११ जानेवारी २०१३
मथितार्थ : अभाव ‘सामुदायिक जीवना’चा!
चित्रकथी : चित्रवीण!
कव्हर स्टोरी
क्रीडा : कल खेल में हम हो न हो..
प्रासंगिक

सादरीकरणाची कला आपल्या रक्तातच!
विकेट ‘कीपर’

संगीत : आठवणी वाद्यवृंदाच्या!
थोडी सजगता आणि पथ्य
सेकंड इनिंग : भीष्मासारखं वार्धक्य!
आरोग्यम् : पोलिओ पॉलिटिक्स
चटक-मटक : चवदार, चटपटीत
युवा : जग थिरकतंय ‘गंगन्म स्टाइल’वर..
भंकसगिरी : थोरांचे संमेलन झाले त्याची गोष्ट..
विज्ञान तंत्रज्ञान : टेक फेस्ट टेक्नॉलॉजीची आषाढी
कवितेचं पान : पहिली गाजलेली कविता

शब्दरंग : आम्हा घरीं धन

एकपानी : बी अ कॅलेंडर!
सिनेमा : मराठी सिनेमात नव्या वर्षांत नव्या जोडय़ा
लग्नाची वेगळी गोष्ट : जीवनात ही घडी..
लग्नाची वेगळी गोष्ट : बायका त्या बायकाच..
पाठलाग :एकच प्याला..
माझं शेतघर : फार्म हाऊस पाहावे घेऊन..
संख्याशास्त्र : मूलांक म्हणजे काय?
भन्नाट : आकाशाला गवसणी
केल्याने रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

युवा

जग थिरकतंय ‘गंगन्म स्टाइल’वर..
प्राची साटम

response.lokprabha@expressindia.com
यूटय़ूबवर अपलोड झालेल्या गंगन्म स्टाइलने बघता बघता सगळ्या जगाला वेड लावलंय. पण अशी सर्वाधिक हिट्स देणारी गाणी येतात आणि जातात, टिकत मात्र नाहीत. काय आहे त्यांच्या यशाचं रहस्य? काय आहे त्यांच्या अल्पायुषी असण्यामागचं कारण?

झोपेतून अचानकच जाग आल्याने त्या एक दीड वर्षांच्या चिमुरडय़ाने भोकाड पसरले. त्याच्या आईने मात्र अगदी सराईतपणे मोबाइल हाती घेतला आणि त्यावरची काहीशी बटणं दाबून तिनं तो चिमुरडय़ाच्या समोर धरला. चमत्कार झाल्यागत तो एकाएकी शांत झाला आणि त्या मोबाइल स्क्रीनकडे पापणी न लवता पाहायला लागला. हे नक्की काय गौडबंगाल आहे हे कोणालाच कळेना. शेवटी त्याच्या आईनेच खुलासा केला. ‘मोबाइलमध्ये असलेला गंगन्म स्टाइलचा व्हिडिओ त्याला खूप आवडतो आणि हा कितीही रडत असला तरी तो व्हिडिओ पाहिल्यावर मात्र शांत होतो.’
ही अतिशयोक्ती नाही, खराखुरा प्रसंग आहे हा. पार्क जेई संग म्हणजेच पीएसवायच्या गंगन्म स्टाइलने अक्षरश: संपूर्ण जगाला भुरळ घातली आहे. वाऱ्यापेक्षाही जास्त वेगाने त्याचे गाणे आणि नृत्य जगभर पसरले आणि त्याच वेगाने लोकप्रियसुद्धा झाले. इतकं की अमिताभ बच्चन, शाहरूख खान, ब्रिटनी स्पिअर्स, पॅरिस हिल्टन, केटी पेरी, टॉम क्रूझ, नादाल जोकोविच यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटीजना गंगन्म स्टाइल नाचावंसं वाटलं.
ऑपन गंगन्म स्टाइल म्हणत १५ जुलै २०१२ला हे के-पॉप (कोरिअन पॉप) यूटय़ूबवर रिलीज झालं आणि जादूई वाटावा असा त्याचा प्रवास सुरू झाला आणि अजूनही सुरू आहे. आतापर्यंत यूटय़ूबवर या व्हिडिओला जवळपास ९५१ दशलक्ष लोकांनी पाहिले आहे. यूटय़ूबच्या इतिहासातला हा आतापर्यंतचा ‘सर्वाधिक पाहिला गेलेला व्हिडिओ’ आहे. जस्टीन बिबरच्या ‘बेबी’ या व्हिडिओला मागे टाकत पीएसच्या गंगन्म स्टाइलने हा किताब मिळवला. त्याचबरोबर यूटय़ूबवरील ‘सर्वाधिक लाईक्स मिळविणारा व्हिडिओ’ म्हणून याची नोंद ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली.
काय आहे तरी काय हे गंगन्म स्टाइल व्हिडिओ? पाहिल्यावर लक्षात येते की यात फार काही नाही पण तरी बरेच काही आहे. या ‘बरेच काही’मधली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यातील ‘हॉर्स डान्स’. एका अदृश्य घोडय़ावर बसल्याचा आव आणून दोन्ही हातांनी लगाम खेचायचा की तुम्ही झालात गंगन्म स्टाइल नाच करायला तयार. या नाचाची इतकी हवा झाली आहे की गुगलचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन एरिक श्मिड्ट आणि ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनीही तो नाच करून आपली हौस पूर्ण करून घेतली. गंगन्म स्टाइलमधील गंगन्म हा खरं तर दक्षिण कोरियामधील एक जिल्हा ज्याच्या नावाचा अर्थ होतो ‘(हान)नदीच्या दक्षिणेकडचा प्रदेश’. १९८०पर्यंत गंगन्म प्रदेश बऱ्यापैकी मागास होता पण त्यानंतर हा प्रदेश इतका विकसित झाला की आता तो दक्षिण कोरियामधील सर्वाधिक श्रीमंत प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे साहजिकच तिथल्या लोकांचे राहणीमान फारच ऐषारामाचे आहे. पीएसवायने त्याच्या गंगन्म स्टाइलमध्ये या प्रदेशाच्या बदललेल्या आíथक आणि सांस्कृतिक परिमाणांवर बोट ठेवले आहे. या निमित्ताने उच्चभ्रू चंगळवादी राहणीमानासाठी गंगन्म स्टाईल हा नवीन वाक्प्रचारही मिळाला.
या गंगन्म स्टाइलचा कर्ताधर्ता गायक, नर्तक, निर्माता पीएसवायला तर सध्या आकाशच ठेंगणे झाल्यासारखे वाटतेय. एकाच वेळी अनेक पुरस्कारांचा वर्षांव त्याच्यावर होतोय. अमेरिकन म्युझिक अ‍ॅवॉर्ड एमनेट, एशियन म्युझिक अ‍ॅवॉर्ड यांसारखे अनेक पुरस्कार मिळवणाऱ्या पीएसवायने एम टी.व्ही. युरोप म्युझिक अ‍ॅवॉर्ड सोहळ्यात गंगन्म स्टाइल सादर तर केलेच पण याचबरोबर ‘सर्वोत्कृष्ट व्हिडिओ’चा पुरस्कारही पटकावला, ज्यात त्याची स्पर्धा होती रिहान्ना लेडी गागा सारख्या प्रस्थापित मातब्बरांशी. ‘किंग ऑफ पॉप’ ‘किंग ऑफ यूटय़ूब’सारखी अनेक विशेषणं त्याला लावली गेली आहेत. युनायटेड नेशन्सचे सेक्रेटरी जनरल बान की-मून यांनी तर पीएसवायबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘युनिसेफ’चा गुडविल अ‍ॅम्बॅसिडर म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली आहे. इतकंच नाही तर नुकत्याच झालेल्या एका ख्रिसमस चॅरिटी सोहळ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासमोर पीएसवायला गंगन्म स्टाइल सादर करण्याची संधी मिळाली. ‘ओपन गंगन्म स्टाईल’ ही ओळ येल युनिव्हर्सटिी प्रेसद्वारा प्रकाशित ‘द येल बुक ऑफ कोटेशन’मध्ये ‘२०१२ मधील सर्वात जास्त लोकप्रिय झालेल्या ओळींपैकी एक’ म्हणून संबोधण्यात आली आहे.

एक प्रादेशिक भाषेतील गाणे आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजले जाते, तेव्हा जग जवळ आले आहे असे म्हणणे खरोखरच पटते.

थिरकायला लावणाऱ्या बीट्स, वेधक चाल आणि रंगीबेरंगी भपकेबाज व्हिडिओ यांनी जगभरातल्या तरुणांना वेडं केलंय. काहींच्या मते गंगन्म स्टाइल नाच आवडण्याच्या बऱ्याच कारणांपैकी एक म्हणजे ख्रिस गेल. टी -२० विश्वचषकाच्या दरम्यान ख्रिस गेलने केलेल्या गंगन्म स्टाइल स्टेप्स भलत्याच लोकप्रिय झाल्या. एखादा झेल पकडल्यावर बळी मिळवल्यावर किंवा षटकार मारल्यावर गेल भर मैदानात गंगन्म स्टाइलचा तो हॉर्स डान्स करायचाच. विश्वचषक जिंकण्याच्या वेळीसुद्धा त्याने हा शिरस्ता मोडला नाही. त्याच्या या कृतीमुळे प्रेक्षकांची करमणूक तर व्हायचीच पण गंगन्म स्टाइलसुद्धा घराघरांत पर्यायाने तरुणांपर्यंत पोहोचायला मदत झाली. आजही यूटय़ूबवर ख्रिस गेलचे गंगन्म स्टाइलचे व्हिडिओ मोठय़ा संख्येने पाहिले जातात. क्लिबग पाटर्य़ासाठी गंगन्म स्टाइल मस्ट झालेय. कोरिअन भाषेतला ओ की ठो कळत नसूनही सगळीकडे ‘ओपन गंगन्म स्टाइल’चे सूर आळवले जात आहेत. तरुणांच्या मते हे गाणे आणि त्याचा नाच धमाल आहे. त्याच्या बीट्स, त्याच्या चाली इतक्या कॅची आणि थिरकायला लावणाऱ्या आहेत की भाषेचा अडसर जाणवतच नाही. सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे पीएसवायचा हटके डान्स. गंगन्म स्टाइल तुफान लोकप्रिय होण्यात सर्वात मोठा वाटा आहे तो त्याच्या व्हिडिओचा. हा व्हिडिओ नसता तर गंगन्म स्टाइलला इतकी प्रसिद्धी कधीच मिळाली नसती असे अनेकांना वाटते. ‘कीप काल्म अँड गंगन्म स्टाइल’ ‘ऑपन गंगन्म स्टाइल’, ‘ड्रेस क्लासी अ‍ॅण्ड चेसी’सारख्या ओळी छापलेले टीशर्ट्स तरुणांच्या पसंतीस उतरत आहेत. त्याचप्रमाणे व्हच्र्युअल अड्डे असलेल्या फेसबुक, ट्विटरसारख्या ठिकाणीसुद्धा पीएसवायआणि त्याची गंगन्म स्टाइल स्टेट्स, मेसेज, कार्टून्स ट्विट्सच्या रूपात चíचली जातेय.
गंगन्म स्टाइलला मिळालेली ही प्रसिद्धी ‘वैश्विक खेडय़ा’ची संकल्पना बव्हंशाने खरी ठरवते. तसंच दळणवळणाचा विस्फोट, माहिती तंत्रज्ञानाची करामत, परिणामी देशादेशांमधील वाढत चाललेले परावलंबित्व यांचाही विचार करायला भाग पाडते. आज इंटरनेटमुळे हा व्हिडिओ जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. अमेरिका, इंग्लंडसारख्या देशांमध्ये तिथल्या स्थानिक गाण्यांना मागे टाकत गंगन्म स्टाइलने अव्वल स्थान मिळवले. एक प्रादेशिक भाषेतील गाणे जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजले जाते आणि फक्त तिथेच न थांबता स्वत:चे जागतिक स्थान निर्माण करते तेव्हा हे जग जवळ आले आहे असे म्हणणे खरोखरच पटते.
गंगन्मच कशाला, आपल्याकडेही अशीच काही प्रादेशिक गाणी लोकप्रिय झाली आहेत. एकेकाळी पंजाबी पॉप गाण्यांचा ट्रेंड होता. बरेचसे पंजाबी पॉप कलाकार त्यामुळे प्रसिद्ध झाले होते पण आता हळूहळू त्यांची जागा दाक्षिणात्य गाण्यांनी घेतली आहे. ‘आपडी पोडें ’, ‘आ आन्टे’ सारखी गाणी देशभरात लोकप्रिय झाली आहेत. मराठीबाबत म्हणायचे झाले तर ‘कोंबडी पळाली’, ‘अप्सरा आली’, ‘आता वाजले की बारा’ इत्यादी गाणी अमराठी लोकांच्या तोंडीही चांगलीच रूळली. फक्त आणि फक्त इंटरनेटमुळे देशभर पसरलेले गाणे म्हणजे ‘कोलावेरी डी’. देशभरात या गाण्याने अक्षरश: धुमाकूळ घातला. तरुणांच्या तोंडी आणि मोबाइलमध्ये हे गाणे होते. पण कालांतराने त्याची क्रेझ कमी होत गेली. परिणामी हे गाणे ज्या चित्रपटातील होते तो ‘थ्री’ कधी आला आणि कधी गेला ते कळलंच नाही. तसंच ‘कोलावेरी डी’ हे भारतापुरतेच मर्यादित राहिले. गंगन्म स्टाइलसारखी देशाबाहेर त्याला फारशी लोकप्रियता मिळू शकली नाही.
लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या पीएसवाय आणि त्याच्या गंगन्म स्टाइलला काही वादांनाही सामोरे जावे लागले (नसते जावे लागले तरच नवल) बऱ्याच जणांना वाटतंय की हे गाणे काही त्याला मिळणाऱ्या लोकप्रियतेएवढे आकर्षक नाही. लोकांना एखाद्या गोष्टीबद्दल वाटणारी उत्सुकता हे या गंगन्म स्टाइलच्या यशाचे कारण आहे. म्हणजे असं की याचा व्हिडिओ जर इतक्या लोकांनी पाहिलाय तर आपणही पाहायला हवा आणि इतक्या लोकांनी लाईक केलाय म्हणजे नक्कीच यात काहीतरी आवडण्याजोगी गोष्ट असेल अशा प्रकारे गंगन्म स्टाइल पसरली असावी. अजून एक वाद म्हणजे २००२ आणि २००४ साली पीएसवायने केलेल्या काही अमेरिकेविरोधी कृतींमुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली (तेव्हा त्याची गंगन्म स्टाइल नुकतीच हिट होत होती.) पण त्याने झाल्या प्रकाराबाबत माफी मागून वाद मिटवून टाकला.
इंटरनेटमुळे किंवा इतर आधुनिक कारणांमुळे गंगन्म स्टाइल आणि तत्सम गाण्यांना लोकप्रियता तर मिळून जाते पण सध्याच्या ‘फास्ट मूव्हिंग’ जगात ती बरेचदा अल्पायुषी ठरते. काही काळानंतर त्या गाण्याचे आणि त्या कलाकाराचे काय होते याचा कोणालाही पत्ता नसतो. हल्लीच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे एका क्लिकसरशी आपल्याला हवी ती माहिती मिळून जाते त्यामुळे एखादी गोष्ट मुद्दामहून लक्षात ठेवण्याचे कष्ट कोणी घेत नाही आणि म्हणूनच अशी गाणी दीर्घायुषी ठरत नाहीत. तो कलाकार ‘वन साँग वंडर’ बनतो. याची जाणीव कदाचित पीएसवायला झाली असावी कारण गंगन्म स्टाइलच्या यशाबद्दल त्याला विचारले असता तो म्हणतो की ‘खरं तर मी माझ्या सर्वात सुंदर स्वप्नात आणि दु:स्वप्नात एकाच वेळी जगत आहे कारण माझ्यासमोर आता ही लोकप्रियता टिकविण्याचे आव्हान आहे.’
आगामी वर्षांत आपल्याला गंगन्म स्टाइलचे काय होणार ते कळेलच. त्याला मिळालेल्या लोकप्रियतेचे पर्यायाने कलाकाराला मिळालेल्या लोकप्रियतेचे आयुष्य किती असते याचाही अंदाज येईल. पण खरा प्रश्न आहे तो संगीतातील अभिरुचीचा!