८ मार्च २०१३
मथितार्थ
चित्रकथी

कव्हरस्टोरी
जालना आणि फिनलॅँड शिक्षणाचा आनंदमार्ग!
अभियानाने शिक्षकांना दिले चैतन्य..
आवडते मज माझी शाळा
मुलांची चौकसबुद्धी वाढली! - बी. राधाकृष्णन (आय.ए.एस.)
आनंदाने शिकता शिकता..

नियोजन

यूथ

सेकंड इनिंग
संमेलन
चिंतन
आरोग्यम्
वादविवाद
क्रीडा

स्टार रेसिपी

विज्ञान-तंत्रज्ञान
एकपानी
कविता
भंकसगिरी
शब्दरंग
सिनेमा
माझं शेतघर
लग्नाची वेगळी गोष्ट
आधी केले..
पर्यटन
क्राईम
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

लग्नाची वेगळी गोष्ट

आधी केले..
अविनाश जमदग्नी

‘लग्नाची वेगळी गोष्ट’ या उपक्रमांतर्गत कथा-
चिरेबंदी वाडय़ाच्या तळमजल्यावर चांगलीच धामधूम चालू होती. मावळतीच्या रविराजाची सोनेरी तांबूस किरणे सोप्याचा उंबरठा माजघरातून स्वयंपाकघरात जाऊन स्थिरावली होती. फडताळातील तांब्या-पितळेच्या भांडय़ांना चांगलीच लकाकी आली होती. तिथे मोठय़ा चुली मांडल्या होत्या. अग्निनारायणाच्या कृपेने त्यावरील भांडय़ांत विविध पक्वान्ने, भाज्या, भात शिजत होता आणि छानसा वास सगळीकडे पसरला होता. सोप्याच्या मुख्य दरवाजावर चार-पाच नारळ बाजूस दोन्हीकडे मोर असे सुंदर तोरण बांधले होते. दरवाजाच्या दोन्ही बाजूस केळीचे घड असलेले हिरवेगार सोट उभे केले होते. सोप्याच्या एका कोपऱ्यात सनईवाला त्याच्या चौदा-पंधरा वयाच्या मुलाकडे ताशा देऊन सनईवादन करीत होता. ताशाचीही चपखलपणे त्याला साथ चालू होती. सोप्यातील आतल्या अंगावर छताला लागून पताका आणि झेंडूच्या फुलांच्या माळा सुबकपणे बांधल्या होत्या. जमिनीवर मोठी जाजमे अंथरली होती. एक बाजू आणि त्यासमोरील दुसरी बाजू पुरुषांसाठी ठेवली होती. भटजी मंडळी डोक्यावरील टोपी आणि अंगावरील उपरणे सावरीत पाटावर काही मांडत होते. गॅसबत्तीवाले गॅसबत्त्या चालू करण्याच्या खटपटीत बसले होते. साधारणपणे ५० वर्षांपूर्वीचा काळ असावा हा. या वेळी विजेचा वापर मुक्तपणे सुरू झाला नव्हता. आम्ही चार-पाच मुले नवे कपडे घालून हा सारा सरंजाम पाहत होतो. वाडय़ाच्या मालकांचा मी मुलगा आणि इतर चौघे भाडेकरूंच्या नात्यातले होते. वाडय़ाचा खालचा भाग पेंडसे यांच्याकडे भाडेकरू या नात्याने वापरात होता. त्याच्या बायकोच्या धाकटय़ा भावाचे लग्न होते आणि गोरजमुहूर्त धरला होता. सोनेरी किरणे हळूहळू लोप पावून अंधाराच्या पाऊलखुणा मार्ग क्रमू लागल्या होत्या. गॅसबत्त्या चांगल्याच तेजाळल्या होत्या. त्यांनी स्वयंपाकघरात आणि माजघरात प्रवेश केला होता. सगळी दालने या प्रकाशात लख्ख उजळून गेली होती. माझ्याबरोबरच्या चौघांत पेंडशांचे बाबू आणि बल्या बाकीचे दोघे पेणहून आलेले त्यांचे मावसभाऊ होते. आम्ही समवयस्क म्हणजे आठ-दहा वयाचे असल्याने चांगले जमले होते. लग्न म्हणजे चिवडा, करंज्या, चकली, लाडू या खाद्यपदार्थाची चंगळ, नवीन कपडे घालून मिरवण्याची हौस आणि धुडगूस एवढीच त्या बालमनांची करमणूक. आतल्या दालनात बायकांची लगबग आणि सोप्यालगतच्या मोठय़ा खोलीत पुरुषवर्गाची धावपळ चालू होती. आम्हा मुलांची यामुळे करमणूक होत होती आणि औत्सुक्य होते नवरा-नवरींना बघण्याचे.
वधूकडील मंडळी आली हो. चला सगळे तयार राहा. पोरांनो, तुम्ही आहे तिथेच थांबा. अजिबात गडबड नको. गोंधळ घालायचा तो लग्नानंतर. डोक्यावरील टोपी आणि गळाबंद कोट सावरीत सावजीकाका म्हणाले. ते पेंडसे काकूंचे थोरले भाऊ होते. त्यांनी जरीकाठी काचा मारून धोतर नेसले होते. कपाळावर लाल कुंकवाचा मोठा नाम ओढला होता. उजव्या मनगटात सोन्याचा दागिना चमचमत होता. ते त्याच्याकडे अधूनमधून मजेत पाहत होते. तोच अंगभर आणि डोक्यावरही लाल लुगडं नेसलेल्या आजीबाई काठी टेकत टेकत सोप्यावर आल्या. त्या अंगाने खूपच बारीक होत्या. डोळ्यावरील चष्म्याची कानावरील पीळदार काडी पुन्हा पुन्हा हात लावून तपासत होत्या. सावजीकाकांनी त्यांना पाहून खाली वाकून नमस्कार केला. ‘गंगामावशी येथे बसून घ्या. तुम्हाला लग्न सोहळा येथून छान पाहता येईल. घरात वडील तुम्हीच आहात.’ काकांच्या बोलण्यावर त्या मंद हसल्या.
‘यमुना, कावेरी, कालिंदी. कोणी आहात काय? लवकर या. या वधूवरून भाकरतुकडा ओवाळून टाका. नवरीमुलगी आली हो,’ दारात पोहोचलेल्या वऱ्हाडी मंडळींकडे पाहत गंगामावशीने आत आवाज दिला. तोच कोणी तरी धावत येऊन भाकरतुकडा ओवाळून टाकला आणि कुरवंडी केली. नवरी आंब्याच्या रंगाचा नऊवारी शालू नेसरी होती. केसांचा भला मोठा अंबाडा होता. त्यावर मोगऱ्याच्या फुलांचे सर माळले होते. कपाळावर केसातून बिंदी चमकत होती. नाकातील नथ, गळ्यातील दागिने आणि हातातील पाटल्या-बिलवरही चमचमत होते. ती गोरी होती. ‘कृष्णामामा किती काळा आणि ही त्याची नवरी किती छान,’ बल्या टाळ्या पिटत म्हणाला. तसे आम्हीपण सगळ्यांनी टाळ्या पिटल्या. नवरीचे आमच्याकडे लक्ष गेले. तसे आम्ही चिडीचूप झालो. ती आमच्याकडे बघून हसली. तसे आम्ही पुन्हा टाळ्या पिटत नाचू लागलो. तोच वऱ्हाडी मंडळींकडील लाडू- चिवडा, चकलीची ताटे सोप्यावर जमा झालेल्या पुरुष मंडळीत फिरू लागली. त्याचप्रमाणे वर पक्षाकडील मंडळींनीही त्यांच्या दालनात अशीच खाद्यपदार्थाची ताटे पाठवून दिली. तुळशीच्या लग्नानंतरचा हा दुसरा दिवस कृष्णामामाच्या लग्नासाठी निवडला होता. आता अंधारही चांगलाच पसरला होता. लग्नाचा मुहूर्त जवळ येऊ लागला तसे विष्णू भट म्हणाले, ‘‘उपस्थित निमंत्रित वधू-वरांकडील सर्व मंडळी, वधू-वरांना पती-पत्नीच्या नात्यात गुंतवायला तुमच्याबरोबर आम्हीही उत्सुक आहोत. तेव्हा सारा जामानिमा आटपून लग्नवेदीवर प्रस्थान करा, कारण आपण जाणताच आहा. हा गोरज मुहूर्त आहे.’’
हा इतका प्रभावी परिणाम होता की दोन्हीकडील स्त्रीवर्ग जादूची कांडी फिरवावी तसा झटकन आटपून तयार झाला. पुरुषमंडळीही काही कमी नव्हती. अंगावर अत्तरांची पुटं चढवीत कानात अत्तराचे फाये घालून डेरेदाखल झाले. कृष्णामामा पांढराशुभ्र शर्ट आणि त्यावर पांढरी पॅन्ट, त्यावर चमकदार काळा लेदर पट्टा आणि लाल टाय, डोक्यावर जरीची टोपी, त्याला बांधलेल्या बेगडाच्या आणि मोत्याच्या मुंडवळ्या घालून तयार होता. तोच नवऱ्यामुलीचे मामा तिला घेऊन हजर झाले. कृष्णामामा तिच्यापुढे चांगलाच काळा होता. तथापि त्याचे उठावदार डोळे केसांचा कुर्रेबाज फुगा आणि नाकाखालच्या झुपकेदार मिशांमुळे देखणा वाटत होता. अंतरपाट धरला होता आणि मामा टाचा वर करून त्याच्या आडून मामीला निरखित होता. कानाचा हलकासा चिमटा घेत नारुभट्ट म्हणाले, ‘‘तुमच्या निवडीला तुमच्या नजरेबरोबर विम्याच्या पॉलिसीत जाम करा, पण एकदा अक्षदा डोक्यावर पडल्यावर.’’
‘‘ते आहेच हो. पण असा तिरपा कटाक्ष टाकण्यात काय मजा असती ते आता तुम्हाला सांगून काय उपयोग? गेले, ते दिन गेले,’’ त्यांच्या कानात मिश्कीलपणे कुजबुजत कृष्णामामा म्हणाला. लग्नाच्या वेळी आमचा बालचमू नवरा-नवरीजवळ असल्याने ते आमच्या कानी आले. मामीही काही तरी गमतीदार घडले म्हणून अचंब्याने पाहू लागली. तोच .. यांनी लग्नाचे मंत्र सुरू केले. मध्येच काव्याक्षता उधळल्या गेल्या आणि ‘शुभमंगल सावधान’ म्हणून नवरा-नवरींनी एकमेकास फुलांचे हार घातले. मग दोघांना दोन खुच्र्यावर बसविण्यात आले. मामी छान दिसत होती. मामा-मामीचे चेहरे स्पष्ट दिसावेत म्हणून कुणी तरी गॅसबत्ती ठेवली होती पण.. त्या गॅसबत्तीची धग एवढी होती की, कृष्णामामा आणि मामीचे चेहरे घामाने डबडबले होते. कुणाचे याकडे फारसे लक्ष नव्हते. दोघांच्या जवळ बल्या उभा होता. मामा त्याच्या कानात काय पुटपुटला कुणास ठाऊक गॅसबत्ती विझली होती. तेवढय़ात मामा-मामीजवळ सरकला तो तिच्या कानात काहीसे सांगत असावा. गॅसबत्ती आणण्यासाठी पुकारा झाला. पाच-सात मिनिटे तशीच गेली असावीत. कोणी तरी नवदाम्पत्याच्या दिशेने बॅटरीचा प्रखर झोत टाकला. मामाचे हात मामीच्या खांद्यावर होते. तो तिच्याजवळ इतका सरकला गेला होता की तिच्या गालाशी त्याचे ओठ भिडले गेले होते. नेमक्या त्याच वेळी पेंडसेकाकू हजर झाल्या होत्या. त्यांच्याकडे पाहत त्या म्हणाल्या, ‘‘शिव शिव, इतकी गडबड होती तर रजिस्टर मॅरेज केले असते. तू घोडनवरा आणि ती घोडनवरी. जरा तरी ताळतंत्र बाळगायचा.’’
कृष्णामामाने बोलण्यासाठी तोंड उघडले त्यापूर्वीच त्या झटकन निघून गेल्या होत्या. तेवढय़ात कुठल्या तरी फोटोग्राफरने धिटाईने फोटाही काढला होता. वस्तुस्थिती अशी होती, बल्याला गॅसबत्तीच्या वातीवर नाणे टाकून विझवायला मामाने सांगितले होते, कारण त्या धगीने ते दोगेही पुरते घामाघूम झाले होते. ती गॅसबत्ती दूर करायला सांगूनही कोणीही तिकडे फिरकले नव्हते. मामीला त्याबद्दल सांगत असताना तो पुढे झुकला गेला. तेवढय़ात मामीच्या कानातील झुमका त्यांच्या हारात घुसला गेला. अंधारामुळे काही दिसत नव्हते. कृष्णामामातील रोमॅन्टिकपणाच उातारवयाप्रमाणे उसळला असावा अशी पेंडसेकाकूंनी समजूत करून घेतली होती. तथापि काकू गेल्यावर ते दोघे मस्त हसत का होते हे मोठेपणी मला उमगले. तोपर्यंत काकूंच्या बरोबर आलेल्या इतर दोघींकडून ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. थोडय़ाच वेळात गॅसबत्ती आली. कृष्णामाने सर्व हकिकत सांगताच मुकाट बसलेल्या पेंडसेकाकू सर्वाच्या बरोबर हल्ल्यात सामील झाल्या. कृष्णामाने फोटोग्राफरला बोलाविले. तो डोळे मिटून गपकन त्याच्यासमोर उभा राहिला होता. मामा त्याची पाठ थोपटत होता आणि त्याच्या धिटाईचे कौतुक करत होता. त्यांच्या हातात त्याने दहाच्या दोन नव्या कोऱ्या नोटा ठेवल्या तेव्हा फोटोग्राफर त्याच्या पायाशी झुकला होता. इतकेच नव्हे तर त्यानंतरचे सर्व फोटो निर्धास्तपणे आणि दिलखुलासपणे काढले होते. केळीच्या पानांवर जेवणाचा नामी थाट सजला होता. पानाभोवतालच्या रांगोळी आणि उदबत्तीच्या सुवासाने बैठय़ा पंगती रंगल्या होत्या. आग्रहाची तृप्ती सर्वाना सुखवून गेली. मग खाशा पंगतीचा म्हणजे नवरा-नवरी आणि त्यांचे जवळचे आप्त अशांचा बेत आखला गेला होता. मधोमध चौरंगावर चांदीची ताटे वाटय़ा-तांब्याभांडे ठेवून भोवताली सुबक रांगोळी घातली होती. पंगतीत कृष्णामामाच्या एका बाजूस मामी आणि दुसऱ्या बाजूस पेंडसेकाकू मानकऱ्यासारख्या बसल्या होत्या. त्यांनीच तर हा लग्नाचा घाट घातला होता. बासुंदी-पुरीबरोबर पेंडसेकाकूंच्या माहेरचा म्हणजे बेळगावचा आचारी आला होता. त्याने मांडे केले होते. त्यामुळे मनात मांडे खाणे याला पूर्ण फाटा मिळाला होता. नाव घेण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करून कृष्णामामाने पुरुषांच्यात नव्हे तर बायकांच्यात बाजी मारली होती. मांडय़ाचा घास हातात घेऊन मामीला भरवीत तो म्हणाला,
‘‘गणगोतांच्या मांदियाळीत चंद्र-सूर्य नकोत साक्षीला ।
किमयाच्या मीलनाला कृष्णा आहे साथीला।।’
मामीचे नाव किमया कळल्यावर आम्ही बच्चे कंपनीने टाळ्या वाजवून मामाला साथ दिली. तसा कृष्णामाही खुलला. मामी लाजून चूर झाली होती. ती चटकन उठली. मोतीचूर लाडू कृष्णामामाच्या तोंडात देत म्हणाली,

‘साऱ्यांच्या थट्टामस्तीने चिंब भिजले प्रीतिधारांनी।
मोतीचुराचा घास भरवूनी किमया भाक देते राहील कृष्णाच्या साथीनी।।’
जेवणावळी आटोपल्या तोच दारात वरातीची गाडी उभी होती. गाडीला समोरून सात लाकडी घोडे लावले होते. गाडीच्या मागच्या भागात केरोसीनवर चालणारे इंजिन होते. गाडीला विजेचे छोटे बल्ब लावले होते. ते उघडझाप करीत होते. आम्ही बच्चे कंपनी ड्रायव्हरलगतच्या सीटवर बसलो होतो. शेवटी तेथे दाटीवाटी होते म्हणून माझे आणि बल्याचे पार्सल मामा-मामीच्या मांडीवर सोपविले होते. वरात चालली होती. पाठीमागे वीस-पंचवीस बायका नटून थटून तसेच दहा-पंधरा तरणे गडी चालत येत होते. आमच्या डोक्यावर फुलांनी सजविलेली छत्री आणि पुढे अबदागिरी येऊन मावळ्याच्या पोशाखातील सेवक चालले होते. मध्ये एका ठिकाणी दोन आईस्क्रीमचे बाऊल दिले. मामा-मामी एकत्र खात असल्याने मी आणि बल्याने एका आईस्क्रीममध्ये भागीदारी केली. महाद्वारा रोडवरील ही वरात लोक दुतर्फा हौसेने पाहत होते. नवरा-नवरीने महालक्ष्मीचे दर्शन घेतले आणि गाडीत बसले. या वेळी मामा-मामीमध्ये आणि दोघांच्या बाजूस मी आणि बल्या बसलो होतो. वरात बराच वेळ चालली असावी. आम्ही दोघे पेंगता पेंगता मामा-मामींच्या मांडीवर केव्हा लवंडलो झालो ते कळलेच नाही. दोघेही आमचे लोढणे नाखुषीने सहन करीत होते. मधूनच मथुराकाकी येऊन गेली आणि म्हणाली. ‘‘पोरं कशी छान झोपी गेली. नाही तरी तुम्हाला आता सवय करून घ्यायलाच हवी. पुढल्या वर्षी बाळकृष्ण रांगायलाच हवा. काय ग सूनबाई खरं ना!’’
पोरांची अंगे एवढी जड झाली होती की खऱ्या अर्थाने वरात निघाली होती किमया काही म्हणण्यापूर्वीच मामा म्हणाला, ‘‘मथुकाकी लग्न झाले की प्रपंच आलाच हो. पण पहिल्या दिवसापासून गळ्यात लोढणे बांधायलाच हवे का?’’ यावर नाक मुरडत मथुकाकी पुढे सटकली, किमया मात्र मनापासून हसत होती.
तोच कुठल्याशा वळणावर गाडीला लावलेले मिचकावणारे बल्ब चक्क झोपले होते. केरोसिनच्या धुराचा वास गाडीभर पसरला होता. तो इतका की किमयामामी आणि कृष्णामामा स्वत:ला ओळखू शकत नव्हते. तिचा चेहरा काळा झाला होता पण मामाचा चेहरा चांगलाच रापला होता. पांढरे कपडे पोतेऱ्यासारखे झाले होते. मामाने अखेर चिडून ड्रायव्हरला विचारले.
‘‘अरे हे चालले आहे काय? वरातीपेक्षा सोंगंसुद्धा बरी. सगळी व्यवस्था करून निघता येत नाही. पैसे दिले होते ना?’’
‘‘साहेब, तेवढय़ा केरोसिनमध्ये वरात पूर्ण निघते. तुमच्या घारुकाकांनी कोल्हापुरातील जवळजवळ सारी ठिकाणे पालथी घातली होती. त्यामुळे वरात खूपच लांबली. आम्ही काय बोलून चालून गडी माणसं सांगाल तसं वागणारी.’’ ड्रायव्हरने एकूण बोलतीच बंद केली होती.
घराजवळ वरात आली. रात्रीचे अडीच वाजले होते. पंधरा मिनिटे मामा सुभान्याच्या नावाचा पुकारा करीत होता. सुभान्याने डोळे किलकिले करीत दरवाजा उघडला. मामा-मामीचा अवतार बघून त्याला झोपेतही हसू फुटले. सगळ्यांचे षड्ज-पंचमादी सूर लागले होते. किमयामामी बायकांच्या खोलीत पळाली. कृष्णामाने आमची बोचकी सुभान्याच्या हवाली केली आणि पुरुष मंडळी झोपली होती तिथे सरकला आणि पुढच्या क्षणी झोपी गेला.
अगदी सुप्रभाती पेंडसे काकू, मथुकाकी, शरयू मामी, कालिंदी वहिनी, धुपकर आजी आणि किमयामामीकडील काही स्त्रीवर्ग कृष्णामामाभोवती फेर धरून उभा होता. त्याच्याकडे पाहत धुपकर आजी म्हणाल्या, ‘‘नवरा-नवरीची हळद काढली जाते. तुमच्या चेहऱ्यावर हे कसले काळे पट्टे? रात्री दंगामस्ती केली नाही! अजून खूप रात्री बाकी आहेत म्हटलं.’’
ड्रायव्हरच्या करामतीचा किस्सा मामाने रंगवून सांगितला तसे सगळे धुपकर आजीसह खो-खो हसत राहिले. पेंडसेकाकू तशातच मामाला उठवून आपल्याबरोबर हाताने घेऊन चौकातील दगडावर बसवून घंगाळ्यातील गरम पाण्यात गुंतल्या. पाण्याचा बंब चांगलाच रसरसलेला होता. मामाचा चेहरा त्यांनी स्वच्छ केला. गरम पाणी त्याच्या अंगावर आणि डोक्यावर ओतीत त्यांनी म्हैसूर सॅन्डलची चक्क जाहिरात केली. मामाच्या अंगाचा केरोसीनचा वास लोपला होता.
‘‘तुझी पुढची भाऊबीज आजच उरकून घेतली बघ,’’ मामाकडे पाहत काकू म्हणाल्या. कृष्णामामा बहिणीच्या या सेवेने अगदी भारावला होता. किमया मामीकडील मंडळी तिला स्नान घालून काळे डाग काढण्यात गुंतली होती. त्यांनी वरातीचा किस्सा ऐकला तेव्हा त्यांच्यातही खसखस पिकली होती. उशिरा झोपल्याने कृष्णामामा-मामीचे डोळे, इतके येथेच्छ स्नान होऊन पेंगुळलेले होते. आज सत्यानारायण पूजेचा घाट घातला होता आणि त्यानंतर संध्याकाळी गोंधळाचा कार्यक्रम अशी त्या दिवसाची आखणी होती.
विष्णूभटजी स्वयंपाकघरात येत सगळीकडे नजर टाकीत पेंडसे काकूंना म्हणाले,
‘‘लग्नाचा बार, वहिनी तुम्ही चांगलाच उडवून दिलात हो.. तुमच्या वरातीचे कौतुक आमच्यापर्यंतही आले हो. साखरझोपेतून नवदाम्पत्य उठले की नाही? उगाचंच त्या सत्यनारायणाला साकडे नको हो.’’
कृष्णामामाला विष्णू भटजींच्या खवचट बोलण्याचा राग आला होता. त्याच्या वयाची जाण ठेवत मामा त्यांना कोपरखळी देत म्हणाला, ‘‘काका आम्ही दोघे रात्रभर चांदण्याची फुले खुडत होतो. तुम्ही लगबगीने घराकडे येताना पाहिले तेव्हा सकाळ झाल्याचे कळाले आणि ती फुले रजनीनाथाने चक्क हातातून हिसकावून घेतली. मग काय करणार तुम्हीच सांगा. आता सत्यनारायणाला साकडे घाला सगळ्या धामधुमीतून आम्हाला लवकर मुक्त करण्याचे.
विष्णूभटांनी सत्यनारायणाची कथा सांगायला सुरुवात केली. स्त्री-पुरुष मंडळींची तोबा गर्दी झाली होती. चार अध्याय पूर्ण झाले. पाचव्या अध्यायाने पोथीची सांगता व्हायची. कथा सांगता सांगता विष्णूभटजी बाबुराव अर्नाळकरांच्या काळ्या पहाडाची कथा सुरसपणे ऐकवू लागले तसे सारेच लोक खदाखदा हसू लागले. भटजीबुवा भानावर आले तसा त्यांचा चेहरा पाहण्यालायक झाला होता. यातील गमतीचा भाग असा की, विष्णूभटजींच्या नातवापैकी कुणी तरी ही सत्यनारायणाची पोथी हाताळली होती. पोथीवरील श्रद्धेने तिची पाने जीर्ण झाली तरी ते मला पोथी तोंडपाठ आहे या आविर्भावात हाताळत होते. त्या अध्यायातील दोन पाने चांगलीच फाटली होती. आपल्यावर नाव यायला नको म्हणून त्या नातवाने बेमालूमपणे काळा पहाडामधील पाने चिकटवली होती. पोथी वारंवार लागत नसल्याने विष्णू भटजींचे त्याकडे लक्ष गेले नव्हते. कसाबसा कथाभाग आणि आरती आटोपून विष्णूभटजी निघाले. तोच कृष्णामामा गुरुजींचा उत्तरलेला चेहरा हसरा करण्याच्या इराद्याने म्हणाले, ‘‘काका, गेली किती तरी वर्षे सत्यनारायणाची कथा तुम्ही मनोभावे ऐकवता पण आजच्या कथा भागात काळा पहाडाने चैतन्य आणले. मला वाटले त्यालाही सत्यनारायणाच्या चरणी आपली सेवा रुजू करण्याचा मानस असावा. त्यावर तुम्ही असे खट्टू नका होऊ. बोला श्रीसत्यनारायण महाराज की जय.’’ हसत हसत विष्णूभटजी सामील झाले आणि कार्यक्रमात रंजकता आली. हे सारे आणि जेवणादी कार्यक्रम आटपायला सायंकाळचे पाच वाजले होते.
गोंधळीबुवा आपल्या दोन साथीदारांसह गोंधळ घालण्यासाठी हजर झाले होते. गोंधळाचा कार्यक्रमही नामी झाला होता. गोंधळीबुवा आपल्या नर्मविनोदी शैलीने वेगवेगळे किस्से सांगून कार्यक्रमात रंग भरत होते. सरतेशेवटी गोपा खेळविण्याचा कार्यक्रम होता. मामा-मामीच्या हातात वरवंटय़ास सजवून गोपा तयार करून दिला होता. आम्ही मुले छोटय़ा दिवटय़ा धरून मामा-मामींच्या भोवती फेर धरून नाचत होतो. गोंधळीबुवा घरातील वडील मंडळींच्या नावाचा पुकारा करून त्या गोप्यावर वस्त्र-द्रव्य घालण्याचा सूरसपाटा लावण्यात दंग होते. ठरलेल्या बिदागीपेक्षा त्यांना या मिळकतीत अधिक रस होता. त्यांचा हव्यास संपेना तेव्हा कृष्णामामाला राहवले नाही.
‘‘गोंधळीबुवा या गोप्याबरोबर त्याचे पुत्र प्रपौत्र यांचा सांभाळ करण्याचा विचार पक्का केलेला दिसतो आहे. पण ते तेवढय़ावर थांबले असते तर चांगले होते. पण त्यासाठी आमचा सांभाळ या उत्पन्नातून करावा लागेल त्याचे काय?’’
गोंधळीबुवा चांगलेच गोंधळले. त्यांची लय एकदम ओसरली. चेहऱ्यावर उसने हास्य आणून ते म्हणाले, ‘‘आम्हाला या कामाशिवाय बोलविते तरी कोण मग असे होऊन जाते. मला फक्त बिदागी द्या.’’
‘‘गोंधळीबुवा तुमची बेगमी व्हावी हा आमचाही हेतू आहे. हे सारे उत्पन्न तुमचेच आहे. त्यासाठीच हा सारा अट्टहास असतो. असे कुणालाही एकदम नाडवू नका. ती आदिशक्ती तुमचा सांभाळ करण्यासाठीच अवतरली आहे.’’
गोंधळीबुवांच्या डोळ्यातील कृतज्ञतेचे आसू पाहून सारेच गलबलले होते. कृष्णामामा विनोदी आहे तितकाच तो भावुक आहे हे सारेजण त्याला प्रथमच आजमावीत होते. दुसऱ्या दिवसापासून हळूहळू सारी माणसे मार्गस्थ झाली.
त्यानंतर जवळजवळ पंचवीस वर्षांनी मी श्रीवर्धनला गेलो होतो. कृष्णामाने आपल्या फार्म हाऊसवर टोलेजंग बंगला बांधला होता. मला पाहताच किमयामामी धावत आली. तसा मी दोघांनाही वाकून नमस्कार केला. मला जवळ घेऊन बसवीत म्हणाली तुला आता गंमत दाखवते. तिने छोटीशी पेटी आणली. तिने ती उघडून रेशमी बासनात गुंडाळलेली कसलीशी चवड काढली. ते कृष्णामामा व किमया मामीचे लग्नातले कृष्णधवल फोटो होते. मी एकेक फोटो पाहत होतो. सगळे फोटो पाहून झाले आणि मला अनावर हुंदका आला. मामा-मामी दोघेही जवळच होते. माझा हात दाबीत ते म्हणाले ‘‘कशाची रे आठवण झाली?’’
‘‘मामा आता या फोटाच्या रूपाने आठवणी जिवंत राहिल्या. तो वाडा भाऊबंदकीच्या वादात आणि कोर्टावरील टाचेने आम्हाला कायमचा पोरका करून गेला आणि आता बाकी राहिलेत त्याचे अवशेषच. अगदी फुकाफुकी तो हातातून गेला. अगदी रक्ताच्या नात्यांनीही त्या वेळी पाठ फिरवली.’’
माझ्या पाठीवरून हात फिरवीत तो म्हणाला, ‘‘अरे या मामाला तरी हाक द्यायची होती. अनुताईसाठी तिचा पाठचा भाऊ नक्कीच धावून आला असता. इतके का परके होतो आम्ही?’’
‘‘तुमच्या लग्नानंतर दोनच वर्षांनी पेंडसेकाकू आणि मंडळी घर सोडून पेणला गेली. घरात कुणाचेच बिऱ्हाड नव्हते आणि त्यानंतर एक वर्षांने वाडय़ाला सर्व तगादे लागले म्हणजे त्यातले काही पूर्वीचे तंटे आणि त्यात काहींची नव्याने भर पडली. आपत्ती आली की सर्व बाजूंनी येतात तसे झाले. आम्हा चार भावंडांपैकी सर्वात मोठा भाऊ त्या वेळी पंधरा वर्षांचा होता. घरात उत्पन्नाचे साधन म्हणजे शेती. त्या वेळी उत्पन्नाचे साधन म्हणजे गूळ. त्या वर्षी त्या मालालाही दर नव्हता. आधीच वखारवाल्याकडून त्यावर बरीच उचल झालेली. घरात भरीस भर बाबांचे आजारपण. सर्व वाटाच बंद झाल्या होत्या. तुझीही विमा कंपनीच्या विभागणीने बदली झाली होती. कुणाचेच पत्ते माहीत नव्हते. सुटीचा दिवस असूनही घरावर जप्ती आली होती. वाडय़ाचे अखेरचे दर्शन घेऊन आम्ही नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडलो.’’
‘‘आता फिनिक्स पक्ष्यासारखे त्यातून बाहेर पडलात ना! मग झाले तर. अडचणीच माणसांना शहाणं करतात. नाही तर नोकरी सोडून इकडे आम्हीही आलो नसतो. तुमच्यासारखीच आमची गत झाली असती. वेळीच सावरलो. कूळ कायद्यात ही शेती गमावून बसलो असतो. असो या जीर्ण आठवणी उगाच काढत बसायच्या नाहीत. दमेकऱ्यासारखा त्याचा दमा थोडय़ा थोडय़ा वेळाने उसळून सतावतो तसेच त्यांचेही आहे. आज आम्हालाही कसली ददात नाही. चल तुला हा सारा परिसर फिरवून दाखवितो. तेवढाच विरंगुळा,’’ मामा मला समजावीत म्हणाला.
चहा-फराळ आटोपून मामा-मामीसह आम्ही तिघेही निघालो. मामाने आपण केलेल्या शेतीपालटाची माहिती, नैसर्गिक पाण्याचा वापर माडांच्या सुधारीत जाती पोफळीच्या बागेत लावलेली मिरी, वेलदोडा, लवंग या मसाला पिकांची केलेली यशस्वी लागवड आणि गाईच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून कीडनिवारण प्रकल्प याची माहिती दिली. यामध्ये सुरुवातीच्या कष्टापासून किमयामामीचे यातील योगदान आजही किती चालू आहे हे सांगताना मामाचा ऊर भरून आला होता.
‘‘अरे तुझ्या मामांचे आणि माझे मनापासूनचे प्रेम होते ना. मुळे पक्की घट्ट रोवली गेली की सगळीकडे तो आधार पक्का होतो,’’ किमयामामी हसत म्हणाली.
मला काही उलगडा न झाल्याने मी मामीकडे नंतर मामाकडे पाहत राहिलो.
‘‘चला आमच्या पर्णकुटीत जाऊन बसू या. तिथे सारी हकीकत सांगते.’’ मामांच्या नोकराने फोडून दिलेल्या शहाळींचा आस्वाद घेत मामीने बोलायला सुरुवात केली.
‘‘तुझ्या मामांचा आणि माझा प्रेमविवाह. मामा विमा कंपनीत कोल्हापूरला विमा एजंट म्हणून काम पाहत होते. त्या वेळी मीही तेथे उमेदवारी करीत होते. तुझ्या मामांचे या ना त्या कारणाने लग्न राहिले होते आणि आमच्याकडे घरची परिस्थिती कमालीची बेताची होती. त्यामुळे घर सांभाळता सांभाळता माझेही लग्नाचे वय उलटून गेले होते. आम्ही दोघांनी एकमेकास त्याबद्दल सांगितले होते. अशा रीतीने आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. मामांच्या घरच्यांकडून आमच्या लग्नास विरोध होता. मामा पक्के कोकणस्थ चित्तपावन-गोखले आणि मी राजापूरकर देशस्थ. दोन वर्षे आमचे प्रेमप्रकरण चालू होते. मामाही माझ्याशीच लग्न करणार म्हणून हटून बसले होते. आमच्या प्रेमाची कुणकुण तुझ्या पेंडसेकाकूंना म्हणजे यांच्या बहिणीला होती. त्यांच्याकडे मी अधूनमधून येत असे. तुझ्या मामांचे राहणे त्यांच्याकडे होते. अखेर त्यांनीच पुढाकार घेतला आणि आमचा विवाह ठरला. मधल्या काळात यांच्याकडील मंडळींनी कोकणस्थ स्थळे पाहण्याचा सपाटाच लावला होता. तुमचे मामा विनोदवीर पण बाबांच्या पुढे गप्प होते. शेवटी हिश्शावरून आम्ही दोघांनी पुढे कोणते अस्मानी संकट उभे राहू नये म्हणून गुपचूप नोंदणी पद्धतीने विवाह केला. माझ्या घरातूनही गोखल्यांकडून पसंती नसल्याने मुद्दाम तिथे जाऊन खितपत का पडायचे आणि पाणउतारा करून घ्यायचा असा विचार होता. अशा रीतीने आमच्या प्रेमविवाहाची मुळे रुजली होती आणि लग्नानंतर ही घट्ट झाली. देशस्थ- कोकणस्थ वाद मिटला आणि गोखल्यांच्या मंडळींनी मला कायमचे आपलेसे केले. आमच्या रजिस्टर विवाहाची माहिती आज तुझ्यापुढे प्रथमच सांगत आहे. कुणी अडथळा आणू नये म्हणून मामांनी ही नामी शक्कल लढविली होती. अगदी वेगळे राहायचे या निश्चयाने. तथापि ताईंनी पुढाकार घेतला आणि महिनाभरात गोखले-राजापूरकर या मंडळींच्या लेखी वैदिक पद्धतीने विवाहबद्ध झालो’’
‘‘मामी त्या काळातही तुझ्या प्रेमाची किमया मामावर करून खरंच लग्नाची वेगळी गोष्ट अगदी पारंपरिक पद्धतीने साजरी केलीस,’’ मी म्हणालो.
‘‘अरे खरी गंमत तर आत्ताच आहे. आमची तिऊ आणि तुझा बल्ल्या म्हणजे बलराम पेंडसे लवकरच बोहल्यावर चढणार आहेत. लहानपणापासूनच त्यांनी तिऊभोवती फिल्डिंग लावली आहे. विकेट आपलीच आहे म्हणून, पण ते महाशय एव्हरेस्ट सर केल्यासारखे आपल्या प्रेमाचे गोडवे उघडपणे गात आहेत. घरचे संबंध अधिक बळकट करण्याचा तिऊ-बल्याचा उपक्रम स्तुत्यच म्हणावा लागेल. बल्याचा करवाला आणि तिऊचा भाऊ म्हणून आता पुढची सूत्रे तुलाच घ्यावी लागणार आहेत. नव्हे मी ती तुझ्यावर सोपवली आहेत. ती दोघे लग्नानंतर स्वित्र्झलडला जाण्याचे मनसुबे पुण्यात बसून आखण्यात मश्गूल आहेत. तुझे काही असल्यास सांग म्हणजे त्यांच्याबरोबर तुझाही बार उडवून देऊ. आमच्या लग्नामुळे शहाणे झालो. उगाचच असा विषय चिवडायला देण्यापेक्षा त्यातीलच वास्तव जपले तर बोलणाऱ्यांची बोलतीच बंद करून टाकता येते. तेव्हा ही सूत्रे केव्हा स्वीकारणार ते सांग. कामाच्या निमित्ताने तुझे इकडे येणे झाले. लग्न आपल्या घरातच व्हायचे आहे. अगदी आमच्या लग्नाच्या वेगळ्या आठवणी जागवत.’’
‘‘मामा-मामी तुमच्या लग्नाच्या वेगळ्या गोष्टीमुळे मला पुढची नवीन सूत्रे सांभाळायला थोडी उसंत हवी आहे. ती द्याल ना?’’
‘‘सूत्रे तुझ्या हवाली केलीच आहेत पण मधल्या काळात तू बाजी मारून ही सूत्रे परत माझ्या हवाली करू नकोस. पण काही हरकत नाही. त्यासाठी आमची प्रेरणा तुझ्या कामी आली तर आम्ही तयार आहोत. यासाठी ‘लग्नाची वेगळी गोष्ट’ बनू नये याची मात्र जरून काळजी घेणे. आम्ही सदैव तुझ्या पाठीशी अभेद्य तटबंदीसारखे आहोत.’’ त्यांचा निरोप घेत असता माझ्या हातावर दहीसाखर ठेवत मामी उत्तरली.
response.lokprabha@expressindia.com