८ मार्च २०१३
मथितार्थ
चित्रकथी

कव्हरस्टोरी
जालना आणि फिनलॅँड शिक्षणाचा आनंदमार्ग!
अभियानाने शिक्षकांना दिले चैतन्य..
आवडते मज माझी शाळा
मुलांची चौकसबुद्धी वाढली! - बी. राधाकृष्णन (आय.ए.एस.)
आनंदाने शिकता शिकता..

नियोजन

यूथ

सेकंड इनिंग
संमेलन
चिंतन
आरोग्यम्
वादविवाद
क्रीडा

स्टार रेसिपी

विज्ञान-तंत्रज्ञान
एकपानी
कविता
भंकसगिरी
शब्दरंग
सिनेमा
माझं शेतघर
लग्नाची वेगळी गोष्ट
आधी केले..
पर्यटन
क्राईम
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

कविता

बालकवी
श्रीधर तिळवे
response.lokprabha@expressindia.com
(१)
बालकवी चाललाय
त्याला फॉलो करत त्याचा औदुंबर
त्याला फॉलो करत त्याचा निळासावळा झरा
माणसांच्या बेटाबेटातून
काचांच्या बोटाबोटातून
बिल्डिंगांच्या स्टील बिल्डिंगांच्या बुटाबुटातून
मूवेबल बँकांच्या बिटाबिटातून
स्वत:चा मार्ग न बदलण्याच्या इच्छेत
स्वत: खालचा मार्ग दर क्षणाला बदललेला
पाहात
चॉइस नाहीये हे उमजूनही नाकारत
बालकवी असल्याने
युद्ध करता येत नाही ह्य़ाची खंत बाळगत
आवाज न करता
चूपचाप
(२)
आनंद पोर्नोग्राफिक होतोय
आनंदी आनंद ना गडे
आनंद ओरबाडला जातोय
आनंद हिसकावला जातोय
आनंद रेप करून प्राप्त केला जातोय
बालकवी नाचतोय
त्याला कुठेच जाता येत नाहीये
तो जिथे आहे तिथेच नाचतोय
बालकवी आनंदात कैद आहे
आणि बालकवीला माहीत नाही
की आनंद पोर्नोग्राफिक झालाय

(३)
बालकवीची वाढ होत नाहीये
त्याला स्वत:चा संशय यायला लागलाय
आपण इतके वाढूनही बालच कसे?
की वाढ झालेलीच नाहीये?
मग कवितेत वाढ होत नाहीये तर काय होतंय?
बालकवीभोवती मास माफिया आहे की हिरवे
फंगस?
आपण पशू नाहीये हे नक्की
देव आपणाला भेटणार नाही हेही शुअरशॉट
मोठे व्हायचे तर आनंद सोडून द्यावा लागतोय
हे फिक्स
बालकवीभोवती मॉल आहे
मॉलमध्ये असंख्य खेळणी आहेत
औंदुबरही टॉय झालाय आनंदही टॉय होतोय
बालकवी आवाज काढतोय- टॉय.. टटॉय
बालकवीची हेलन टॉय नगरीतून पळून गेलीये
तिला बालपण प्राप्त झालंच नाही
ती थेट यंग झालीये- यंगीस्तानचा साईड
इफेक्ट
बालकवी कुणालाच दुखावू शकत नाही
म्हणून दुखी आहे
मात्र दु:ख व्यक्त करण्याची रिस्क तो घेत
नाहीये
कारण दु:ख व्यक्त केलं
की घरात भांडणं होतात हे त्याला माहीत आहे.
(४)
बालकवी टर्मिनसकडे चाललाय
आत्महत्या डब्यात भरून घेत
लोकल निसटतायत
एक खिन्न पारवा- न गाता
मोबाइल टॉवर पाहात टेरीबल दु:खी आहे
बालकवी रडतोय इंटरनल एकांतात
पण त्याचे रडणे लोकल्सल्या गदारोळात
आणि आत्महत्या गोळा करून त्यांना ट्रेनमध्ये
ढकलणाऱ्या जमावाच्या नादात
ऐकू येत नाहीये.
बालकवीला स्वत:ची आत्महत्याही डब्यात नीट
चढवता येत नाहीये
त्याची अगतिकता टर्मिनसच्या काळजात
फडफडतीये
बालकवी आत्महत्येऐवजी बालकवीलाच
ढकलून देतोय
ट्रेन ह्य़ा क्षणाची स्कीम काय हे न उमजून.
टॉय..
पारवा उडतोय
पहिला आणि शेवटचा बालकवी मेला म्हणून
आणि बालकवी
त्यालाही स्पष्टपणे न दिसलेल्या कशालातरी
फॉलो करत
चाललाय
त्याच्यामागे त्याचा नेहमीचा औदुंबर नाहीये
निळासावळा झरा
आहे फक्त बोबडा आवाज
जो कुणालाच ऐकू येत नाहीये

विसाव्या शतकात मराठीत जी पहिली नवता अवतरली तिला विंदा करंदीकरांनी ‘स्वच्छंदवादी’ नवता म्हटले आहे. वाचकांनी पाठवलेल्या कवितांच्यात ह्य़ा नवतेच्या कवितांची संख्या चांगली होती. चंद्रकांत बारामतीकरसारख्या कवींनी
लोकहो माझा असा वहीम आहे
जो राम आहे तोच रहीम आहे

अशा दमदार ओळींनी सुरुवातही केली. मात्र ह्य़ात सर्वात चांगली कविता नलिनी दर्शने ह्य़ा वाचिकेची आहे. या कवितेत स्वच्छंदवादी नवतेची भावव्याकूळता, भावनांचा कल्पनाविलास ही वैशिष्टय़े आढळतात. ही कविता पुढीलप्रमाणे-
तुळस झुलते अंगणी
तुळस झुलते अंगणी
जणू डोलते तुझी प्रीती मन्मनी
रेखिते रेखीव रांगोळी अंगणी
तुझ्या पदरवाची जाणीव त्या क्षणी
कपाळी रेखिते कुमकुम तिलक
जन्मजन्मीच्या तुझ्या सहवासाचे प्रतीक
साज शृंगार माझा हा सारा
तुझ्याविना नाहक पसारा
लाविते नंदादीपातील सांजवात
थरथरत्या हातात असतो एक विश्राम
नलिनी दर्शने, पुणे.

आधुनिक जीवनाने परंपरेवर हल्ले चढवले तरी परंपरा शाबूत राहिली विजय तरवडे या वाचकाने त्यांच्या कवितेत म्हटले आहे-
सायकोमधले अ‍ॅन्थनी
इथे तिथे सगळ्यांच्याच मनात दडलेले असतात
तळघरातील प्रेते सांभाळत

मात्र विसाव्या शतकातील दिलीप चित्रे, अरुण कोलटकर, भालचंद्र नेमाडे यांच्या कवितेने हे परंपरेचे प्रेत जिवंत करून तिला नवा जन्म दिला. त्यातून दीपक कुलकर्णी यांनी देशी नवतेला साजेशी एक कविता लिहिली आहे ती पुढीलप्रमाणे-
ज्याचा त्याचा विठोबा।
ज्याचा त्याचा विठोबा। ज्याचे त्याचे ठायी।
असेल पुण्याई। भेटेल तो।।
ज्याचा त्याचा रंग। विठोबाच्या अंगा।
माखेल सर्वागा। कार्मासंगे।।
ज्याचे त्याने गावे। विठोबाचे गाणे।
तुळशीचे न्हाणे। अंगणात।।
ज्याची त्याची घाण। विठोबाच्या चरणी।
आषाढीची करणी। लाभतसे।।
ज्याचा त्याचा विठोबा। विटेवरी अडे।
रुक्मिणीचे रडे। पुंडलिकाशी।।
- दीपक कुलकर्णी, सातारा.

आयुष्याचे चढ आता चढवत नाहीत अशी आधुनिक भावना व्यक्त करणारी हेमंत देशपांडे यांची ‘हमखास’ ही कविता लक्षणीय!
।। हमखास।।
चढवत नाहीत आता
उभ्या आयुष्याचे चढ
राहून राहून येतो
डोळ्यांना आता कढ
आता चढावर आपोआप
लागत राहते धाप
वाटते फळास आले
असे कोणते हे पाप
आयुष्य चालले असे
घरंगळत घरंगळत
पायाखालची वाट
नाही संपता संपत
पोटात कडाडून भूक
नि माथ्यावर उपेक्षेचे ऊन
एका प्रचंड पोकळीत
आहे सारी भूक दडून
खाऊ शकलो नाही इथे
दोन सुखाचे घास
सदैव अपमानाच्या गर्तेत
गुदमरत राहील श्वास
आपले दु:ख सांगावे
आता कुणाकुणास
आपल्याच दु:खासारखे आहे
दुसऱ्याचेही दु:ख हमखास
हेमंत देशपांडे, गडचिरोली.

मराठीत बा. सी. मर्ढेकर यांच्या कवितेने आधुनिक कवितेची सुरुवात झाली. आधुनिक जीवनाची हताशता, घरपणाची लागलेली वाट प्रा. राजन जयस्वाल यांच्या कवितेत दिसते ही कविता पुढीलप्रमाणे-
घर
घराच्या भिंती तडकतात
व्यथा अबोल बनतात
दारातून येते दैन्य
खिडकीतून निघून जाते चैतन्य
भकास उठबस करणाऱ्या
निर्जीव नेपथ्यात
वावरणाऱ्या कळसूत्री बाहुल्यांना
नातेवाईक समजणे
मग तऱ्हेवाईक होऊन जाते
घराला लागते घरघर
जीवनचक्र तडकले की
असे तडकतात
ताटातूट करतात
घराशी घरपणाचे
-प्रा. राजन जयस्वाल, नागभीड.

विसाव्या शतकाच्या शेवटी उदयाला आलेल्या पण एकविसाव्या शतकाच्या आरंभी भरभराटीला आलेल्या चौथ्या नवतेची एकही कविता मला आढळली नाही हे दुर्दैव. असो पण हा शोध दिलचस्प होता.
कविता पाठवा
‘जशी मनातील जनी प्रकटते उर्वशी, मी ना सांगायाची कविता जन्मते कशी’ असं कवयित्री संजीवनी मराठे यांनी म्हटलं होतं. तुम्हीही तुमची कविता जन्मली कशी ते सांगू नका, पण ती जन्मलेली कविता आमच्याकडे पाठवून तर द्या. नामवंत कवी तुमच्या कवितेची निवड करतील आणि ‘लोकप्रभा’च्या माध्यमातून तुमची कविता महाराष्ट्रभर पोहोचेल.
आमचा पत्ता: लोकप्रभाह्ण, प्लॉट नं. ईएल/१३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई-४००७१० फॅक्स : २७६३३००८
Email - response.lokprabha@expressindia.com