८ मार्च २०१३
मथितार्थ
चित्रकथी

कव्हरस्टोरी
जालना आणि फिनलॅँड शिक्षणाचा आनंदमार्ग!
अभियानाने शिक्षकांना दिले चैतन्य..
आवडते मज माझी शाळा
मुलांची चौकसबुद्धी वाढली! - बी. राधाकृष्णन (आय.ए.एस.)
आनंदाने शिकता शिकता..

नियोजन

यूथ

सेकंड इनिंग
संमेलन
चिंतन
आरोग्यम्
वादविवाद
क्रीडा

स्टार रेसिपी

विज्ञान-तंत्रज्ञान
एकपानी
कविता
भंकसगिरी
शब्दरंग
सिनेमा
माझं शेतघर
लग्नाची वेगळी गोष्ट
आधी केले..
पर्यटन
क्राईम
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

वादविवाद

कलाकारांचे राजकारण!
रोहन टिल्लू

तब्बल दहा वर्षांनंतर होत असलेल्या नाटय़ परिषदेच्या निवडणुकांदरम्यान बोगस मतपत्रिका, मतपत्रिका पोस्टातून लांबवणे, बोगस मतदान अशा अनेक आरोप-प्रत्यारोपांची माळ या एका महिन्यात लागली. तूर्तास, ही निवडणूक प्रक्रिया रद्द ठरवण्यात आली आहे. पण या निमित्ताने आपल्या लाडक्या कलाकारांच्या ‘मुखवटय़ांमागचा खरा चेहरा’ही लोकांसमोर आला..

नाटय़ कलावंत आणि रंगकर्मी या सृजनशील जमातीशी निगडित असलेल्या अखिल भारतीय नाटय़ परिषद या संस्थेच्या निवडणुका रद्द झाल्या आणि नाटय़ परिषदेची उरलीसुरली अब्रूही चव्हाटय़ावर आली. निवडणुका रद्द करण्याचा निर्णय धर्मादाय आयुक्तांनी घ्यावा की, निवडणूक अधिकाऱ्यांनी हा वादाचा विषय असला तरी यंदाच्या निवडणूक प्रक्रियेत बऱ्याच मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार व गैरप्रकार झाले ही गोष्ट निर्विवाद आहे. विशेष म्हणजे वैचारिकदृष्टय़ा एकमेकांच्या विरोधात असलेल्या सगळ्याच पॅनल्सच्या उमेदवारांचा यात थोडा ना थोडा सहभाग होता, ही गोष्ट नाकारता येणार नाही.
नाटय़ परिषदेची शेवटची निवडणूक झाली होती ती तब्बल दहा वर्षांपूर्वी. म्हणजे २००३मध्ये! त्या वेळी झालेल्या निवडणुकीत मतदारांनी मतदान करावे, यासाठी उमेदवार त्यांना आर्जवे करत होते. पण मग दहाच वर्षांत अशी काय जादूची कांडी फिरली की, गायब झालेल्या मतपत्रिकांबाबत ओरड व्हावी आणि थोडय़ाथोडक्या नाही, तर दोन हजार बनावट मतपत्रिकाही सापडाव्यात! या प्रश्नाचं उत्तर मिळतं दोन वर्षांपूर्वी झालेल्या रत्नागिरीच्या नाटय़ संमेलनात.
कोकणातल्या माड-पोफळीच्या सावलीत एकत्र जमून नाटकाच्या भविष्याची चिंता करणाऱ्या नाटय़कर्मीच्या संमेलनात राज्य शासनाने अडीच कोटी रुपये नाटय़ परिषदेच्या विविध योजनांसाठी जाहीर केले. नाटय़ परिषदेचे विश्वस्त कृषिमंत्री शरद पवार यांनीही त्यांच्यातर्फे अडीच कोटींचा निधी जाहीर केला. या एकूण पाच कोटींच्या निधीसाठी नाटय़ परिषदेने योजना पाठवाव्यात, असे सांगण्यात आले. मात्र गेल्या दोन वर्षांत ठोस योजनांच्या अभावी हा निधी नाटय़ परिषदेला मिळू शकला नाही. बारामती येथे झालेल्या नाटय़ संमेलनात अजित पवार यांनी नाटय़ परिषदेला कानपिचक्या दिल्या होत्या. ‘योजना मांडा आणि पाच कोटी मिळवा’, असाच काहीसा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून दिला होता.
सुरुवातीला ही निवडणूक केवळ मोहन जोशी यांचे उत्स्फूर्त आणि विनय आपटे यांचे नटराज याच दोन पॅनल्समध्ये होईल, अशी अटकळ होती. मात्र त्यानंतर अपक्ष उमेदवारांची मोट बांधत प्रमोद पवार यांनीही आपली स्वतंत्र आघाडी उघडली व निवडणुकीतून माघार घेतलेल्या प्रदीप कबरे यांनी आपल्या काही उमेदवारांचे पॅनल तयार केले. मोहन जोशी व विनय आपटे या दोघांच्याही पॅनल्सनी आपापल्या जाहीरनाम्यांत नाटय़ परिषदेच्या विकासाचे स्वप्नच लोकांसमोर उभे केले.
या दोघांच्या जाहीरनाम्यातील खटकणारी गोष्ट म्हणजे ‘नाटय़ परिषदेचा कारभार पारदर्शक करण्यावर भर देण्यात येईल,’ हे आश्वासन! दोन्ही पॅनल्समधील काही सदस्य गेली दहा वर्षे नियामक मंडळावर मांड ठोकून बसले होते. त्या वेळी हा कारभार पारदर्शक करता आला नाही का, या प्रश्नाला दोघांकडे काहीच उत्तर नाही. मोहन जोशी यांच्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांचा कारभार मनमानीकडे झुकणारा होता, असे अनेक सदस्य सांगतात. तर विनय आपटे आणि कंपनीही याच मनमानीकडे वळत असल्याचे बारामती नाटय़ संमेलनाच्या निमित्ताने लक्षात आल्याचे या सदस्यांचे म्हणणे आहे.
मुद्दा हा आहे की, १४ जून २००७मध्ये भर पावसात दामू केंकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्याची वेळ या दोन्ही रंगभूमीवरील रंगकर्मीवर का आली? बरं, त्या मोर्चानंतर तत्कालीन अध्यक्ष मोहन जोशी यांनी दिलेल्या काही आश्वासनांना मूर्त स्वरूप अजूनही आलेलं नाही. जोशींनंतर अध्यक्षपद सांभाळणाऱ्या आणि जोशींच्या काळात उपाध्यक्षपदी असलेल्या हेमंत टकले यांनीही या दोन्ही रंगभूमीसाठी काहीच केले नाही. प्रमोद पवार रंगभूमीशी निगडित इतर उपक्रमांमध्ये सहभागी असले, तरी नाटय़ परिषदेत असताना त्यांनीही फार काही केल्याचे ऐकिवात नाही.

या सर्वच प्रकरणात मुख्य निवडणूक अधिकारी विश्वास ठाकूर यांची भूमिकाही अत्यंत वादग्रस्त म्हणावी अशीच होती. मुंबईत एवढी मोठी उलथापालथ होत असताना ठाकूर स्वत: मात्र नाशकात सुशेगात बसले होते.

नाटय़ परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सर्वप्रथम या सर्व उमेदवारांनी केलेली गोष्ट म्हणजे एकमेकांच्या चारित्र्यावर चिखलफेक! १७ जानेवारी रोजी मोहन जोशी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विनय आपटे व हेमंत टकले आदी कंपूवर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला. चांदवड प्रकरणाच्या अहवालाचे नेमके झाले काय, तो अहवाल जाहीर करण्याबाबत आपण टकले यांना अनेकदा पत्रे पाठवली आहेत, असा दावा जोशी यांनी केला. नाशिकचा निवडणूक अधिकारी नेमण्यामागेही काहीतरी काळंबेरं असल्याचा दावाही त्यांनी केला. त्यापुढे जात काही दिवसांतच पंढरपूर येथे जोशी यांनी ‘बनावट मतपत्रिका छापल्या गेल्या आहेत,’ असा आरोप करत खळबळ उडवून दिली होती. निवडणुकीला उभे राहण्याची आपली इच्छा नव्हती, असे जोशी यांनी वारंवार सांगितले असले, तरीही त्यांनी ही निवडणूक वैयक्तिक प्रतिष्ठेची बनवल्याचे सहज लक्षात येत होते.
या आरोपांना नटराज पॅनलकडून सव्याज उत्तर देण्याची तरतूद अशोक हांडे आणि कंपनीने केली. नाटय़ परिषदेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच उतरलेल्या अशोक हांडे आणि चंद्रकांत कुलकर्णी या दोघांनी उत्स्फूर्त पॅनलवर शरसंधान करत जोशींच्या काळात कारभाराची कशी वाट लागली होती, याची रसभरीत वर्णने वारंवार केली. नाटय़ परिषदेचा विकास हा खुला अजेंडा आणि मोहन जोशींना विरोध हा छुपा अजेंडा ठेवत नटराज पॅनलने आपला प्रचार केला. तर अपक्ष उमेदवार प्रमोद पवार यांनी तिसरी आघाडी उघडली.
या सर्व प्रकरणात निवडणूक न लढवणाऱ्या पण तरीही नाटय़ परिषदेचे सदस्य असलेल्या दिलीप जाधव यांच्यासारख्यांनीही खरमरीत टीका केली. जाधव यांनी मोहन जोशी, प्रमोद पवार आणि प्रदीप कबरे यांच्याविरोधात अत्यंत गंभीर आरोपही केले. आपल्याकडे या बाबतीतील सर्वच पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र प्रमोद पवार यांनी दिलीप जाधव यांच्याविरोधात तक्रार दाखल करत हे प्रकरण न्यायालयाच्या वेशीवर नेले.
बनावट मतपत्रिकांचा विषय उघडकीस आल्यानंतर त्याच्याविरोधातल्या अनेक ‘कॉन्स्पिरसी थियरीज’ही समोर आल्या. ‘पत्रिका नाशिकमध्येच छापायच्या, त्या तिथेच फ्रँकिंग करायच्या, मग मतपत्रिका पोस्टातून गहाळ झाल्याची बोंब मारायची आणि त्यांच्याऐवजी बनावट मतपत्रिका पोस्टात टाकायच्या, हा नटराज पॅनलचा डाव आहे,’ अशी एक थियरी मांडण्यात येत आहे. तर ‘हरण्याची भीती असल्याने आधी मतपत्रिका लंपास करायच्या, मग बनावट मतपत्रिकाही आपल्या सोयीप्रमाणे पेटीत टाकायच्या, हे काम उत्स्फूर्त पॅनलचे आहे,’ असा दावा काहींनी केला आहे. तर शेवटच्या टप्प्यात कबरे यांच्या पॅनलच्या काही लोकांनी परिषदेच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालत भरभरून मतपत्रिका टाकल्या होत्या, असे व्हिडीओ फुटेजही परिषदेकडे आहे.
या सर्वच प्रकरणात मुख्य निवडणूक अधिकारी विश्वास ठाकूर यांची भूमिकाही अत्यंत वादग्रस्त म्हणावी अशीच होती. मुंबईत एवढी मोठी उलथापालथ होत असताना ठाकूर स्वत: मात्र नाशकात सुशेगात बसले होते. त्यांना स्वत:च्या जबाबदारीची जाणीव असल्याचे जाणवलेही नाही. त्यात आपण ही निवडणूक रद्द करत असल्याची घोषणा करत त्यांनी धर्मादाय आयुक्तांचे अधिकारही स्वत:कडेच घेतले. त्यामुळे सरतेशेवटी एकमेकांच्या विरोधात असलेल्या तीन पॅनल्सनी एकत्र येत ठाकूर यांच्या निर्णयाचा निषेध करत धर्मादाय आयुक्तांकडे धाव घेतली.
आता मुद्दा आहे तो या सगळ्या कलाकार म्हणवून घेणाऱ्या लोकांच्या वागणुकीचा! कलाकाराकडे समाज वेगळ्या अपेक्षेने आणि आदराने पाहात असतो. त्यात अभिनेत्यांचे चेहरे सातत्याने दिसत असल्याने सामान्य लोक आणि अभिनेते यांच्यात एकप्रकारचे नातेही तयार होते. या निवडणुकीत उभ्या राहिलेल्या मोहन जोशी, विनय आपटे, स्मिता तळवलकर, वंदना गुप्ते, नीना कुलकर्णी, स्मिता जयकर, सुकन्या कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी अशा अनेक कलाकारांची एक प्रतिमा आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने छोटा-मोठा पडदा आणि रंगभूमीवर एक मुखवटा घालून वावरणाऱ्या कलाकारांचा माणूस म्हणून चेहराही लोकांच्या समोर आला आहे.
दुसरा मुद्दा म्हणजे, यातील स्मिता जयकर, सुकन्या कुलकर्णी, विद्याधर जोशी, विजय कदम असे अनेक कलाकार एक पत्रकार परिषद सोडली, तर इतर वेळी निवडणुकीच्या प्रचारासाठी किंवा बनावट मतपत्रिकांचा गोंधळ उघडकीस आल्यानंतरही कुठेच दिसले नाहीत. नाटय़ परिषदेच्या इतिहासातील एवढी मोठी घटना घडल्यानंतरही जे समोर आले नाहीत, ते प्रत्यक्ष कारभारात किती रस घेणार हा प्रश्नही आहेच. एक अत्यंत गंभीर मुद्दा म्हणजे या सगळ्या प्रक्रियेकडे पाहण्याचा तरुण उमेदवारांचा दृष्टिकोन! राहुल भंडारे, प्रसाद कांबळी हे दोघेही निर्माते उत्तमोत्तम नाटय़निर्मितीमुळे सर्वाच्याच परिचयाचे आहेत. त्यांच्याकडून परिषदेलाही खूप अपेक्षा बाळगायला हरकत नाही. पण ज्या सहजपणे ते या बनावट मतपत्रिका प्रकरणाकडे पाहात होते, ती काळजीची बाब आहे.
नाटय़ परिषद या संस्थेवर निवडून येण्यासाठी एकेकाळी कोणताही कलाकार फार उत्सुक नसे. मात्र यंदाच्या निवडणुकीने हा समज पूर्णपणे खोटा ठरवला आहे. आतापर्यंत अशा प्रकारचे घाणेरडे आणि हीन राजकारण करणे हे नेत्यांचे काम आहे, हे सामान्यांना माहीत होते. पण अशा राजकारणात नेत्यांपेक्षा आपण सरस असल्याचे या अभिनेत्यांनीही दाखवून दिले. आतापर्यंत निष्फळ ठरलेल्या नाटय़ परिषदेच्या निवडणुकीची हीच काय ती फलश्रुती!
response.lokprabha@expressindia.com