८ मार्च २०१३
मथितार्थ
चित्रकथी

कव्हरस्टोरी
जालना आणि फिनलॅँड शिक्षणाचा आनंदमार्ग!
अभियानाने शिक्षकांना दिले चैतन्य..
आवडते मज माझी शाळा
मुलांची चौकसबुद्धी वाढली! - बी. राधाकृष्णन (आय.ए.एस.)
आनंदाने शिकता शिकता..

नियोजन

यूथ

सेकंड इनिंग
संमेलन
चिंतन
आरोग्यम्
वादविवाद
क्रीडा

स्टार रेसिपी

विज्ञान-तंत्रज्ञान
एकपानी
कविता
भंकसगिरी
शब्दरंग
सिनेमा
माझं शेतघर
लग्नाची वेगळी गोष्ट
आधी केले..
पर्यटन
क्राईम
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

भंकसगिरी्

खायचे अन् दाखवायचे..
विसोबा खेचर

आमुचा त्या सर्व बूमबहाद्दरांस व वृत्तवाचाळांस एकच आजचा सवाल आहे, की आजवर च्यानेलांवरील एकातरी मालिकेत कोणी साधासुधा विवाह सोहळा दाखविलेला आहे काय? साधासुधा जाऊ दे, किमान सामूहिक विवाहसोहळा तरी दाखविलेला आहे काय..?

हे च्यानेलवाले स्वत:स काय समजतात तरी काय?
सात्त्विक व तेजस्वी संतापाने आम्ही दूरनियंत्रकाची कळ दाबून चित्रवाणी संच बंद केला, तेव्हा आमुच्या मनी केवळ हेच एक सवालिया निशान फडफडत होते.
व आमुचे बरोबर व योग्यच होते! चूक च्यानेलांचीच होती! व आता मात्र ते सर्व पाप आमुच्या माथ्यावर मारत होते.
मनी आले, कोणाची नोटीस आली तरी बेहत्तर, (अगदी मुद्दे चुकीचे असले तरी पर्वा नाही,) प्रंतु रोखठोक ठोकून काढावे एकेकाला!
आताशा अंगी ऐशी वीरश्री काही रोजरोज संचारत नाही! शिवाय ती परवडत नाही! आíथक अरिष्टे कशी दाटून आली पाहताय ना!.. पण आता ती संचारली होती. तेव्हा आम्ही त्वेषाने अंगावरील चादर फेकून दिली. खाटेवरी उठून बसलो. कचेरीतून आणलेले सफेदफेक ए-फोर ताव घेतले. हाती तल्वार तशी आमुची बॉलपॉइंट लेखणी घेतली व लिहू लागलो..
‘हे च्यानेलवाले स्वत:स काय समजतात तरी काय? या वृत्तवाहिन्या ऊठसूट समाजास नीतिमूल्यांचे पाठ देतात, किंतु त्यांच्यामुळेच हा समाजपुरुष बिघडत चाललेला आहे. च्यानेल नव्हते तेव्हा आपुला समाज किती सभ्य व सुसंस्कृत व नतिक होता! प्रंतु आता त्यांचेमुळे अवघा समाज किडला आहे. च्यानेलांवरील गुन्हेमालिकांमुळे समाजात गुन्हेगारी फोफावली आहे व त्यांवरील आयटमी नृत्यगीतदर्शनाने अनतिकता वाढली आहे.
संतापाची बाब म्हणजे, एकीकडे असे समाजघातक काम करीत असणारे हे च्यानेलवाले आपुल्या वृत्तवाहिन्यांतून मात्र नाक वर करून दुटप्पीपणाची हद्द करीत आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणून अलीकडील लग्नसोहळ्यांवरील च्यानेली टीकेकडे पाहता येईल.
आमुचा त्या सर्व बूमबहाद्दरांस व वृत्तवाचाळांस एकच आजचा सवाल आहे, की आजवर च्यानेलांवरील एकातरी मालिकेत कोणी साधासुधा विवाह सोहळा दाखविलेला आहे काय? साधासुधा जाऊ दे, किमान सामूहिक विवाहसोहळा तरी दाखविलेला आहे काय.. एक रामायण मालिका वगळता? उलट लग्न म्हटले की जसे त्यांचे अंगी राष्ट्रवादी नेते संचारतात! केवढे ते भरजरी कपडे, केवढे ते मंडप, किती त्या छानछान करवल्या, कसे ते हिरवे हिरवे मेहंदी समारंभ आणि कशा त्या गोडगोड अंताक्षऱ्या!
आता हे सर्व पाहिल्यानंतर कोणास जर वाटले, की आपुल्याही बबडीचे वा बबडय़ाचे शुभमंगल सावधान असेच भव्यदिव्य व्हावे. त्यांचे विवाहास नितीन देसायांचे सेट असावेत, मनीष मल्होत्राने त्यांचे कपडे डिझाइन करावेत, त्यांचे दागिने यावेत तनिष्कमधून, त्यांचे वरातीत नाचावेत फिल्मी सितारे अन् संजीव कपूरने रांधावे लक्षलक्ष वऱ्हाडय़ांकरिता कॉन्टिनेन्टल भोजन, तर त्यात काय चुकले? प्रंतु या च्यानेलवाल्यांचे..’
आम्ही येथे आणखीही काही रोखठोक व कडक भूमिका मांडून च्यानेलांचे तद्दन वस्त्रहरण करणार होतो. ऐसे ज्वलजहाल विचार मांडणार होतो, की ते वाचून खीनभर सामनाकारांसही आपुले पत्र म्हणजे अगदीच मुंब सकाळ ऐसे वाटले असते! प्रंतु हाय! तेवढय़ात आमुच्या खोलीच्या कवाडावरील घंटी टरटरली. आता कोण पातले या समयी मरावयास, ऐसा सुस्वागतमयी सुविचार करीत आम्ही कवाड खोलले. पाहतो तो दारी आमुचे परमशेजारी रा. रा. लेले.
‘अरे, लेलेसाहेब, या या.. आता तुमचाच विचार करीत होतो..’ ऐसे स्वागतबोल बोलत आम्ही त्यांस घरात पाचारले.
‘काय लेखन चाललं होतं वाटतं. डिस्टर्ब तर नाही ना केलं?’ खाटेभोवती पडलेल्या कागदीबोळ्यांकडे पाहत लेलेंनी पुसले.
‘काही नाही, तुमचा कसला आलाय डिस्टर्ब? बसा ना..’ (यास खोटे बोलणे म्हणत नाहीत! आतिथ्यशीलता म्हणतात!)
‘जरा प्रॉब्लेम आलाय एक. तुमचा सल्ला घ्यायला आलो होतो.’
सल्ला म्हटल्याबरोबर आमुचे रक्ताभिसरण एकदम वाढले. चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या. दोन्ही मेंदू ताजे टवटवीत झाले. एकंदर अशा वेळी कोणत्याही मध्यमवर्गीय नोकरमान्याचे जे होते तेच आमुचे झाले! पुन्हा त्यात आम्ही पडलो पत्रकारू. म्हणजे हा तर आमुचा हक्काचा प्रांत!
‘काय प्रॉब्लेम आहे, लेले?’
आमच्यात आता आपोआपच, नोकरी, शादी, मूठकरणी, वशीकरण, प्रेम, गुप्तधन, मूल न होणे अशा कोणत्याही समस्येवर गॅरंटी के साथ शंभर टक्के उपाय सुचविणाऱ्या बंगाली बाबाचा आत्मविश्वास संचारला होता.
लेलेंनी नमनास तेल न जाळता थेटच सांगितले, ‘लग्न करतोय.’
‘ऑँ’ या लेलेंना आम्ही आतापर्यंत अगदी अण्णा समजतो होतो!
‘नाही म्हणजे, मुलाचे लग्न काढलेय.’
‘हां..!’
‘जमलंय सगळं, पण..’
‘काही पशांची अडचण आहे का?’ आम्ही भीतभीत विचारले. ते होय म्हणाले तर काय, या विचाराने आमुच्या उदरी लोणारइतका खड्डा पडला होता.
‘काही पशाची काळजी नाही..’
(खीखीखी! हा लेल्या स्वत:स काय ब्रुनेईचा सुल्तान समजतो की काय? - ही अर्थातच आमुची सोलिलोकी!)
‘आपला सगळा पीएफ तसाच पडून आहे. प्रॉब्लेम जरा वेगळाच आहे. त्याचं काय आहे, आमचं हे पहिलंच कार्य. तेव्हा ते जरा थाटात व्हावं अशी आमच्या हिची इच्छा आहे.’
‘बरोबरच आहे. लग्न कसं थाटात झालं पाहिजे!’ (आपणांस सांगावयास काय जाते? ईएमआय थोडेच आपणांस भरावयाचे असतात? हीसुद्धा सोलिलोकीच.)
‘थाटात करता येईल हो. आपली फुल तयारी आहे. पण बाहेर काय चाललंय ते पाहताय ना? तिकडं मराठवाडय़ात दुष्काळ पडलाय. अशा वेळी थाटामाटात लग्न केलं, तर लोक लगेच नाव ठेवणार. बरं नाही केलं, तरी नावं ठेवणार! मोठी पंचाईत झालीय..’ लेलेंची समस्या खरेच थोर होती.
‘हॅ! लोकांचा विचार सोडा, लेले. लोकांना काय? लग्न काय रोज रोज होतं काय? नाही म्हणजे हल्ली होतात! हॅहॅहॅ! पण आपलं तसं नाही. तेव्हा जोरात बार उडवून द्यायचा.. पण मग ते इन्कम टॅक्सचं.. त्यांची धाड पडली तर?’
(साला, हा लेल्या स्वत:स खरोखरंच ब्रुनेईचा सुल्तान समजतो!)
‘पण आता इन्कम टॅक्सचं लफडं असतं खरं. पण त्यावर एक उपाय आहे.. म्हणजे बघा, साप पण मरेल आणि काठी पण तुटणार नाही. पण आधी सांगा, तुमचा लग्नाचा बेत कसा आहे?’
‘पहिल्यांदा म्हणजे आमंत्रणपत्रिका. ती दोन प्रकारची. एक नातेवाईकांसाठी.. ती जरा साधी असली तरी चालेल, पण दुसरी इंग्रजीतली, ऑफिसात वगरे वाटण्यासाठी भारीतलीच पाहिजे. म्हणजे अशी एकात एक एकात एक बरीच पाकिटं असतात बघा, तशी. बरं, आपल्याकडे पाहुणे भरपूर येणार. त्यामुळे मोठा हॉल बुक करणार.. एरकंडिशन! तिथं लायटिंगसुद्धा पायजे अशी लुकझुकवाली!’
‘किती पाहुणे येतील?’
‘शंभर तरी येतील!’
‘म्हणजे तेवढय़ांचं जेवण आलं. त्यात सकाळचा नाश्ता.’
‘त्यात हयगय करायची नाही! बुफे ठेवायचा. दोन भाज्या, दालतडका, जिरा राइस, व्हेज बिर्याणी, रोटी, मिठय़ामध्ये रोशोगुल्ला नाही तर गुलाबजामुन.. झालंच तर, पाणीपुरीचा, चायनीजचा स्टॉल. आणि आइसक्रीम पायजेच. एकदम पेशवाई थाटात बुफे झाला पाहिजे! आपली काही मंडळी जरा त्यातली आहेत. त्यामुळे रात्री त्यांच्यासाठी जरा खाण्यापिण्याची वेगळी व्यवस्था करावी लागेल. पुन्हा मिरवणुकीला ब्रास बँड अन् डीजे. नवरदेवासाठी कार नको. छान अबलख घोडा आणायचा..’
‘एकंदर तुम्ही म्हणजे लेले, आमच्या शरद पवारांची झोप उडवणार बहुतेक! हॅहॅहॅ!’ आम्ही माफक विनोद केला. या वाक्यावर लेलेही हसले. (एरवी आमचे विनोदी लेखच्या लेख हा पुणेकर मख्ख चेहऱ्याने वाचतो व वर, तुम्ही गंभीर-वैचारिक बरे लिहिता म्हणून प्रतिक्रिया देतो!)
‘पण विसूभाऊ, हे सगळं केलं आणि उद्या त्या च्यानेलवाल्यांनी बातम्या लावल्या- निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याचे शाही शतभोजन - म्हणजे हे केवढय़ाला पडायचं?’ लेलेंनी सवाल केला. (अन् आम्ही मनोमन लेलेंच्या मस्तकातील हवेस सलाम केला!)
‘त्याची काळजी करू नका, लेले. आपल्याकडं त्यावर नामी तोडगा आहे.’
‘काय? काय?’
‘काय करायचे, की पत्रिकेत जाहीर करून टाकायचं, की या लग्नास येणाऱ्या अहेरातील पन्नास टक्के भाग मुख्यमंत्री साहायता निधीस दिला जाणार आहे. याचे दोन फायदे- आहेर आणू नयेत असं नाइलाजाने छापावं लागणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली सामाजिक बांधीलकीही त्यातून दिसेल. बरं, जेवणाला बुफे म्हणायचंच नाही. अन्नदान म्हणायचं! म्हणजे तिथंही सामाजिक बांधीलकी दिसेल. आणि बाकीचा थाटमाट हा केवळ मंदीच्या काळातही डेकोरेशनवाले, बँडवाले, घोडेवाले, शिंपी, कापड दुकानदार, केटर्स यांचं पोट भरावं या सद्हेतूने केलेला आहे, असं ज्याला-त्याला सांगत सुटायचं. शिवाय, दुष्काळी परिस्थितीमुळे मानपानादी समारंभ रद्द करण्यात आले आहेत, असंही जाहीर करायचं.. काय सांगावं, कदाचित आदर्श विवाहसोहळा म्हणून तुमचा बाइटही दाखवतील च्यानेलवर!’
आम्ही हे बोललो व लगेच मनी आले, लेलेंप्रमाणेच आमचे परमलाडके नेते भास्करराव जाधव आम्हांस आधीच भेटले असते तर? लेकाचे व लेकीचे लग्न शाही थाटात केले म्हणून त्यांस एवढे भोगावे तरी लागले नसते.
आपल्याकडे खायचे व दाखवायचे दात वेगवेगळे ठेवले की पत्रकारांपासून मतदार बंधुभगिनी ते नेत्यांपर्यंत सकलजन खूश राहतात, हे त्यांस वेळीच समजले असते!
response.lokprabha@expressindia.com