८ मार्च २०१३
मथितार्थ
चित्रकथी

कव्हरस्टोरी
जालना आणि फिनलॅँड शिक्षणाचा आनंदमार्ग!
अभियानाने शिक्षकांना दिले चैतन्य..
आवडते मज माझी शाळा
मुलांची चौकसबुद्धी वाढली! - बी. राधाकृष्णन (आय.ए.एस.)
आनंदाने शिकता शिकता..

नियोजन

यूथ

सेकंड इनिंग
संमेलन
चिंतन
आरोग्यम्
वादविवाद
क्रीडा

स्टार रेसिपी

विज्ञान-तंत्रज्ञान
एकपानी
कविता
भंकसगिरी
शब्दरंग
सिनेमा
माझं शेतघर
लग्नाची वेगळी गोष्ट
आधी केले..
पर्यटन
क्राईम
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

कव्हरस्टोरी

आनंदाने शिकता शिकता..
विनिता ताटके
फिनलँडमधल्या सर्व शाळा शासनच चालवते. तरीदेखील बालवाडी ते संशोधन क्षेत्रापर्यंत सर्वच टप्प्यांवर व्यक्तिमत्त्व घडविण्याची, आपल्या आवडीनुसार पुढे काय करायचे आहे हे शोधण्याची, ठरविण्याची संधी येथे प्रत्येक मुलाला असते. १९७० पासून राबविण्यात येणाऱ्या या पद्घतीने जगासमोर एक आदर्श शिक्षण व्यवस्था उभी केली आहे.

कल्पना करा. तुमच्या घरात बाळ जन्माला आले आहे. दवाखान्यातून घरी जाताना शासनातर्फे तुम्हाला एक भेट मिळते. त्यात तीन पुस्तके आहेत- एक आईसाठी, एक वडिलांसाठी तर एक चक्क बाळासाठी! अर्थात बाळाच्या पुस्तकात आई-वडिलांचे चेहरे आहेत. शासन बाळाच्या पालकांना सांगते आहे की तुमच्या माध्यमातूनच हे बाळ बाहेरचे जग पाहणार आहे, तेव्हा तुम्हीच बाळासाठी महत्त्वाचे आहात!
हे सारे कल्पनारंजन इथेच संपत नाही. हे बाळ थोडे मोठे झाल्यावर शासनाच्याच बालवाडीत जाते. या बालवाडीत त्याला मुक्त खेळायची, समवयस्क मुलांसोबत मत्री करायची संधी असते. त्याचे औपचारिक शिक्षण वयाच्या सातव्या वर्षांपासून चालू होते, जेव्हा हे मूल शासनाच्या शाळेत पाऊल टाकते. होय, शासनाच्याच, कारण फिनलँडमधल्या सर्व शाळा शासनच चालवते, आणि एकदा का हे मूल शाळेत जायला लागले, की या मुलाला घडवायची, त्याला त्याच्या पुढील आयुष्यासाठी तयार करायची जबाबदारीच शाळेतील शिक्षक स्वीकारतात, आणि मग ते करण्यासाठी योग्य ते मार्ग स्वत:च शोधतात.
थांबा, अजूनही बरेच आहे. हे मूल अत्यंत आनंदात, परीक्षांचा ताण नसलेल्या वातावरणात आपले शालेय शिक्षण पूर्ण करते. आपले व्यक्तिमत्त्व घडविण्याची, आपल्या आवडीनुसार पुढे काय करायचे आहे हे शोधण्याची, ठरविण्याची संधी या मुलाला असते. १०व्या वर्षी घेण्यात येणाऱ्या चाचणीच्या आधारे व विद्यार्थ्यांची आवड व क्षमतेनुसार त्याला पुढचे शिक्षण घ्यायची मुभा असते. व्यवसाय प्रशिक्षण व ज्यांना अभ्यास व संशोधनात रस आहे अशांनाच पुढच्या पदवी अभ्यासक्रमाकडे वळण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
हे असं खरंच फिनलँडमध्ये आज घडतंय. नव्हे, १९७० पासून आजपर्यंत अशाच पद्धतीने आपल्या मुलांना शिक्षण देऊन फिनलँडने या मुक्त आणि आनंदी अशा शिक्षण व्यवस्थेचे यश सिद्धच केले आहे.
शिक्षण व्यवस्थेची घडी बसवताना अनेक वर्षांच्या प्रयत्नांनी विचारपूर्वक, चर्चा व चर्वतिचर्वणाद्वारे जनमत तयार करत करत फिनलँडमधल्या आजच्या शिक्षण व्यवस्थेने जन्म घेतला. ह्यची सुरुवात ही दुसऱ्या महायुद्धातील अस्वस्थतेतूनच झाली.
संकट नको असले तरी बरेच काही शिकवून जाते, परत उभे राहण्याची जिद्द देते. तसेच काहीसे फिनलँडचे झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हा देश ५-६ वष्रे अत्यवस्थ होता. त्या काळी सुमारे ४० लाख लोकसंख्या असलेल्या या छोटय़ाखानी, शेतीप्रधान अर्थसंस्कृती असलेल्या देशातल्या लाखो लोकांना युद्धाची झळ बसली. स्वातंत्र्यासाठी लढावे लागल्यामुळे फिनिश समाज एकत्र आला तो एक नवा आदर्शवाद घेऊनच. सर्वासाठी समान शिक्षणाची संधी ही संकल्पना याच आदर्शाचा एक भाग होती. पुढचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असेल हे जाणून या समाजाने शिक्षणाचे महत्त्व ओळखले व सामाजिक-आíथक विकास साधण्याचे एक महत्त्वाचे साधन म्हणून शिक्षणाला व शिक्षण क्षेत्राला प्राधान्य दिले.

अत्यंत वैविध्य असलेल्या देशांतून स्थलांतरित होऊन फिनलँडमध्ये स्थायिक झालेल्या समाजातील मुलांनासुद्धा फिनलँडच्या शाळांनी अत्यंत आनंदाने सामावून घेतले आहे. बऱ्याच शाळांमधून तर निम्मे विद्यार्थी इतर देशांतील असतात.

देशाला पुढे जायचे असेल, एक प्रगत राष्ट्र म्हणून जगातील आपले स्थान भक्कम करायचे असेल तर आपल्या नवीन पिढीला उत्तम शिक्षण दिले पाहिजे या मूलभूत संकल्पनेला फिनिश लोकांनी खूप महत्त्व दिले आणि उत्तम शिक्षण म्हणजे आपल्या पायावर समर्थपणे उभे राहाणाऱ्या सक्षम फिनिश नागरिक घडवण्याचे शिक्षण, हेही त्यांनी ठरवून टाकले.
त्या काळातली फिनलँडची शिक्षण व्यवस्था अनेक समस्यांनी ग्रस्त होती. कमी पटनोंदणी, प्राथमिक इयत्तेतच शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक, शहरी व श्रीमंत वर्गाला खासगी शाळांतून मिळणारी शिक्षणाची संधी व गरीब जनता मात्र वंचित, औपचारिक अभ्यासक्रम पूर्ण करण्याला महत्त्व देणारी व शिक्षककेंद्रित शिक्षणपद्धती, अशी आपल्याला ओळखीची व जवळची वाटेल अशीच तिथली शिक्षणव्यवस्था होती. १० पकी ९ फिनिश नागरिक ७ ते ९ वर्षांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करू शकत होते.

वय इयत्ता शिक्षणाचे स्वरूप / अभ्यासक्रम
३ ते ६ ०* बालवाडी
७ ते १५ १ ते ९वी सक्तीचे र्सवकष शिक्षण
१६ ते १८ १० ते १२ माध्यमिक शिक्षण अथवा व्यावसायिक शिक्षण
१९ ते २१ १३ ते १५ पदवी शिक्षण (विद्यापीठ) अथवा व्यावसायिक पदवी शिक्षण
२२ ते २३ १६ ते १७ पदव्युत्तर शिक्षण (विद्यापीठ) अथवा व्यावसायिक पदव्युत्तर शिक्षण
२५ ते २६ १९ ते २० संशोधनपर (पीएचडी) विद्यापीठ

या व्यवस्थेत आमूलाग्र बदल करायला हवा हे फिनिश शासनाने व नागरिकांनी ओळखले. १९४६ पासूनच फिनिश सरकारने मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा पुरस्कार करण्यास सुरुवात केली. तेव्हा अस्तित्वात असलेल्या शैक्षणिक रचनेचा मूळ पायाच बदलण्याच्या दृष्टीने विचारांची पावले पडायला लागली. हे करताना फिनिश जनतेने व शासनाने प्रचंड खल केला; तीन महत्त्वाच्या समित्यांनी अभ्यास करून आपल्या शिफारसी मांडल्या, ज्यावर चर्चाचे झोड उठले. विरोधी मते मांडली गेली, टीकेला प्रत्युत्तर दिले गेले. या सर्व प्रक्रियेत केवळ राजकीय नेत्यांनीच नव्हे, तर पालकांपासून शिक्षणतज्ज्ञांनी, शिक्षण क्षेत्रात संशोधन करणाऱ्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वानी या चच्रेत भाग घेतला, हिरिरीने आपली मते मांडली.
ही प्रक्रिया साधारणत: दोन दशकांच्या वर चालली. हळूहळू काही मुद्दे स्वीकारत, काही नाकारत, प्रत्यक्षात आजची शिक्षणरचना साकारायला फिनलँडला १९७० चे साल उजाडले. एवढा काळ जरी लागला असला तरी ही प्रक्रिया चालू असतानाच त्याचे परिणाम दिसू लागले होते. १९५५-५६ मध्ये ३४,००० असलेली पटनोंदणी पाच वर्षांत दोन लाखांवर गेली होती, तर १९७० पर्यंत ३.२५ लाखपर्यंत पोचत दसपटीने वाढली होती.
फिनिश शिक्षण व्यवस्थेचा पाया हा तिची मूल्ये, रचना व शिक्षक प्रशिक्षण या तीन महत्त्वाच्या बाबींवर रचला गेला आहे असे म्हणता येईल. या नवीन रचनेची जी काही मूल्ये ठरवली गेली, ती अशी-
सर्वाना शिक्षणाची समान संधी देणे हे राष्ट्रीय कर्तव्य मानले गेले. खऱ्या अर्थाने सर्वाना शिक्षणाची समान संधी आपण खरंच देऊ शकतो का, ह्य प्रश्नाचे उत्तरही आपल्याला इथेच मिळते. इराक, सोमालिया, रशिया, बांगलादेश, इथिओपिया अशा अत्यंत वैविध्य असलेल्या देशांतून स्थलांतरित होऊन फिनलँडमध्ये स्थायिक झालेल्या समाजातील मुलांनासुद्धा फिनलँडच्या शाळांनी अत्यंत आनंदाने सामावून घेतले आहे. बऱ्याच शाळांमधून तर निम्मे विद्यार्थी इतर देशांतील असतात. खरं म्हणजे स्वत:ची भाषा व संस्कृती याबद्दल फिनिश समाज अत्यंत जागरूक आहे. असे असतानादेखील त्यांनी सर्व स्तरांतील व भाषिक समूहातील मुलांना समान संधी द्यायची ठरवली. वर्गात कुणालाही मागे पडू द्यायचे नाही ह्य निश्चयाने काम करणाऱ्या शिक्षकांसाठी हे तर खूप मोठे आव्हान असते. पण तरीही फिनलँडचे सुमारे ३५०० शिक्षक हे आव्हान समर्थपणे पेलताना दिसतात.

शिकण्याची प्रक्रिया ही आयुष्यभर चालूच राहते. हे ओळखून अभ्यासक्रम पूर्ण करण्याऐवजी मुलांना शिकते करण्याला महत्त्व दिले गेले.

एवढेच नाही, तर विशेष गरज असलेल्या मुलांनाही त्याच वर्गात प्रवेश दिला जातो. शिकताना येणाऱ्या अडचणी वेळेवर कळल्या तर त्यावर उपाय केले जाऊ शकतात, म्हणून अनेक शाळांमध्ये अशा मुलांसोबत काम करण्याचे प्रशिक्षण असलेले शिक्षक असतात.
यापेक्षा अधिक सर्वसमावेशक असे काय असू शकते!
भक्कम अभ्यास व संशोधनावर आधारितच धोरण ठरवण्याचे सूत्र अंगीकारायचे असे ठरवण्यात आले.
नवीन व्यवस्था ठरवताना अभ्यासांचा (गरज पडल्यास सर्वेक्षणांचाही), अनुभवांचा आधार घेतला गेला. शिक्षणतज्ज्ञांनी आपली मते तर मांडलीच, पण त्यावर बहुमत होईल यासाठीही प्रयत्न झाला. साहजिकच ही नवी घडी बसताना अभ्यास व संशोधन हा व्यवस्थेचा पाया बनला. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेबाबत सर्व निर्णय घेण्याचे काम हे शिक्षणतज्ज्ञांवर सोपवले गेले, राजकीय हस्तक्षेपाला जागा राहिली नाही.
प्रत्येक विद्यार्थी महत्त्वाचा. अभ्यासक्रम पूर्ण करणे नव्हे. तर विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास साधणे हे शैक्षणिक व्यवस्थेचे लक्ष्य असावे हे ठरवले.
प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो, त्याच्या आवडीनिवडी, शिकण्याची गती वेगळी असते. हे ओळखून सर्वाना एकच पद्धत लागू न करता विद्यार्थ्यांनुसार शिकवण्याची पद्धतसुद्धा बदलणे गरजेचे असते. शिकण्याची प्रक्रिया ही आयुष्यभर चालूच राहते. हे ओळखून अभ्यासक्रम पूर्ण करण्याऐवजी मुलांना शिकते करण्याला महत्त्व दिले गेले. खऱ्या अर्थाने व्यक्तिकेंद्रित शिक्षण घडू लागले.
शैक्षणिक धोरणामध्ये शैक्षणिक उद्दिष्टे ठरवणे, शिक्षणप्रक्रियेला महत्त्व देणे व सातत्यपूर्ण मूल्यमापन करणे या तिन्ही बाबींचा अंतर्भाव हवा हे निश्चित केले.
शिक्षण प्रक्रियेला महत्त्व दिल्याने परीक्षा, चाचण्या या नाकारून प्रत्येक विद्यार्थ्यांकडे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून बघितले जाऊ लागले. प्रत्येक शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्यांशी एक नाते जोडता येते, ज्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक लहानसहान बाबींवर त्याचे लक्ष राहते. विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास साधणे त्यामुळे शक्य होते. त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रत्येक पलूवर शिक्षकाला काम करता येते.
शिक्षक प्रशिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व हवे व त्याकडे एक स्पर्धात्मक व्यवसाय म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन विकसित करायला हवा हे मान्य केले गेले.
शिक्षक प्रशिक्षण व संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत शिक्षकांना असलेले अनन्यसाधारण महत्त्व हे फिनिश शिक्षण व्यवस्थेचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. या बाबतीत फिनलँड जगातील इतर सर्व देशांच्या तुलनेत वेगळा विचार करताना दिसते. शिक्षकांवर टाकण्यात येणारा विश्वास, त्यांना दिले जाणारे स्वातंत्र्य व पर्यवेक्षणाचा अभाव हे बरेच काही सांगून जाते. फिनिश शाळा शासन चालवत असूनही या शाळांमध्ये पर्यवेक्षण होत नाही ही पटण्यासारखी गोष्ट नाही. पण हेच खरे आहे. असे असूनसुद्धा फिनलँडच्या सर्व शाळांचे विद्यार्थी तेवढेच प्रावीण्य मिळवतात याचे आश्चर्य वाटावे. शिक्षक बनण्यासाठी बरेच फिनिश नागरिक उत्सुक असतात, तरीही दहापकी एकच व्यक्ती शिक्षक बनू शकते. शिक्षक प्रशिक्षण विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी स्पर्धा असते. म्हणूनच शिक्षक असणे हे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. यात महिलांचे प्रमाण अधिक आहे हे सांगायला नकोच. देशातले हुशार नागरिक या क्षेत्राकडे वळतात यावरूनच तिथली शिक्षण व्यवस्था कशी आहे याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो.
स्पर्धा नाही!
शिकण्याच्या प्रक्रियेत स्पध्रेचा अडसर ठरू शकतो म्हणून स्पध्रेचा विषय फिनलँडने तर संपूर्णपणे निकालात काढला. सतत परीक्षा घेत मुलांची प्रगती मोजणे, शिक्षकांच्या चाचण्या, शाळांसाठी निकष लावणे या सर्व बाबी या देशाने बाद करून टाकल्या. माध्यमिक शाळेच्या अंतिम टप्प्यावर घेतली जाणारी एक चाचणी सोडली तर हे विद्यार्थी कुठलीच परीक्षा देत नाहीत. मुलांची, शाळांची, शिक्षकांची एकमेकांशी ना तुलना केली जाते, की ना स्पर्धा लावली जाते. तुझा नंबर कितवा हा प्रश्न विचारायची वेळच इथल्या विद्यार्थ्यांवर येत नाही!
प्रत्येक विद्यार्थ्यांला आपल्या आवडीनुसार त्याचे कामाचे क्षेत्र निवडता यावे म्हणून व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन या दोन्हींना अभ्यासक्रमातच समाविष्ट करून घेण्यात आले. सक्तीचे शिक्षण पूर्ण करण्याच्या कालावधीतच मुलांना आपले पुढील शैक्षणिक उद्दिष्ट ठरवता यावे यासाठी या दोन्हींना अत्यंत महत्त्व आहे. बेसिक शिक्षण झाल्यानंतर मुलांपुढे माध्यमिक शिक्षण पूर्ण करणे, व्यावसायिक प्रशिक्षण घेणे किंवा काम शोधणे असे तीन पर्याय असतात. किती शिकायचे हा पर्याय मुलांना लवकर दिल्याने ज्यांना अभ्यासात रस नाही त्यांच्यावर शिकत राहण्याचा व त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांना त्यांना शिकवत राहण्याचा ताण येत नाही. पर्यायाने गळती पण होत नाही.
‘आम्ही एवढे चांगले काम करतो?’
आपण किती उत्तम काम करत आहोत हे फिनलँडमध्ये कुणालाच माहीत नव्हते. जेव्हा २००० साली आंतरराष्ट्रीय पातळीवरची पिसा चाचणी पहिल्यांदा घेतली गेली तेव्हा व नंतरच्या २००३, २००६, २००९ मध्ये घेतल्या गेलेल्या चाचणीत फिनलँड देशातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उत्तम यशाने जगाचे लक्ष वेधून घेतले. फिनलँडच्या विद्यार्थ्यांना उत्तम गुण तर मिळालेच, पण इतर देशांच्या तुलनेत या देशातील सर्वाधिक विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादित केले. पिसाच्या वाचन, गणित व विज्ञान या तिन्ही चाचण्यांत बहुतांश फिनलँडच्या विद्यार्थ्यांना उत्तम गुण मिळाले. एवढेच नाही, तर या देशातील सर्व शाळांचे विद्यार्थी या चाचणीत तितकेच यशस्वी झाले.

शिक्षक बनण्यासाठी बरेच फिनिश नागरिक उत्सुक असतात, तरीही दहापकी एकच व्यक्ती शिक्षक बनू शकते. शिक्षक प्रशिक्षण विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी स्पर्धा असते. म्हणूनच शिक्षक असणे हे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते.

अचानक जगातील शिक्षणतज्ज्ञांचे लक्ष फिनलँडकडे वेधले गेले, आणि त्यानंतर फिनलँडच्या शिक्षण व्यवस्थेचा सखोल अभ्यास सुरू झाला. आकडेवारी तपासली गेली, अनेक लेख, शोधनिबंध लिहिले गेले. फिनलँडच्या शाळांना, तिथल्या नॅशनल बोर्ड ऑफ एज्युकेशन या शिक्षणाचे धोरण ठरवणाऱ्या शासकीय संस्थेला अक्षरश: हजारो लोकांनी भेटी दिल्या. इतक्या की फिनलँड देश हा शिक्षण क्षेत्रातील एक पर्यटन स्थळ बनला! फिनलँडच्या शासनाने तर चक्क आपल्या शिक्षण व्यवस्थेबद्दल इतर देशांना माहिती देण्यासाठी एका दूताची नेमणूक केली.
फिनलँड देश हा भारतातील एका मोठय़ा शहराएवढा देश आहे. पुणे शहरापेक्षा थोडा मोठा. ५२.४ लाख लोकसंख्येच्या या देशात ३७०० शाळांमधून ४४,४३३ शिक्षक शिकवतात. मात्र गुणवत्तेबाबत या सर्व शाळांची कामगिरी तेवढीच मोठी आहे. ९३% विद्यार्थी फिनिश शाळांतून आपले पायाभूत वा व्यावसायिक शिक्षण पूर्ण करतात, तर जवळ जवळ ६६% विद्यार्थी पदवीच्या शिक्षणाकडे वळतात. सर्व स्तरांवरचे शिक्षण शासन मोफत पुरवत असले तरी अमेरिकेच्या तुलनेत प्रत्येक विद्यार्थ्यांप्रती होणारा खर्च कमीच आहे. हे आकडे खूप बोलके आहेत. हेलसिन्कीच्या एका शाळेच्या मुख्याध्यापिका, अर्जारिता हेक्किनेन या शिक्षिकेचे मत बोलके होते. ती म्हणाली, ‘‘मला अजूनही आश्चर्य वाटते. आम्ही इतके चांगले काम करत होतो हे आमच्या लक्षातच नाही आले!’’
आमच्या तर अजूनही हे लक्षात आलेले नाही. आपल्याकडे शिक्षण ही राज्याच्या यादीतली बाब आहे व जिल्हा पातळीवर, शहर पातळीवर शिक्षण मंडळांच्या आधिपत्याखाली आपली शिक्षण व्यवस्था येते. या मंडळांना कायद्याने खूप स्वातंत्र्य दिले असतानाही जगातील सर्वोत्तम शिक्षण व्यवस्थेकडून आपण काही धडे घेत नाही. आपल्याकडेही अनेक शिक्षणतज्ज्ञ आहेत, अनेक प्रयोग होत आहेत, पण प्रत्यक्षात निर्णय घेताना मात्र शिक्षणशास्त्राचा आधार घेतला जात नाही.
ते तर जाऊ द्या. भावी पिढीचे शिक्षण हे तर आपल्यासाठी क्षुल्लक बाब आहे. मुलांना लागणारी मोकळी मदाने, मोक्याच्या ठिकाणी असलेल्या शाळांच्या इमारती या आपल्यासाठी बाजारी वस्तू आहेत. पुण्यातील गरवारे बालभवनाची जागा बळकावण्याचा प्रयत्न म्हणूनच सातत्याने होत राहतो.
कधी शहाणे होणार आपण?
response.lokprabha@expressindia.com