेतल्या व आमचे आयुष्य सुखात जाईल म्हणून आनंदीपण होतो. २००९ पासून आम्ही खूप मजेत होतो. बारीकसारीक आजार म्हणजे सर्दी, पडसं, खोकला ऋतुबदलाप्रमाणे आली तर आपण फारसा विचार करत नाही. माझे वय ८२, तर पत्नीचे ७७. प्रकृत्ती उत्तम, कारण आम्ही तब्येतीची काळजी घेतो. नियमित व्यायाम करणे, सकस आहार म्हणजे मोडाच्या उसळी, नाचणीच्या भाक ऱ्या, भाज्या, फळ, कणीक (सात्त्विक) च्या पोळ्या असा आमचा आहार. असे असताना २०११ जुलै महिन्यात काय झाले कुणास ठाऊक, पण अचानक माझ्या पत्नीला १०४ पर्यंत ताप आला आणि महिनाभर बारीक ताप चालू राहिला. गेल्या २५ वर्षांत डॉक्टरांकडे गेल्या नसलेल्या पत्नीसाठी डॉक्टरना बोलवावे लागले. त्या महिन्याभरात १५ दिवसांच्या अंतराने दोनदा डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे सगळ्या तपासण्या केल्या. तरीसुद्धा आजारात फरक पडेना. ८ किलो वजन कमी झाले आणि काळजी वाटू लागली.
आतापर्यंत बऱ्याच वेळा वर्तमानपत्रात (मोबाइल टॉवर व माणसांवर होणारे परिणाम) आलेल्या बातम्या वाचल्या होत्या. परंतु त्यावर एवढय़ा गांभीर्याने विचार केला नाही. रेडिएशनला ना वास, ना चव. ना आवाज ना स्पर्श. तरीपण माणसावर विपरीत परिणाम होतो याची कल्पना करू शकलो नाही. घरात पत्नी आजारी आणि टीव्ही लावला असताना मोबाइल टॉवर पाहिले आणि सहज खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले असता गौतम दर्शन इमारतीवर मोबाइल टॉवर १०-१५ मीटरवर दिसला. गौतम दर्शन इमारत ६ मजली आणि त्यांच्या टेरेसवरील टाकीवर मोबाइल टॉवर लावलेला आहे. अ‍ॅन्टेनाची उंची धरून साधारणपणे ९ व्या मजल्याच्या उंचीपर्यंत टॉवर येतो. बंगश्री टॉवरमध्ये आम्ही ९व्या मजल्यावर राहायला येऊन साडेतीन वर्षे झाली. या ब्लॉकमध्ये राहायला आल्यानंतर साधारण अडीच वर्षांनंतर त्रासाला सुरुवात झाली. ब्लॉकच्या सर्व बाजूला टॉवर्स. १५ ते १५० मीटपर्यंत ८ ते १० टॉवर्स आहेत. मी ज्या विंगमध्ये राहतो त्याच विंगमधले १०व्या, ११व्या व १२व्या मजल्यावर तीन स्त्रिया एकाच वर्षांत दिवंगत झाल्या. आपला पण नंबर लागेल अशी चुकचुक लागणे स्वाभाविक होते.
दुसऱ्या दिवशी रेडिएशन डिक्टेटर मशीन विकत आणले आणि घरातील सर्व खोल्या रेडिएशन दाखवत होते. त्यावर उपाययोजना केली आणि पत्नीची तब्येत सुधारायला लागली.
यातून मी एकच निष्कर्ष काढला की, गेल्या एक ते दोन वर्षांत रेडिएशनमुळे या त्रासाला सुरुवात झाली. एक सामाजिक बांधीलकी म्हणून मी स्वत: या मशीनच्या साहाय्याने आतापर्यंत ३० ते ४० सोसायटींमध्ये रेडिएशन आहे की नाही हे तपासले. त्यातील ४ ते ५ जणांनी त्यावर उपाययोजना केली. इतरांनी तेवढा गांभीर्याने विचार केलेला दिसला नाही. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ, असे टॉवरवाले म्हणतील; परंतु एकाच विंगमधल्या तीन मजल्यांवरच्या व्यक्ती दिवंगत होणे हे नैसर्गिक म्हणता येणार नाही. तसेच आमच्या घरातले आजारपण रेडिएशन प्रतिबंध फिल्म लावल्यावर जाते याचा अर्थ काय? ही सर्व दुखणी रेडिएशनमुळे होती हे सिद्ध होते.
मधुसूदन खांबेटे, चरई, ठाणे.

लाचार जनताच कारणीभूत
‘तरुण तुर्क आणि घराणेशाहीचा अर्क’ हा अवधूत परळकर यांचा लेख आवडला. लेखामध्ये त्यांनी केलेली टीका-टिप्पणी योग्य असून सर्वानीच याचा विचार केला पाहिजे. राजकारणामध्ये घराणेशाही निर्माण करण्यास लाचार आणि मुर्दाड जनताच कारणीभूत आहे. कारण निवडणुकीच्या काळात हिच जनता या लबाड घराणेशाहीच्या भोवती पिंगा घालताना दिसते. देशात फोफावणारी घराणेशाही कॅन्सरसारखी घातक आहे. तरुणांनी वेळीच ही घराणेशाही संपवली पाहिजे अन्यथा मेणबत्त्या हातात घेऊन मोर्चा काढण्याशिवाय हातात काही उरणार नाही.
पवारांची घराणेशाही व राष्ट्रवादी की दहशतवादी पक्ष देशाला कसा लुटतो आहे हे जनता पाहात आहे. परंतु त्याच्या विरोधात कोणीही काहीही करत नाही. याचे आश्चर्य वाटते. - रमेश फोंडगे, पुणे.

संग्राह्य़ पर्यटन विशेषांक
‘लोकप्रभा’चा पर्यटन विशेषांक अतिशय दर्जेदार झाला आहे. अंकाचे मुखपृष्ठ पाहून असे वाटते की या पर्वतराजीच्या खडकामध्ये समोरच्या निसर्गरम्य भगदाड पडलेल्या दृश्याच्या आतील सौंदर्य पाहून मनाला आणि नेत्राला तृप्त करावे. या अंकातील इतर लेखही वाचनीय आहेत.
गरिबांना आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने प्रत्यक्ष पर्यटनस्थळी जाता येत नाही. पण ‘लोकप्रभा’तील छायाचित्रे पाहून आपण प्रत्यक्ष पर्यटनस्थळी आल्याचाच भास होतो. दर्जेदार लेख वाचत असताना पर्यटनस्थळांची सफर करत आहोत असे वाटते.
‘चित्रकथी’मध्ये विनायक परब यांचे लेख चित्रकार, कलाकार यांच्याविषयी माहिती देणारे लेख वाचनीय तर आहेतच, पण त्यातील दुर्मीळ चित्रेदेखील सुंदर आहेत. या लेखांचे संकलन करून त्याचे पुस्तक व्हावे असे मला वाटते. ‘लोकप्रभा’चे सर्वच अंक वाचनीय आणि माहितीपूर्ण असतात.
रामचंद्र रेडकर, बेळगाव.

सच्च्या राजाची ओळख झाली
‘लोकप्रभा’चा राजा ढाले यांची मुलाखत असणारा डिसेंबरमधील अंक आवडला. राजा ढाले हे फुले-आंबेडकरी विचारधारेचे भाष्यकार आहेत. राजा ढाले यांच्या वाङ्मयीन, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक बंडखोर व्यक्तिमत्त्वाचे अंग प्रथमच उलगडले. महाराष्ट्रातील आंबेडकरी सामान्य जनांना राजा ढाले म्हटलं की, दलित पँथर, मासमूव्हमेन्ट, सम्यक क्रांती, भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, धम्मलिपीचे संपादक आणि साधनेतील ‘राष्ट्रध्वज’विषयी खळबळजनक लेखाचे विद्रोही लेखक अशीच त्यांची सर्वसाधारण ओळख!
पण ५६ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने मधू कांबळे यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीतून राजा ढाले हे चित्रकार, बालसाहित्यिक, एम.ए. पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण, स. दा. कऱ्हाडे गाइड हे प्रथमच कळाले. सत्यकथेची सत्यकथा लिहिताना दस्तुरखुद्द भागवत गुरूंचं दडपण न येऊ देता एम.ए.चं महत्त्वाचं वर्ष असतानासुद्धा सत्यकथेची चिरफाड करणे हे एक सच्चा निर्भय लेखकच करू शकतो. तरीही सच्च्या गुरूंनी शिष्याचं मोठेपण, मोठय़ा मनाने ललित २००३ च्या अंकातील मुलाखतीत नोंदवलं. ‘दलित पँथर’ निर्मितीची प्रेरणा अमेरिकेतील ‘ब्लॅक पँथर’कडून ‘आयात’ झाली. पण या निर्मात्यांना आपल्या भूमीतील ‘आयती’ समता ‘सैनिक दला’कडून प्रेरणा मिळू नये, यावरून १८-१९ वर्षांचे नामदेव ढसाळ यांची ‘यत्ता कंची’ कळते. तरीही त्यांच्याविषयी आदर वाटतो.
दिलीप पुरुषोत्तम चित्रे या थोर कवीनं लिहिलेलं खोडून काढणे यावरून राजा ढाले यांच्या वाङ्मयीन व्यासंगाची प्रचीती येते. चि. त्र्यं. खानोलकरांची ‘आता कशाला खेळशी झिम्मा’ ही कविता त्यांना आजही पाठ आहे, यावरून त्यांची स्मरणशक्ती दिसून येते.
ढाले यांनी अर्वाचीन कवितेवरील ७० कीर्तने लिहिली. या सगळ्या लिखाणाचं पुस्तक करायचं राहून गेल्याची खंत राजा ढाले यांनी व्यक्त केली. त्याचं पुस्तक झाल्यास त्याचे स्वागत होईल. आताच्या पिढीला राजा ढाले यांचं राजेपण कळेल. राजाभाऊंनी अण्णाभाऊंची आठवण जागवली आणि जीव गहिवरला. चि. त्र्यं. खानोलकर, अरुण कोलटकर, भालचंद्र नेमाडे यांच्याबरोबर ढाले यांचे काही मुद्दय़ांवर मतभेद असतील, पण या सर्वाबद्दल त्यांनी नेहमीच आदर दाखवला आहे. ढाले हे महाराष्ट्रातील एकमेव व्यक्ती असतील ज्यांच्यावर सामाजिक अशांततेच्या ७४ केसेस होत्या. त्यांनी या सर्वाला निधडय़ा छातीनं तोंड दिलं, हे त्यांच्या बंडखोर प्रवृत्तीचं लक्षण नव्हे काय?
आज लिटल मॅगझीनवाले साहित्याच्या शिखरावर तेजाने तळपत आहेत. परंतु ‘शब्द’चा मंच, लिटल मॅगझीनचा पाया होता. त्या पायाला ते विसरले आहेत, असं वाटतं, पण राजा ढाले यांनी तो विसरभोळेपणा केला नाही. उलट त्याचं ऋण ते जाहीरपणे मान्य करतात. राजा ढाले यांनी बाळ ठाकरे यांच्या स्मारकाबद्दल जो वाद चालू होता त्यावर कोहिनूर मिलचा पर्याय सुचवला तो योग्य आहे.
चांद्यापासून ते बांद्यापर्यंतचे कार्यकर्ते नामदेव ढसाळ यांना ‘नाम्या’, तर राजा ढाले यांना आदराने ‘चक्रवर्ती राजाभाऊ’, तिसरे पँथर ज. वि. पवार यांना ‘जवि’ म्हणून आजही संबोधतात.
राजा ढाले यांच्यामध्ये उपजत सृजनशीलता तर आहेच. परंतु ते संवेदनशील असल्यामुळे विधायक विद्रोही प्रतिभावंत, विचारवंत ठरतात. राजा ढाले हे आंबेडकरी समाजातील प्रज्ञावंत, क्रियाशील नेते आहेत. त्यांचा मूळ पिंड कवी, लेखक, संशोधकाचा आहे. तेव्हा चळवळ आणि साहित्य हे दोन्ही समांतर चालले पाहिजे, यासाठी खास अजेंडा तयार करावा, असे अनेकांना वाटते.
ढाले यांच्याबद्दल अनेक दंतकथा निर्माण झाल्या होत्या. पण ‘लोकप्रभा’तील लेखामुळे त्यांची सत्यकथा कळाली. मूलनिवासी संकल्पनांचे शास्त्रीय विश्लेषण कोणताही विज्ञाननिष्ठ समाज नाकारू शकणार नाही. ‘साधने’तील लेख दुर्गाबाई भागवत यांच्या पत्रामुळे गाजला हे ढाले यांनी जाहीरपणे सांगितले. यातून प्रकट झालेला त्यांचा प्रामाणिकपणा मनोमन भावला. ‘जो बाबासाहेबांची चिकित्सा वाचेल तो बदलल्याशिवाय राहणार नाही आणि जो वाचणार नाही तो कधीही बदलणार नाही. दलितत्व अंतिम नव्हे, तर माणूसपणच अंतिम आहे.’ त्यांचा हा संदेश मोलाचा आहे.
मुलाखतीमध्ये कुठेही आत्मप्रौढी नाही की सत्याचा अपलाप नाही. एक सच्चा फुले-आंबेडकरी प्रेरणेचा प्रज्ञावंत प्रतिभावंत, विचारवंत राजा ढाले यांची माणूसपणाने ओतप्रोत असलेली मनमोकळी, पारदर्शी, स्मरणीय अशी ही मुलाखत मनापासून आवडली!
मिलिंद एंगडे, नांदेड.