८ मार्च २०१३
मथितार्थ
चित्रकथी

कव्हरस्टोरी
जालना आणि फिनलॅँड शिक्षणाचा आनंदमार्ग!
अभियानाने शिक्षकांना दिले चैतन्य..
आवडते मज माझी शाळा
मुलांची चौकसबुद्धी वाढली! - बी. राधाकृष्णन (आय.ए.एस.)
आनंदाने शिकता शिकता..

नियोजन

यूथ

सेकंड इनिंग
संमेलन
चिंतन
आरोग्यम्
वादविवाद
क्रीडा

स्टार रेसिपी

विज्ञान-तंत्रज्ञान
एकपानी
कविता
भंकसगिरी
शब्दरंग
सिनेमा
माझं शेतघर
लग्नाची वेगळी गोष्ट
आधी केले..
पर्यटन
क्राईम
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

क्रीडा

वाळवंटातला मोटार स्पोर्ट
पराग फाटक

मारुती सुझुकी डेझर्ट स्टॉर्म या रॅलीचा थरार नुकताच राजस्थानच्या कानाकोपऱ्यात रंगला. ही रॅली काय असते, तिचे टप्पे कसे असतात, अडचणी काय असतात, याचा प्रत्यक्ष वाळवंटातून घेतलेला धांडोळा..

राजस्थानमधलं बापूसर नावाचं छोटंसं गाव. वस्ती जेमतेम दोनशे लोकांची. गावाच्या चहूबाजूला वाळवंट. दृष्टी स्थिरावेल तोपर्यंत नजरेस पडणारे वाळूची बेटं. गावात विजेचे खांब पोहचले आहेत, मात्र वीज अद्याप आलेली नाही. एवढय़ातच गावाच्या वेशीवर व्रुम व्रुम असा मोठा आवाज सुरू होतो. निसर्गाच्या सान्निध्यात वाढणाऱ्या गावकऱ्यांना हा आवाज कसला असा प्रश्न पडतो. आणि म्हणून बाया-बापडे, लहान मुलं हा आवाजी घोंघावात पाहण्यासाठी दाखल होतात. क्षणार्धात वाळूचा धुरळा उडवत, चढउतार सांभाळत एक गाडी तुफान वेगाने पुढच्या गावाच्या दिशेने रवाना होते. यंत्राचा, आवाजाचा हा विलक्षण प्रकार बघून गावकरी अचंबित होतात. आपापसात कुजबुज सुरू.. आणि तेवढय़ात दूरवर पुन्हा एक आवाज निनादू लागतो. गाडीचा रंग आणि चालवणारा वेगळा परंतु परिणाम तोच. डोळ्यांचं पातं लवतं ना लवतं तोच सुसाट वेगाने गाडी डोळ्यांसमोरून सरकते. हे सगळं वर्णन आहे एका भन्नाट रॅलीचं. हो रॅलीच. शर्यत नव्हे. मारुती सुझुकी डेझर्ट स्टॉर्मची ही रॅली होती, तिचा थरार नुकताच राजस्थानच्या कानाकोपऱ्यात रंगला.
मोटार स्पोर्ट हा खेळ भारतात हळूहळू रुजत आहे. केवळ लब्धप्रतिष्ठितांची थेरं अशी त्याची संभावना होत असली तरी आता स्वत:च्या मेहनतीवर, कष्टातून यश मिळवणारे आणि गाठीशी सन्मार्गाने मिळवलेला पैसा असणारे अनेक जण या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत. भारतात सध्या अशा स्वरूपाच्या चार रॅली होतात. रेड दी हिमालय ही रॅली हिमालय पर्वतराजीत अर्थात लेह-लडाख परिसरात होते. डेझर्ट स्टॉर्म राजस्थानच्या वाळवंटात होते. याआधी ही स्पर्धा कच्छच्या रणात झाली होती. याव्यतिरिक्त दक्षिण डेअर आणि मुघर रॅली या रॅलींचे आयोजन करण्यात येते. डेझर्ट स्टॉर्म रॅलीचे हे अकरावे वर्ष. या रॅलीमध्ये सहभागासाठी चार प्रकार असतात. पहिला प्रकार एक्सट्रीम- रॅलीतला हा सगळ्यात कठीण आणि मानाचा प्रकार. वाळवंटातील रस्त्यांची आव्हानं पार करत अंतिम लक्ष्य गाठण्याचे उद्दिष्ट या गटातील रॅलीपटूंना मिळते. या गटाच्या विजेता होण्यासाठी प्रचंड चुरस असते. मात्र या गटात सहभागी होण्यासाठी प्रचंड शारीरिक आणि मानसिक कणखरता असणे आवश्यक असते. याव्यतिरिक्त गाडीच्या तांत्रिक गोष्टींविषयी सखोल माहिती बाळगणे अत्यावश्यक असते. मुख्य चालकाला मार्गाची माहिती देण्यासाठी नेव्हिगेटर असतो. चालकाचे यश नेव्हिगटरच्या अचूकतेवर अवलंबून असते. जीपीएस अर्थात ग्लोबल पोझिशनिंग सिस्टमद्वारे गाडी कुठल्या मार्गाने न्यायची, कुठे अडथळा आहे, कुठे वळण आहे याचे मार्गदर्शन नेव्हिगेटर चालकाच्या बाजूला बसून देत असतो. आणि हे सगळं सातत्याने आणि तुफान वेगाने करायचं असतं. त्यामुळे चालकापेक्षाही नेव्हिगेटर सक्षम असणं महत्त्वाचं असतं. या दोघांमध्ये सुसंगती असेल तर चालकाचं काम तेवढं सोपं होतं.
दुसरा गट आहे- मोटोक्वॉड्स अर्थात मोटार बाइक्सचा. यामध्ये सामान्य बाइकपेक्षा इंजिनक्षमतेत अधिक कार्यक्षम असणाऱ्या बाइकमध्ये स्पर्धा असते. यामध्ये एक बाइकस्वार असतो. बाइकला जीपीएस यंत्रणा सक्रिय असते. त्यानुसार जागरूक राहून गाडीचे निर्देशन करत अंतिम लक्ष्याच्या दिशेने आगेकूच करायची असते. बाइकस्वारांच्या कौशल्याची अतूट कसोटी पाहणारा हा गट आहे. रस्त्यावरचे चढउतार, खाचखळगे यांचा अंदाज घेत एकटय़ाने मार्गक्रमण करणे खडतर असते. तिसरा प्रकार आहे एक्सप्लोरचा. यामध्ये टीएसडी अर्थात टाइम (वेळ), स्पीड (वेग) आणि डिस्टन्स (अंतर) या त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करावे लागते. या गटासाठी मार्ग तुलनेने सोपा असतो. मात्र ठराविक वेळेत विशिष्ट अंतर पार करणे अनिवार्य असते. हे होऊ शकले नाही तर वेळेच्या स्वरूपात दंड होतो. रस्त्यावरल्या अडचणी पार करण्यापेक्षा चांगल्या रस्त्यावर तांत्रिक गोष्टींची यशस्वीपणे पूर्तता केल्यास या गटात यश मिळू शकते. चौथा आणि शेवटचा गट म्हणजे एन्डुयर. नावाप्रमाणेच चिकाटीची, संयमाची सवय करून देणारा हा गट आहे. एक्सट्रीम गटासाठी तयारी करणाऱ्या तसेच मोटार स्पोर्ट, रॅली ही संकल्पना काय आहे हे समजून घेऊन अनुभवण्यासाठी हा गट आहे. नवोदित रॅलीपटू या गटात सहभागी होऊन वरिष्ठ दर्जाच्या गटासाठी सराव करू शकतात. मात्र यांनाही त्रिसूत्रीचे पालन करावे लागते.

औरंगाबादकर चमकले
एक्सट्रीम गटामध्ये अमित कुलकर्णी-प्रमोद राठोड आणि सदानंद गोडसे-सूर्यकांत आंबरवडीकर या औरंगाबादच्या जोडय़ांनी रॅली यशस्वीपणे पूर्ण केली. चैतन्य राजूरकर आणि अभिजीत कुरेकर यांच्या गाडीला अपघात झाल्याने त्यांना माघार घ्यावी लागली. मोटो क्वॉड्स प्रकारात गणेश पखे यांच्या बाइकच्या क्लचवायरमध्ये बिघाड झाल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले.

रॅलीपटू जेव्हा नेहमीच्या रस्त्यावरून वाटचाल करतात, त्या टप्प्याला ‘ट्रान्सपोर्ट लेग’ म्हणतात. हा टप्पा पार करण्यासाठी लागणारा वेळ रॅलीच्या वेळेत नोंदला जात नाही. रॅलीसाठी एक विशिष्ट मार्ग संयोजकांद्वारे आखलेला असतो. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला छोटे झेंडे असतात. ही रॅली वाळवंटात होते त्यामुळे रॅलीपटूंना वाळूच्या रस्त्यातूनच वाटचाल करायची असते. विचित्र चढउतार, झाडंझुडपं, अचानकपणे वाटेत उभे ठाकणारे प्राणी-पशू यांना भेदत शेवटचा टप्पा गाठायचा असतो. अंतिम ठिकाणी कार्यकर्त्यांची फौज तैनात असते. रॅलीपटूला तो टप्पा पार करण्यासाठी लागलेल्या वेळाची नोंद घेतली जाते. सहा दिवसांच्या या स्पर्धेत असे १३ टप्पे असतात. काही वेळेला एकामागोमाग दोन टप्पे असतात किंवा एक टप्पा झाल्यानंतर ट्रान्सपोर्ट लेग सुरू होतो आणि ठराविक अंतरानंतर नव्या ठिकाणी पुढचा टप्पा असतो. गाडीने वेगमर्यादा ओलांडल्यास दंड होतो. गाडीला अपघात झाला तर माघार घेणे भाग असते. बरेचदा रॅली निर्जन वाळवंटी प्रदेशातून जाते. पूर्णपणे अनोळखी प्रदेशातून, पुढे रस्ता कशा प्रकारचा आहे याची काहीही कल्पना नसताना, १२०-१३०च्या स्पीडने, नियमांना धरून गाडी पळवणे महत कौशल्याचे काम आहे. रॅलीदरम्यान काही अडचण उद्भवल्यास ‘सव्र्हिस’ अर्थात ‘मदत गाडय़ा’ ठराविक अंतरावर उपलब्ध असतात. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही मंडळी तत्पर असतात. गाडीतील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यापासून, रॅलीपटूंना खाणे-पिणे पुरवण्या या सगळ्यासाठी सव्र्हिस मंडळी तयार असतात. ज्या प्रदेशातून रॅली जाणारे आहे तिथे ही मंडळी तासभर आधी पोहोचतात. एखादा अपघात झाल्यास रॅलीपटूंची काळजी घेण्यासाठी अॅम्ब्युलन्स तयार असतात. गाडीचे नुकसान झाले असेल आणि त्यातून वाहतूक करणे शक्य नसेल तर गाडी टो करून नेण्यासाठी व्यवस्था सज्ज असते. रॅली सुरळीत होण्यापेक्षा या सगळ्या मंडळींची भूमिका निर्णायक असते.

मोटार स्पोर्ट हा खेळ आपल्याकडे हळूहळू रुजत आहे. लब्धप्रतिष्ठितांची थेरं अशी त्याची संभावना होत असली तरी आता स्वत:च्या मेहनतीवर, कष्टातून यश मिळवणारे अनेक जण रॅलीमध्ये सहभागी होत आहेत.

रॅलीला औपचारिक हिरवा झेंडा दिल्लीतील मारुती सुझुकीच्या मुख्यालयात देण्यात आला. यानंतर रॅलीपटूंनी दिल्ली ते सरदारशहर हे साडेतीनशे किमीचे अंतर पार केले. सरदारशहर या राजस्थानमधील छोटय़ा शहराच्या परिसरात रॅलीची सलामी झाली. नऊ तासांच्या प्रवासानंतर जेवणासाठीच्या विश्रांतीनंतर अवघ्या दोन तासांत रॅलीपटू पहिल्या टप्प्यासाठी सज्ज झाले. संयोजकांनी विचारपूर्वक नाइट लेग रॅलीच्या सुरुवातीला ठेवला होता. रात्रीच्या वेळी गाडीच्या लाइटव्यतिरिक्त काहीच दिसत नाही. नेव्हिगेटरच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे अत्यावश्यक असते. रॅलीची सुरुवात दमदार करण्याच्या उद्देशाने उतरलेल्या काही रॅलीपटूंनी अतिवेगाने जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. रात्रीच्या वेळेला रस्त्याचा अंदाज न आल्याने काही जण भरकटले. यामुळे रॅलीपटूंच्या संख्येत मोठी घट झाली. यानंतर गाडय़ांचा ताफा बिकानेरच्या दिशेने रवाना झाला. यादरम्यान जामसर-सिवानी आणि राजासर या गावांमध्ये दुसरा टप्पा झाला. मुख्य रस्त्यापासून खूप आत, दुर्गम अशा या गावांमधून रॅलीपटूंनी वाट काढत हा टप्पा पार केला. तिसरा दिवस गाडय़ांचा काफिला बिकानेरहून जैसलमेरकडे रवाना झाला. यादरम्यान ट्रान्सपोर्ट लेगचा वेळ जास्त होता. मात्र दोन छोटय़ा टप्प्यांनी रॅलीपटूंच्या कौशल्याचा कस पाहिला. चौथा दिवस ऐतिहासिक जैसलमेर परिसरातल्या टप्प्यांचा होता. सर्वाधिक अंतराचे हे टप्पे सँन्ड डय़ुन्स या परिसरात झाले. प्रखर उष्णता आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे उडणारी वाळू यामुळे रॅलीपटूंना लक्ष्य गाठणे थोडे कठीण बनले होते. या टप्प्यात तांत्रिक बिघाड झाल्याने चार गाडय़ांना माघार घ्यावी लागली. पाचवा दिवस गाडय़ांची फौज पुन्हा बिकानेरकडे रवाना झाली. यादरम्यान नोखरा-कांजी की सर्द या परिसरामध्ये रॅलीपटूंना अवघड टप्प्याला सामोरे जावे लागले. सहाव्या आणि अंतिम दिवशी रॅलीपटू बिकानेरहून जयपूरला रवाना झाले. पहाटे झालेल्या पावसामुळे रॅलीपटूंना डावपेचांमध्ये बदल करावे लागले. काळू गावानजीकच्या परिसरात झालेल्या या टप्प्यात सुरेश राणाने एक्सट्रीम गटाच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. एकूण १३ टप्प्यांपैकी ७ मध्ये सुरेश राणाने अव्वल स्थान राखले. त्याने एकूण १२ तास, १५ मिनिटे आणि २७ सेकंदांत ही रॅली पूर्ण केली. मात्र त्याला सनी सिधू आणि लोहित अर्स या रॅलीपटूंनी जोरदार टक्कर दिली. काही टप्प्यांमध्ये राणाला मागे टाकत या दोघांनी आगेकूच करण्याचा प्रयत्न केला. मात्र राणाने आपला सारा अनुभव पणाला लावत अव्वल स्थान पटकावले.
विजेते
एक्सट्रीम - सुरेश राणा
एक्सप्लोर - संजय टकले
एन्डय़ुरो - सोमदेब चंदा
मोटो क्वॉड्स - मोहित वर्मा
response.lokprabha@expressindia.com