८ मार्च २०१३
मथितार्थ
चित्रकथी

कव्हरस्टोरी
जालना आणि फिनलॅँड शिक्षणाचा आनंदमार्ग!
अभियानाने शिक्षकांना दिले चैतन्य..
आवडते मज माझी शाळा
मुलांची चौकसबुद्धी वाढली! - बी. राधाकृष्णन (आय.ए.एस.)
आनंदाने शिकता शिकता..

नियोजन

यूथ

सेकंड इनिंग
संमेलन
चिंतन
आरोग्यम्
वादविवाद
क्रीडा

स्टार रेसिपी

विज्ञान-तंत्रज्ञान
एकपानी
कविता
भंकसगिरी
शब्दरंग
सिनेमा
माझं शेतघर
लग्नाची वेगळी गोष्ट
आधी केले..
पर्यटन
क्राईम
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

एकपानी

संवेदना
सायली

तसा मी एकदम पुरोगामी माणूस आहे. त्याचा मला अभिमानही आहे. मी जात, धर्मनिरपेक्ष आहे. समोर भेटलेल्या माणसाच्या आडनावावरून त्याची जात काय असेल याचा अंदाज घेणं, मग तो आपल्यातलाच आहे का, याची चर्चा करणं, या सगळय़ाचा मला जाम तिटकारा आहे. माझ्या ऑफिसमध्ये, माझ्या आसपास हे सगळं करणाऱ्या माणसांवर मी सारखं ओरडत असतो. माणसाला माणूस म्हणून किंमत द्या, जात, त्याचा हुद्दा, पसा या सगळय़ाकडे बघून त्याच्याशी कसं वागायचं हे ठरवू नका, असं मी सगळ्यांना सांगतो.
लोकांना हे सगळं पटतंच असं नाही. पण माझ्यापुरतं तरी मी ठरवलं आहे, की आपण नीट वागायचं. आपल्या हाताखाली काम करणाऱ्या माणसांचा नीट आदर राखायचा. हे खरं तर सांगायचीही गरज नाही. कारण ते माझ्या जगण्याचं तत्त्वच आहे. माझा प्यून, वॉचमन, ड्रायव्हर कुणालाही विचारा, त्यांच्याशी माझ्या इतकं प्रेमाने कुणी वागत नसेल. वॉचमन असो की ड्रायव्हर कुणालाही अरे जारे करणं, त्यांचं काही चुकलं तर ओरडणं, शिव्याबिव्या देणं हे तर मी कधीच करत नाही. त्यामुळे त्याच्यापुढे जाऊन जातीबितीवरून भेदभाव करणं ही तर माझ्या आकलनापालीकडची गोष्ट आहे.
हे सगळं मी तुम्हाला का सांगत बसलो तर त्याला कारण आहे, माझी आई. तिला मात्र हे सगळं सांगून मी दमलो. नुकतीच ती माझ्याकडे कायमची रहायला आली आहे. आमच्या गावातून उठून इथे या मोठय़ा शहरात कायमचं रहायला येणं तसं तिला चांगलंच जड गेलं. पण कधीतरी ते होणारच होतं. वडील गेल्यापासून गावाला तिने एकटीने आणि शहरात मी एकटा असं किती दिवस रहाणार होतो.. तर माझी आई माझ्याकडे रहायला आली आणि आमची इतक्या वर्षांमधली गॅप मला एकदम जाणवायला लागली. दहावी झाल्यापासून मी शिकण्यासाठी घराबाहेर पडलो होतो. आईवडिलांची वेगवेगळय़ा गोष्टींवरची मतं मला माहीत असली तरी माझा त्यांच्याशी थेट संबंध येणंच बंद झालं होतं. आम्ही फोनवर खूप बोलायचो. एकमेकांची काळजी करायचो पण रोजच्या जगण्यातले कंगोरे जाणवण्याचा प्रश्नच नव्हता. कारण मी सुट्टीला घरी जायचो तेव्हा आईवडिलांनी केलेले लाड, माझे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्या कौडकौतुकातच इतका रमायचो की घरी कामाला येणाऱ्या वेगवेगळ्या मंडळींना माझी आई कसं वागवायची ते जाणवूनही, खटकूनही मी काही बोलायचो नाही. म्हणजे ती त्यांच्याशी दुष्टपणाने वागायची, त्यांना घालूनपाडून बोलायची असं नाही पण घरकामाला येणाऱ्या बाईला चहा प्यायला वेगळा कप असायचा. तो फुटका वगैरे नसायचा. तो चांगलाच असायचा पण त्या तिला चहा दिला जायचा तो त्याच कपातून. तिच्याशी किंवा इतर नोकर माणसांशी बोलताना आईच काय वडीलही ‘अरे हे काय रे तुमच्या जातीत असं’ ‘आमच्या जातीत नाही हे असलं काहीतरी’ ‘किती झालं तरी तुम्ही जातीवरच जाणार रे’ असं सहज म्हणून जायचे. लहानपणापासून मी ही वाक्य ऐकत मोठा झालो खरा, पण एकदा घराबाहेर पडल्यावर माझा दृष्टिकोन मात्र बदलत गेला. जग किती मोठं आहे ते कळलं, माणसामाणसांमधल्या भेदांच्या भिंती माझ्या मनातून तरी कोसळून पडल्या. सुरुवाती सुरुवातीला मी हे सगळं आईवडिलांशी बोलायचो. कुणाशीही जातिवाचक बोलणं, त्याला वेगळेपणाची वागणूक देणं कसं चुकीचं आहे ते सांगायचो. अर्थात माझ्याकडे ते लक्ष द्यायचे नाहीत ही गोष्ट वेगळी. पण हळूहळू माझं सुट्टीला जाणंही कमी होत गेलं. नंतर तर फेलोशीप मिळून मी अमेरिकेला गेलो. परत येऊन थोडा सेटल होईपर्यंत वडील गेले आणि आता आई माझ्याकडे रहायला आली होती.
घरी कामाला येणारी बाई, आमच्या टॉवरचा वॉचमन, लिफ्टमन सगळय़ांशी खूप बोलायची ती. त्यांची जात विचारायची, आमची सांगायची. कुठे राहता, घरी कोण आहे, जेवलात का, काय जेवलात, सणवार असं तिचं त्यांच्याबरोबर काय काय चालायचं. मी तिला एकदा विचारलंही, ‘आई या सगळय़ांशी काय बोलत बसतेस तू..?’ तर म्हणाली, ‘अरे मग कुणाशी बोलू? तुझ्या या मजल्यावर चारच घरं. त्यातल्या दोघी पंजाबी, एकजण तेलगु. त्या तिघी कधीच घरी नसतात. त्यांना मराठी जाऊ दे, िहदीपण येत नाही.. सहज चक्कर मारायला खाली गेले तर कुणी समोर दिसलं तर साधं हसतपण नाहीत इथले लोक. वॉचमन, लिफ्टमन हेच बोलतात माझ्याशी मराठीत. आता आहेत अमक्यातमक्या जातीचे. पण या न बोलणाऱ्या श्रीमंत लोकांपेक्षा तेच बरे. तेच आपल्यातले वाटतात बघ..
मी काहीच बोललो नाही. हा वाद कितीही वाढत गेला असता. आणि आईशी वाद घालायचा नाही असं मी अनुभवाने शिकलो होतो.
एक दिवस मी ऑफिसमधून घरी आलो तर वॉचमन दारात उभा होता. आईने त्याच्या हातात डबा दिला. डबा घेऊन तो निघून गेला.
मी आईकडे प्रश्नार्थक पाहिलं. ‘अरे, काल संध्याकाळपासून जेवला नाहीय तो. म्हणून त्याला मी जेवण दिलं.’
‘आई, अगं त्याला चांगला पाच हजार रुपये पगार देते सोसायटी..’
मी सांगितलं.
‘काय रे तुम्ही? काय तुमच्या सोसायटीचं सांगतोस मला? तीन तीन वॉचमन ठेवलेत, पण याच्यानंतरची डय़ूटी असलेला दुसरा वॉचमन काल संध्याकाळी आलाच नाही. आज सकाळचाही आला नाही. हाच काल सकाळपासून उभा आहे तिथे. तुझ्याच वयाचा, तिशीचा माणूस हा काल संध्याकाळपासून उपाशी बसलाय. या तुमच्या हायफाय सोसायटय़ा. इथे आसपास त्याला परवडेल अशी चहाची गाडी तरी आहे का..? आणि पाच हजार रुपये पगाराचं काय सांगतोस मला. गेटवर पाच मिनिटं वॉचमन नसेल तर तुम्ही किती आरडाओरडा करता.. कुठे जाणार आहे तो बिचारा आणि कसा जाणार..?
आईकडे पहातच राहिलो.
जातीबितीच्या भेदभावापीलकडचा निव्वळ माणूस पाहण्याची माझी संवेदनशीलता खरी की या भेदभावांसहित असलेली भुकेला माणूस पाहून त्याच्या पोटात चार घास जातील ही व्यवस्था करणारी माझ्या आईची संवेदनशीलता खरी..
मला तरी त्या प्रश्नाचं उत्तर सापडत नाहीय. बघा तुम्हाला देता येतंय का.
response.lokprabha@expressindia.com