२५ जानेवारी २०१३
मथितार्थ : देशप्रेमाची बोलाचीच कढी
चित्रकथी : कचऱ्याचे एव्हरेस्ट
कव्हरस्टोरी : अैसे कैसे झाले भोंदू?
भंकसगिरी : एक इतिहास संशोधन
(भाग दोन)

चर्चा : स्त्रियांच्या असुरक्षिततेला पुरुषांची लैंगिकता जबाबदार आहे का?

वाचन : वाचनसंस्कृती आणि ललित
प्रासंगिक : ..जखमांची उजळणी ६५ वर्षांची!
उपक्रम : पक्षिमित्रांची मांदियाळी..
आरोग्यम् : तुमची आमची दंतकथा
विज्ञान तंत्रज्ञान : खरंच अशनी येणार?
सेकंड इनिंग : निरोगी उतारवयासाठी..
चटक-मटक
चटक-मटक : ओरिएंटल स्पेशल रेसिपीज!
युवा : रेणूची सायकल यात्रा

क्रीडा : भारतीय हॉकीला संजीवनी मिळेल?

पुस्तक : अभ्यासकांसाठी आदर्श
कवितेचं पान
एकपानी : काटेरी हलवा
शब्दरंग : आवळेजावळे वर्ण
सिनेमा :तब्बूचं काय चाललंय?
लग्नाची वेगळी गोष्ट : लग्नासी जाता..विघ्ने येती नाना..
लग्नाची वेगळी गोष्ट : चारचौघींसारखी वेगळी!
पाठलाग : केवळ एका फायलीवरून..
माझं शेतघर : डोळस व्यवहार
संख्याशास्त्र : भाग्यांक
पर्यटन : स्वर्गातून जमिनीवर
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

शब्दरंग

आवळेजावळे वर्ण
सत्त्वशीला सामंत

response.lokprabha@expressindia.com
वेदवाङ्मयातील यम आणि यमी या दोन जुळ्या भावंडांची कथा प्रसिद्ध आहे. त्यावरून ‘यमल’ म्हणजे ‘जुळे’ असा अर्थ सिद्ध झाला. संस्कृतमधील ‘य’ वर्णाचा प्राकृत भाषांत ‘ज’ होण्याची प्रक्रिया बरीच व्यापक आहे. प्राकृत भाषासमूहांत हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती इ. भाषांचा समावेश असून, कित्येक देशी रूपांतरांत ही प्रक्रिया झालेली दिसून येते. यदुनाथ- जदुनाथ (सरकार), यादव- जाधव, यशोदा- जसोदा, जसुमती, यवनिका- जवनिका, यश (वंत)- जश (वंतसिंग), यमुना- जमुना, यूथिका- जूथिका - जूही - जुई, यव-जव, युग- जूं, युगल- जुगल (नंदी), युग्मन- जुगणे, योगी- जोगी, युग- जुग (जुग जियो) अशी अनेक उदाहरणे देता येतील.
संत कबीर एके ठिकाणी म्हणतात-
आए जमराज (यमराज) पलँग चढिम् बैठे..
तर दुसऱ्या ठिकाणी ते म्हणतात..
कटै जमफंद (यमबंध) है।
संत मीराबाई म्हणते-
कृष्ण करो जजमान (यजमान) प्रभु तुम कृष्ण करो जजमान।
जोगिया (योगी) जी छाइ रह्य़ा परदेस।
तर संत सूरदास म्हणतात- प्रभु अंतरजामी (अंतर्यामी) सब जानत।
भारतीय भाषांतील ही प्रवृत्ती आर्ययुरोपीय कुलातील भाषांमध्येही दिसून येते. संस्कृत, प्राकृत व इंग्रजी या सर्व भाषांमध्ये तारुण्यवाचक असे जे शब्द आहेत, त्यामध्ये आपणास याचा प्रत्यय येतो. संस्कृतमधला ‘युवन’ हा हिंदी मराठीत ‘जवान’ होतो, संस्कृत ‘युवती’ ब्रज भाषेत ‘जुवती’ होते (मोहिं कहतिं जुवती सब चोर - सूरदासे), तर इंग्रजीत young, youth सारख्या शब्दांच्या जोडीला) juvenile, juvenility, juvenescence या रूपांतर ‘य-ज’चे सख्य आविष्कृत होते.
जर्मन भाषेच्या लिपीतील या अक्षरांचा काही अपवाद सोडून सर्वसाधारणपणे ‘य’ असा उच्चार होतो. विशेषत; विशेषनामांच्या बाबतीत हे अधिकच खरं आहे. स्विस मानसशास्त्रज्ञ Carl Gustav Jung हा ‘यूङ्’ या नावाने प्रसिद्ध आहे. जर्मन गणिती Carl Gustav Jacobi आणि प्राच्यविद्यापंडित Jacobi हे दोघेही ‘याकोबी’ म्हणून ओळखले जातात. (इंग्रजीतला jacob आणि फारसीतला ‘याकूब’ यांतलं साम्य पाहा.) डॅनिस भाषाशास्त्रज्ञ Otto Harry jesperson याच्या नावाचा उच्चार ‘येस्पर्सन्’ असा आहे. Janus (जेऽनस्) या रोमन देवाचा फारसी अवतार ‘यूनुस/यूनिस’ असा आहेJanuary, June, July ही इंग्रजी महिन्यांची नावे जर्मनमध्ये ‘यानुआर’, ‘यूनी’, ‘यूली’ म्हणून रूपांतरित झालेली दिसतात.
सर्वसाधारणपणे हा प्रवास ‘य’कडून ‘ज’कडे झालेला दिसत असला तरी, क्वचितप्रसंगी तो ‘ज’ ते ‘य’ असा उलटय़ा दिशेनेही झालेला दिसतो. तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगांत ‘याति’ हा शब्द वारंवार आलेला आहे. (‘याति गुणें रूपे काय ते’, ‘यातिहीन मज काय’, ‘याती शूद्र वैश केला वेवसाव’ इ.) म्हणून मी संस्कृत शब्दकोश उघडून पाहिले तेव्हा ‘जात’ या अर्थाने ‘याति’ असा शब्द कोठेही आढळला नाही. त्या अर्थी ‘जाति’ या अर्थाचा मूळ संस्कृत शब्द ‘याति’ असावा अशा गैरसमजापोटी कोणी तरी हे संस्कृतीकरण केले असावे असे मला वाटते.
तीच गोष्ट ‘जार’ आणि ‘यार’ या जोडगोळीची. संस्कृतमध्ये विवाहित स्त्रीचा विवाहबाह्य़ मित्र म्हणजे ‘जार’ व अशी स्त्री म्हणजे ‘जारिणी’; पण फारसीमध्ये तो ‘यार’ होऊन गेल्यावर त्याचा हा हीनार्थ लुप्त होऊन तो निखळ मित्र वा दोस्त झाला. किंबहुना फारसीमध्ये ‘यारी’ वा ‘याराना’ या शब्दांना व्यापक मैत्रीवाचक अर्थ आहे. याउलट, हिंदीमध्ये ‘यार’ला ‘दोस्त, मित्र’ हा व्यापक आणि ‘विवाहबाह्य़ मित्र’ हा संकुचित अर्थदेखील आहे. मराठीतही दोन्ही अर्थ आहेत.
‘य’ आणि ‘ज’ हे बहुतांशाने आवळेजावळेपूर्ण आहेत हे खरं असलं तरी ते दोन्ही अभिन्न आहेत, असं विधान सरसकट करता येत नाही. भाषाशास्त्रीयदृष्टय़ा हे दोन्ही वर्ण एकाच ‘स्वनिमा’चे (phoneme) उपवर्ण (allophones) असं म्हणणं कठीण आहे, कारण काही शब्दांमध्ये ‘य’च्या जागी ‘ज’ घातला तर लगेच अर्थ बदलतो. ‘यान’ म्हणजे ‘वाहन’, पण ‘जान’ म्हणजे ‘प्राण’ (म) ‘यवन’ म्हणजे ‘अनार्य’, ‘म्लेंच्छ’, तर ‘जवन’ म्हणजे ‘वेगवान’ (सं.)
दोन जुळी भावंडं दिसण्यात, बोलण्यात-चालण्यात, इतर वर्तनातही बाह्य़त: हुबेहूब सारखी असली तरी, त्या प्रत्येकाला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं आणि प्रत्येकाचं नशीबही वेगवेगळं असतं. तसंच या आवळ्याजावळ्यांचं आहे - सारखे असूनही वेगळे!