११ जानेवारी २०१३
मथितार्थ : अभाव ‘सामुदायिक जीवना’चा!
चित्रकथी : चित्रवीण!
कव्हर स्टोरी
क्रीडा : कल खेल में हम हो न हो..
प्रासंगिक

सादरीकरणाची कला आपल्या रक्तातच!
विकेट ‘कीपर’

संगीत : आठवणी वाद्यवृंदाच्या!
थोडी सजगता आणि पथ्य
सेकंड इनिंग : भीष्मासारखं वार्धक्य!
आरोग्यम् : पोलिओ पॉलिटिक्स
चटक-मटक : चवदार, चटपटीत
युवा : जग थिरकतंय ‘गंगन्म स्टाइल’वर..
भंकसगिरी : थोरांचे संमेलन झाले त्याची गोष्ट..
विज्ञान तंत्रज्ञान : टेक फेस्ट टेक्नॉलॉजीची आषाढी
कवितेचं पान : पहिली गाजलेली कविता

शब्दरंग : आम्हा घरीं धन

एकपानी : बी अ कॅलेंडर!
सिनेमा : मराठी सिनेमात नव्या वर्षांत नव्या जोडय़ा
लग्नाची वेगळी गोष्ट : जीवनात ही घडी..
लग्नाची वेगळी गोष्ट : बायका त्या बायकाच..
पाठलाग :एकच प्याला..
माझं शेतघर : फार्म हाऊस पाहावे घेऊन..
संख्याशास्त्र : मूलांक म्हणजे काय?
भन्नाट : आकाशाला गवसणी
केल्याने रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

प्रासंगिक

विकेट ‘कीपर’
शमिक चक्रवर्ती / वजिशा शहा
response.lokprabha@expressindia.com
ज्या देशामध्ये क्रिकेटबद्दलची प्रत्येक गोष्ट प्रसिद्धीच्या शिखरावर पोचते तिथे ‘पिच क्युरेटर’ ही महत्त्वाची व्यक्ती मात्र प्रकाशझोतात येत नाही. ‘पिच क्युरेटर’ प्रोबीर मुखर्जी आणि शिव कुमार यांना आलेल्या अनुभवांचा आणि त्यांच्या कामाचा वेध.

ते १९९८ सालं होते, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला होता. कोलकात्यात ईडन गार्डन मैदानावर सामना होणार होता. सरावादरम्यान ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू रिकी पॉन्टिंग खेळपट्टीवर गेला. खेळपट्टी कठीण आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याने बुटाच्या स्टडने खेळपट्टीचा काही भाग उकरण्याचा प्रयत्न केला. ईडन गार्डन मैदानाचे ‘पिच क्युरेटर’ प्रोबीर मुखर्जी यांच्या करडय़ा नजरेतून पॉन्टिंग वाचला नाही. त्यांनी त्याला हटकले. त्याची चूक त्याच्या लक्षात आणून दिलीच. पण त्याची चांगली कानउघाडणी केली.
मुखर्जी यांचे नाव मागच्या महिन्यात पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले ते धोनीशी झालेल्या वादामुळे. इंग्लंड आणि भारत कसोटी मालिकेदरम्यान कोलकाता येथे एक सामना झाला. या सामन्यापूर्वी धोनीने मुखर्जी यांच्याकडे खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना अनुकूल बनवण्याची विनंतीवजा मागणी केली. यावर ८३ वर्षीय मुखर्जी यांनी हे काम अनैतिक असल्याचे सांगितले. त्यांच्या वक्तव्याची जाहीर चर्चादेखील झाली आणि ‘पिच क्युरेटर’ हा पडद्यामागचा कलाकार पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला.
मुखर्जी यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली ती १९८५मध्ये ‘क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल’ च्या ग्राऊंड कमिटीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. सुरुवातीला ते साहाय्यक म्हणून पिचचे काम बघत असत. १९९३ पासून मात्र त्यांच्याकडे ‘पिच क्युरेटर’ची सर्व सूत्रे सोपवण्यात आली, तेव्हापासून आजपर्यंत ते ईडन गार्डनचे सर्वेसर्वा आहेत. कथित वादानंतर धोनी मुखर्जी यांना भेटला तेव्हा त्याने त्यांना मिठी मारली आणि ‘बॉस ऑफ ईडन’ असे उद्गार काढले.
खरे तर मुखर्जी यांना क्रिकेटर व्हायचे होते. पण चौदाव्या वर्षी झालेल्या एका भीषण अपघातानंतर त्यांचे दोन्ही गुडघे निकामी झाले. खेळणे बंद झाले पण क्रिकेटबरोबरची नाळ तुटली नाही. त्यानंतर त्यांनी एका क्लबच्या मैदानाचा ‘पिच क्युरेटर’ म्हणून काम करण्यास सुरुवात केली. हवामानाचा पिचवर होणारा परिणाम, पिचची माती अशा अनेक गोष्टी त्यांनी येथे प्रत्यक्ष काम करून अनुभवल्या. मैदान व पिचची देखभाल यासाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिले.
१९९३ साली जेव्हा इंग्लंडचा संघ ग्रॅहम गुचच्या नेतृत्वाखाली भारतात आला होता त्यावेळचा हा प्रसंग आहे. भारताची दारोमदार ही फिरकी गोलंदाजांवर होती. कर्णधार महम्मद अझरुद्दीन आपल्या करिअरच्या निर्णायक वळणावर उभा होता. मुखर्जी यांच्याकडे भारतासाठी अनुकूल असणारे पिच बनवण्याची विनंती करण्यात आली. मुखर्जी यांनी भारतासाठी अनुकूल खेळपट्टी बनवली. भारताची कामगिरी चांगली झाली. अझरुद्दीन आपले कप्तानपद टिकवण्यात यशस्वी झाला. त्याने खूश होऊन मैदानावरील कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपयांचे बक्षीस दिले.
या प्रसंगाच्या उलट घटना १९९९ साली घडली. ‘एशियन टेस्ट चॅम्पियनशिप मॅच’ च्या काळात मुखर्जी यांनी हिरवळ असणारे पिच बनवले, कारण त्यांना संघात पदार्पण करणाऱ्या लक्ष्मी रतन शुक्ला याची हिरवळीच्या पिचवरची कामगिरी पाहायची होती. या सामन्यामध्ये नवीन खेळाडूंना संधी दे, असे मुखर्जी यांनी अझरुद्दीनला सांगितले. पण अझरने ते मान्य केले नाही. उलट पिचवरची हिरवळ कमी करा, असे त्याने मुखर्जी यांना सांगितले. मुखर्जी यांनी ते शक्य नाही, असे उत्तर दिले. ते सांगतात, ‘संपूर्ण कारकिर्दीत मी कोणत्याही खेळाडूला माझ्यावर अधिकार गाजवू दिला नाही.’
मुखर्जी यांचे अनेक खेळाडूंबरोबर अनेक वेळा वाद झाले. कधी मुखर्जी यांना माघार घ्यावी लागली तर कधी त्यांनी खेळाडूंना. मुखर्जी सांगतात, ‘पूर्वी खेळपट्टीबाबत कर्णधारांच्या फारशा काही अपेक्षा नव्हत्या. ते खेळावर अधिक लक्ष द्यायचे आजकाल खेळपट्टीबाबतच कर्णधारांनी अपेक्षा बाळगणे सुरू केले आहे. सुनील गावस्कर किंवा कपिलदेव यांनी कधी खेळपट्टीबाबत तक्रार केली नाही. त्यांनी आपल्या संघाचे प्रदर्शन सुधारण्यावर भर दिला. आजचे कर्णधार आपल्या अपयशाचे खापर खेळपट्टीवर फोडतात. याला राहुल द्रविड मात्र अपवाद आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ईडन गार्डनवर काही एकदिवसीय सामने खेळले. एका सामन्याच्या वेळी पिचवर काही प्रमाणात हिरवळ होती. भारतीय संघाचा या सामन्यात पराभव झाला. पण आमचा खेळ वाईट झाला, त्यामुळे आम्ही हरलो असे द्रविडने मान्य केले. खेळातील विजय आणि पराजय हा खेळाडूंवर अवलंबून असतो, पिचवर नाही.’ मुखर्जी यांचा दरारा परदेशी खेळाडूंनीदेखील अनुभवला आहे. एकदा इंग्लंडचा कॅप्टन माईक आथरटन एका टेस्टदरम्यान खेळ संपल्यावर खेळपट्टीचे परीक्षण करीत होता. त्या वेळी मुखर्जी त्याला म्हणाले, ‘लॉर्डसच्या खेळपट्टीचे परीक्षण करण्याची परवानगी भारतीय खेळाडूंना द्या. तरच आम्ही तुम्हाला ईडन गार्डनवर खेळपट्टीचे परीक्षण करायला देऊ.’
धोनीबरोबर झालेल्या वादाबाबत मुखर्जी सांगतात, ‘क्रिकेटविरोधात मी एकही गोष्ट केलेली नाही. माझी निष्ठा खेळावर आहे, व्यक्तीवर नाही.’ अधिकाराचा वापर मी क्रिकेटच्या भल्यासाठी केला आहे, असे ते सांगतात. आपल्या कारकिर्दीचा आढावा घेताना मुखर्जी सांगतात, ‘ ‘पिच क्युरेटर’ला जेव्हा काही मिळत नव्हतं त्या काळापासून मी काम करतो आहे. आज मला महिना तीस हजार रुपये मिळतात. माझी नेमणूक झोनल क्युरेटर म्हणून करण्यात आली. २००६-२००७ साली मी निवृत्त झालो. त्यानंतर मी बंगाल असोसिएशनसाठी काम करतो आहे. मी माझ्या कारकिर्दीत काही मैदाने तयार केली. मला आय.सी.सी चॅम्पियन ट्रॉफीच्या दरम्यान ढाक्यामध्ये पिच तयार करण्यासाठी बोलावण्यात आले होते. २००५ साली भारत-पाकिस्तान मालिकेदरम्यान फिरोजशहा कोटलाचे पिच मी बनवले होते. जे. यू.चे मैदान तर दलदलीचा प्रदेश वाटावे, असे होते. त्या ठिकाणी मी उत्तम पिच बनवले. त्यावर रणजी सामने झाले. लहानपणी मला जेव्हा अपघात झाला तेव्हा मला सांगण्यात आले की मी पुन्हा कधी क्रिकेट खेळू शकणार नाही. हे सहन करणे माझ्यासाठी खूप अवघड होते. पण आज त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो, कारण यामुळेच मी पिचच्या रूपाने नवनिर्मिती करू शकलो.’
क्रिकेटचा अविभाज्य घटक असणाऱ्या ‘पिच क्युरेटर’ना खेळाडूंचे वेगवेगळे अनुभव येत असतात. शिव कुमार शर्मा हे अशाच काही अनुभवी ‘पिच क्युरेटर’ पैकी एक आहेत. या कामामुळे त्यांचे आयुष्यच बदलून गेले आहे.
शिव कुमार हे कानपूरच्या ग्रीन पार्क या अंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाचे पिच क्युरेटर आहेत. आपल्या स्मरणात राहिलेल्या काही सामन्यांबद्दल शिव कुमार सांगतात, ‘२००८ मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच दिवसांचा सामना ग्रीन पार्क मैदानावर झाला होता. तो तिसऱ्या दिवशीच संपला आणि भारताने तो आठ खेळाडू राखून जिंकला. ग्रीन पार्कची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना अनुकूल होती. सर्वानीच माझे कौतुक केले. त्या सामन्यामध्ये अनिल कुंबळे नव्हता. पण तो मैदानामध्ये उपस्थित होता. त्याने माझे कौतुक तर केलेच पण मला ‘पनामा कॅप’ पण दिली. हा क्षण माझ्यासाठी संस्मरणीय असा होता. रॉजर बिन्नी बंगाल संघाचे प्रशिक्षक होते. त्यांनी तर ‘परफेक्ट’ असे या पिचचे वर्णन केले.

‘क्रिकेटविरोधात मी एकही गोष्ट केलेली नाही. माझी निष्ठा खेळावर आहे, व्यक्तीवर नाही.’ - प्रोबीर मुखर्जी

कुमार यांना कधीच क्रिकेटर किंवा ‘पिच क्युरेटर’ व्हायचे नव्हते. त्यांना सरकारी नोकरी हवी होती. त्यासाठी खेळाडू असणे हा सर्वोत्तम मार्ग होता. ते सांगतात, ‘ मी शाळेकडून क्रिकेट खेळायचो. मी राज्यस्तरीय विनू मंकड करंडकात खेळलो होतो. पण क्रिकेटमध्ये खूप स्पर्धा असल्याचे लक्षात आले म्हणून मी वेटलिफ्टिंग हा क्रीडा प्रकार निवडला. त्यात राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली. दरम्यान मी इलेक्ट्रिकलचा डिप्लोमा केला आणि बरेली येथील एका जलतरण तलावावर इलेक्ट्रिशियन म्हणून रुजू झालो. डिप्लोमा असल्याने मला पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे कामही देण्यात आले. २००१मध्ये मला अलाहाबाद स्टेडियममध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून नोकरी मिळाली. येथे मला माझी वेटलिफ्टिंगची पदके, पुरस्कार यांचा उपयोग झाला. २००२ मध्ये माझी बदली कानपूरला ग्रीन पार्क येथे झाली. इथे मी माझ्या कामाबरोबरच ग्रीन पार्कचे ‘पिच क्युरेटर’ छोटेलाल यांना मदत करायचो. त्यांच्याकडून मी पिचची निर्मिती, देखभाल या गोष्टी शिकलो. माझा कामातील उत्साह बघून छोटेलाल प्रभावित झाले. २००४ मध्ये भारतीय क्रिकेट मंडळाच्या पिच कमिटीचे सदस्य आनंद शुक्ला कानपूर येथे आले असताना त्यांना माझे काम आवडले आणि त्यांनी मला ‘पिच क्युरेटर’ म्हणून काम करण्याची परवानगी दिली. छोटेलाल यांच्यानंतर मी ‘पिच क्युरेटर’ म्हणून काम पाहू लागलो.’ उत्तर प्रदेशच्या क्रीडा विभागामध्ये ‘पिच क्युरेटर’ हे पद नसल्याने कुमार यांना इलेक्ट्रिशियनचाच पगार मिळतो. सांगतात, ‘मला उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनकडून ‘पिच क्युरेटर’ च्या प्रशिक्षणासाठी राजकोट आणि चेन्नई येथे पाठवण्यात आले होते. मी ४५ दिवसांचे प्रशिक्षणदेखील पूर्ण केले आहे. ते पश्चिम बंगाल येथे होते. माझा समावेश कधी तरी भारतीय क्रिकेट मंडळाच्या ग्राऊंड कमिटीमध्ये होईल असे मला वाटते. ते माझे स्वप्नं आहे.’ केवळ सरकारी नोकरी मिळवण्याचे उद्दिष्ट असणारे शिव कुमार आज ‘पिच क्युरेटर’चे आव्हानात्मक आणि वेगळे काम करीत आहेत. या क्षेत्रामुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणीच मिळाली आहे.