११ जानेवारी २०१३
मथितार्थ : अभाव ‘सामुदायिक जीवना’चा!
चित्रकथी : चित्रवीण!
कव्हर स्टोरी
क्रीडा : कल खेल में हम हो न हो..
प्रासंगिक

सादरीकरणाची कला आपल्या रक्तातच!
विकेट ‘कीपर’

संगीत : आठवणी वाद्यवृंदाच्या!
थोडी सजगता आणि पथ्य
सेकंड इनिंग : भीष्मासारखं वार्धक्य!
आरोग्यम् : पोलिओ पॉलिटिक्स
चटक-मटक : चवदार, चटपटीत
युवा : जग थिरकतंय ‘गंगन्म स्टाइल’वर..
भंकसगिरी : थोरांचे संमेलन झाले त्याची गोष्ट..
विज्ञान तंत्रज्ञान : टेक फेस्ट टेक्नॉलॉजीची आषाढी
कवितेचं पान : पहिली गाजलेली कविता

शब्दरंग : आम्हा घरीं धन

एकपानी : बी अ कॅलेंडर!
सिनेमा : मराठी सिनेमात नव्या वर्षांत नव्या जोडय़ा
लग्नाची वेगळी गोष्ट : जीवनात ही घडी..
लग्नाची वेगळी गोष्ट : बायका त्या बायकाच..
पाठलाग :एकच प्याला..
माझं शेतघर : फार्म हाऊस पाहावे घेऊन..
संख्याशास्त्र : मूलांक म्हणजे काय?
भन्नाट : आकाशाला गवसणी
केल्याने रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

वाचक प्रतिसाद

महाराष्ट्रातील कुरणांवर चरताहेत नेते
आजवर सर्वच पक्षांच्या राजकारण्यांनी चराऊ कुरणे ही आपली खासगी मालमत्ता मानत लूट केलीय. एका ओबीसी नेत्याने शैक्षणिक कामाच्या नावाखाली २५ एकर कुरण वापरले. कोणी बोलत नाही. ओबीसींचे नेते ओबीसींचेच कर्दनकाळ बनलेत. धनगरांना आवाज नाही. वाली नाही. तुम्ही तरी बोललात. कसे आभार मानावेत हे समजत नाही.
-सुरेश वाघमारे, नाशिक

कुरणे ही धनगर गुराख्यांची वहिवाटीने हजारो वर्षे हक्काची जमीन आहे. प्रत्येक जिल्ह्य़ात मात्र आता कुरणे दिसेनाशी झालीत. आमच्या बारामती तालुक्यात सर्वत्र कुरणांवर राजरोस दरोडे पडताहेत. जनावरांना प्यायला पाणी नाही की खायला चारा नाही. धनगरांना तालुक्यातून हाकलून द्यायचे कारस्थान चाललेय. धनगर आत्महत्या करू लागेल तेव्हाच सरकारचे डोळे उघडणार का? सोनवणीसाहेब तुम्ही आणि ‘लोकप्रभा’ने आमचे काळीज उघडे केले. अहो खूप हाल चाललेत आमचे. बघायला कोणी नाही. आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना, अशी आमची परिस्थिती बनलीय.
- गणेश कोकरे, बारामती.

कुरणांच्या ज्वलंत प्रश्नाला हात घातल्याबद्दल धन्यवाद. असेच सामाजिक प्रश्न निर्भीडपणे हाताळून गोरगरिबांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करत रहाल ही अपेक्षा व शुभेच्छा.
- विकास कोरडे, शिरुर, पुणे.

भटक्या धनगरांसाठी रेणके आयोग अजूनही का लागू केला जात नाही हे समजत नाही. आजकाल धनगरांना चाऱ्यासाठी तीन-चार राज्यांत भटकावे लागते आणि प्रत्येक राज्य धनगरांना हाकलायच्या मागे असते. आम्ही देशाचे नागरिक तरी आहोत की नाही, हा प्रश्न पडतोय. भारतातील पहाडी प्रदेशातील धनगर-गोपाळ तर आज अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. कर्नाटकातील कुरुबांची स्थितीही वेगळी नाही. तुमच्या लेखाने महाराष्ट्राची वेदना बाहेर तरी आली हे एक समाधान आहे. सोनवणी, तुम्ही देशभरातील धनगरांची व्यथा मांडा. ‘लोकप्रभा’ने हा लेख प्रसिद्ध करायचे धाडस दाखवून खरी पत्रकारिता दाखवलीय. ते नक्कीच देशभरातील धनगरांच्या वेदनेला जागा देतील. साऱ्या देशातील गरीब धनगर बांधव आपल्याला दुवा देतील.
- भाऊसाहेब शिंगोटे, बेळगाव

२८ डिसेंबरच्या ‘लोकप्रभा’ साप्ताहिकातील संजय सोनवणी यांचा महाराष्ट्रातील कुरणांवर चरतंय कोण? हा लेख खूप छान आहे. गायरान जर कमी झाले तर शेतकरी जगणार तरी कसे? सरकार आणी विकासक (builder) यांना कधी कळणार याच्यातील वास्तवता. पुणे-सातारा रस्त्यावरून जाताना डोंगरच्या डोंगर फोडलेले दिसतात. हे जर असेच चालत राहिले तर ढग अडणार कसे? पाऊस पडणार कसा? जमीन पिकणार कशी? नुसतीच सिमेंटची जंगले उभी राहून माणसे जिवंत राहणार आहेत का? पिकणाऱ्या जमिनीवर कारखाने उभे करण्याचा सरकारचा स्तुत्य उपक्रम लाजिरवाणा आहे, कोणत्याही कारखान्यात धान्य अजूनपर्यंत तरी तयार करता येत नाही ते शेतातच होते. हे सगळे माहीत असूनही लागवडीखालील जमीन दिवसेंदिवस कमी होतेय, काही वर्षांत एकेका भाकरीच्या तुकडय़ासाठी मुडदे पडू नयेत म्हणजे झाले.
किशोर टापरे

अंधश्रद्धेस खतपाणी घालणारा अंक
लोकप्रभाचा ‘भविष्य विशेषांक’ वाचून निराशा झाली, कारण आजच्या विज्ञान युगात, ज्योतिषशास्त्राला दिलेले महत्त्व अंधश्रद्धेस खतपाणी घालणारे आहे असे वाटते. त्याऐवजी, जर २०१३ साली कला, साहित्य, खेळ, राजकारण, विज्ञान इत्यादी प्रांतांत भारताची कामगिरी कशी राहील याचा परामर्श घेतला असता तर ते अधिक समर्पक ठरले असते. सरत्या वर्षांत दबंगवाणी, कोकणचो डॉक्टर इत्यादी लोकप्रिय सदरे वाचकांचा निरोप घेत आहेत, म्हणून एक प्रकारची हुरहुर लागली आहे. आगामी वर्षांत सामान्यांना लिहिण्यास उत्तेजन देणारी सदरे सुरू केल्यास उत्तम, कारण कित्येक वाचकांमध्ये एक छुपा लेखक असतो हे त्यांनी ‘लग्नाची वेगळी गोष्ट’अंतर्गत लिहिलेल्या दर्जेदार कथांनी सिद्ध केले आहे.
- केतन मेहेर, विरार

‘लोकप्रभा’मधील पाठलाग सदरातील निशांत सरवणकर यांचे लिखाण चांगले असते. त्यांचे लिखाण उत्सुकतापूर्ण तर आहेच, पण श्रीकांत सिनकरांच्या लिखाणाशी बरेचसे साधम्र्य सांगणारे आहे. मी सिनकरांची पुस्तके १९७० ते ७६ च्या काळात खूप आवडीने वाचत असे. आपणदेखील त्या पद्धतीने लिहावे.
- दिनेश कुमठेकर,
मुख्य अभियंता कुवेत एअरवेज, अध्यक्ष महाराष्ट्र मंडळ कुवेत

ठाणे खाडी परिसराला रामसर साइट म्हणून घोषित करावे
स्थलांतरित पक्ष्यांवरील ७ डिसेंबरच्या अंकातील लेख खूपच उत्कृष्ट आहेत. लेखातील छायाचित्रे तर खूपच उत्कृष्ट आहेत. (अशी अपेक्षा आहे की एक्स्प्रेसनेदेखील ही स्टोरी इंग्रजीत घ्यावी, जेणेकरून अधिक लोकांपर्यंत हा विषय पोहोचेल.) आपण जेव्हा मुंबईतील स्थलांतरित पक्ष्यांच्या अधिवासाबद्दल बोलतो, त्याच वेळी ठाणे येथील पक्षी अधिवासाचीदेखील दखल घेणे गरजेचे आहे. ठाणे खाडी आणि परिसर हा अनेकस्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास आहे. मुंबईत फ्लेमिंगोज नाही तर मोठय़ा प्रमाणात स्थलांतरित पक्ष्यांचे अधिवास धोक्यात आले आहेत. ठाणे खाडी परिसरातील अधिवास केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने रामसर साइट म्हणून घोषित करावे, अशी अनेक पर्यावरणवाद्यांची मागणी आहे. ठाणे खाडी परिसरातील इतर धोके आणि खारफुटीचा नाश होणे यातून येथे येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांसाठी आपत्तिजनक आहे.
- प्रशांत रांगणेकर

कायदा करताय..
जरा सांभाळून !
गणेश काटमोरे :

भौतिक विकासाबरोबरच सामाजिक विकास पण गरजेचा आहे आणि ही केवळ सरकारची नाही तर मानव म्हणवणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.
दीपक विसपुते :
अतिशय जळजळीत वास्तव आपण समोर आणले आहे.
विजयंता टॅक :
जळजळीत सत्य, पण आजवरची कारकीर्द पाहता नवीन कायदा याबाबत काही करू शकेल अशी स्थिती नाही. आता खरी गरज आहे ती सध्याच्या कायद्याचे मजबुतीकरण करण्याची. ते इतके अभेद्य हवेत की समाजातील कोणत्याही घटकाची ते मोडण्याची हिंमत होणार नाही. त्यामुळेच फक्त कायदे असणे हा उपाय नाही. कायद्यानुसार माझी गाडी पोलिसांनी उचलून न्यायची आणि आमदाराने फोन केल्यावर सोडून द्यायची, याला काही अर्थ नाही. असल्या पळवाटा नव्या कायद्यात असू नयेत. आपले संपादकीय आपले मूक-बधिर आणि आंधळे शासन वाचेल आणि त्याचा विचार करेल, अशी आशा आहे. भारतीय जनतेला यातून काहीतरी चांगले मिळेल अशी अपेक्षा आहे.

सुधारगृह नव्हे जिवंत नरकच
विजयंता टँक :
कापरेरेट हाऊसने जबाबदारी घ्यावी

महाराष्ट्राचे शिक्षण राज्यमंत्रीच आफ्रिकन सफारीबद्दल अकलेचे तारे तोडतात आणि त्यावर काहीच होत नाही. सरकार काय करत आहे. महाराष्ट्र शासनाने सुधारगृहाबाबतच्या सर्व खात्यातील दोषींना पकडणे गरजेचे आहे. त्यांना सराईत गुन्हेगार मानून शिक्षा करावी, कारण एकटे अधीक्षक अशी कृत्ये करू शकणार नाहीत. भविष्यात विविध सामाजिक संस्थांनी आणि मोठय़ा कॉर्पोरेट हाऊसनी अशा सुधारगृहांची जबाबदारी घ्यावी. अशा अबला भगिनीसाठी समाजदेखील मदत करेल. सरकारचे दलाल हे कधीच विश्वासू नव्हते. आजवरचे त्यांचे रेकॉर्ड हे पूर्णपणे खोटेपणाने भरले आहे. प्रत्येक वाचकांने सोनिया गांधींना किमान एक पोस्ट कार्ड पाठवावे आणि महाराष्ट्रातील या भीषण परिस्थितीची जाणीव करून द्यावी.

महिलांना मिळणारी दुय्यम वागणूक हे समस्येचे मूळ
‘लोकप्रभा’च्या २१ डिसेंबरच्या अंकातील महिला सुधारगृहावरील लेख वाचला. या लेखामुळे सुधारगृहाविषयी अनेक प्रश्न मनामध्ये निर्माण झाले. सुधारगृहाचा मूळ उद्देश चुकलेल्या व्यक्तीला चांगल्या मार्गावर आणणे हा असतो. पण इथे मात्र ज्यांना परिस्थितीने ग्रासले आहे अशा मुली आहेत असे दिसते. सुधारगृहाचे चित्र पाहता त्यांना इथे स्वावलंबी बनवण्यासाठी कोणतेच उपाय केले जात नाहीत. उलट त्यांना पुन्हा वाईट मार्गाला लावले जात आहे. यासाठी सुधारगृह तर जबाबदार आहेच, पण आपणही जबाबदार आहोत असे वाटते. कारण जे काही घडते ते आपल्या समाजामध्येच घडते. आपण त्याबद्दल काही न करता गप्प बसतो याचा अर्थ आपली अशा गोष्टींना मूक संमतीच असते. महिलांना त्यांच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या जाचाला सामोरे जावे लागते. याची सुरुवात आपल्या घरांमधूनच होत असते. महिलांना दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणुकीतूनच महिलांच्या समस्यांची सुरुवात होते. समाजाच्या अध:पतना विरोधात आपण फार काही करू शकत नसलो तरी आपल्या घरामध्ये नक्कीच सकारात्मक गोष्टी करू शकू. फक्त सुरुवात स्वत:पासून करणे आवश्यक आहे.
- शरद प्रधान, बोरिवली

भारतीय खेळाडूंसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधा असाव्यात..
खो-खोला हवे मॅटचे मदान हा २८ डिसेंबरच्या अंकातील लेख वाचला व मनाला तो पटलासुद्धा. भारतीय लोक, क्रीडाप्रेमी, भारतीय खेळांचे व खेळ मंडळाचे पदाधिकारी भारतीय खेळाडूंकडून जिंकण्याच्या खूप आशा-अपेक्षा करतात. ते करणे योग्य आहे.
मात्र भारतीय खेळाडूंना पाश्चात्त्य देशातील खेळाडूंच्या धर्तीवर अत्याधुनिक सोयी-सवलती व तंत्र पद्धतीची प्रॅक्टिस मिळत नाही. खो-खोला मॅटचे मदान हवे या लेखातून आपण मॅट मदानाचे महत्त्व विशद करून मॅटची आवश्यकता किती महत्त्वाची आहे हे दर्शविले त्याबद्दल धन्यवाद. केवळ खो-खोचा विचार करून चालणार नाही, तर इतर जे काही खेळ असतील त्या सर्व खेळांच्या खेळाडूंसाठी आधुनिक सोयी-सुविधा प्राप्त करून दिली व तशी तयारी करून घेतली तर भारतीय खेळाडू विश्वस्तरीय दर्जाचे होतील व करोडो भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करतील.
- धोंडीरामसिंह राजपूत, वैजापूर