११ जानेवारी २०१३
मथितार्थ : अभाव ‘सामुदायिक जीवना’चा!
चित्रकथी : चित्रवीण!
कव्हर स्टोरी
क्रीडा : कल खेल में हम हो न हो..
प्रासंगिक

सादरीकरणाची कला आपल्या रक्तातच!
विकेट ‘कीपर’

संगीत : आठवणी वाद्यवृंदाच्या!
थोडी सजगता आणि पथ्य
सेकंड इनिंग : भीष्मासारखं वार्धक्य!
आरोग्यम् : पोलिओ पॉलिटिक्स
चटक-मटक : चवदार, चटपटीत
युवा : जग थिरकतंय ‘गंगन्म स्टाइल’वर..
भंकसगिरी : थोरांचे संमेलन झाले त्याची गोष्ट..
विज्ञान तंत्रज्ञान : टेक फेस्ट टेक्नॉलॉजीची आषाढी
कवितेचं पान : पहिली गाजलेली कविता

शब्दरंग : आम्हा घरीं धन

एकपानी : बी अ कॅलेंडर!
सिनेमा : मराठी सिनेमात नव्या वर्षांत नव्या जोडय़ा
लग्नाची वेगळी गोष्ट : जीवनात ही घडी..
लग्नाची वेगळी गोष्ट : बायका त्या बायकाच..
पाठलाग :एकच प्याला..
माझं शेतघर : फार्म हाऊस पाहावे घेऊन..
संख्याशास्त्र : मूलांक म्हणजे काय?
भन्नाट : आकाशाला गवसणी
केल्याने रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

क्रीडा

कल खेल में हम हो न हो..
प्रशांत केणी

response.lokprabha@expressindia.com
एक दिवसीय क्रिकेटमधून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपली निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्या कारकिर्दीवर एक दृष्टिक्षेप..

सचिन तेंडुलकरसाठी २९ मार्च १९९४ हा दिवस जितका महत्त्वाचा ठरला, तितकाच एकदिवसीय क्रिकेटसाठी. या सामन्याने एकदिवसीय क्रिकेटला नवा महामंत्र दिला. सचिन नावाचा सूर्य सर्वप्रथम तेजाने तळपला तो याच दिवशी. होळीच्या सणाने भारतात रंगांची उधळण केली, तर परदेशात सचिनने धावांची. न्यूझीलंडच्या ऑकलंडमधील ईडन पार्क मैदानावर भारत-न्यूझीलंड सामना रंगणार होता. भारताचा सलामीवीर नवज्योतसिंग सिद्धू मान दुखत असल्यामुळे खेळू शकणार नव्हता. पण सचिनने प्रशिक्षक अजित वाडेकर यांना विचारले, ‘‘मी भारताच्या डावाला प्रारंभ करू का?’’ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाच वष्रे खेळणाऱ्या सचिनच्या या प्रश्नाकडे वाडेकर यांनी शांतपणे पाहिले आणि त्याला परवानगी दिली. डॅनी मॉरिसन, ख्रिस पिं्रगल आणि गॅव्हिन लार्सन यांच्यासारख्या दिग्गज किवी गोलंदाजांवर सचिनने जोरदार हल्ला चढवला. या दिवसापर्यंत सचिनची फलंदाजी म्हणजे एक कलात्मक अदाकारी होती. पण या दिवशी प्रथमच या फलंदाजीत आक्रमण दिसून आले. सचिनने फक्त ४९ चेंडूंत ८२ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. या सामन्यानंतर सचिनचे सलामीचे स्थान ‘फेव्हिकॉल का मजबूत जोड’प्रमाणे पक्के झाले ते आजमितीपर्यंत. एकदिवसीय क्रिकेटमधील सचिनच्या कारकिर्दीच्या सूर्यास्ताप्रसंगी सर्वप्रथम ताजा होतो तो हाच क्षण.
सचिनने निवृत्ती पत्करावी, हा सल्ला तसे ३९ वर्षीय या महानायकाला गेली दोन वष्रे तरी प्रसारमाध्यमे आणि माजी क्रिकेटपटू देत आहेत. १००व्या शतकासाठी सचिनने केलेली दिरंगाई सर्वप्रथम या मंडळींच्या पथ्यावर पडली. त्यानंतर सचिनचा त्रिफळा उडणे, हा नवा कोन या मंडळींनी शोधून काढला. नामांकित वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांसाठी काम करणाऱ्या सुनील गावस्कर, कपिलदेव, सौरव गांगुली आणि विनोद कांबळी या मंडळींनी धडाधड आगपाखड केली. अन्य छोटय़ा-मोठय़ा मंडळींनी त्यांना अनुमोदन दिले. पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खरे तर सचिन हवा होता. पण निवड समितीची धुरा सांभाळणाऱ्या संदीप पाटील आणि कंपनीच्या मनात काही औरच होते. सचिनने सलामीच्या स्थानाऐवजी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरावे, असेही त्याला विचारण्यात आले होते. पण त्याने नकार देऊन सरळ निवृत्ती पत्करल्याचेही चर्चेत होते. झाले.. एकदिवसीय क्रिकेटला नवा आयाम देणारा एक ध्रुवतारा क्रिकेटच्या क्षितिजावरून अस्त पावला. स्वाभाविकपणे सल्लागार मंडळींच्या आत्म्याला थोडी शांती लाभली असेल.
भारतीय क्रिकेट रसिकांचे मास्टर ब्लास्टर सचिन म्हणजे दैवत. पण या दैवताआधी क्रिकेटवर निस्सीम प्रेम करणाऱ्या या क्रिकेटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवले होते ते लिटिल मास्टर सुनील गावस्करने. गोष्ट १९८७ सालची. मुंबई क्रिकेट असोसिएशनचा सर्वोत्तम ज्युनिअर क्रिकेटपटूचा पुरस्कार न मिळाल्यामुळे सचिन स्वत:वर भलताच नाराज होता. पण काही दिवसांतच त्याच्या दारापाशी आलेला पोस्टमन चक्क सुनील गावस्कर यांचेच पत्र घेऊन आला होता. गावस्कर यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेल्या त्या पत्राने सचिनची सारी नाराजी दूर झाली आणि नवी प्रेरणा मिळाली. गावस्कर यांनी पत्राच्या अखेरीस लिहिलेला ताजा कलम असा होता, ‘‘एमसीएकडून सर्वोत्तम ज्युनिअर क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला नाही, म्हणून नाराज होऊ नकोस. जर तू मागील पुरस्कार विजेत्यांची यादी पाहिलीस तर तुला लक्षात येईल की यात एक नाव दिसत नाही आणि त्याने जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये फार वाईट कामगिरी केलेली नाही!’’ शालेय दिवसांतच गावस्कर यांनी सचिनला पॅडची एक जोड भेट म्हणून दिली होती. पाकिस्तानविरुद्ध १९८९मध्ये सचिनने कसोटी पदार्पण केले ते हेच गावस्करचे पॅड बांधून. १९८९मध्ये सचिन नावाचा सूर्य सर्वप्रथम पाकिस्तान भूमीवर उदयाला आला. इम्रान खान, वसिम अक्रम आणि वकार युनूस यांसारखे तेजतर्रार गोलंदाज समोर असतानाही तो डगमगला नाही, तर त्वेषाने लढला. या दौऱ्यावरील एका प्रदर्शनीय सामन्यात सचिनने महान फिरकी गोलंदाज अब्दुल कादीरवर तुफानी हल्ला चढवत त्याच्या गोलंदाजीची हवाच काढून घेतली होती. सियालकोटच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटीत इम्रान खानचा एक उसळणारा चेंडू सचिनच्या नाकावर आदळला आणि रक्त वाहू लागले. पण त्याने वैद्यकीय मदत नाकारून मैदानावर खेळणे पसंत केले.
एकदिवसीय क्रिकेटमधून सचिनने अलविदा केला, तेव्हा त्याच्या खात्यावर जमा होती विश्वविक्रमी सर्वात जास्त ४९ शतके. पण त्याच्या पहिल्या एकदिवसीय शतकासाठी मात्र त्याला तब्बल पाच वष्रे वाट पाहावी लागली होती. ९ सप्टेंबर १९९४ या दिवशी सुमारे ७९ एकदिवसीय सामने खेळल्यानंतर सचिनच्या खात्यावर पहिले शतक जमा झाले, ते कोलंबोमध्ये. त्यानंतर १९९८मध्ये सचिन तेजाने तळपला. शारजात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने त्वेषाने हल्लाबोल केला. वाळूच्या वादळानंतर सचिन नामक आलेले वादळ सर्वानी अनुभवले. त्यानंतर स्वत:च्या वाढदिवसादिवशी ऑस्ट्रेलियाला हरवून शतक आणि विजेतेपद हे दोन्ही यश त्याने मिळवून दाखविले होते. यशाचा हा आलेख उंचावतच होता.
फलंदाज म्हणून धावांचा एव्हरेस्ट रचणारा हा महानायक चांगला संघनायक कधीच बनू शकला नाही. १९९६मध्ये मोठय़ा आशाआकांक्षांच्या बळावर सचिनला देशाचे नेतृत्व सोपविण्यात आले. पण सचिनला कर्णधार म्हणून यश मिळू शकले नाही. १९९७मध्ये भारत अतिशय वाईट पद्धतीने हरला. तेव्हा भारताचा माजी कप्तान मोहम्मद अझरुद्दीनने फार वाईट भाष्य केले होते, ‘‘नहीं जीतेगा, छोटे के नसीब में जीत नहीं है!’’ अझरचे हे बोल खरे ठरले. २५ कसोटी सामन्यांत फक्त ४ विजय सचिनच्या नेतृत्वाखाली भारताला मिळवता आले, तर ९ पराजय आणि १२ सामने अनिर्णीत राहिले. याचप्रमाणे ७३ एकदिवसीय सामन्यांपैकी फक्त २३ विजय आणि ४३ पराभव असा सचिनच्या कप्तानीचा आलेख राहिला. त्यामुळे अखेर निराश अंत:करणाने सचिनने २०००मध्ये कर्णधारपदाचा त्याग केला. मग बीसीसीआयने सौरव गांगुलीकडे नेतृत्वाची धुरा सोपवली.

एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला, तेव्हा त्याच्या खात्यावर ४९ विश्वविक्रमी शतकं होती पण पहिल्या एकदिवसीय शतकासाठी त्याला तब्बल पाच वष्रे वाट पाहावी लागली होती.

पण सचिन भारतीय संघाच्या थिंक टँकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होता. संघातील अनुभवी खेळाडू असल्यामुळे व्यूहरचना आखताना तो नेहमी कर्णधारासोबत कार्यरत दिसायचा. इरफान पठाणला फलंदाजीच्या क्रमात बढती देण्याची सूचना सचिननेच केल्याचे माजी कप्तान राहुल द्रविडने सर्वासमोर सांगितले होते. त्यावेळी या निर्णयामुळे संघाचे नशीबही पालटले होते. २००७ मध्ये द्रविड कप्तान असताना सचिनला उपकर्णधार नेमले होते. २००७ मध्ये भारतीय संघासमोर इंग्लंड दौऱ्याचे आव्हान होते आणि द्रविडची कर्णधारपद सोडण्याची तीव्र इच्छा होती त्यावेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्तिश: सचिनशी संपर्क साधून त्याला कर्णधारपद स्विकारण्याची विनंती केली होती. पण सचिनने विनम्रपणे पवार यांना आपल्याला कर्णधारपद देऊ नये, अशी विनंती केली. पण यावेळी सचिनने कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे सोपवावी, अशी शिफारसही पवार यांच्याकडे केली होती. धोनीमुळे मग भारताचे नशीब उजळून निघाले होते. पण धोनीचे नाव सर्वप्रथम सुचविणाऱ्या सचिनशी झालेले हे संभाषण नंतर पवार यांनी उघड केले होते.
ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये फक्त एकमेव सामना खेळणाऱ्या सचिनने इंडियन प्रीमियर लीगमधील मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व मात्र चार हंगाम सांभाळले. परंतु २०११ मध्ये चॅम्पियन्स लीग स्पध्रेला सामोरे जाता सचिन दुखापतग्रस्त असल्यामुळे हरभजन सिंगकडे नेतृत्व देण्यात आले आणि कमाल झाली. भज्जीने मुंबई इंडियन्सला पहिलेवहिले जेतेपद चॅम्पियन लीगच्या रूपाने मिळवून दिले. स्वाभाविकपणे सचिनच्या मनावर या घटनेचाही परिणाम झाला. त्यामुळे पाचव्या आयपीएल पर्वात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व सचिनने स्वयंप्रेरणेने हरभजनकडे दिले.
कप्तानीप्रमाणे सचिन खेळतो, तेव्हा भारत हरतो अशी एक चर्चा हमखास होताना आढळायची. पण आकडेवारीकडे नजर टाकल्यास या दाव्याचा फोलपणा सहजपणे लक्षात येतो. सचिन खेळलेल्या ४६३ एकदिवसीय सामन्यांपैकी २३४ सामने भारताने जिंकले आहेत, तर २०० सामने भारत पराभूत झाला आहे. याचप्रमाणे २४ अनिर्णीत आणि ५ टाय झाले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सचिनने प्रतिनिधित्व केलेल्या १९४ सामन्यांपैकी भारत ६६ सामन्यांत जिंकला, तर ५६ सामन्यांत हरला आहे. याशिवाय ७२ सामने अनिर्णीत राहिले आहेत. त्यामुळेच सचिनचे एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणे, हे मंथन करण्याजोगे आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात मर्यादित षटकांची क्रिकेट मालिका सुरू आहे. पण सचिनच नसल्यामुळे या मालिकेविषयी क्रिकेटरसिकांना फारशी उत्सुकता दिसत नाही. त्यामुळेच आता क्रिकेट जगताला प्रतीक्षा आहे ती नव्या सचिनची. सचिनने चार दिवसांपूर्वी ट्विटरवर म्हटले होते की, ‘‘एकदिवसीय क्रिकेटच्या प्रवासामधील काही जादुई क्षण माझ्या उर्वरित आयुष्यात माझी सोबत करतील. माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या क्रिकेट रसिकांचा मी आभारी आहे.’’ सचिनच्या या मताप्रमाणेच त्याच्या क्रिकेट रसिकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या खेळीही सदैव सर्वाच्या लक्षात राहतील.