८ फेब्रुवारी २०१३
मथितार्थ : तहात हरणारा देश!
चित्रकथी : समकालीन स्पंदने!
कव्हर स्टोरी
प्रवाह : संघात घडलं तरी काय?

सुवर्णमहोत्सव : वाटचाल फ्रीमेसनरीची

स्वागत : प्रेमाची गोष्ट
क्रीडा : नोव्हाक जोकोव्हिच आणि व्हिक्टोरिया अझारेन्का
आरोग्यम् : खासगी रु ग्णालयांना कायद्याची वेसण
यूथ : जिद्दीला सलाम!
विज्ञान तंत्रज्ञान : बायोसेन्सची संवेदना
युवा : जग थिरकतंय ‘गंगन्म स्टाइल’वर..
भंकसगिरी : म्हणे गुलाबी थंडी!
कवितेचं पान
सेकंड इनिंग : नीज न ये तर..

एकपानी : काय फायदा?

शब्दरंग : सत्त्वशीला सामंत
सिनेमा : तिरपागडी प्रेमकथा!
लग्नाची वेगळी गोष्ट : फॅमिली मेंबर
लग्नाची वेगळी गोष्ट : ‘लग्नगाठ’
वाईल्डक्लिक : गुजरातनो सृष्टिवैभव
पाठलाग : ‘सिनेमा स्टाइल’ उकल
माझं शेतघर : कुटुंबाचे अर्थनियोजन
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

शब्दरंग

आवळेजावळे वर्ण-३
सत्त्वशीला सामंत

response.lokprabha@expressindia.com
( रा-ल-ळ, ळ-य, स-ह, ऋ-५ )
मराठी या प्राकृत भाषेचं संस्कृतशी निकटचं नातं असलं तरी कन्नड, तेलुगु वा तमिळ इ. दाक्षिणात्य भाषांशीहि तिचा संपर्क आल्यामुळे तेथून मराठीत ‘ळ’ची आवक झालेली दिसते. त्यामुळे मराठीत संस्कृत ‘ल’ आणि दाक्षिणात्य ‘ळ’ यांची बेमालूम सरमिसळ झालेली आहे. याची साक्ष म्हणजे कमल-ळ, नल-ळ, नाल-ळ, बाल-ळ, अजागल-ळ, खल-ळ, काल-ळ, शूल-ळ, माला-ळा, मूल-ळ, स्थल-ळ इ. सारखी असंख्य उदाहरणं दाखवता येतील. पण तरीही क्वचित प्रसंगी आपली फसगत होऊ शकते.
संस्कृतमधून आलेला ‘छल’ हा कपटवाचक शब्द आहे, तर ‘शब्दच्छल’ या शब्दप्रयोगात तो play of words अशा अर्थाने वापरल्याचं आढळतं. पण मराठीत त्या ‘ल’चा ‘ळ’ झाला की आपला ‘छळ’ (torture) सुरू होतो. कायद्याचा ‘अंमल’ होतो, मात्र आपण विश्रांतीसाठी ‘अंमळ’ टेकतो. ‘मंडल’ हा शब्द बहुश: circle या अर्थाने वापरला जातो, तर ‘मंडळ’ हा शब्द board या अर्थाने रूढ झालेला आहे. याचा अर्थ असा की, ‘ल’ आणि ‘ळ’ या दोहोंनाही मराठीत स्वतंत्र अस्तित्व आहे.
प्रमाण मराठीतील हा ‘ळ’ अहिराणी बोलीत वेगळंच रंगरूप दाखवतो. बहिणाबाई चौधरी यांच्या अहिराणी बोलीत तो ‘य’ रूपात प्रकटतो. ‘देव अजब गारोडी’ या कवितेत त्या म्हणतात-
ऊन वाऱ्याशीं खेयतां (खेळता)
पर्गटले दोन पानं
टाया (टाळ्या) वाजवती पानं
दंग देवाच्या भजनीं।
शहरी माणसाला बोलीच्या या लकबी कळणं कठीण. त्यांतूनच मग गमतीजमती घडतात. असाच एक किस्सा-
‘काया मातीत मातीत, तिफन चालते..’ ही विठ्ठल वाघांची गाजलेली कविता. एका शहरी प्राध्यापकांनी ‘ही काया म्हणजे शरीर अखेरीस मातीलाच मिळणार’ असा सूर लावून ती शिकवायला सुरुवात केली म्हणतात- खरं-खोटं कोण जाणे! बरोबरच आहे. शहरी पांढरपेशा माणसाला ‘काळ्या मातीचा’ स्पर्श नाही आणि गावरान बोलीचा गंध नाही. खानदेशातील एका खेडय़ातील घरी शहरचा पाहुणा आला होता. तेवढय़ात घरातली लहान मुलगी बाहेरून आली आणि काही तरी शोधू लागली. पाहुण्याने विचारलं, ‘‘काय शोधतेस?’’ मुलगी म्हणाली- ‘‘माय कुठीं दिसत न्हायी.’’ पाहुणा म्हणाला, ‘‘कुठं बाहेर गेली असेल’’ मुलगी बावरून उत्तरली- ‘‘म्यां खिडकीत तर ठिवली हुती.’’ पाहुणा आणखीच बावचळला. थोडक्यात काय, तर सगळा समजुतीचा घोटाळा. मुलीची माळ हरवली होती, पाहुण्याला वाटलं तिची आई हरवली.
गुजरातमध्येंहि शहरी भाषा आणि गांवबोली या दोहोंतील फरकामुळे ‘स-ह’चे घोटाळे होतात. दक्षिण गुजरातमध्ये प्रादेशिक अंतरांमुळेदेखील हे भेद संभवतात. त्या भागात ‘स’ ऐवजी सरसकट ‘ह’ उच्चारला जातो. उदा.- साग शाकभाजी- हाग, सारूं- हारूं, सुरत-हुरत, इ. म्हणून गमतीने कोणीतरी एक वचन रूढ केलंय-
आशीर्वादं न गृहीयात्।
शतायुरिति वक्तव्ये हतायुरिति वक्ष्यते।।
मतलब असा की, या भागातील व्यक्तीकडून कोणी आशीर्वाद घेण्याच्या फंद्यात पडू नये. कारण आशीर्वाद देणाऱ्याला ‘शतायु भव’ असं म्हणायचं असलं तरी तो मुखावाटे ‘हतायु’ म्हणणार आणि मग ती शापवाणी ठरणार! मात्र या सगळ्या भाषिक गदारोळात सिंधु नदीकाठचे लोक हे ‘सिंधु’ऐवजी ‘हिंदु’ म्हणूनच प्रख्यात झाले ही एक आश्चर्याची गोष्ट नव्हे काय?
इराणमधील झरतुष्ट्र या धर्मसंस्थापकाचे अनुयायी गुजरातमधूनच भारतात प्रवेश करते झाले. त्यामुळे हे ‘स-ह’चे लोण तेथवरहि पोचले. ‘अवेस्ता’ या धर्मग्रंथातील ‘अहुरमज्द’ ही देवता म्हणजे मूळचा संस्कृत ‘असुरमेधावी’ (‘असुर’ हा शब्द ‘असु’ म्हणजे प्राण या शब्दावरून साधलेला आहे) असावा असा विद्वानांचा तर्क आहे.
संस्कृत ‘सप्ताह’ हा फारसीत ‘ह.फ्त:’(ह.फ्ता) झाला. मराठीतहि थोडीबहुत ही प्रवृत्ति दिसते. ‘स्नान’ या शब्दाचा प्रवास पहा- स्नान- सनान- नसान (वर्णविपर्यय) - नहान/ण; (मराठी- नहाणे, हिंदी- नहाना)
इंग्रजी भाषेलाहि हा वाण लागलेला दिसतो. semi (circle) आणि hemi (sphere) या दोहोंतील साम्य पहावे.
इंग्रजीतील f आणि v या दोहोंचंहि नातं काहीसं असंच आहे calf, half सारख्या शब्दांच्या अनेकवचनी रूपांत v अवतरतो. (calves, halves), तर gustav या विशेषनामाचा उच्चार ‘गुस्ताफ’ असा आहे. जर्मन भाषेत v या अक्षराकृतीचा उच्चार बहुश: ‘फ’ असा होतो. उदा.- vier म्हणजे ‘फीर’ (four चार), तर volk ’‘ चा उच्चार ‘.फोल्क्’ असा असून, त्याचे अर्थ ‘लोक, जनता, राष्ट्र’ असेच आहेत. (फरक एवढाच की जर्मनमध्ये त्या स्पेलिंगमधील ’ चा उच्चार स्पष्ट होतो, तर इंग्रजीत folk’‘ मधील ’ अनुच्चारित असतो.)
यम-यमीपासून सुरू झालेले हे यमल-पुराण सुफळ, संपूर्ण!