८ मार्च २०१३
मथितार्थ
चित्रकथी

कव्हरस्टोरी
जालना आणि फिनलॅँड शिक्षणाचा आनंदमार्ग!
अभियानाने शिक्षकांना दिले चैतन्य..
आवडते मज माझी शाळा
मुलांची चौकसबुद्धी वाढली! - बी. राधाकृष्णन (आय.ए.एस.)
आनंदाने शिकता शिकता..

नियोजन

यूथ

सेकंड इनिंग
संमेलन
चिंतन
आरोग्यम्
वादविवाद
क्रीडा

स्टार रेसिपी

विज्ञान-तंत्रज्ञान
एकपानी
कविता
भंकसगिरी
शब्दरंग
सिनेमा
माझं शेतघर
लग्नाची वेगळी गोष्ट
आधी केले..
पर्यटन
क्राईम
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

चित्रकथी

हुसेनची खेळणी : शोध आणि बोध
विनायक परब

मकबुल फिदा हुसेन म्हणजे जाडसर ठाशीव रेषा, तजेलदार रंग आणि रंगाचा प्रभावी फटकारा, असेच समीकरण गेली काही दशके झाले होते. २०११ साली त्यांचा कुंचला विसावला तोपर्यंत हुसेन यांनी सतत नवनवीन प्रयोग करून पाहिले. प्रयोगाशील चित्रकार असाही त्यांचा एक वेगळा परिचय होता. भारतीय चित्रकलेला जागतिक स्तरावर नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हुसेन यांच्या नावावर नोंदलेले आहे. सध्याच्या भारतीय चित्रकारांना मिळणाऱ्या दाम, काम आणि मान यांच्यामागची बाजारपेठेतील पायाभरणी हुसेन यांनीच केली आहे. अनेक मोठय़ा व्यक्ती किंवा कलावंताच्या बाबतीत असे होत असते की, त्या व्यक्तींनी या जगाचा निरोप घेतल्यानंतर त्यांच्याबाबतची चर्चा होतच राहाते. अर्थात त्याला कारणेही तशीच असतात. त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी नव्याने कळलेल्या असतात किंवा त्यांनी केलेल्या अनेक गोष्टींचा नव्याने अर्थ लागलेला असतो. गेल्या काही महिन्यांमध्ये हुसेन यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. अर्थात त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाची चर्चा झाली ती त्यांच्या चित्रांनी घेतलेल्या ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणांमुळे. तसेच वादाचे वादळ आयुष्यभर सोबत घेऊन फिरलेल्या हुसेन यांचे नाव त्याच वादांमुळे त्यांच्या मृत्यूनंतरही चर्चेत राहिले. पण या खेपेस त्यांचे नाव चर्चेत येण्याचे कारण सर्वस्वी वेगळे आहे.
या चर्चेला सुरुवात झाली ती गेल्या वर्षी साधारणपणे ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात. जागतिक चित्र- शिल्प लिलाव कंपनी असलेल्या सद्बीजने न्यूयॉर्क शहरामध्ये दक्षिण आशियातील कलात्मक बाबींचा एक लिलाव आयोजित केला होता. त्यासाठीचा कॅटलॉग त्यांनी जारी केला. लिलावापूर्वी जारी केल्या जाणाऱ्या या कॅटलॉगला अनन्यसाधारण असे महत्त्व असते. त्यामध्ये लिलाव होणाऱ्या कलाकृतीची सर्व अधिकृत माहिती, पूर्वेतिहास नोंदविलेला असतो. या कॅटलॉगमधील एका बाबीने भारतीय कलाजगताचेच नव्हे तर जागतिक कलाजगताचे लक्ष त्या बाबीकडे वेधले गेले. हुसेन हे एक प्रयोगशील चित्रकार आहेत, हे सर्वानाच माहीत होते. पण त्यांनी कधीकाळी लहान मुलांची खेळणी डिझाइन करण्याचे त्याचप्रमाणे केवळ तेवढय़ावरच न थांबता लाकडी खेळणी तयार करण्याचे कामही आवडीने केले, याची कलाजगताला फारशी कल्पना नव्हती. अशा वेळेस या कॅटलॉगमध्ये प्रसिद्ध झालेल्या त्या नोंदीने अनेकांचे डोळे खाड्कन उघडले. हुसेन यांनी तयार केलेली लाकडाची ती दोन खेळणी त्या लिलावामध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. त्यांच्या ठरविण्यात आलेल्या नियोजित किमतीपेक्षाही अधिक चांगली किंमत त्या खेळण्यांना मिळाली. ती प्रत्येकी १८.८५ लाखाला विकली गेली. अर्थात ती हुसेन यांनी तयार केलेली खेळणी होती, त्यामुळेच किंमत अधिक मिळाली हे सांगणे न लगे!
आणखी एक दुसरा आंतरराष्ट्रीय लिलाव त्यानंतर आणखी काही महिन्यांमध्ये झाला. त्यामध्ये हुसेन यांनी तयार केलेली आणखी दोन खेळणी होती. त्यात एक तबलावादक तर एक ढोलकवादक या दोन खेळण्यांचा समावेश होता. झाले असे की, हुसेन चक्क एक दोन नव्हे तर सहा वर्षे खेळणी डिझाइन करण्याचे आणि त्याचबरोबर प्रत्यक्षात ती तयार करण्याचेही काम करत होते, असे पहिल्या कॅटलॉगमधील नोंदींमधून कलासंग्राहकांच्या लक्षात आले आणि मग या धनाढय़ संग्राहकांनी हुसेन यांच्या खेळण्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. अजून काही महिन्यांत किंवा वर्षभरात अशी आणखी काही खेळणी प्रकाशात आली आणि त्यांनाही कोटींची किंमत मिळाली तर आश्चर्य वाटून घेण्याचे काही कारण नाही.
सद्बीजच्या चित्रलिलाव कॅटलॉगमधील नोंद अतिशय रंजक आहे, ती याप्रमाणे.. ‘१९४२ साली हुसेन यांना पहिला मुलगा झाला, त्याचे नाव शफाअत. अर्थात त्यावेळेस त्यांना नियमित पगार मिळणाऱ्या नोकरीची गरज होती. त्यामुळेच त्यांनी चित्रपटाची होर्डिग्ज रंगविणे सोडून दिले आणि मुंबईतील फॅन्टसी फर्निचर या दुकानामध्ये नोकरी स्वीकारली. फर्निचर आणि खेळणी यांचे डिझाइन करण्याचे प्रमुख काम त्यांच्याकडे होते. त्यांनी दिलेल्या खूप छान संकल्पनांमुळे त्यांची खेळणी अतिशय लोकप्रिय ठरली. ती सुंदर आणि कल्पक होती. त्यांनी त्यावेळेस पहिले खेळणे डिझाइन केले होते ते आपल्या मुलासाठी. त्यानंतर त्यांची मुलगी रईसा हिचा जन्म झाला. तेव्हापासून त्यांनी मग लाकडी खेळणी स्वत: तयार करण्यास सुरुवात केली. एकूण तब्बल सहा वर्षे हुसेन यांनी या फर्निचरच्या दुकानात काम केले. अर्थात चांगल्या कामामुळेच त्यांचा पगार वेळोवेळी वाढविण्यात आला. त्यांनी इथे ६ रुपये पगारावर नोकरी स्वीकारली होती. हे काम सोडताना त्यांचा पगार ३०० रुपयांपर्यंत पोहोचला होता. १९४७ साली त्यांनी ही नोकरी सोडली. त्यानंतरही बराच काळ ते खेळणी तयार करत होते. त्यानंतर पुन्हा एकदा १९७५ सालाच्या आसपास त्यांनी पुन्हा एकदा अशीच खेळणी तयार करण्याचा घाट घातला होता. अर्थात त्यावेळेस लाकडाऐवजी दुसरे माध्यम होते..’
सद्बीजच्या या लिलाव विक्रीमध्ये हुसेन यांची आजवर फारशी प्रकाशात न आलेली ही लाकडी खेळणी येण्यासाठी निमित्त ठरले ते एबी आणि जॅन वेइसब्लाट. यातील एबी यांनी १९५३ साली त्यांना मिळालेल्या फोर्ड फाऊंडेशनच्या शिष्यवृत्तीच्या निमित्ताने मुंबईत येऊन स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. समकालीन भारतीय चित्रकार, कलावंतांशी त्यांची चांगली मैत्री होती. त्यांनी त्यांची चित्रे जमवली. त्यांच्याच संग्रहामध्ये ही खेळणी होती. हुसेन यांनीच ती खेळणी त्यांना दिली होती. त्यातील बैलगाडी आणि टांगा ही दोन खेळणी या सद्बीजच्या चित्रलिलावामध्ये विक्रीसाठी होती. ही खेळणी दिल्ली आर्ट गॅलरीचे आशीष आनंद यांनी विकत घेतली आहेत. आता आनंद यांच्या संग्रहात हुसेन यांची एकूण सहा खेळणी आहेत.
हुसेन यांच्या या खेळण्यांना कलेतिहासातही तेवढेच महत्त्व राहील, याचे कारण आपल्याला लक्षात येईल ते ही खेळणी आणि त्यांची चित्रे पाहिल्यानंतर. सुमारे १९४७ पर्यंत त्यांनी खेळण्यांच्या डिझाइनचे आणि प्रत्यक्ष ती तयार करण्याचे काम केले. हे ते वर्ष आहे ज्यावेळेस प्रसिद्ध चित्रकार एन. एस. बेंद्रे यांनी गळ घातल्यानंतर हुसेन प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपमध्ये येऊन दाखल झाले आणि त्यांनी कॅनव्हॉसवर चित्र काढण्यास सुरुवात केली. इथे त्यांच्यातील चित्रकाराच्या जीवनाला कलाटणी मिळाली असे मानले जाते. पण बारकाईने पाहिले तर असे लक्षात येईल की, ती कलाटणी कदाचित त्याआधी म्हणजेच १९४७ पूर्वी मिळालेली असावी. अर्थात त्यासाठी या खेळण्यांचे निरीक्षण तेवढेच बारकाईने करावे लागते. मग लक्षात येईल की, त्यांच्या चित्रांमध्ये काही आकार टोकदार किंवा कोनात्मक असे दिसतात. हुसेन यांच्या सुरुवातीच्या काळातील म्हणजेच अगदी १९६० पर्यंतच्या चित्रांमध्ये तर हे कोनात्मक आकार स्पष्टपणे जाणवावेत, असेच आहेत. त्याची सुरुवात या खेळण्यांमध्ये झालेली दिसते. म्हणजेच कदाचित हुसेन यांच्यानंतर विकसित होत गेलेल्या त्या कोनात्मक शैलीचा जन्म बहुधा या खेळण्यांमध्ये झालेला दिसतो. कदाचित ही सारी खेळणी ही लाकडाची असण्यामध्येच त्याचे मूळ दडलेले असावे. कारण लाकडाला गोलाकार देण्यापेक्षा त्याला कोनात्मक आकार देणे तुलनेने सोपे जाते. अर्थात हुसेन हे प्रतिभावान कलावंत होते, त्यामुळे त्यांनी त्या कोनात्मक बाबींमधून स्वत:ची अशी एक वेगळी शैली विकसित केली जी आजही त्यांचा ठसा म्हणून सर्वत्र ओळखली जाते. आता येणाऱ्या काळात या खेळण्यांमधील हुसेन यांच्या शैलीवर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. कारण या खेळण्यांमध्येच हुसेन यांचे तजेलदार रंगकामही पाहायला मिळते. नंतर हेच तजेलदार रंगकाम त्यांच्या चित्रांचा अखेपर्यंत विशेष राहिले.
आता सर्वत्र प्लास्टिकची खेळणी पाहायला मिळतात किंवा मोडय़ुलर ब्लॉक्स असलेली खेळणी दिसतात. ही नव्हती त्यावेळेस भारतीय अधिमनावर केवळ लाकडाच्या खेळण्यांचेच राज्य होते. त्या खेळण्यांच्या इतिहासाचीही आठवण हुसेन यांच्या या खेळण्यांच्या निमित्ताने जुन्या पिढीला होईल. या खेळण्यांच्या निमित्ताने आणखी एक गोष्ट पुन्हा अधोरेखित झाली आहे ती म्हणजे प्रतिभावान कलावंताने जीव लावून केलेली साधीशी गोष्टदेखील इतिहासात त्याची नोंद घेण्यास भाग पाडते!
(ताजा कलम : सद्बीजच्याच या कॅटलॉगमधील नोंदीनुसार हुसेन यांनी फर्निचर डिझाइन करण्याचेही काम केले. त्यामुळे आता संग्राहकांनी हुसेन यांनी डिझाइन केलेल्या फर्निचरचा शोध सुरू केल्याचे समजते!)
response.lokprabha@expressindia.com