११ जानेवारी २०१३
मथितार्थ : अभाव ‘सामुदायिक जीवना’चा!
चित्रकथी : चित्रवीण!
कव्हर स्टोरी
क्रीडा : कल खेल में हम हो न हो..
प्रासंगिक

सादरीकरणाची कला आपल्या रक्तातच!
विकेट ‘कीपर’

संगीत : आठवणी वाद्यवृंदाच्या!
थोडी सजगता आणि पथ्य
सेकंड इनिंग : भीष्मासारखं वार्धक्य!
आरोग्यम् : पोलिओ पॉलिटिक्स
चटक-मटक : चवदार, चटपटीत
युवा : जग थिरकतंय ‘गंगन्म स्टाइल’वर..
भंकसगिरी : थोरांचे संमेलन झाले त्याची गोष्ट..
विज्ञान तंत्रज्ञान : टेक फेस्ट टेक्नॉलॉजीची आषाढी
कवितेचं पान : पहिली गाजलेली कविता

शब्दरंग : आम्हा घरीं धन

एकपानी : बी अ कॅलेंडर!
सिनेमा : मराठी सिनेमात नव्या वर्षांत नव्या जोडय़ा
लग्नाची वेगळी गोष्ट : जीवनात ही घडी..
लग्नाची वेगळी गोष्ट : बायका त्या बायकाच..
पाठलाग :एकच प्याला..
माझं शेतघर : फार्म हाऊस पाहावे घेऊन..
संख्याशास्त्र : मूलांक म्हणजे काय?
भन्नाट : आकाशाला गवसणी
केल्याने रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

शब्दरंग

सत्त्वशीला सामंत
आम्हां घरीं धन..
‘शब्दरंग’ या सदराचा शुभारंभ करताना मला सर्वप्रथम आठवली ती संजीवनी मराठे यांची ‘अमुचीं रत्नें’ ही कविता-
अमुचीं रत्नें शब्दांचीं, सुबक साजिरीं त्यांस कोंदणे,
ललित लयींचीं - छंदांची!
अमुचीं रत्नें बोलांचीं, साक्षात् प्रणयाकंठी रुळती,
असल्या तोलामोलाचीं!
अमुचीं रत्नें वचनांचीं, अर्थावर आरोहुन जाती,
ऋणें फेडण्या जन्मांचीं।
(‘मी-दिवाणी’)
जुन्या काळीं शिवाजीमहाराजांनी संत तुकारामांचा सन्मान करण्यासाठी कारकुनाबरोबर पत्र, अबदागीर, वगैरे देऊन बोलावणं धाडलं तेव्हा, तुकारामांनी अभंगात्मक उत्तर पाठवलं तें असं-
दिवटय़ा छत्री घोडे। हें तों बऱ्यांत न पडे।।१।।
....
द्रव्य आणि धन। हीं आम्हां गोमांसासमान
तुमचें येर वित्त धन। तें मज मृत्तिकेसमान।।
राजदरबाराकडून येऊं घातलेल्या लौकिक धनसंपत्तीकडे पाठ फिरवणारे तुकाराममहाराज दुसऱ्या एका अभंगात म्हणतात-
आह्मां घरीं धन शब्दांचीं रत्नें।..
‘शब्दरत्न’ ही कल्पना तुकारामांनी आणखी एका ठिकाणी’ योजलेली आहे-
शब्दांचीं रत्नें करूनी अळंकार। तेणें विश्वंभर पूजियेला।।१।।
त्याचबरोबर, पहिल्या अभंगात तुकाराममहाराज ‘शब्दांचीं शस्त्रें यत्नें करूं। ..’ असंही म्हणतात तेव्हा, शब्द हा हिऱ्याप्रमाणें रत्न असूनही धारदार शस्त्रदेखील आहे हे लक्षात येतं. शब्द हे एक दुधारी शस्त्र आहे. नेटक्या शब्दांनी अंतरींच्या भावना व्यक्त करतां येतात, तशा त्या लटक्या शब्दांनी प्रसंगी लपवतांही येतात. प्रभावी शब्द योजून इतरांच्या मनांतील स्फुल्लिंग चेतवतां येतो व त्यांना सत्कर्माची प्रेरणा देतां येते, तर भेदक शब्दांचा मारा करून, दुसऱ्यावर मर्माघातहि करतां येतो. पण कधीं कधीं बुडबुडय़ासारखे पोकळ, फसवे शब्द वापरून, इतरांची दिशाभूल केली जाते. एक कवी म्हणतो-
शब्द बापुडे केवळ वारा। ..
व म्हणून ते वाऱ्यावर विरूनही जातात. ‘ट्रॉयलस् अँड क्रेसिडा’ या नाटकात शेक्सपीअर म्हणतो-
Words, words, mere words, no matter from the heart.
म्हणून शब्दांना अर्थाचीही जोड हवी.
‘वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये। ..’
असं महाकवी कालिदास म्हणतो त्याप्रमाणे शब्द व अर्थ या दोघांचं शिवशक्तीसारखं अद्वैत हवं.
इंग्रजी भाषेचे प्रख्यात कोशकार डॉ. सॅम्युएल जॉन्सन यांनी आपल्या कोशाच्या प्रस्तावनेत म्हटलंय-
I am not yet so lost in lexicography as to forget that words are the daughters of the earth, and that things are the sons of heaven.
त्यांच्या मतें, जगातील अखिल वस्तुजात हें ईश्वरदत्त आहे, पण शब्दसंपत्ती मात्र मानवनिर्मित आहे.
God wore a web of loveliness
of clouds and stars and birds.
But made not any thing at all
So beautiful as words (Her words)
असं अ‍ॅना ब्रँच ही लेखिका म्हणते. पु. ल. देशपांडय़ांची ‘ती फुलराणी’ तर शब्दांवरच भाळलेली आहे.
त्यामुळें बहुरंगी शब्दांचं इंद्रधनुष्य माझ्यासारख्या शब्दप्रेमींना कायम खुणावतं आणि मोहवत राहतं. म्हणून ‘शब्दरंग’ खेळून त्यांच्या सप्तरंगांत न्हाऊन निघावं व त्यात वाचकांनाही भिजवून ‘रंगवावं’ असा माझा मानस आहें.
रूप, रस, स्पर्श व गंध या संवेदनांच्या तुलनेत श्रुतिसंवेदनेचं असाधारण महत्त्व जाणून ज्ञानेश्वर म्हणतात-
तैसें शब्दांचें व्यापकपण। देखिजे असाधारण।
पाहतयां भावज्ञां फावती गुण। चिंतामणीचे।। (ज्ञाने. ६:२१)
‘बोलीं अरूपांचे रूप दावीन’ ही ज्ञानेश्वरांची तर ‘शब्दें वांटूं धन जनलोकां’ ही तुकाराममहाराजांची प्रतिज्ञा आहे.
‘एक: शब्द: सुज्ञात: सुप्रयुक्त: स्वर्गे लोके कामधुक् भवति।
म्हणजे ‘सम्यक् तया जाणून घेतलेला व योग्य प्रकारें योजलेला कोणताही शब्द हा इहलोकीं व परलोकींही कामधेनूप्रमाणें आपले मनोरथ पुरवतो.’ असा हा शब्दचिंतामणि व ही शाब्दिक कामधेनु तुम्हां-आम्हां, सर्वाना पावो ही सदिच्छा!
हा ‘शब्दरंग’ खेळताना, मी जें साहित्य वापरणार आहें तें सारं पूर्वसूरींचं संचित आहे.
‘महाराष्ट्र शब्दकोश’ कार य. रा. दाते, ‘गीर्वाणलघुकोश’कार ज. वि. ओक, इंग्रजी शब्दकोशकार नोहा वेब्स्टर, ‘उर्दू-हिंदी शब्दकोश’कार ‘मद्दाह’, हिंदी शब्दकोशकार डॉ. हरदेव बाहरी आणि भाषावैज्ञानिक डॉ. पां. दा. गुणे व डॉ. भोलानाथ तिवारी व इतर अनेक कोशकार हे माझे पूर्वसूरी असून, ‘इदं न मम’ अशीच माझी भावना आहे.
फोडिलें भांडार। धन्याचा हा माल।
मी तो हमाल। भारवाही।।
response.lokprabha@expressindia.com