८ मार्च २०१३
मथितार्थ
चित्रकथी

कव्हरस्टोरी
जालना आणि फिनलॅँड शिक्षणाचा आनंदमार्ग!
अभियानाने शिक्षकांना दिले चैतन्य..
आवडते मज माझी शाळा
मुलांची चौकसबुद्धी वाढली! - बी. राधाकृष्णन (आय.ए.एस.)
आनंदाने शिकता शिकता..

नियोजन

यूथ

सेकंड इनिंग
संमेलन
चिंतन
आरोग्यम्
वादविवाद
क्रीडा

स्टार रेसिपी

विज्ञान-तंत्रज्ञान
एकपानी
कविता
भंकसगिरी
शब्दरंग
सिनेमा
माझं शेतघर
लग्नाची वेगळी गोष्ट
आधी केले..
पर्यटन
क्राईम
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

कव्हरस्टोरी

अभियानाने शिक्षकांना दिले चैतन्य..

सुरुवातीला सिंधी काळेगाव येथे प्रायोगिक तत्त्वावर शाळा उन्नत अभियान राबवायचे ठरले. हा उपक्रम राबवणारे सिंधी काळेगाव येथील केंद्रीय मुख्याध्यापक आर. एम. बोर्डे सांगतात, आम्ही एकवीस दिवसांत अकरा शाळा मुख्य कार्यकारी अधिकारी बी. राधाकृष्णन यांना अपेक्षित होत्या तशा केल्या. त्यांनी जिल्ह्य़ातील सर्व केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी यांना एक दिवस या शाळा पाहायला लावल्या आणि नंतर हा उपक्रम जिल्हाभरात राबविला. मी विद्यार्थ्यांसाठी वाचनकक्ष तयार केला. दुपारच्या वेळात मुले या ठिकाणी अभ्यासात रमतात. या अभियानामुळे शालेय वातावरण बदलून गेले आहे. वारंवार शैक्षणिक माहिती डोळ्यासमोर राहिल्यामुळे विद्यार्थ्यांना ती लवकर आत्मसात होत आहे. त्यांची विचार करण्याची क्षमता वाढली असून, शिक्षक अधिक जोमाने काम करत आहेत.
डोंगराच्या कुशीत असलेल्या माझ्या श्रीराम तांडय़ावर शिक्षणाची गंगा तशी फार उशिरा आली. आमच्या दृष्टीने जगायचं म्हणजे राब राब राबायचं आणि मुलाबाळांना खाऊ घालायचं. मात्र जगदीश कुडे व एन. जी. पठाण हे दोन मास्तर शाळेत आले आणि आमच्या मुलांचं भाग्यच बदललं. तांडय़ावरची जी मुले उनाडक्या करत फिरायची, त्यांना दोघांनी शाळेची गोडी लावली. त्यांच्यामध्ये अभ्यासाची गोडी निर्माण केली. त्यातच शाळा उन्नती अभियान आले आणि आमची बंजारा भाषा बोलणारी मुलं या अभियानातील विविध उपक्रमामुळे शाळेत जायला लागली, शाळेच्या भिंतींवर काय लिहिलंय ते तांडय़ातील निरक्षर माणसांना सांगायला लागली. शाळा उन्नती अभियानामुळे आमच्या तांडय़ातील मुलांसाठी शिक्षणाची पहाट उगवली आहे. हे उद्गार आहेत ज्या गावात जायला रस्तासुद्धा नाही अशा श्रीराम तांडा गावच्या कृष्णा उत्तम राठोड यांचे!
गणेशपूर (ता. परतूर) येथील प्रफुल्ल सोनवणे या शिक्षकाने सबंध गावच शिक्षणमय करून टाकले आहे. ते सांगतात, शाळेत मुले शिक्षकाजवळ केवळ सहा तास असतात. यामुळे त्यांना द्यायला हवं तेवढं ज्ञान देता येत नाही. त्यामुळे मग मी गावातून वर्गणी गोळा केली, माझ्या खिशातून पैसे टाकून तीनशे लिटर रंग आणला. गावातल्या प्रत्येक भिंतीला रंग दिला. त्यावर भाषा, गणित, इंग्रजी या विषयांमधले वेगवेगळे घटक उतरवून काढले. त्यामुळे गावात मुलं कुठेही गेली तरी वेगवेगळ्या विषयांमधील माहिती मुलांच्या डोळ्यासमोर राहायला लागली. गावातल्या कुठल्याही भिंतीवर त्यांच्यासाठी ज्ञान उपलब्ध झाले आहे. लहान इयत्तेतल्या मुलांनाही वरच्या इयत्तेतली माहिती आपोआपच समजायला लागली आहे. थोर संतांची, महात्म्यांची माहिती आजमितीस माझ्या शाळेतील दुसरीची मुले सांगतायेत.
प्रफुल्ल सोनवणे यांनी आतापर्यंत २५० मुलांना दत्तक घेतले असून, त्यांना वर्षभर लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य ते स्वखर्चातून देतात.
अंबड तालुक्यातील पिठोरी येथील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक एस. एम. चोले आणि शिक्षक आर. टी. कदम सांगतात आम्ही मुलांसाठी शाळा म्हणजे बगीचा केला आहे. मुलांना बागेत खेळायला, बागडायला आवडते. त्याच प्रकारचे वातावरण आम्ही शाळेत निर्माण केले आहे. शाळा उन्नती अभियानांतर्गत आम्ही राष्ट्रमाता जिजाऊ उद्यानात इंग्रजी, मराठी वर्णमाला सिमेंटने रंगवून काढून थ्री डायमेंशनमध्ये सादर केल्यामुळे मुले त्याकडे जास्त आकर्षक झाली आहेत. गणितातील किचकट अपूर्णाक सममिती भिंतीवर उतरविल्यामुळे मुले चालता-बोलता ती अभ्यासायला लागली. इमारतीच्या छतावर आकाशगंगा अवतरली असून, त्यामुळे मुलांना नावीन्यपूर्ण गोष्टी चित्रातून माहिती झाल्या आहेत.
डॉट बोर्डाच्या आधारे मुले आपापल्या समवयस्कांकडून अनेक बाबी समजून घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी देणाऱ्या संत तुकाराम रंगमंचावर १ ते १० अंकांची ओळख करून देणारे पावलांचे ठसे आहेत. मुलांना घसरगुंडीवर चढता-उतरता क्रम लिहून दिल्यामुळे मुले तो आनंदाने अभ्यासत आहेत. आवार भिंतीवर श्लोक, इंग्रजी लिपीतील सुविचारांमुळे मुलांना वाचनाची आवड लागली आहे. तसेच मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी आम्ही आठवडा बाजारातील भाजीपाला स्टॉल शाळेत लावले. मुलांनी शाळेतच भाजीपाला विक्री करावी आणि त्यांना खरेदी विक्रीचे व्यवहार ज्ञान मिळावे हा आमचा त्यामागचा उद्देश आहे. या गावातील राजेश्वर पास्टे नावाचे पालक या सगळ्या बदलाबाबत सांगतात, ‘शाळा लै भारी झाली.’
अंबड तालुक्यातील आवा येथील प्रकाश गाताडे व संजय थोरात या दोघांनी शाळा उन्नती अभियानातील सर्व उपक्रमांची अंमलबजावणी यशस्वीपणे केली. त्यासोबतच त्यांनी शिक्षकांनी मुलांना शिक्षा करू नये व मुलांनाच स्वयंशिस्त लागावी, यासाठी ‘बालन्यायालय’ स्थापन कले. आठवडय़ाच्या प्रत्येक शुक्रवारी ते भरते. त्यात न्यायाधीश, सरकारी, तसेच खासगी वकील या भूमिका मुलेच पार पाडतात. न्यायाधीश मुलगा न्यायनिवाडा करून संबंधित मुलाला शाळेतील कचरा उचलणे, झाडांना पाणी टाकणे, गवत काढणे अशा शिक्षा सुचवतो. त्यातून मुलांना शिस्त लागली आणि त्यांना न्यायालयीन कामकाजाची माहितीदेखील झाली.
अंबड तालुक्यातील उर्दू माध्यमात शिकविणारे सलीम नवाज जाफराबादी सांगतात, उर्दू माध्यमातील मुलांसाठी हे अभियान खूपच उपयुक्त ठरले आहे. कारण तालुक्याच्या ठिकाणी मुलांना उर्दूतून संदर्भपुस्तिका फारशा मिळत नाहीत. या अभियानाअंतर्गत उर्दूतून विविध प्रकारचे विचार, तक्ते लिहिल्यामुळे मुले आवडीने ते वाचताना दिसत आहेत.
मंठा तालुक्यातील हेळसवाडी येथील शाळेतील शिक्षक विनायक राठोड सांगतात की, या कामातून मला आनंद मिळाला. नवनवीन माहिती शिकण्याचा स्रोत मिळाला.
परतूर तालुक्यातील दत्तात्रय हेलसकर हे शिक्षक सांगतात की, शिक्षणाच्या प्रवाहात नवचैतन्य निर्माण आणण्याचे काम या अभियानाने केले आहे. प्रत्येक वर्गाला त्यानुरूप अध्ययन अनुभव मिळत असल्यामुळे मुलांच्या शिकण्यात, आकलनात फरक पडला आहे, मुले हुशार झाली आहेत.
जाफराबाद तालुक्यातील निमखेडा खुर्द येथील अनिल सोनूने या शिक्षकाने आपल्या वर्गात स्क्रीन बसवला आणि त्यानुरूप तो अध्यापन करतो. यामुळे मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत नावीन्य आले आहे.
जाफराबाद तालुक्यातील डावरगावदेवी येथील शिक्षक जमीर शेख गेली वीस वर्षे अध्यापनाच्या क्षेत्रात आहेत. ते या अभियानाबाबत बोलताना म्हणतात, या अभियानाने जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या अंगच्या कलागुणांना वाव दिला तसेच त्यांच्यातील मरगळ झटकून काढली. यात काही शिक्षकांनी आपापल्या कल्पकतेने शाळा उन्नती अभियानातील घटकांसोबतच नवीन घटकांचा समावेश करून विद्यार्थ्यांना एखादा घटक अधिक सोपा करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षक झपाटल्यागत काम करायला लागले आहेत. मुलेसुद्धा शिक्षकांना वेगवेगळे प्रश्न विचारायला लागली आहेत. त्यामुळे शिक्षकांना आपले ज्ञान सतत अद्ययावत करावे लागत आहे. माझ्याच शाळेत मी हे अनुभवतो आहे. दुपारच्या शालेय पोषण आहार वाटपावेळी माझ्या शाळेतील मुले रांगेत उभी असतात आणि समोरच्या भिंतीवरील लिहिलेली वाक्ये वाचून मला अनेक प्रश्न विचारतात. या अभियानाने शिक्षक गतिशील झाले आहे आणि विद्यार्थी ज्ञानोपासना करताना दिसत आहेत.
धोंडीपिंपळगाव येथील प्राथमिक शाळेतील तरुण शिक्षक राजीव हजारे सांगतात की, स्पेशलायझेशनच्या या जमान्यात कौशल्यांना अधिक महत्त्व आहे. हे लक्षात घेऊनच हे अभियान आखले गेले आहे. त्याच्या परिणामी मुले स्वत: ज्ञाननिर्मिती करायला लागली आहेत. ती प्रश्नमंजूषा तसेच इतरही उपक्रमांच्या माध्यमातून ज्ञानक्षेत्रांकडे वळत आहेत. या अभियानाने जिल्हा परिषद शाळांमध्ये एकसंधपणा आला आहे. या अभियानामुळे मी माझ्या शाळेत पाण्यासाठी बोअर घेतला. ग्रामपंचायतीने आम्हाला विद्युतपंप दिला. यामुळे या दुष्काळातदेखील दिवसभरात पाच तास मोटार चालते. त्यामुळे शाळेतील मुलांची तसेच गावकऱ्यांची पाण्याची सोय झाली आहे.
जाफ्राबाद तालुक्यातील पोखरी येथील प्राथमिक शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बबनराव पाचरणे सांगतात, आमच्या मुलांना शाळेत जायला जराही आवडायचे नाही. शाळा अगदी निरस होती. शाळेत केवळ घाण असायची. मुलं शाळेत जायला कंटाळा करायची. मात्र येथे राजेंद्र कणखर गुरुजी आले. त्यांनी गावातून चाळीस हजार रुपये लोकवर्गणी केली व त्यातून बोअर घेऊन शाळेत सुंदर बगीचा तयार केला. शाळा उन्नती अभियानांतर्गत उपक्रम सुरू झाले आणि आमची मुले झपाटय़ाने वाचायला, लिहायला लागली. शाळेचा परिसर जिवंत झाला. मुले गावात चकरा मारण्याऐवजी शाळेकडे चक्कर मारतात आणि भिंतीवरील मजकुराचे वाचन करतात. आधी आम्हाला गावातून खूप विरोध झाला. मात्र कणखर सरांच्या प्रयत्नांमुळे आम्ही आमच्या शाळेचा विकास करू शकलो.
जालना जिल्ह्य़ातील अंदमान-निकोबार समजल्या जाणाऱ्या जाफराबाद तालुक्यातल्या बेलोरा येथे एच. यू. रमघम यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गरम्य शाळा तयार झाली आहे. ते सांगतात की, आम्ही गावात लोकवर्गणीची मागणी केली. गावातील लोकांनी एकाच दिवसात ४० हजार रुपये दिले. त्यातून आम्ही शाळेसाठी दहा हजार लिटर पाण्याची सिमेंट काँक्रीटची टाकी बांधली, तसेच शाळेला भव्य लोखंडी कमान बसविली आहे. एक कि.मी. अंतरावरून शाळेत पाइपलाइन आणली. या वेळी ग्रामस्थांनी श्रमदान मोफत केले. यामुळे आम्ही शाळेतील दोन हजार लहान-मोठे वृक्ष जतन करत आहोत. हे केवळ शाळा उन्नत अभियानामुळेच होऊ शकले.
जालना तालुक्यातील उषा मुंडे या शिक्षिका सांगतात की, हे अभियान म्हणजे ज्ञानाची देवाणघेवाण करणारे आहे. नवनवीन ज्ञाननिर्मितीसाठी आम्ही शिक्षक मंडळी यामुळे उद्युक्त झालो असून, आमच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. शिक्षक आता वाचन करूनच वर्गात प्रवेश करताना दिसत आहेत. शिक्षकांची कार्यप्रवणता वाढली तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्तादेखील या अभियानामुळे वाढली आहे.
जाफ्राबाद तालुक्यातील दहिगाव येथील प्राथमिक शाळेतील संजयकुमार निकम सांगतात या अभियानामुळे आम्ही शाळा जिवंत केल्या. अठराशे लोकसंख्या असलेल्या या गावात आम्ही लोकांचा इंग्रजी माध्यमाकडचा कल मराठीकडे वळवला. त्यानुरूप शाळेत उपयुक्त शैक्षणिक साहित्य तयार केले. शाळा उन्नती अभियानातून आम्ही संगणक शिक्षण देत आहोत. त्याच्या माध्यमातून विद्यार्थी माहिती व तंत्रज्ञानाच्या युगासाठी तयार होत आहेत. आम्ही गावातून तीस हजार लोकवर्गणी गोळा केली आणि शाळेचा कायापालट केला.
भोकरदन तालुक्यातील जयंत कुलकर्णी सांगतात या अभियानाने गाव-शाळा संबंध अधिक घनिष्ठ झाले. गावातील नागरिक माझी शाळा या भावनेने तिच्याकडे पाहात आहेत.
बदनापूर येथील राजेंद्र जत्ती यांनी आपल्या शाळेत इंटरकॉन्फरन्स सिस्टीमद्वारे अध्ययन-अध्यापन सुरू केले जाते. यासाठी त्यांनी एक मुख्य खोलीतून प्रत्येक वर्गात साऊंड सिस्टीम बसवली आहे. यामुळे ज्या वर्गात शिक्षक नसतील अशा वर्गातही मुलांना धडे देता येतात. त्यांनी नवीन खोली बांधकामासाठी आलेल्या एका रूमला इअछअ (Building as learning Aids) इलेमेंटचा परिपूर्ण उपयोग केला आहे. तिला लावण्यात आलेल्या ग्रिलला विविध भौमितिक आकृत्यांचा आकार दिलेला आहे. त्यामुळे मुले ते आवर्जून पाहतात. या अभियानांतर्गत पिण्याच्या पाण्याची आठ नळाद्वारे त्यांनी व्यवस्था केली आहे.