१८ जानेवारी २०१३
मथितार्थ
चित्रकथी

कव्हरस्टोरी
‘कामकोंडी’तील यक्षप्रश्न
गोष्ट धास्तावलेल्या पालकांची दिल्ली बलात्कारानंतरची
गोष्ट धास्तावलेल्या शिक्षकांची दिल्ली बलात्कारानंतरची

क्रीडा

प्रेरणा

प्रासंगिक
उपचार
महिला
आरोग्यम्
चटक-मटक
शेफ निलेश लिमये
शेफ सुधीर पै
युवा
विज्ञान तंत्रज्ञान
द्या टाळी
कवितेचं पान
एकपानी
शब्दरंग
सिनेमा
लग्नाची वेगळी गोष्ट
।। ही तो श्रींची इच्छा।।
जोडीदार
पुस्तक
माझं शेतघर
संख्याशास्त्र
पर्यटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

प्रेरणा

आम्हाला तुमच्या दयेची भीक नको
सोनाली नवांगुळ

कराड येथे नुकतेच तिसरे अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलन झाले. या संमेलनात अपंगाबद्दल असलेल्या समाजाच्या पंगू दृष्टिकोनावर झोत टाकणारे भाषण-

काही वर्षांपूर्वी एक नाटक आलं होतं. ‘ऑल द बेस्ट’ नावाचं. हे नाटक धोधो चाललं, आजही चालतंय. भरत जाधव, अंकुश चौधरी यांच्यासारख्या नटांना याच नाटकानं पहिल्यांदा ग्लॅमर दिलं आणि नंतर नाटक चालतंय म्हटल्यावर कलाकारांच्या चार टीम्स तयार करून नाटय़निर्मात्यानं ढीगभर प्रयोग केले आणि पसेच पसे मिळवले. या नाटकातून बघणाऱ्यांनी काय बघितलं? कसला आनंद घेतला?
- वेगवेगळ्या प्रकारचं अपंगत्व आणि त्यातून निर्माण झालेला विनोद यावर हसणं हे माणूसपणाचं लक्षण आहे की क्रौर्य आहे?
- अशा नाटकाला ना सुजाण नागरिकांनी विरोध केला, ना अपंगांसाठी म्हणून काम करणाऱ्या संस्था-संघटनांनी! काही दिवसांपूर्वी ‘बर्फी’ हा सिनेमा पाहायला गेले होते. या सिनेमातले अनेक तरल आणि भावुक प्रसंगही प्रेक्षकातील तरुण मंडळी आक्षेपार्ह कॉमेंट्स करून उधळून लावत होती. एखाद्या व्यक्तीला अजिबात बोलता न येणं-ऐकू न येणं, दुसरी व्यक्ती ऑटिस्टिक असणं आणि तरीही त्यांच्यात भावबंध तयार होऊन त्यांनी एकमेकांना जपणं ही बाब लोकांना हास्यास्पद वाटते. जिवाचा संताप झाला या प्रतिक्रिया पाहून.
हे तर काहीच नाही! ‘गुजारिश’ या सिनेमानं तर आणखी वेगळा अनुभव दिला. ‘गुजारिश’ या सिनेमातील नायक हा एका अपघातात क्वाड्राप्लेजिक बनलेला. क्वाड्राप्लेजिक म्हणजे चेहरा आणि मानेचा भाग वगळता संपूर्ण शरीर अचेतन असलेला माणूस. साहजिकच त्याच्या नाकावर बसलेली माशी स्वत:च्या हातानं हाकलणंही त्याला अशक्य. सिनेमागृहात यावर कॉमेंट काय? - ‘अरे .. माशी तरी हाकल, ‘पुढचं’ कसं होणार मग?’ - अशा अवस्थेतही हा नायक रेडिओवर कार्यक्रम करतो, लोकांना शक्य तितका आनंद देत राहतो, स्वत:ही आनंद घेत राहतो. त्याच्याकडे असणारी जादूची विद्या आपल्या प्रतिस्पध्र्याच्या उत्साही तरुण मुलाला शिकवतो आणि त्यानंतर सगळं जगून संपलंय असं वाटतं तेव्हा आनंदानं जगाचा निरोप घेण्याची संधी आपल्याला मिळावी म्हणून झगडतो. हा सिनेमा पाहिला तेव्हा मला स्वत:ला जाणवलं की जगण्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या आणि ‘सुंदर जीवन जगलेल्या माणसाला तितकंच सुंदर मरण मिळणं हा त्याचा मूलभूत अधिकार आहे’ या माझ्या मताचा हा सिनेमा पुरस्कार करतोय. मी म्हणूनच ‘गुजारिश’च्या अनुषंगानं इच्छामृत्यू या विषयावर एक लेख लिहिला, वृत्तपत्रातून प्रसिद्ध केला. परिणाम काय झाला? - ज्यांना मी पॅराप्लेजिक आहे एवढंच माहिती होतं, अशा मंडळींना वाटलं मी निराश होऊन लगेच आत्महत्या करण्याच्या विचारात आहे. ज्यानं त्यानं प्रत्यक्ष भेटून मला आत्महत्या करणं हा कसा गुन्हा आहे, पळपुटेपणा आहे.. आपल्या वाटय़ाला जे जे आलं ते कसं भोगावंच लागतं.. वगरे समजवायला सुरुवात केली. काही माणसं माझ्याकडे प्रेरणा देणारी वगरे म्हणून पाहणारी! त्यांची प्रतिक्रिया होती, ‘तुमच्यासारख्यांनीच इच्छामृत्यूसारखं बोलायला सुरुवात केली तर आम्ही काय करायचं? ‘अमुक’कडे पाहा, ‘तमुक’चं वाचा आणि बघा आपण काय बोलतोय ते! तुम्हाला असलं बोलणं शोभत नाही.’ ज्यांना मी पॅराप्लेजिक आहे हे माहिती नव्हतं, त्यांचा सल वेगळाच होता. ते म्हणाले, ‘इच्छामृत्यूसारख्या विषयावर ‘सुखांत’सारखा चांगला मराठी सिनेमा निघालेला असताना तुमच्यासारख्यांना िहदी सिनेमाचीच तरफदारी का करावीशी वाटते?’

आई क्षमाशील असते, प्रोफेसर विसरभोळे असतात, सरदारजी मूर्ख असतात .. समाजमानसातल्या या प्रतिमा कशामुळं तयार झाल्या हे शोधण्याचा प्रयत्न केला की अशा प्रतिमा तयार होण्याला साहित्य आणि माध्यमं ही प्रामुख्यानं जबाबदार आहेत.

- म्हणजे माझा जो मूळ मुद्दा होता तो समजून घेण्याऐवजी त्याला वेगळेच फाटे फोडण्यात आले. असं का व्हावं?
विचार करायला लागल्यानंतर लक्षात आलं की कुणी कसं असावं आणि कुणी कसं जगावं याच्या काही ठराविक प्रतिमा समाजमानसामध्ये घट्ट रुजलेल्या आहेत. उदाहरणार्थ कलाकार लहरी असतात, आई क्षमाशील असते, प्रोफेसर विसरभोळे असतात, सरदारजी मूर्ख असतात .. समाजमानसातल्या या प्रतिमा कशामुळं तयार झाल्या हे शोधण्याचा प्रयत्न केला की अशा प्रतिमा तयार होण्याला साहित्य आणि माध्यमं ही प्रामुख्यानं जबाबदार आहेत असं लक्षात येत गेलं. अपंगांविषयी, त्यांच्या जगण्याविषयी आणि त्यांच्या प्रश्नांविषयीही अनेक गरसमज माध्यमांनी कायमस्वरूपी तयार करून ठेवलेले आहेत. एखाद्या प्रकारचा विकार किंवा अपंगत्व याविषयीच्या अपुऱ्या आणि वास्तवाशी विसंगत माहितीनं कसे गरसमज तयार होतात याचा एक किस्सा ऐकण्यासारखा आहे.
नसीमादीदी, मी आणि व्हीलचेअरवर असणारे १२-१५ विद्यार्थी-विद्याíथनी, थोडे कुबडय़ा-वॉकर घेऊन चालणारे लोक असे सगळे जुहू बीचवर बसलो होतो. सहलीच्या निमित्तानं तिथं आल्यामुळे सूर्यास्त बघत बघत भेळ खात होतो. एका वेळी इतके सगळे अपंग सहलीला आलेत म्हणून कुतूहलानं काही लोक आमच्याकडे पाहात होते, काही चुकचुकत होते. त्यातला एक नसीमादीदींजवळ गेला. त्यातल्या त्यात दीदीच सगळ्यांपेक्षा मोठय़ा वाटल्यामुळे त्यानं दीदींना विचारलं, ‘‘बच्चों के साथ आए हो लगता है .. इतने सारे के सारे बच्चों का ऐसा कैसे हो गया? माँ है आप, तो तकलीफ होती होगी ना?’’ त्याची समजूत झाली होती की अपंग स्त्रीला अपंग मुलंच होतात आणि व्हीलचेअरवर बसणाऱ्या स्त्रीला व्हीलचेअरवर बसणारी! कोड हे आनुवंशिक असू शकतं, एका पिढीआड घरातल्या एका व्यक्तीला कोड असतं वगरे त्यानं काहीतरी ऐकलं असेल, तोच नियम त्यानं शारीरिक अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना लावण्याचा प्रयत्न केला.
यात चूक कुणाची?
माध्यमांमधून किंवा साहित्य कृतींमधून अपंगांविषयी काही विशिष्ट पठडीतल्या प्रतिमा शेकडो र्वष मांडण्यात येताहेत. अनेक जुन्या सिनेमांमध्ये खलप्रवृत्तीची व्यक्ती अपंग दाखवली जात असे. उदाहरणार्थ जुन्या सिनेमांमधले वेगवेगळे डाकू आठवा.. त्यांच्या एका डोळ्याला हमखास काळी पट्टी बांधलेली असे किंवा पक्षाघातानं चेहऱ्यावर परिणाम होऊन जबडय़ाचा भाग तरी वाकडा झालेला असे. सुनेचा छळ करणारी सासू म्हटली की आजही अनेक महिलांना ललिता पवार ही अभिनेत्री आठवते. खरं तर ललिता पवार सिनेमात नायिकेचं काम करायच्या, पण शूटिंगच्या वेळीच झालेल्या एका जोरदार आघातानं त्यांचा एक डोळा कायमचा अधू झाला आणि त्यानंतर नायिकेपेक्षा त्यांच्या खलनायिकेच्या भूमिका अधिक लोकप्रिय होत गेल्या. दोन-चार दिवसांपूर्वीच ‘नातीगोती’ या नाटकाची डी.व्ही.डी. पाहायला मिळाली. अतुल परचुरेसारख्या नटाचं हे पहिलं मोठं नाटक. बाकी कलाकारही मातब्बर. मतिमंद मुलावर म्हणून बेतलेलं हे नाटक असलं तरी प्रत्यक्षात नाटकामध्ये फक्त मतिमंद मुलांच्या आईवडिलांच्या हतबलतेचं व फरपटीचं चित्रण आहे. साहजिकच असा मुलगा जगण्यापेक्षा मेलेला बरा असं प्रेक्षकांच्या मनात आल्यावाचून राहात नाही. आज वास्तव असं आहे का? मतिमंद मुलांनाही योग्य प्रशिक्षण देऊन किमान स्वावलंबी बनवता येणं शक्य आहे अशी असंख्य उदाहरणं आहेत. मग एखादं नाटक त्याविषयी का बोलत नाही? नाटकाचा टोकाचा प्रभाव मनावर राहिल्यामुळे एखाद्या पालकांनी मतिमंद असलेल्या आपल्या मुलाचा गळा घोटला तर त्याची जबाबदारी कुणाची? - मी स्वत: वयाच्या नवव्या वर्षी अपघातात पॅराप्लेजिक झाले. त्यानंतर भेटायला आलेल्या कुणीतरी बाहेरच्या खोलीत बाबांना म्हटलं, ‘‘आमच्यात पोरीला असलं काही झालं असतं तर तिला जिवंत ठेवली नसती. पोराचं ठीक हो, पण पोरीच्या जातीचं पांगळेपण कसं चालणार?’’ - माझ्या आईवडिलांनी तसं काही केलं असतं तर मी आज तुमच्यासमोर उभी नसते.. चालता येत नसलं तरी माझी बुद्धी आणि कष्ट करण्याची तयारी या जोरावर मी स्वावलंबी आहे. ताठ मानेनं जगते आहे. माझ्याबाबतीत हे घडू शकतं तर कोणाही बाबतीत घडू शकतं. मग साहित्यात असो, नाटकात असो की सिनेमात असो, अपंग व्यक्ती एक तर दुष्ट असली पाहिजे किंवा विकल आणि लाचार असली पाहिजे असे का? या दोन्हीपकी काही नसेल तर ती व्यक्ती एकदम काही चमत्कार घडवणारी असते किंवा केवळ विनोदनिर्मितीसाठी तिचा वापर करून घेतला जातो हे चित्र बदलायला नको का?
अशा सर्व समजांपलीकडचं अपंग व्यक्तीचं चित्रण असणारा एक सिनेमा अलीकडे पाहण्यात आला. ‘कॅटरपिलर’ (दिग्दर्शक कोजी वाकामात्सू, जपान) असं त्याचं नाव. युद्धभूमीवर लढण्यासाठी म्हणून गेलेल्या एका सनिकाला त्याचे दोन्ही हात व दोन्ही पाय गमवावे लागतात. त्याचा ‘वॉर गॉड’ म्हणून गावात एक वेगळा सन्मान व स्थान तयार होतं. - पण या तथाकथित देवाच्या उंचीवर नेऊन ठेवलेला माणूस इतरांइतकाच विकारी आणि स्वार्थी असतो. त्याच्या विकारी असण्याचा, स्वार्थी असण्याचा सारा त्रास त्याच्या बायकोला सहन करावा लागत असतो. आपली समजूत असते की मरणाच्या दारात जाऊन आलेला माणूस खूप बदलतो. त्याच्यातील देवत्व जागं होतं, वगरे - पण सगळ्याच व्यक्तींबाबत हे खरं असत नाही. या वास्तवाचं भान ठेवून या सिनेमात अपंगत्व आलेल्या सनिकाचं चित्रण केलेलं आहे.

एकदा अपंग व्यक्ती स्वत:ला दयनीय किंवा दयेला पात्र समजू लागल्या की त्या आपल्या विकासाचा मार्ग आपल्याच हातानं बंद करतात.

सांगण्याचा मुद्दा असा की एकूणच अपंगत्व, त्यांचं जगणं याविषयी विशिष्ट आणि अवास्तव प्रतिमा साहित्यातून किंवा माध्यमांमधून रंगवणं हे अतिशय चुकीचं आहे. अर्थात याला काही सन्माननीय अपवाद भारतीय सिनेमांमध्येसुद्धा आहे. उदाहरणार्थ - ‘स्पर्श’ (सई परांजपे) सारखा सिनेमा नेत्रहीन व्यक्तीचं जग ययार्थपणे समोर आणतो. ‘देवराई’ (सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर) सारख्या सिनेमात स्किझोफ्रनिया म्हणजेच छिन्न मनस्कतेसारख्या विकाराविषयी आपल्याला जाग मिळते, दिशा मिळते. ‘कोशिश’ (गुलजार) सारख्या सिनेमात कर्णबधिर जोडप्याचे भावबंध, त्यांच्या आयुष्यातले प्रश्न, त्यांच्याशी भिडण्याची त्यांची रीत आणि त्यातून निखळ जगता येणं वगैरे पट समोर येतो. कोड किंवा व्हिटिलिगोसारख्या सामाजिक स्टिग्माबाबत ‘नितळ’ (सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर) सिनेमा खूप काही सांगून जातो.
‘जंिपग ओव्हर द पडल्स’ (कॅरल कचिना), ‘कलर ऑफ पॅराडाइस’(माजिद माजिदी), ‘बटरफ्लाय सर्कस’ (जोशुआ वेगल), ‘धिस इज नोरीको’ (जपानी) यांसारखे विदेशी सिनेमे अपंगांविषयीचं अतिरेकी, अवास्तव चित्रण न करता अपंगांना जगणं शिकवतात आणि म्हणूनच ‘मार्गदर्शक’ म्हणून त्यांच्याकडे पाहता येतं.
माध्यमांमधील प्रतिमांप्रमाणेच साहित्यकृतींमध्येदेखील अपंगांबाबतचं अवास्तव चित्रण खूप मोठय़ा प्रमाणावर आढळतं. वास्तविक आज परिस्थिती बदललीय. अपंगांना आपल्या अपंगत्वावर मात करून सामान्य आयुष्य जगता येईल.
अशा अनेक सुविधा विज्ञान, तंत्रज्ञानानं उपलब्ध करून दिलेल्या आहेत, पण साहित्यातील चित्रण मात्र अजूनही पुराणकथा आणि रामायण, महाभारत काळातीलच व त्या पठडीतील आढळते. अशा प्रकारचं चित्रण शेकडो र्वष केवळ अनुकरणातून होत आलेलं आहे. या चित्रणाला छेद देणारं असं नाही, पण वास्तवाच्या थोडं जवळचं म्हणता येईल असं चित्रण अपंग व्यक्तींनी स्वत: लिहिलेल्या किंवा त्यांच्यासाठी शब्दांकन केल्या गेलेल्या आत्मकथनांमधून आता समाजासमोर येत आहे. गेल्या काही वर्षांत अशा प्रकारची जी पुस्तकं गाजली त्यामध्ये जसा नसीमा हुरजुकांच्या ‘चाकाची खुर्ची’चा समावेश होतो त्याचप्रमाणे वसई येथील नेत्रहीन प्राध्यापक पुरुषोत्तम महाजन यांच्या ‘माझ्या आयुष्याचे महाभारत’सारख्या पुस्तकाचाही समावेश होतो. डॉ. वा. ना. तुंगार यांनी लिहिलेले ‘कहाणी अथक जिद्दीची’ हे पुस्तकही महत्त्वाचे आहे. ‘माणूस मोठा जिद्दीचा’ या मधुकर कुलकर्णी यांनी लिहिलेल्या बाबूकाका दिवाणांच्या जीवनकथेतूनही व्हीलचेअरला खिळलेल्या, नैसर्गिक विधींवरचं नियंत्रण गमावलेल्या अनेकांना आपल्या आयुष्याची दिशा ठरवण्यासाठी उपयोग झाला आहे.
सांगलीच्या वल्लरी करमरकरच्या जडणघडणीविषयी आणि अडचणींविषयी तिचे वडील भालचंद्र करमरकर यांनी लिहिलेले ‘फिटे अंधाराचे जाळे’, ‘व्हाय नॉट आय?’ हे वृंदा भार्गवे यांनी लिहिलेले मुंबईतल्या सिद्धी देसाईच्या जीवनावर बेतलेले पुस्तक तसेच ‘मनश्री’ हे सुमेध वडावाला यांनी शब्दांकित केलेले मनश्री सोमण या नेत्रहीन मुलीच्या आयुष्याचं केलेलं शब्दांकन, ‘एक इजम निरागस’ हे सुहासिनी मालदे यांनी लिहिलेले ऑटिस्टिक मुलांच्या समस्या व उपाययोजना याविषयीचे पुस्तक, प्रसाद घाडीसारख्या मस्क्युलर अ‍ॅट्रॉफीग्रस्त मुलाविषयी त्याच्या आईनी शरयू घाडींनी लिहिलेलं ‘पंखाविना भरारी’ हे पुस्तक अशा अनेक पुस्तकांचा अपंग व अपंगांसाठीचे साहित्य म्हणून उल्लेख करावा लागतो. राम गोसावींसारख्या मिरजेतील नेत्रहीन कवीनी नेत्रहीनांच्या विश्वाला काव्यरूपात समाजासमोर आणत साहित्यामध्ये स्वत:चं असं स्थान निर्माण केलेलं आहे. थोडक्यात अपंगांविषयीचे प्रश्न, त्यांचे जीवन यांचे चित्रण आता पूर्वीच्या तुलनेत अधिक योग्य स्वरूपात पुस्तकातून येत आहे. याखेरीज अनेक परदेशी अपंग, पण कर्तृत्ववान व्यक्तींची आत्मकथनं आता मराठीत भाषांतरित होत आहेत. हेन्री व्हिस्कार्डी यांचं आत्मकथन ‘हात ना पसरू कधी’ या नावानं रवींद्र देसाई यांच्याकडून खूप आधी मराठीत आलं असलं तरी ते आजही वाचनीय आहे. ऑस्कर पिस्टोरिअससारख्या दक्षिण आफ्रिकेतल्या धावपटूवरचं पुस्तक मी मराठीत आणलं आहे, तर लान्स आर्मस्ट्राँगसारख्या सायकलपटूचं आत्मकथन ‘इट्स नॉट ओन्ली अबाउट बाइक’ प्रसिद्ध झालेलं होतं, आता त्याच आत्मकथनाचा पुढचा भागही प्रसिद्ध झाला आहे. अर्थात कर्करोगावर मात करून सात वेळा जगातील सर्वात मोठय़ा सायकल रेसमध्ये अजिंक्यपद पटकावणाऱ्या आर्मस्ट्राँग सध्या दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकला आहे. मादक द्रव्य सेवनाच्या आरोपांमुळे त्याची सर्व विजेतेपदाची सर्व पदके काढून घेण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय स्तरावर झाला आहे. खरे तर कृत्रिम पायांचा फायदा मिळतो म्हणून सुदृढ माणसांच्या स्पध्रेत धावण्यावर ऑस्कर पिस्टोरिअसवरही बंदी घालण्यात आली होती. पण त्यानं त्यासंदर्भातील लढा आंतरराष्ट्रीय न्यायालयात शेवटपर्यंत लढून आपलं निर्दोष असणं सिद्ध केलं. लान्स आर्मस्ट्राँगनं मात्र आरोप खोडून काढण्यासाठीचा लढा एका मर्यादेनंतर सहनशक्ती संपल्यामुळे निम्म्यात सोडून दिला.
अपंग व्यक्ती, अपंगत्व याविषयीच्या पारंपरिक प्रतिमा ज्या माध्यमांनी आणि साहित्याने समाजात रुजवल्या आहेत त्या बदलायच्या तर अशी असंख्य पुस्तकं समोर येण्याची गरज आहे. पूर्वीच्या तुलनेत अशा पुस्तकांची संख्या वाढली असली तरी शेकडो र्वष ज्या प्रतिमा रुजल्या किंवा रुजवण्यात आल्या त्या बदलण्यासाठी या पुस्तकांची संख्या अजूनही खूप कमी आहे. काहीजणं म्हणतात, ‘‘पारंपरिक प्रतिमा तशाच राहिल्या तर बिघडलं कुठं? विकलांग व्यक्तींविषयी योग्य ते जाणून घेण्याचे सामाजिक अपंगत्व तसंच राहू देण्यात तुमचा फायदा नाही का?’’
‘अपंग किंवा विकलांग म्हणजे समाजाच्या केवळ करुणेचे धनी अशी समजूत दृढ होणं हे अपंगांना आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांना वेगवेगळ्या प्रकारची मदत मिळण्याच्या दृष्टीनं चांगलंच नाही का?’ असं कुणी म्हणणार असेल तर त्याला माझा ठाम विरोध असेल. याचं कारण असं की एकदा अपंग व्यक्ती स्वत:ला दयनीय किंवा दयेला पात्र समजू लागल्या की त्या आपल्या विकासाचा मार्ग आपल्याच हातानं बंद करतात. कष्ट करण्याची, नवं काही शिकण्याची वृत्ती सोडून देऊन आपलं सगळं काही समाजानं किंवा सरकारनं बघावं अशा वृत्तीनं जगणं हे अपंगांसाठी आत्मसन्मानाचं नक्कीच नाही. ज्यांनी कष्ट करण्याची, नवनव्या गोष्टी शिकण्याची तयारी दर्शवली अशा अपंग व्यक्तींनीही वेगवेगळ्या क्षेत्रात आज आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. आज त्यांना अपंग म्हणून हिणवण्याची कोणाचीही िहमत नाही किंवा त्यांना दयेची भीक घालण्याचीही गरज उरलेली नाही. अपंग व्यक्तींचा लढा असलाच तर तो आपल्याला स्वावलंबी होण्यासाठी, सक्षम होण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, सार्वजनिक ठिकाणी व समाजातील सर्व प्रकारचे व्यवहार करताना विविध प्रकारचे अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींकरता मत्रीपूर्ण अशी व्यवस्था निर्माण व्हावी यासाठीचा लढा असला पाहिजे. दयेच्या भिकेसाठीचा लढा नको! मी म्हणते त्या प्रकारचा लढा आपण यशस्वी करू शकलो तर देशात आज आठ ते दहा कोटींच्या संख्येनं असलेल्या अपंग व्यक्ती देशाच्या विकासातही आपला वाटा उचलू शकतात. समाजाच्या इतर घटकांना अभिमानानं सांगू शकतात की आम्ही समाजावर भार नाही! साहित्यातून आणि माध्यमातूनही अपंगांची प्रतिमा समोर यायला हवी ती आत्मसन्मानासाठी व स्वावलंबनासाठी पडतील ते कष्ट घेण्याची तयारी असणारे सजग नागरिक म्हणून.
response.lokprabha@expressindia.com