११ जानेवारी २०१३
मथितार्थ : अभाव ‘सामुदायिक जीवना’चा!
चित्रकथी : चित्रवीण!
कव्हर स्टोरी
क्रीडा : कल खेल में हम हो न हो..
प्रासंगिक

सादरीकरणाची कला आपल्या रक्तातच!
विकेट ‘कीपर’

संगीत : आठवणी वाद्यवृंदाच्या!
थोडी सजगता आणि पथ्य
सेकंड इनिंग : भीष्मासारखं वार्धक्य!
आरोग्यम् : पोलिओ पॉलिटिक्स
चटक-मटक : चवदार, चटपटीत
युवा : जग थिरकतंय ‘गंगन्म स्टाइल’वर..
भंकसगिरी : थोरांचे संमेलन झाले त्याची गोष्ट..
विज्ञान तंत्रज्ञान : टेक फेस्ट टेक्नॉलॉजीची आषाढी
कवितेचं पान : पहिली गाजलेली कविता

शब्दरंग : आम्हा घरीं धन

एकपानी : बी अ कॅलेंडर!
सिनेमा : मराठी सिनेमात नव्या वर्षांत नव्या जोडय़ा
लग्नाची वेगळी गोष्ट : जीवनात ही घडी..
लग्नाची वेगळी गोष्ट : बायका त्या बायकाच..
पाठलाग :एकच प्याला..
माझं शेतघर : फार्म हाऊस पाहावे घेऊन..
संख्याशास्त्र : मूलांक म्हणजे काय?
भन्नाट : आकाशाला गवसणी
केल्याने रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

सेकंड इनिंग

भीष्मासारखं वार्धक्य!
डॉ. उज्ज्वला दळवी

response.lokprabha@expressindia.com
नवनव्या औषधांमुळे गेल्या शंभर वर्षांत माणसाचं जीवनमान वाढलं आहे. साहजिकच वृद्धांची संख्या वाढली आणि त्यांच्या समस्याही वाढल्या. पण समस्या आहेत म्हणून कुरकुरत बसण्यापेक्षा आपली दुसरी इनिंग अधिकाधिक रुपेरी कशी होईल यासाठी प्रयत्न करायला हवेत.

‘‘भावडय़ा, लहान आहेस रे तू!’’
मुंबई विमानतळावर एक आजी हे खणखणीत आवाजात म्हणाल्या. त्यांच्याबरोबर फक्त एक आजोबा होते. म्हणून कुतूहलाने चौकशी केल्यावर कळलं की आजी आपल्या पणतीचं बाळंतपण करायला वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी हाँगकाँगला चालल्या होत्या! आणि सोबतचा पंच्याहत्तरीचा भाऊ त्यांना ‘म्हातारा इतुका न, अवघे पाऊणशे वयमान’ असा वाटणं स्वाभाविकच होतं.
पण त्या आजींनाही ‘लहान’ म्हणू शकतील असे निदान पाच तरी नव्वदीपार आजोबा मला त्या क्षणी आठवले.
शारदा नाटकाच्या काळात, १९१२ साली यावर कुणाचाही विश्वास बसणं शक्य नव्हतं. त्या दिवसांत माणसं पटकी-विषमज्वरासारख्या साथीच्या रोगांनी लहान वयात मरत असत. मग विज्ञानयुग आलं; नवनव्या औषधांनी आणि प्रतिबंधक लशींनी साथीच्या आजारांना काबूत आणलं; शहरी राहणीत साप-विंचू चावणं कमी झालं; सर्वसाधारण माणूस दीर्घायुषी झाला. या सहस्रकाच्या सुरुवातीला साठी ओलांडलेली साठ कोटी माणसं जगात होती. २०५० साली त्यांची संख्या दोनशे कोटींच्या पुढेच जाईल! त्या वृद्धांची काळजी घ्यायला ‘हम दो, हमारा एक,’ म्हणणाऱ्या जगात पुरेशी तरुणाई मात्र हजर नसेल! सारं जग वार्धक्याच्या सावटाने झाकोळून जाईल.
असं भाकीत सध्या वर्तवलं जातं आहे. पण विज्ञानाच्या प्रगतीमुळे जसा फरक गेल्या शतकभरात पडला तसाच पुढेही पडू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेने १९९९ सालापासूनच त्या दृष्टीने पावलं उचलायला सुरुवात केली आहे. वाढत्या वृद्धसंख्येच्या वाढीव मागण्यांच्या समस्येवरचा सर्वोत्तम तोडगा म्हणजे ‘करतं-सवरतं वार्धक्य’. जगातल्या सर्व देशांनी या प्रकल्पाला हातभार लावायचा आहे. प्रत्येक वृद्धाच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कुवतीप्रमाणे त्याला स्वत:साठी आणि समाजासाठी सतत काही ना काही करत राहता यावं; त्याच्या गरजा आणि अपेक्षा समाजाकडून पूर्ण व्हाव्या; जेव्हा निकड भासेल तेव्हा त्याला पुरेसं संरक्षण आणि मदत मिळावी म्हणून हा बेत आखलेला आहे. त्यायोगे सशक्त, सुरक्षित आणि समाजाभिमुख असं ‘यशस्वी वार्धक्य’ साऱ्यांना मिळेल.
या कामात तरुणाईची मदत लागेलच. स्वत:च्या आईवडलांची आणि आजीआजोबांची काळजी घेतानाच त्यांना इतर वडीलधाऱ्यांच्या भावना आणि गरजाही समजून घ्याव्या लागतील. देशोदेशींच्या सरकारचा हातभारही लागेल. पण मुख्य भार उचलायचा आहे तो वृद्धांनीच. संसार, मुलांचं शिक्षण, त्यांची लग्नं, आपल्या आईवडलांची सेवा वगरे अनेक जबाबदाऱ्या त्यांनी आयुष्यात पेललेल्या असतात. स्वत:चं उतारवय ही त्यांतलीच एक जबाबदारी म्हणून जर स्वीकारली तर तिच्यासाठी योजनाबद्ध आखणी करता येईल. ती कशी करायची हे समजायला काही गोष्टींची नीट माहिती असावी लागते. ती माहिती करून देणं हेच या लेखमालेचं उद्दिष्ट आहे.
संवेदनशील राहणं ही जशी तरुणांची जबाबदारी असते तसंच ते वडीलधाऱ्यांचंही कर्तव्य असतं. त्यांनीही तरुणांची धावपळ, त्यांच्या अडचणी समजून घ्यायला हव्या. आडमुठेपणा सोडायला हवा. वेळीच पड खाल्ली तरच वेळ जिंकून घेता येते. आपल्याच मुलांसाठी नव्हे तर त्या पिढीतल्या इतरही धडपडणाऱ्या मुलांना आपल्या परीने जे काही सहाय्य करता येईल ते केलं तर नवे ऋणानुबंध जुळून येतील; त्यांचा पुढे आपल्या अडीअडचणींनाही उपयोग होईल. आयुष्याच्या सांजवेळी सभोवती आपल्या माणसांचं गोकुळ असावं असं प्रत्येकाला वाटतं. आजकाल मुलं परदेशी किंवा परगावी असतात. जवळ आपला गोतावळा नसतो. म्हणून आपला नवा गोतावळा आपणच जोडायचा असतो. जे काही आपल्याला येतं, जमतं ते जर भोवतालच्या समाजाला द्यायला आपण झटलो तर एक नवी देवाणघेवाण सुरू होते. त्यातून माणसं जोडली जातात.
शंतनू-सत्यवतींचा विवाह झाला तेव्हा देवव्रत भीष्म जाणत्या वयाचा होता. आणि अभिमन्यूची पत्नी उत्तरा गर्भवती असताना पितामह भीष्म कौरवांचे सेनापती झाले. म्हणजे त्यांची कारकीर्द चार पिढय़ांच्या काळाइतकी चालली आणि तिच्या अखेरीलाही ते लढायला उतरले इतके सशक्त होते. मृत्यूच्या वेळेपर्यंत त्यांच्या अवतीभोवती जवळच्या नातेवाईकांची तुंबळ का होईना, वर्दळ होती. त्यांची सेना त्यांना मान देत होतीच पण विरोधी पक्षाच्या मनातही त्यांच्याबद्दल आदर होता. वार्धक्य असावं तर ते भीष्मासारखं!
पण त्या चार-पाच पिढय़ांत लढण्याच्या आणि जगण्याच्याही पद्धतीत कसलाही बदल झाला नाही. भीष्मांच्या ज्ञानाचा शेवटपर्यंत साऱ्यांना फायदाच झाला. आता दर वर्षी आयपॅड, आयफोन, टॅबलेट, फॅबलेट अशी नवनवी फॅडं येत राहतात; म्हाताऱ्या माणसांना त्यांच्याशी जमवून घेणं कठीण होतं; त्यामुळे त्यांची तरुणाईपासून फारकत होत जाते; ती एकटी पडतात. तसं होऊ नये म्हणून आपल्यापुरतं का होईना नवं तंत्रज्ञान आत्मसात करणं अत्यावश्यक आहे.
जगूकाकांचा पाय मधुमेहामुळे गुडघ्यापासून कापावा लागला. त्यांचा मुलगा अमेरिकेत मोठं पद भूषवतो आहे. जगूकाका कट्टर पुणेकर, दोन नोकरांच्या मदतीने एकटे राहणारे. ते जिद्दीने संगणक शिकले; त्याच्यावर भरपूर वाचन केलं. शिवाय रोज दोन तास अमेरिकेतल्या मुलाशी, नातवंडांशी व्हिडिओ-गप्पा केल्या त्यांनी! तेवढय़ा सहवासाने आजोबांचं नातवंडांशी नातं दृढ झालं, पक्कं राहिलं; काकांना एकटेपणाची झळ पोचली नाही. मुला-सुनेची मित्रमंडळीही येत-जात राहिली; नोकरांवरही त्यामुळे वचक राहिला ते वेगळंच. घरात फिरायला काकांनी इलेक्ट्रिक व्हीलचेअरही वापरली. नवं तंत्रज्ञान योग्य रीतीने वापरल्यामुळे काकांचं म्हातारपण एका पायावर सुखाचं झालं; त्यांच्याभोवती गोकुळ नांदलं.
उतारवय आर्थिकदृष्टय़ा सुरक्षित वाटावं म्हणून बँकेतली शिल्लक पुरेशी असावी तर लागतेच. तिच्यासाठीही योग्य ती पावलं उचलायला हवीत. तिने महागाईवर मात करायला हवी असेल तर इक्विटी, म्युच्युअल फंड यांसारखे अन्य मार्गही चोखाळावे लागतात. त्याशिवाय ज्ञानाच्या, आरोग्याच्या, मनुष्यबळाच्या रूपातही पुंजी जमवावी. तीच अधिक कामी येते.
मिताहार, नियमित व्यायाम आणि निर्व्यसनीपणा हे प्रकृतीचे प्रमुख आधार. चिरतरुण देव आनंद म्हणत असे, ‘‘या चित्रसृष्टीत रोजचे दोन घास मिळवायचे असतील तर रोज चार घास कमीच खावे.’’
अशी काळजी तारुण्यापासून घेतली तर उत्तमच. ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात म्हटलंच आहे,
वार्धक्याचे स्मरण तारुण्यींचि ठेवी ।
तर ते जया न शिणवी ।
जाणावे तयाचे ठायी । ज्ञान आहे ?
पण अगदी सत्तरीनंतरही हे र्निबध पाळायला सुरुवात केली तरीही फायदा हा होतोच.
उतारवयात गात्रांची क्षमता उतरणीला लागते. विकलांगपणा, विस्मरण, बुद्धिमांद्य यांसारखे बागुलबुवा भेडसावतात. पंचविशीतली धावपळ, दगदग झेपत नाही. आपल्याला काय झेपेल हे नेमकं जाणून त्याप्रमाणेच वागायला हवं. त्यासाठी म्हातारपण म्हणजे नेमकं काय; त्यात आपल्या शरीरात कोणते बदल होतात; त्या बदलांमुळे येणारा थकवा आणि वृद्धापकाळाच्या आजारांचा शीण यांच्यात फरक काय हे आपण समजून घेणार आहोत. व्यायाम करायला हवाच पण तडक शीर्षांसन करायला गेलं तर तडक डॉक्टर गाठावा लागतो; सारंच उलटं होतं. औषधं घेण्याच्या पद्धतीचीही काही पथ्यं असतात आणि ती आवर्जून पाळायची असतात. आजारपणामागची शरीरातली प्रक्रिया काय असते ते समजून घेतलं की त्यातून मार्ग शोधता येतो. काही सवयी अंगवळणी पाडून घेतल्या की वार्धक्याचे आजार कमी क्लेशदायक वाटतात. वय वाढलं की अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात हे खरं. पण वार्धक्य म्हणजे रोग नव्हे; तो जीवनातला एक टप्पा आहे. त्याला बागुलबुवा समजून घाबरून न जाता नीट न्याहाळून जोखला तर त्याची िशगं धरणं सोपं जातं.
‘मला कुठे म्हातारीला चावताहेत पोहे?
पण घातलेनच भांडय़ात तर खलबत्ता आहे,’
म्हणणाऱ्या आजीने अडचणीवर सोपी मात शोधली होती. वय झालं की धावता येत नाही. पण वार्धक्याच्या अडथळ्यांमधून पळवाटा शोधता येतातच. त्या खेळाबद्दल आपण बोलणारच आहोत.
खुद्द वयाशीच लपंडाव खेळायचा पोरकटपणा मात्र करू नये. आपण म्हातारे झालो आहोत याची स्वत:च्या मनाशीच कबुली दिली की सारं फार सुकर होतं. मग ‘चेहराचढवी’ शल्यक्रिया, बाटलीतला काळिमा, इंचभर जाडीची रंगपुताई या साऱ्यांतून सुटका होते. काठी, श्रवणयंत्र, चष्मा, कंबरपट्टे हे वार्धक्याचे दागिने रुपेरी मुकुटाबरोबर अभिमानाने मिरवता येतात. आपल्या वयाचा मान आपणच राखला की आपल्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळी शान येते. आबा टिपरे आपल्याला आवडतात ते त्यामुळेच. बालपण ही जर पहाट असली तर वार्धक्य ही चांदरात असते. पडदे ओढून घरात टय़ूबलाइट लावून दिवसाचं सोंग आणण्यापेक्षा मोकळेपणे चांदण्याचा आस्वाद घ्यावा.

वार्धक्याच्या अडथळ्यांमधून पळवाटा शोधता येतातच. त्या खेळाबद्दल आपण बोलणारच आहोत.

खरं तर साठी ओलांडून ‘वयात’ येणाऱ्या प्रत्येकाचं या चांदण्याच्या रुपेरी साम्राज्यात पोचल्याबद्दल अभिनंदन करायला हवं. कित्येक कमनशिबी लोकांना ही संधी हवी असून मिळत नाही! आता तर वार्धक्याचा मान वाढणारच आहे. जगभरात वृद्धांची संख्या वाढते आहे. याचाच अर्थ अनेक देशांची मुख्य व्होट-बँक आता रुपेरी केसांची ध्वजा मिरवणार आहे. तरुणाईच्या मतांमागे अनुभवाचं पाठबळ नसतं. वडीलधाऱ्यांची मतं कित्येक पावसाळ्यांत मुरलेली असतात. त्यांनी काठी टेकत मत देऊन प्रतिनिधी निवडले की देश अधिक चांगला चालतो. हा अधिकार उत्साहाने गाजवणं हे वडीलधाऱ्यांचं कर्तव्य आहे.
वय एकदा पंच्याहत्तरीच्या पुढे गेलं की आपली रंगमंचावरची नटाची भूमिका संपते. पण पहिल्या रांगेतल्या राखीव जागी बसून समोर चाललेला खेळ पाहायचा मान मिळतो; मनसोक्त हसावं, टाळ्या वाजवाव्या, दाद द्यावी. आता संशोधनानेच सिद्ध झालं आहे की ‘पाऊणशेची उमर’ गाठल्यावर मनोवृत्ती अधिक आनंदी होते. पंच्याहत्तरी म्हणजे जीवनाचा अमृतमहोत्सव. ते अमृत चाखून एकदा उमर ऐंशीच्या पार गेली की मृत्यूचं प्रमाण कमी होतं. नेहमीचे वैद्यकशास्त्राचे आडाखे त्या अमृतजीवींना लागू पडत नाहीत. हे एकच कारणदेखील आनंदसोहळा साजरा करायला पुरेसं आहे. महर्षी कर्व्यांनी तो आनंद आपल्या समाजकार्यातून अनेक र्वष अक्षरश: लुटला. आपला आदर्श तो आहे.
ज्योतीसम संतत तेवावे; आसमंत नित उजळित जावे।
तृप्त होउनी क्षणात अंती स्वत्त्व मालवुनि मिटुनी जावे ।।
यशस्वी वार्धक्याचा हा गुरुमंत्र आहे.