८ मार्च २०१३
मथितार्थ
चित्रकथी

कव्हरस्टोरी
जालना आणि फिनलॅँड शिक्षणाचा आनंदमार्ग!
अभियानाने शिक्षकांना दिले चैतन्य..
आवडते मज माझी शाळा
मुलांची चौकसबुद्धी वाढली! - बी. राधाकृष्णन (आय.ए.एस.)
आनंदाने शिकता शिकता..

नियोजन

यूथ

सेकंड इनिंग
संमेलन
चिंतन
आरोग्यम्
वादविवाद
क्रीडा

स्टार रेसिपी

विज्ञान-तंत्रज्ञान
एकपानी
कविता
भंकसगिरी
शब्दरंग
सिनेमा
माझं शेतघर
लग्नाची वेगळी गोष्ट
आधी केले..
पर्यटन
क्राईम
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

मथितार्थ

ज्ञानाला ज्ञानेंद्रियांनीच भिडावे !
आपल्या व्यवसायामध्ये येऊ घातलेल्या तरुणांचा दर्जा अतिशय खालावलेला आहे आणि त्यांना व्यवसायातील प्राथमिक बाबीही नेमक्या माहीत नाहीत, व्यवसायासाठी आवश्यक त्या कौशल्यांची प्रचंड वानवा आहे, असे लक्षात आल्यानंतर निराश झालेल्या एका उत्तम व्यावसायिकाने अखेरीस या समस्येच्या मुळाशी जाण्याचा निर्णय घेतला. या व्यावसायिकाने करियर म्हणून त्या क्षेत्राचा स्वीकार केला त्या वेळेस विद्यापीठांमध्ये त्या विषयाचा समावेश नव्हता. नाही म्हणायला काही खासगी संस्थांनी भविष्याची पावले ओळखून त्या विषयाच्या खासगी व्यावसायिक अभ्यासक्रमांना सुरुवात केली होती, इतकेच. अर्थात ते खासगी अभ्यासक्रम त्या वेळेस केवळ पैसे असणाऱ्यांनाच परवडणारे होते. त्यामुळे भविष्यात या क्षेत्रातील संधी केवळ पैसे असणाऱ्यांनाच मिळणार, या विचारांनी हा व्यावसायिक अस्वस्थ झाला होता. त्यानंतर सुमारे २० वर्षांनी विद्यापीठ स्तरावर त्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचा समावेश पदवीसाठी म्हणून करण्यात आला, त्या वेळेस या व्यावसायिकास आनंद झाला. आता सर्वाना या व्यवसायात येण्यासाठी समान संधी मिळणार, यामुळे त्याच्या आनंदाला भरते आले होते. पण हळूहळू विद्यापीठाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी त्याच्याकडे इंटर्नशिपसाठी येऊ लागले, तसतशी त्याची अस्वस्थता वाढत गेली आणि अखेरीस एके दिवशी केवळ त्याचा कडेलोट होण्यासारखीच स्थिती निर्माण झाली.
त्याने मग वेळ काढून समस्येचा शोध घेतला तेव्हा लक्षात आले की, विद्यापीठाच्या स्तरावर शिकवला जाणारा अभ्यासक्रमच मुळात आवश्यक तेवढा व्यावसायिक (प्रोफेशनल) नाही. त्यात केवळ पुस्तकी ज्ञानच अधिक आहे. खरे तर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रयोगाधारित ज्ञान अधिक असायला हवे. मग त्याने थेट कुलगुरूंना गाठले. उत्तम व्यावसायिक व्यक्तींनी अभ्यास मंडळावर यावे, असे कुलगुरूंनी सुचवले. अभ्यासक्रम बदलामध्येही राजकारण आल्याने तो कंटाळला. प्रत्येक पायरीवर विद्यापीठीय राजकारणाचा अनुभव त्याने घेतला. एक एक करत एके दिवशी प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम त्याच्याकडे आले. त्या वेळेस विद्यापीठातील विभाग प्रमुखाने सांगितले की, प्रश्नपत्रिका सोपी काढा. तो चक्रावला. विभाग प्रमुखाने सांगितले की, प्रश्नपत्रिका सोपी नसेल तर विद्यार्थी नापास होण्याची शक्यता अधिक असते. अशाने या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थी वळणार नाहीत. परिणामी विद्यार्थीसंख्या कमी झाल्याने शिक्षकांना कमी करावे लागेल. त्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येईल, ते बेकार होतील आणि मग एक दिवस हा अभ्यासक्रमच बंद करण्याची वेळ विद्यापीठावर येईल. त्यामुळे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतील, असे पाहा.. तो व्यावसायिक समस्येच्या मुळापर्यंत पोहोचला होता! आता त्याला अनेक प्रश्न पडले होते.. आपण विद्यार्थ्यांना शिकवतो ते शिक्षकांना जगवण्यासाठी. त्यांना नोकरी मिळावी म्हणून, की विद्यार्थ्यांनी आयुष्यात कौशल्य संपादन करून उत्तम व्यावसायिक व्हावे म्हणून?
हा किस्सा विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे आपल्याकडील अनेक समस्यांचे मूळ हे आपल्या शिक्षणव्यवस्थेमध्येच दडलेले आहे. आपण केवळ पुस्तकी ज्ञान मुलांना देत आहोत. त्यामुळे त्यांनाही प्रश्न पडतात, हे सारे शिकायचे कशासाठी? बीजगणित शिकत असताना किंवा अपूर्णाक शिकत असताना याचा आपल्याला आयुष्यात काय फायदा, असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडलेला असतो. आपण त्यांच्या मनातल्या त्या प्रश्नाचे उत्तर देत नाही. अपूर्णाक किंवा विभाजन अथवा लसावि, मसावि शिकल्याने आयुष्यात फायदाच होतो आणि आयुष्याचे गणित सोपे होते, हे विद्यार्थ्यांना केव्हा सांगणार. त्याचे उपयोजन आपण सांगतच नाही. मग हाच विद्यार्थी पालक होतो, त्या वेळेस मुलांचा अभ्यास घेताना त्याला तोच प्रश्न पुन्हा पडतो. पण हे शिकण्याशिवाय गत्यंतर नाही, असे मुलाला समजावत तो त्याला अभ्यास करायला लावतो, ही शिक्षणव्यवस्थेची नामुष्की आहे.
आपल्याकडचे संशोधन कमी झाले आहे. नवीन व्यावसायिक क्षेत्रे ज्यामध्ये अधिक प्रमाणावर संशोधन व्हायला हवे, ते होत नाही, अशी खंत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मध्यंतरी सायन्स काँग्रेसमध्ये व्यक्त केली. व्यावसायिक अभ्यासक्रम विद्यापीठात ज्या पद्धतीने राबविले जातात, त्यातून अशी अपेक्षा आपण कशी काय करू शकतो. तिथे केवळ आणि केवळ गुणांचा गुणाकार करण्याचेच काम होते. कारण शिक्षक, अध्यापक यांच्या नोकऱ्या वाचविणे हाच त्याचा प्राथमिक उद्देश राहिला आहे.
खरे तर शिक्षणाची खरी गोडी मुलांना लागायला हवी ती बालवाडीपासून. चांगल्या बालवाडय़ांमध्ये ते होतेदेखील. पण नंतरच्या टप्प्यावर असे शिक्षण देणाऱ्या चांगल्या शाळांची कमतरताच अधिक जाणवते. खरे शिक्षण हे पंचेंद्रियांमार्फत होते, असे म्हटले जाते. कान, नाक, डोळा, जीभ आणि त्वचा ही ज्ञानेंद्रिये आहेत, असे आपण म्हणतो. तसेच शाळेत शिकतोदेखील. पण नंतर त्याचाच आपल्याला विसर पडतो. बालवाडीत असताना डोळे बंद करून वेगवेगळे आवाज ओळखण्याचा खेळ खेळला जातो. तो खेळ नाही तर शिक्षण असते. पण आपले सारे मर्यादित राहते ते खेळापुरते. नंतर कधीतरी मोठे झाल्यावर जंगलात जातो, त्या वेळेस पक्षीतज्ज्ञ सोबत असतात.. ते सांगतात डोळे बंद करा आणि आजूबाजूचे येणारे पक्ष्यांचे आवाज ऐका आणि किती पक्षी या परिसरात आहेत, ते सांगा. आवाजावर लक्ष केंद्रित करा. तेव्हा मन थेट बालवाडीत गेलेले असते. मग आवाजावरून पक्षी ओळखण्यास सुरुवात होते आणि मग त्याचा प्रवास पक्षीतज्ज्ञ होण्याच्या दिशेने सुरू होतो.. पण मधली वर्षे वाया गेलेली असतात.
करियरसाठीचा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करून तो चांगल्या नोकरीच्या शोधात असतो. मग त्याच्याकडची कौशल्ये जाणून घेण्यासाठी कंपनी उत्सुक असते. कौशल्याच्या चाचणीत एक मोठे चित्र दिले जाते. ते व्यवस्थित पाहून ठेवा, त्यावरच प्रश्न विचारले जाणार, असे सांगितले जाते. तो चित्र पाहू लागतो तेव्हा त्याला बालवाडीत केलेले चित्रवाचन आठवते.. पण त्यानंतर पुन्हा कधीच चित्रवाचन केलेले नसते. नंतर आयुष्यात कधीतरी त्याला विदेशवारीची संधी मिळते तेव्हा विदेशात सारे काही दिसायला सुंदर आहे, याची कल्पना येते आणि तिथल्या डिझायनर्स आणि आरेखक यांच्याशी बोलल्यानंतर शाळेतील चित्रकलेच्या तासाचे महत्त्व कळलेले असते.. पण दृश्यशिक्षणाची जाण येण्यासाठी विदेशात का जावे लागते? आपल्याला दृश्यशिक्षणाचे महत्त्व का नाही कळत? डोळे हे पंचेंद्रियांतील सर्वात महत्त्वाचे इंद्रिय. त्याच्याशिवाय जीवन जगणे महाकठीण. मग त्याच्यामार्फत होणाऱ्या शिक्षणाची डोळस ‘नजर’ आपल्याला का नाही? डोळे असणे आणि नजर असणे यातला फरक आपल्याला केव्हा कळणार. डोळे असणाऱ्या प्रत्येकाला नजर असतेच, असे नाही. अलीकडेच शिक्षणाचा आनंदमार्ग शोधणाऱ्या जालना जिल्ह्य़ाने याचा दृश्यानुभव घेतला. संपूर्ण जिल्ह्य़ातील शाळा एकाच रंगाने रंगवल्या. केवळ शाळाच नव्हे तर गावातील अनेक भिंतींना रंग देऊन शिक्षण आनंददायी केले. मुलांच्या पावलांच्या ठशांमध्येच गणिताच्या संख्या आल्या आणि गणित सोपे झाल्याचा अनुभव विद्यार्थी- शिक्षकांनी घेतला. सहभागातून शिक्षणाला सुरुवात झाली. हे खरे कार्यात्मक शिक्षण आहे. पण हा आनंदमार्ग कळण्यासाठी एवढय़ा वर्षांचा काळ का जावा लागला?
आपल्याकडे सर्वाधिक महत्त्वाचा बदल होईल तो क्रमिक पुस्तकांची रचना बदलल्यानंतर. पुस्तक हे शिक्षणाचे आपल्याकडील सर्वात महत्त्वाचे माध्यम आहे. पुस्तकांमध्ये अशी चित्रे आणि आकृत्या असायला हव्यात की, त्यामुळे मुलांना पुस्तके दीर्घकाळ हातात धरावीशी वाटतील. सध्या कधी एकदा पुस्तक हातचे खाली ठेवतो, असे विद्यार्थ्यांना वाटत असते. हे दुर्दैवी आहे.
राज्यकर्त्यांनाही चिंता आहे ती केवळ बीएड- डीएडच्या उघडलेल्या कारखान्यांची. तिथे घाऊक शिक्षक तयार होतात. त्यांच्याकडे शिक्षणाचे कौशल्य आहे की, नाही याची खात्री नसते. पण कागदावर पदवी असते. त्यांनाही खात्रीशीर नोकरी हवी असते. शिक्षण हे व्रत म्हणून स्वीकारण्याचे दिवस इतिहासजमा झाले. पण आपण प्रोफेशनल शिक्षक आहोत का किंवा तेवढी व्यावसायिक कौशल्ये आपल्या शिक्षकांकडे आहेत का या प्रश्नाचा शोध घेतल्यास उत्तर नकारार्थीच असेल. मग हे कारखाने सुरू ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचे पीक येते आणि त्या दुष्टचक्रामध्ये आपण अडकत जातो.
अलीकडे शिक्षकांना बरीच कामे करावी लागतात त्यात जनगणनेपासून ते इतर अनेक कामांचा समावेश असतो, असे एक कारण पुढे केले जाते. पण हे काम वजा केले तर शिक्षकांचे वाचन वाढणार आहे का किंवा कौशल्ये वाढणार आहेत का, या प्रश्नाचे खात्रीशीर उत्तर आज कोणालाही देता येणार नाही. कारण मुळात ‘सोयीची नोकरी’ म्हणून एकदा त्याच्याकडे पाहिले की, सारे मुसळ केरातच जाते. अलीकडच्या विद्यार्थ्यांना पूर्वीच्या पिढीपेक्षा अधिक बाबी लहानपणी अवगत असतात कारण त्यांच्यावर टीव्ही किंवा इतर माध्यमांकडून सातत्याने माहितीचा भडिमार होत असतो. पण या माहितीच्या पावसात शिक्षक मात्र कोरडेच राहतात, असा अनुभव आहे. मग विद्यार्थ्यांना आपले शिक्षक अपडेटेड नाहीत, असे वाटते आणि त्यांच्या मनातील आदर कमी होत जातो..
पंचेंद्रियांनी व्हावयाचे शिक्षण थांबले की हे असे होते. आपण गेली काही वर्षे महासत्ता होण्याच्या गप्पा मारतो आहोत. पण केवळ पैसे कमावून आणि अर्थव्यवस्था बळकट करून महासत्ता होता येत नाही. त्याला चांगल्या व व्यापक शिक्षणाचा पाया असावा लागतो. केवळ पैसे मिळवून येणारे महासत्तापण फार काळ टिकणारे नसेल. महासत्तेचे नागरिक हे ज्ञानी असावे लागतील. ज्ञानाच्या बळावर ते महासत्तापद हस्तगत करता आले पाहिजे तरच ते दीर्घकाळ टिकणारे असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी ज्ञानाला ज्ञानेंद्रियांनीच भिडलो तर महासत्तेची पहाट लवकर उगवेल!

vinayak.parab@expressindia.com