११ जानेवारी २०१३
मथितार्थ : अभाव ‘सामुदायिक जीवना’चा!
चित्रकथी : चित्रवीण!
कव्हर स्टोरी
क्रीडा : कल खेल में हम हो न हो..
प्रासंगिक

सादरीकरणाची कला आपल्या रक्तातच!
विकेट ‘कीपर’

संगीत : आठवणी वाद्यवृंदाच्या!
थोडी सजगता आणि पथ्य
सेकंड इनिंग : भीष्मासारखं वार्धक्य!
आरोग्यम् : पोलिओ पॉलिटिक्स
चटक-मटक : चवदार, चटपटीत
युवा : जग थिरकतंय ‘गंगन्म स्टाइल’वर..
भंकसगिरी : थोरांचे संमेलन झाले त्याची गोष्ट..
विज्ञान तंत्रज्ञान : टेक फेस्ट टेक्नॉलॉजीची आषाढी
कवितेचं पान : पहिली गाजलेली कविता

शब्दरंग : आम्हा घरीं धन

एकपानी : बी अ कॅलेंडर!
सिनेमा : मराठी सिनेमात नव्या वर्षांत नव्या जोडय़ा
लग्नाची वेगळी गोष्ट : जीवनात ही घडी..
लग्नाची वेगळी गोष्ट : बायका त्या बायकाच..
पाठलाग :एकच प्याला..
माझं शेतघर : फार्म हाऊस पाहावे घेऊन..
संख्याशास्त्र : मूलांक म्हणजे काय?
भन्नाट : आकाशाला गवसणी
केल्याने रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

विज्ञान तंत्रज्ञान

टेक फेस्ट टेक्नॉलॉजीची आषाढी
प्रशांत जोशी

response.lokprabha@expressindia.com
मुंबईत आयआयटी पवई इथं दरवर्षी होणारं टेक फेस्ट म्हणजे उद्याच्या तंत्रज्ञानाबद्दल कुतूहल असणाऱ्यांसाठी पर्वणीच असते. माणसाच्या बुद्धिमत्तेचे थक्क करणारे आविष्कार अनुभवण्यात ज्यांना रस आहे, त्यांनी टेक फेस्ट कधीही चुकवू नये.

जानेवारी महिना हा न्यू इयर सेलिब्रेशनबरोबरच भारतातील टेक्नॉप्रेमींसाठी एक पर्वणी घेऊन येतो ती म्हणजे आयआयटी पवईचा टेक फेस्ट. वॉटर पोलो खेळणाऱ्या रोबोट्सची स्पर्धा, लिओनाडरे दा विंची यांनी त्या काळी स्वत:च्या अभियांत्रिकी कौशल्याने तयार केलेली, पण आजही आश्चर्यचकित करणारी उपकरणे, सांगू त्या तालावर नाचणारे, कुस्ती, क्रिकेट खेळणारे रोबोट्स, जगप्रसिद्ध कलाकारांच्या कलाकृती, तसेच डॉ ए. पी. जे. अब्दुल कलामांपासून ते नोबेल पारितोषिक विजेत्या संशोधकांना प्रत्यक्षात पाहण्याची व त्यांचे बहुमूल्य विचार ऐकण्याची संधी देणारा एकमेव कॉलेज फेस्टिव्हल म्हणजे आयआयटी पवई येथील टेक फेस्ट. जगातला सर्वात स्वस्तात विकला जाणारा टॅब्लेट ‘आकाश’ची निर्मिती करणारी संस्था, टेक्नॉलॉजी क्षेत्रात सर्वोत्तम शिक्षण देणारी संस्था, उत्तमोत्तम विद्यार्थी, संशोधक तंत्रज्ञ घडविणारी भारतातील संस्था म्हणून आयआयटी समूहाकडे पाहिले जाते. परंतु या साऱ्यांबरोबरच आयआयटी मुंबईने गेल्या काही वर्षांत स्वत:ची एक वेगळी ओळख जगाला करून दिली आहे आणि ती म्हणजे ‘आशिया खंडातील सर्वात मोठा टेक्निकल फेस्टिव्हल भरविणारी संस्था.’ १९९८ साली सुरू झालेला कॉलेजचा एक साधा फेस्टिव्हल दहा ते बारा वर्षांतच जपान, चीन यांसारख्या टेक्नॉलॉजी क्षेत्रात उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या देशांशी स्पर्धा करीत आशिया खंडातील सगळ्यात मोठ्ठा टेक्निकल फेस्टिव्हल बनतो. कदाचित विश्वास बसणार नाही, परंतु ज्या वर्षी टेक फेस्ट सुरू झाला त्या वेळी त्याची दखल फारच थोडय़ा लोकांनी घेतली होती, परंतु गेल्या वर्षांची आकडेवारी पाहता या फेस्टिव्हलला भेट देणाऱ्यांची संख्या जवळजवळ ४० ते ५० पटींनी वाढलेली दिसते. ‘आबालवृद्धांना सामावून घेणारा फेस्टिव्हल’ अशी बिरुदावली सध्या या फेस्टिव्हलला देण्यात येते आणि टेक फेस्टला एकदा भेट दिलीत की हे विधान अगदी खरं असल्याचं आपल्या लक्षात येईल. गेल्या वर्षीपासून टेक फेस्टने शाळेतील विद्यार्थ्यांसाठीदेखील उपक्रम सुरू केले आहेत.
खरंतर साध्या महाविद्यालयीन फेस्टिव्हलसारखाच हा फेस्टिव्हल, परंतु गेल्या काही वर्षांत एवढे काय वेगळेपण ‘टेक फेस्टने’ सिद्ध केले आहे की त्याची दखल आता युनेस्कोलादेखील घ्यावी लागली. युनेस्कोचा सहभाग असणारा बहुधा हा जगातील एकमेव टेक्नॉलॉजिकल फेस्ट आहे. याच्या तुफान लोकप्रियतेचे गुपित उलगडण्याचा प्रयत्न केला असता अनेक कारणे समोर आली. त्यातले सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे प्रसारमाध्यमांनी घेतलेली दखल हे सर्वसाधारण उत्तर सर्व मुखातून आपल्याला मिळतं, प्रसारमाध्यमांची वाढती स्पर्धा व त्यांचा सुयोग्य वापर करून घेत टेक फेस्टची लोकप्रियता वाढविण्याचे काम गेल्या काही वर्षांतील ‘मीडिया डिपार्टमेंटने’ चोख केलं आहे हे जितकं खरं असलं तरी त्यामागील या फेस्टिव्हलला ‘सर्वसमावेशक’ बनविण्याचे येथील विद्यार्थ्यांचे प्रयत्न नक्कीच नाकारता येणार नाहीत. मी गेली चार वर्षे टेक फेस्टला जातो आहे. प्रत्येक वेळी प्रकर्षांने जाणविणारी बाब म्हणजे, दरवर्षीच्या टेक फेस्टला भेट देणाऱ्या समाजातील प्रत्येक घटकाला स्वत:साठी काहीतरी मिळाल्याचं समाधान लाभलेलं पाहावयास मिळतं. अगदी सुरुवातीला म्हणजे साधारण दहा-बारा वर्षांपूर्वी टेक फेस्ट हा फक्त टेक्नॉलॉजीसंदर्भातील बाबी समाविष्ट असणारा अभियांत्रिकी क्षेत्रापुरता मर्यादित असणारा साधारण फेस्टिव्हल होता. त्यानंतर यामध्ये इंटरनॅशनल प्रदर्शनाची भर घालून समाजातील सर्व घटकांना आजच्या जगातील तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला ही प्रथा आजही तशीच चालू असून आता टेक फेस्टमध्ये सर्वाधिक गर्दी या अंतरराष्ट्रीय प्रदर्शनाला झाल्याचे दिसते. यामध्ये आपल्याला एकाच चाकावर आपोआप तोल सांभाळू शकणारी सायकल, अपंगांना सहजरीत्या जिना उतरण्यासाठी तयार केलेले उपकरण, शिवाय रजनीकांतच्या रोबोट चित्रपटात दाखविल्याप्रमाणे एकमेकांसह काम करणारे सॉर्म रोबोट्स, रोज दररोजच्या क्रिया करू शकणारे रोबोट्स थोडक्यात भविष्याचे प्रदर्शनरूपी चित्र पाहावयास मिळते. त्यामुळे बाकी काही नाही तर फक्त हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन पाहण्यासाठी अनेक लोक टेक फेस्टला भेट देतात. याचप्रमाणे एक उत्तम व भरघोस प्रतिसादासह सुरू झालेला टेक फेस्टमधील इव्हेंट म्हणजे जगभरातील सुप्रसिद्ध संशोधक, तंत्रज्ञ यांची व्याख्याने. या व्याख्यानांसाठी विद्यार्थी तासन् तास रांगेत उभे असतात, याबद्दल काही विद्यार्थ्यांंना विचारल्यावर ‘‘नोबेल पारितोषिक विजेत्या किंवा आपण ज्या परदेशी लेखकांची पुस्तके वाचून अभ्यास पूर्ण करीत असतो अशा लेखकांना ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्याची संधी सहसा उपलब्ध होत नाही, अशा लोकांचे विचार ऐकावयास मिळतात म्हणून आम्ही टेक फेस्टला आवर्जून भेट देतो’’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया अनेकांनी दिली. विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून गेल्याच वर्षी ‘डेव्हिड ग्रिफिथ’ या पदार्थविज्ञान क्षेत्रातील लेखकाने तेच व्याख्यान सर्वाना ऐकता यावं यासाठी दोन वेळेस सादर केले. याखेरीजही देशाच्या विविध भागांतील शेतकऱ्यांनी स्वत: प्रयोग करून घडविलेली दररोजच्या वापरातील अनेक गोष्टींचे प्रदर्शन ज्यामध्ये साधा प्रेशर कुकर वापरून कॉफी वेंडिंग मशीन, सहजगत्या शेत नांगरता येण्यासाठी वापरता येणारे नांगराचे फाळ इ. बाबी माणसाच्या संशोधक वृत्तीचा प्रत्यय करून देतात. याखेरीज आयआयटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता व संशोधन जगापुढे मांडण्यासाठी येथे स्वतंत्र प्रदर्शन भरवले जाते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सुरू करण्यात आलेला नवीन प्रकल्प म्हणजे ‘टेक्नॉहेलिक्स’. जगभरातील उत्तमोत्तम कलाकारांना आपली कला उपस्थित समुदायासमोर सादर करण्यासाठी पाचारण करण्यात येते. रात्रीच्या अंधारात गाजणारा हा इव्हेंट पाहण्यासाठी लोकांना उभे राहायलादेखील जागा उरत नाही.
या साऱ्यांबरोबरच विशेष बाब म्हणजे गेल्या काही वर्षांपासून ‘टेक फेस्ट’ने आपल्याला मिळणाऱ्या लोकप्रियतेचा उपयोग करून घेताना अनेक समाजोपयोगी उपक्रम चालविले आहेत, त्यामुळे या टेक फेस्टकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोनच बदलला व त्याने लोकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले. गेल्या वर्षी एक आधुनिक उपक्रम या निमित्ताने हाती घेण्यात आला होता तो म्हणजे भारत व पाकिस्तान देशांतील संबंध यावरील दोन्ही देशांतील तरुणांचे संदेश आयआयटीमार्फत एकमेकांपर्यंत पोहोचविण्यात आले होते.

एखादा चिमुरडा रोबोट् कसा बनवितात व त्यात कोणते कंपोनंट्स वापरायचे याबाबतीत आपल्या आई-बाबांना समजावत असल्याचे चित्र हमखास पाहावयास मिळते.

या साऱ्यांखेरीज आयआयटी या नावाला लाभलेली प्रतिष्ठा लोकांना ‘टेक फेस्ट’च्या दाराशी खेचून आणते. यातल्या रोबोवॉरमध्ये जिंकणाऱ्या टीमला तर दरवर्षी एक ‘ग्लॅमरस वलय’ प्राप्त होते. सर्व स्पर्धातील नावीन्य, नवनवीन विषयांवरील कार्यशाळा, सुयोग्य नियोजन या बाबी तरुणाईला टेक फेस्टभोवती गुंतविण्यास यशस्वी ठरतात. विशेष नमूद करायची बाब म्हणजे, हा आशियातील सर्वात मोठा टेक्नॉलॉजिकल फेस्ट संपूर्णत: विद्यार्थ्यांमार्फत आयोजित केला जातो, यामध्ये प्राध्यापकांचा सहभाग अगदीच नगण्य असा असतो. त्यामुळे टेक फेस्टमध्ये काम करणारा विद्यार्थी हा मॅनेजमेंटचेदेखील धडे गिरवीत असतो.
अगदीच नवीन म्हणजे भविष्याचा विचार करून गेल्या वर्षीपासून टेक फेस्ट टीमने विविध कार्यशाळांच्या माध्यमांतून शालेय विद्यार्थ्यांचा टेक फेस्टमधील सहभाग वाढविण्यावर भर दिला आहे. त्यामुळे अनेकदा प्रदर्शन पाहताना एखादा चिमुरडा रोबोट् कसा बनवितात व त्यात कोणते कंपोनंट्स वापरायचे याबाबतीत आपल्या आई-बाबांना समजावत असल्याचे चित्र हमखास पाहावयास मिळते. पालकही आपल्या मुलाचं हे ज्ञान कुतूहलाने, कौतुकाने फक्त पाहातच राहतात, असा हा भविष्य दाखविणारा कलायडोस्कोप पाहण्याची (अनुभविण्याची) संधी दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात मिळते. या वर्षीही ३ ते ५ जानेवारीदरम्यान आयआयटी पवई येथे या टेक्नॉलॉजीची आषाढी-कार्तिकी साजरी होत आहे.