८ मार्च २०१३
मथितार्थ
चित्रकथी

कव्हरस्टोरी
जालना आणि फिनलॅँड शिक्षणाचा आनंदमार्ग!
अभियानाने शिक्षकांना दिले चैतन्य..
आवडते मज माझी शाळा
मुलांची चौकसबुद्धी वाढली! - बी. राधाकृष्णन (आय.ए.एस.)
आनंदाने शिकता शिकता..

नियोजन

यूथ

सेकंड इनिंग
संमेलन
चिंतन
आरोग्यम्
वादविवाद
क्रीडा

स्टार रेसिपी

विज्ञान-तंत्रज्ञान
एकपानी
कविता
भंकसगिरी
शब्दरंग
सिनेमा
माझं शेतघर
लग्नाची वेगळी गोष्ट
आधी केले..
पर्यटन
क्राईम
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

पर्यटन

बिग फाइव्हच्या जंगलात
गौरी बोरकर
जगातले सर्वात जुने व मोठे अशी ख्याती असणाऱ्या क्रुगर नॅशनल पार्कमध्ये बिग फाइव्ह हमखास दिसतातच, पण स्मॉल फाइव्हज्ही दर्शन देतात. पार्कातील विस्तृत आणि सर्व सोयींनी युक्त कॅम्पसाइटमुळे सर्व प्रकारच्या पर्यटकांचा येथे राबता असतो.

आफ्रिकेचा विस्तारच एवढा प्रचंड आहे की, प्रत्येक भागात वाइल्ड लाइफसाठी नॅशनल पार्कस् आहेतच. मागे सांगितल्याप्रमाणे आम्ही ट्रकमधून ओव्हरलँड सफारीमधून बोतस्वाना, झंबेझी, झिंबाब्वे करून साऊथ आफ्रिकेतील सर्व परिचित क्रुगर नॅशनल पार्क येथे पोहोचलो. दूरदृष्टीने तिथल्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी पूर्वी बराचसा भाग आरक्षित म्हणून ठेवला होता. सॅबी रिझव्‍‌र्ह हा त्यात एक होता. १८९८ मध्ये पॉल क्रुगर याने हा भाग घेऊन त्याचे नॅशनल पार्क केले. १९२३ मध्ये वाइल्ड लाइफसाठी पहिले पर्यटक गेले होते. त्यानंतर हळूहळू पर्यटकांचा ओघ वाढत गेला.
लिंपोपो जिल्ह्यत मुमालांगा व मोझेंबिकच्या सरहद्दीला लागूनच असलेल्या ह्य पार्कची लांबी ३२० कि.मी व रुंदी ८०कि. मी. आहे. जगात सर्वात जुने व मोठे नॅशनल पार्क अशी याची ख्याती आहे. एलीफंटस्, व्हाइट ऱ्हायनो, लायन, लेपर्ड व बायसन् किंवा आफ्रिकन बफेलो अशा बिग फाइव्हसाठी प्रसिद्ध असलेल्या या पार्कला दर वर्षी सुमारे नऊ लाख पर्यटक भेट देतात.
फिरताना ‘एनी ऑफ बिग फाइव्हज् हॅव यू सीन?’ असा प्रश्न विचारला जायचा. बिग फाइव्हज् हा काय प्रकार आहे ते कळेना, पण गाइडने वर उल्लेखलेल्या पाच प्राण्यांची नावे संगितल्यावर समजले. पण बिग फाइव्हज्बरोबर तिथे अँट लायन, एलीफंट श्रु, ऱ्हायनोसेरोसेस बीटल्, बफेलो विव्हर आणि लेपर्ड टारटॉईज असे स्मॉल फाईव्हज्ही आहेत. लिंपोपो, क्रोकोडाईल व सेबी या नद्या पार्कमधून जातात.
या नॅशनल पार्कमध्ये प्रवेशासाठी मेलालेन, क्रुगर, नुंबी, हेझी व्ह्य़ू, आरपेन व क्रोकोडाइल अशी सात गेटस् आहेत, असं आम्हाला सांगितलं गेलं. आता आम्ही कोणत्या गेटमधून प्रवेश करते झालो हे सांगणं जरा कठीण काम आहे, पण आमचं स्वागत मात्र रानडुकराच्या केकाटण्याने झालं. येथे सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रवेश करता येतो. इथे हॉटेल तर आहेच, पण एक व देान बेडरूमच्या टुमदार कॉटेजेस्, भरपूर कॅम्पिंग ग्राऊंडस् आहेत. प्रथम येणाऱ्या पर्यटकांना निवासासाठी प्रथम प्राधान्य असते, त्यामुळे वीकएंडला चांगली जागा मिळवण्यासाठी सर्वाची धांदल असते.
कॉटेजमध्ये राहणारे पर्यटक व्हरांडय़ातील फ्रीजमध्ये बीअर, फ्रुट ज्यूस वगैरे भरून ठेवतात. नॅशनल पार्कमध्ये प्राण्यांना मारावयास परवानगी नसते. त्यामुळे माकडांचे चांगलेच फावते. माणसांची जागमाग नसल्यास मस्तपैकी फ्रीजमधून बीअर, ज्यूस टिनस्, बिस्किटं, सॉसेजेसची पाकिटं व्यवस्थित उघडून त्यांची मेजवानी चालू होते. एका ठिकाणाहून हुसकावून लावल्यावर दुसरी कॉटेज असतेच. आमची कॅम्प साइट जवळच असल्याने टेंट सदा झीप लावून बंद ठेवायला सांगितले होते.
जवळच इलेक्ट्रिक पॉइंट, ब्राय म्हणजे बार्बेक्यूसाठी जागा, काही ठिकाणी थंड पाण्याबरोबर गरम पाण्याचाही नळ असल्याने जेवणासाठी सोयीस्कर होते. पाहिजेच तर जवळच पाच-सहा हॉटप्लेट असलेल्या कम्युनिटी किचनचा वापर करायची सुविधा होती. त्या पार्कमध्ये राहणाऱ्यांसाठी सुपर मार्केट, इंटरनेट, लायब्ररी वगैरे सोयी असल्याने पार्कमध्ये राहणे आरामशीर होते. आमचे टेंटस् बांधून होतात न् होतात तोच इलेक्ट्रिकल फेन्समध्ये खसखस ऐकू आली. पाहिले तर दोन-अडीच फूट उंचीचे सशक्त हाईनाज्, म्हणजे तरस धावत गेले. आमच्यापैकी काहीजण फोटो काढायला धावले. पण ते काय थांबतात? उडय़ा मारत निघून गेले. दिवसभराच्या प्रवासाने दमलेले आम्ही हाईनांचे विचित्र हसणे, सिंहाची डरकाळी अशा निशाचरांचे आवाज ऐकतच झोपलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता वनराजांच्या भेटीला निघालो. आता तिथल्या प्राण्यांना माणसं, गाडय़ांची इतकी सवय झाली आहे की, आपली उपस्थिती त्यांच्या खिजगणतीत नसते. पार्कमधून फिरताना अर्थात वाहनातूनच, झेब्रा, जिराफ, इंपाला, कुदु वगैरे प्राण्यांचा मुक्त संचार चालू असतो. इथे आम्हाला त्रास द्यायला कशाला ही मंडळी आली आहेत म्हणून पाहत उभे राहतात. कधी बिबटे, चिता, हत्ती वगैरे मंडळी रस्त्यावर ठाण मांडून बसतात पण आपण हॉर्न वाजवून त्यांना बिथरवायचे नाही असा जंगलाचा कायदाच आहे. त्यामुळे मंडळी जागची हलेपर्यंत त्यांच्या क्रीडा पाहत बसावे लागते.
वेगवेगळ्या पक्ष्यांची किलबिल ऐकत, निष्पर्ण झाडावर पंख पसरून बसलेली गिधाडं आणि गंमत म्हणजे क्रूर श्वापदांच्या तावडीत न सापडण्यासाठी उंच झाडांच्या शेंडय़ावर झोपलेली माकडं पाहत आमची प्रभातफेरी सुरू झाली. रात्रभर तसंच शेंडय़ावर एखाद्या फांदीच्या आधारे झोपलेली माकडं पडत कशी नाहीत याबाबत आश्चर्यच वाटलं. परिसराचं निरीक्षण करताना गाइडला वॉकीटॉकीवरून कळलं की, ठरावीक जागेवर सिंह आपल्या कबिल्यासह बसला आहे. झालं, ड्रायव्हरने जीप हाणली.
थोडं पुढे जातो न जातो तोच वनराज उघडय़ा माळरानावर मॉर्निग वॉकला निघाल्याप्रमाणे ऐटीत चालला होता. कोवळ्या सूर्यकिरणांची प्रभा त्याच्या आयाळ व शरीरावर पडल्याने तो आणखीनच राजबिंडा दिसत होता. पंचवीस-तीस पावलांवरच रात्री अर्धा फडशा पाडलेला इंपाला होता. दोन सिंहिणी भरल्या पोटाने सुस्तावलेल्या दिसत होत्या. शेजारीच चार-पाच छावे आपल्या बाललीलांमध्ये मग्न होते. नाही म्हटलं तरी जीपची घरघर, कॅमेराची क्लिक आमची थोडीफार खसखस त्या नीरव शांततेत स्पष्ट ऐकू येत होती. त्यामुळे मध्येच काय हा वैताग? म्हणून जांभई देत मान वळवून नजर टाकत होत्या. मध्येच धूर्त कोल्होबा शिकारीतला काही भाग लंपास करायला डावपेच लढवत होते.
जरा पुढे काटेरी झाडांकडे २५-३० जिराफांची झुंड मान उंचावत झाडं ओरबाडून काढत होती. आमची चाहूल लागल्यावर मान वेळावून पाहत व परत खाण्यात मग्न. ते दृश्य म्हणजे एखादी स्त्री दोरीवर कपडे वाळत घालताना बाजूची चाहूल घ्यायला कशी पाहते तसे. मध्येच जिराफ, वॉटर बग्ज, रानडुक्कर हजेरी लावत होते.
क्रोकोडाईल रिव्हरमधे ब्रिजच्या एका बाजूला सकाळच्या कोवळ्या उन्हात मगरींचे सन बेदिंग चालू होते. मधेच कुणी दुसरीचा पाय ओढ, ढकलून दे असे प्रकार दिसत होते. एकमेकींना ढकलत किनाऱ्यावर चांगली जागा मिळवण्यासाठी त्यांच्यात चढाओढ लागली होती. तर दुसऱ्या बाजूला हिप्पो पाण्यात डुंबत होते. मध्येच आपल्या बछडय़ाला घेऊन किनाऱ्यावर सोडून पाण्यात परतत होते.
हे सर्व पाहताना गंमत झाली. फिश ईगलने एक मासा चोचीत पकडला होता. त्या माशाला मारण्यासाठी त्याला आडवातिडवा करत होता. इतक्यात एका मगरीने इतक्या शिताफीने त्याच्या चोचीतून ओढून घेतला की त्या बिचाऱ्या ईगलला काही कळले असेल की नाही कोण जाणे. ते अगदी क्षणार्धात झाल्याने फोटोही टिपता आला नाही.
क्रुगर पार्कमध्ये काही ठिकाणी पिकनिक स्पॉटसारखी जागा, बरोबरच कॅफेटेरीआ, शिवाय परिसर न्याहळण्यासाठी उंच मचाण. काही स्पॉटस्वर सिमेंटचं टेबल, बाजूला बाकं व लागूनच बार्बेक्यू करण्यासाठी गॅसची सोय. तिथे येणारे बहुतेक जण सॉसेजेस, कणसं वगैरेसारख्या गोष्टी बार्बेक्यूसाठी आणून मजा करत होते. शिवाय कॅफेटेरियामधील खाणे होतेच. लोकांनी खाऊन सोडलेल्या प्लेटमधील उरल्यासुरल्यावर यलो हॉर्नबिल, निळसर झाक असलेला तुकतुकीत मार्टीन, फ्लाय कॅचर अशा पक्ष्यांची झुंबड उडाली होती. आम्ही तिथेच लंच व थोडा आराम करून पुढे निघालो.
झुडपात काही तरी खसखस ऐकू आली म्हणून पाहिले तर मानेकडे लटकत असलेले लाल मांस पाहून वाटले की फ्रिगेट बर्ड असणार, पण ते होते ग्राऊंड हॉर्नबिल्स. मध्येच कुठे तारेवर बसलेले लायलॅक क्रोस्टेड रोलर, शेपटीचे टोक डब्ल्यू असणारे ड्रोंगो नजरेस पडत होते. थोडे पुढे गेल्यावर एके ठिकाणी व्हाइट ऱ्हायनो पाहत असतानाच बाजूच्या झाडांमधून पाच-सहा आफ्रिकन बफेलो म्हणजे आपले गवे समोर दत्त म्हणून हजर. आमची जीप व आम्ही सर्व स्तब्ध. सर्वच गवे आमच्याकडे नजर न हलवता एकटक पाहत पाहत एकएक पाऊल पुढे टाकत होते. आमच्या इलाक्यातून सटका, नाही तर पाहा, असा आविर्भाव त्यांच्या नजरेत असावा त्यांच्या ताकदीपुढे आपण किस झाड की पत्ती. आम्ही तिथून काढता पाय घेतला.
थोडे पुढे जातो तर दणकट, मस्त लांब शेपटी, काळ्या तोंडाच्या लंगूर माकडांचे पाच-सहा जणांचे टोळके कुठून तरी दोन हात करून आल्यासारखे दिसत होते. सर्वात पुढे म्होरक्या अगदी झोकात तर मागे थोडा मार खाल्लेली जनता. ते दृश्य पाहायला मजा आली. असो.
असा दिवसभराचा कार्यक्रम आटोपून आम्ही कॅम्पवर परतलो. रोज तेच ते जेवण जेवून सर्वच कंटाळले होते. त्यामुळे चेंज हवाच होता. भारतीय पद्धतीचे जेवण नाही तरी परदेशी फार पसंत असल्याने गाइड अनिताने ती कामगिरी माझ्यावर सोपवली. आपल्या जेवणाला लागणारे जिन्नस तिथे नव्हते फक्त आलं, लसूण, तिखटमीठ व मिरी वापरून केलेली खमंग चिकन बिर्यानी सर्वानी फस्त केली. बिर्याणीच्या खुमासदार वासाने सिक्युरिटी गार्डही तिथेच ठाण मांडून बसला. खेळीमेळीत रात्रीची जेवणे आटोपल्यावर उद्या सर्व जण आपापल्या देशी जाणार म्हणून थोडी खुशी, थोडा गम असे वातावरण होते. पण हे चालणारच. एकच गोष्ट सतत राहिली तर मजा नाहीच नाही का? यही है जिंदगी, असे म्हणत आम्ही झोपून गेलो.
response.lokprabha@expressindia.com