८ मार्च २०१३
मथितार्थ
चित्रकथी

कव्हरस्टोरी
जालना आणि फिनलॅँड शिक्षणाचा आनंदमार्ग!
अभियानाने शिक्षकांना दिले चैतन्य..
आवडते मज माझी शाळा
मुलांची चौकसबुद्धी वाढली! - बी. राधाकृष्णन (आय.ए.एस.)
आनंदाने शिकता शिकता..

नियोजन

यूथ

सेकंड इनिंग
संमेलन
चिंतन
आरोग्यम्
वादविवाद
क्रीडा

स्टार रेसिपी

विज्ञान-तंत्रज्ञान
एकपानी
कविता
भंकसगिरी
शब्दरंग
सिनेमा
माझं शेतघर
लग्नाची वेगळी गोष्ट
आधी केले..
पर्यटन
क्राईम
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

क्राईम

चोरीच्या गाडीमुळे उकल
निशांत सरवणकर

दक्षिण मुंबईतील मरुधर कंपनीच्या मालकीच्या ३५ लाख रुपये किमतीच्या सोन्याची लूट हैदराबाद रेल्वे स्थानकाबाहेर झाल्याची ही घटना आहे. याचा गुन्हा हैदराबाद पोलीस ठाण्यातच दाखल झाला होता. त्यामुळे मुंबई पोलिसांचा तसा या घटनेशी काहीही संबंध नव्हता.
या कंपनीचे दोन नोकर सोने घेऊन हुसैन सागर एक्स्प्रेसने हैदराबादला गेले. दुसऱ्या दिवशी हैदराबादला पोहोचल्यानंतर सोन्याच्या बॅगेसह कंपनीच्या गाडीत बसले. गाडी सुरू झाली आणि काही क्षणातच एका एस्टिम गाडीने त्यांना ओव्हरटेक केले. या गाडीत चार-पाच सशस्त्र दरोडेखोर होते. या दरोडेखोरांनी शस्रांचा धाक दाखवून भरदिवसा गर्दीत सोने लुटले. या दरोडय़ाने नोकरही भांबावून गेले. या दरोडय़ाची मालकाला कल्पना देण्यात आली. पोलिसांनी तपास सुरू केला. सुरुवातीला नोकरांची चौकशी करण्यात आली. परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.
दरोडेखोर लुटीचे सोने आपल्या गाडीत टाकून ते पसार झाले. ही गाडी हैदराबादमध्येच एका निर्जन रस्त्यावर तेथील पोलिसांना मिळाली. गाडीचा क्रमांक हैदराबादचाच होता. परंतु तो बनावट असल्याचे निष्पन्न झाले. गाडीत सापडलेल्या कागदपत्रामुळे ती मुंबईची होती, हे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे हैदराबाद पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाशी संपर्क साधला. त्यावेळी मीरा बोरवणकर या सहआयुक्त होत्या. त्यांनी ही जबाबदारी मालमत्ता विभागाचे वरिष्ठ निरीक्षक अरुण चव्हाण यांच्यावर सोपविली.
हैदराबाद पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून गाडीचा तपशील धारावीशी संबंधित होता. त्यामुळे या गाडी मालकाला पोलिसांनी सर्वप्रथम शोधून काढले. परंतु त्याची गाडी चोरी झाली होती आणि तशी तक्रार दरोडय़ाच्या घटनेच्या आधीच दोन दिवसांपूर्वी त्याने केल्याचे पोलिसांना आढळून आले.
हैदराबादमधील लुटीचे मूळ धारावीत असावे, असे वरिष्ठ निरीक्षक चव्हाण यांना राहून राहून वाटत होते. चव्हाण यांनी त्यांच्या विश्वासातील सुहास चौधरी, संजीवन कांबळे, गौतम पाताडे या अधिकाऱ्यांचे पथक स्थापन केले. धारावीसह आसपासच्या परिसरांतून गाडय़ा चोऱ्या करणाऱ्यांचा डेटाबेस या पथकाने ताब्यात घेतला. हे पथक प्रत्येक गाडीचोराच्या घरापर्यंत पोहोचले. तब्बल ५० हून अधिक गाडीचोरांची या पथकाने झडती घेतली. धारावीतून गाडय़ा चोरण्यात माहीर असलेला अधिष्टराज नाडर हा गायब असल्याचे या पथकाच्या लक्षात आले. घरच्यांनी सांगितले की, तो गेले काही दिवस घरीच आलेला नाही. हैदराबादेतील लुटीच्या घटनेआधी दोन दिवसांपासून तो बेपत्ता होतो. गाडी चोरून तो हैदराबादला गेला असावा, असा अंदाज पोलिसांनी बांधला.
नाडरची चौकशी करता करता त्याच्या भावाची माहिती पोलिसांना मिळाली. त्याला ताब्यात घेऊन नाडरबाबत विचारणा केली तेव्हा आपल्याला काहीच माहिती नाही, अशीच त्याची भूमिका होती. चौकशीनंतर त्याला जाऊ देण्यात आले असले तरी त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. त्याच्या मोबाइल फोनचे रेकॉर्ड पोलिसांनी तपासले. तामिळनाडू, आंध्र प्रदेशातील काही मोबाइल क्रमांक मिळाले. तेही सर्व टेपिंगवर ठेवण्यात आले. परंतु त्यापैकी अनेक क्रमांक बंद असल्याचे आढळून आले.
तपास अजिबात पुढे सरकत नव्हता. त्यामुळे नाडरच्या भावाला पुन्हा चौकशीसाठी बोलाविण्यात आले. यावेळी मात्र पोलीस अधिक कडक झाले होते. भावाचा मोबाइल क्रमांक सांग नाहीतर तुलाच तुरुंगात डांबतो, असा दमच पोलिसांनी भरला. दोन-तीन थोबाडीतही लगावल्या. त्याचा योग्य परिणाम झाला. पोलिसांना अधिष्टराज नाडरचा मोबाइल क्रमांक मिळाला. तोपर्यंत खबऱ्यांकडूनही पोलिसांनी त्याच्याबाबत माहिती काढली होती. हैदराबाद लुटीशी नाडरचे काहीतरी कनेक्शन नक्कीच असावे, याची खात्री पटत चालली होती.
नाडरच्या भावाने दिलेला मोबाईल बंद होता. अर्थातच लुटीनंतर अधिष्टराजने मोबाइल क्रमांक बदलला असण्याची शक्यता होती. या मोबाइल क्रमांकाचे तपशील पोलिसांनी मिळविले. परंतु या क्रमांकावरून फारसे फोन केले गेले नव्हते. परिणामी पोलिसांच्या हाती फारसे लागले नाही.
पोलिसांनी अधिष्टराजच्या भावाच्या मित्रांचे मोबाइल क्रमांक मागितले. मात्र त्याच्याकडे भावाच्या फक्त एका मित्राचा क्रमांक होता. त्याचे नाव पुन्नास्वामी. हा पुन्नास्वामीदेखील गाडी चोरीत माहीर. काही लुटीच्या घटनांमध्येही तो होता. आता हैदराबाद लुटीचे कनेक्शन हळूहळू उलगडत चालले होते. दरोडेखोरांपैकी हे दोघे असावे, असा दाट संशय होता. या सर्वाची छायाचित्रे राज्यात तसेच देशभरात पाठविण्यात आली. त्यातच पुन्नास्वामीचा मोबाइल पोलिसांनी टेपिंगवर ठेवला. बराच काळपर्यंत या मोबाइलवर काहीच बोलणे होत नव्हते. मात्र एकेदिवशी एक संशयास्पद बोलणे टेप झाले. त्याच्या एका साथीदाराने त्याला भेटण्यासाठी बोलाविले होते. ठिकाण होते तामिळनाडूतील तिरनेलविल्ला शहरातील नवे बस स्थानक. चौधरी आणि पाताडे हे अधिकारी तामिळनाडूला रवाना झाले. तोपर्यंत पुन्नास्वामीचा डेटाबेस त्याच्यासोबत होता. डेव्हिड तेवर या त्याच्या आणखी एका साथीदाराची माहितीही यादरम्यान मिळाली होती. दुभाषाला घेऊन हे अधिकारी तेथे पोहोचले.
सहाय्यक निरीक्षक सुहास चौधरी यांनी साध्या वेशात बस स्थानकावरच उभे राहणे पसंत केले तर गौतम पाताडे बसमधून ये-जा करीत होते. बराच काळ झाला तरी तेथे कोणी आले नाही. मात्र काही काळानंतर एकाची हालचाल पोलिसांना संशयास्पद वाटली. तो बहुधा डेव्हिड असावा, असा चौधरींचा संशय होता. ते जवळ गेले तसा तो पळू लागला. त्याला चौधरींनी पकडलाच. परंतु त्याने चौधरींच्या हाताचा जोरदार चावा घेतला. वेदनेने कळवळलेल्या चौधरींचा हात रक्तबंबाळ झाला. परंतु त्याही स्थितीत चौधरीनी त्याला सोडले नाही. तोपर्यंत पाताडे तेथे आले आणि त्याला ताब्यात घेतले. तो होता डेव्हिड तेवर. कट्टर दरोडेखोर. त्याला चौकशीसाठी मुंबईत आणल्यानंतर ३५ लाखांच्या सोनेलुटीची उकल व्हायला वेळ लागला नाही. डेव्हिडकडून मग त्याच्या अन्य साथीदारांची माहितीही पोलिसांना मिळाली.
response.lokprabha@expressindia.com