११ जानेवारी २०१३
मथितार्थ : अभाव ‘सामुदायिक जीवना’चा!
चित्रकथी : चित्रवीण!
कव्हर स्टोरी
क्रीडा : कल खेल में हम हो न हो..
प्रासंगिक

सादरीकरणाची कला आपल्या रक्तातच!
विकेट ‘कीपर’

संगीत : आठवणी वाद्यवृंदाच्या!
थोडी सजगता आणि पथ्य
सेकंड इनिंग : भीष्मासारखं वार्धक्य!
आरोग्यम् : पोलिओ पॉलिटिक्स
चटक-मटक : चवदार, चटपटीत
युवा : जग थिरकतंय ‘गंगन्म स्टाइल’वर..
भंकसगिरी : थोरांचे संमेलन झाले त्याची गोष्ट..
विज्ञान तंत्रज्ञान : टेक फेस्ट टेक्नॉलॉजीची आषाढी
कवितेचं पान : पहिली गाजलेली कविता

शब्दरंग : आम्हा घरीं धन

एकपानी : बी अ कॅलेंडर!
सिनेमा : मराठी सिनेमात नव्या वर्षांत नव्या जोडय़ा
लग्नाची वेगळी गोष्ट : जीवनात ही घडी..
लग्नाची वेगळी गोष्ट : बायका त्या बायकाच..
पाठलाग :एकच प्याला..
माझं शेतघर : फार्म हाऊस पाहावे घेऊन..
संख्याशास्त्र : मूलांक म्हणजे काय?
भन्नाट : आकाशाला गवसणी
केल्याने रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

प्रासंगिक

सादरीकरणाची कला आपल्या रक्तातच!
अलका साहनी

response.lokprabha@expressindia.com
सध्याच्या पाकिस्तानमध्ये काय चाललं आहे, याबद्दलची मांडणी करणारा एक चित्रपट लवकरच येतो आहे. त्याचं नाव आहे, ‘द रिलक्टंट फंडामेंटालिस्ट’. हा चित्रपट यायला आणखी थोडा वेळ असला तरी त्याची आत्तापासूनच चर्चा सुरू आहे. कारण मीरा नायर तो दिग्दर्शित करत आहेत. का करावासा वाटला त्यांना हा चित्रपट?

प्रसिद्ध निर्मात्या मीरा नायर २००४ मध्ये पाकिस्तानमध्ये गेल्या होत्या. त्याचं सगळं लहानपण गेलं ते ओडिशामध्ये. पाकिस्तानशी त्यांचा तसा काहीच थेट संबंध नव्हता. तरीही त्या उठल्या आणि पाकिस्तानात गेल्या त्याला एक अप्रत्यक्ष कारण होतं. ते म्हणजे त्यांच्या वडिलांच्या काही दु:खद आठवणी लाहोर शहराशी जोडल्या गेल्या होत्या. त्यामुळे त्यांना ते लाहोर एकदा तरी अनुभवायचं होतं. पाकिस्तानात त्यांचं चांगलं स्वागत झालं. तिथे त्या अनेकांना भेटल्या. पाकिस्तानातून परत आल्यावर त्यांना ते दिवस आठवत राहिले.
पाकिस्तानमध्ये घालवलेल्या याच दिवसांमुळे त्यांना आजच्या पाकिस्तानातील परिस्थितीवर चित्रपट करण्याची कल्पना सुचली. त्यासाठी त्यांनी मोहसीन हमीद यांच्या ‘द रिलक्टंट फंडामेंटलिस्ट’ या कादंबरीची निवड केली. मोहसीन यांच्या कादंबरीबद्दल त्या म्हणाल्या, ‘‘या कादंबरीमध्ये आजच्या पाकिस्तानचं चित्र पाहायला मिळतं. त्याशिवाय पाकिस्तान आणि अमेरिका या देशांच्या निमित्ताने दोन वेगळी जगं पाहायला मिळतात. पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यामध्ये होणारा संवाद, या दोन देशांचे एकमेकांशी असणारे संबंध यांच्यावर या कादंबरीत प्रकाश टाकला गेला आहे.’’
मीरा नायर यांचं बालपण भारतात गेलं. वडिलांकडून त्यांना फाळणीपूर्व भारताचं ओझरतं दर्शन घडलं. महाविद्यालयीन शिक्षणासाठी आणि नंतर कामाच्या निमित्ताने त्यांचं वास्तव्य अमेरिकेमध्ये होतं. त्यामुळे त्यांना विकसित जगातील जीवनशैलीची कल्पना आली. त्यांचे पती महोम्मद मदानी हे युगांडातील ‘मकेरे इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल रिसर्च’ या संस्थेमध्ये संचालक आहेत. यामुळे नायर यांना तिसऱ्या जगातील देशांची, तेथील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्थितीची कल्पना आली. एकाच विश्वातील तीन जगांची कल्पना येणं ही गोष्ट एखाद्या चित्रपट निर्मात्याच्या जाणिवा समृद्ध करणारी गोष्ट आहे.
त्यांच्या ‘द रिलक्टंट फंडामेंटलिस्ट’ या चित्रपटामध्ये नायक चंगेज खान हा उच्चशिक्षित तरुण असतो. त्याने प्रिन्स्टन विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं असतं. तो एक अर्थविश्लेषक आहे. अमेरिकेतील दहा वर्षांच्या वास्तव्यानंतर तो आपल्या देशात पाकिस्तानात परत येतो आणि लाहोरमधील एका महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे काम करत असतो. याच काळात अमेरिकेत वल्र्ड ट्रेड सेंटरवर हल्ला होतो. त्यामुळे अमेरिकी लोकांच्या मनात परकीय लोकांबद्दल विशेषत: आशियायी लोकांबद्दल संशयाची भावना निर्माण होते. चंगेजच्या परतण्याला हेदेखील एक कारण असतं. लाहोरमधील महाविद्यालयात चंगेज विद्यार्थीप्रीय शिक्षक ठरतो. त्यामुळे त्याच्याभोवती नेहमी तरुणांचा गराडा असतो. ते त्याला जागतिक घडामोडींबद्दल अनेक प्रश्न विचारत असतात.
चित्रपटाच्या निर्मितीबद्दल नायर सांगतात, ‘‘हा चित्रपट म्हणजे माझ्यासाठी एक आव्हान होतं. पाच र्वष मी या चित्रपटावर काम करत होते. त्यातली तीन र्वष केवळ पटकथा बनवण्यात गेली. पुस्तकामध्ये केवळ कथा असते, पण चित्रपट करताना तुम्हाला ती संवादाच्या माध्यमातून अधिकाधिक प्रभावीपणे मांडायची असते.’’ सलाम बॉम्बे, मिसिसिपी मसाला, मान्सून वेडिंग, द नेमसेक आणि आता द रिलक्टंट फंडामेंटलिस्ट हे सर्व नायर यांचे चित्रपट आहेत. या चित्रपटांमध्ये बहुराष्ट्रीय कथानक आहे. कथानकाचा धागा भारतीय उपखंडाशी जोडला गेलेला आहे. त्याबद्दल मीरा नायर म्हणाल्या, ‘‘चित्रपट हे माध्यम निव्वळ मनोरंजनासाठी म्हणजे रविवारची दुपार चांगली जावी यासाठी नाही. आपल्याला एकाच वेळी अनेकांना जे सांगायचं असतं, ते अत्यंत प्रभावीपणे सांगण्यासाठीचं माध्यम आहे. म्हणूनच त्या व्यासपीठाचा चांगला वापर करून घेतला पाहिजे. चित्रपटांच्या माध्यमातून अनेक विषयांची चर्चा झाली पाहिजे. त्यासाठी अर्थात आपल्याकडे काही सांगण्यासारखं असलं पाहिजे. असे विषय असतील तेव्हाच काहीतरी चांगलं मांडलं जाऊ शकतं. मी चांगल्या कथेकडे खेचली जाते. प्रेक्षकाचंही तसंच होत असणार.’’
आंतरराष्ट्रीय चित्रपटांबद्दल मीरा नायर यांची मतं खूप परखड आहेत. त्याबद्दल त्या म्हणाल्या, ‘‘अमेरिकेने इराक, अफगाणिस्तान आणि व्हिएतनाम या देशांबरेबर युद्ध केलं. या युद्धांवर अनेक चित्रपट निघाले. या चित्रपटांमध्ये अमेरिकेचं सैन्य स्वातंत्र्यासाठी, मानवी हक्कांसाठी किंवा लोकशाहीच्या बाजूने लढताना दाखवलं आहे. पण युद्ध जांच्या भूमीवर झालं त्यांच्याबद्दल या चित्रपटांमध्ये काहीच नाही. एखाद्या बॉम्बहल्ल्यामध्ये एखादा कर्ता पुरुष हकनाक मारला जातो. त्याच्या कुटुंबाची अवस्था काय होत असेल? ती आपल्याला कशी दिसणार? युद्धामध्ये हरवलेल्या कुटुंबांचे पुढे काय होते हे कोण सांगणार? ‘द रिलक्टंट फंडामेंटलिस्ट’ या प्रश्नांबद्दलची परिस्थिती मांडतो.’’
नायर यांच्या चित्रपट निर्मितीची सुरुवात झाली ती ‘इंडियन कॅबरे’ या माहितीपटापासून. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की माहितीपट सगळ्यांपर्यंत पोहचत नाहीत. म्हणून त्यांनी चित्रपटांची निर्मिती करण्याचं ठरवलं. १९८८ साली ‘सलाम बॉम्बे’ हा त्यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. मुंबईमधील रस्त्यांवर राहणाऱ्या मुलांवर हा चित्रपट होता. या चित्रपटाबद्दल मीरा नायर म्हणाल्या, ‘‘माहितीपटांपेक्षा चित्रपटांना जास्त प्रतिसाद मिळतो हे लक्षात आल्यावर म्हणजे साधारणपणे ८०च्या दशकात मी चित्रपट निर्मितीला सुरुवात केली. ‘सलाम बॉम्बे’ या चित्रपटाची कथा काल्पनिक आहे. या चित्रपटामध्ये काही ठिकाणी प्रत्यक्ष रस्त्यावर वाढलेल्या मुलांनी काम केलं आहे. पण चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा व्यावसायिक कलाकारांनी साकारल्या आहेत.’’ ‘मान्सून वेडिंग’ हा नायर यांचा आणखीन एक गाजलेला चित्रपट. हा चित्रपट एका पंजाबी कुटुंबाची गोष्ट सांगतो.
मीरा नायर यांचं वैशिष्टय़ं म्हणजे त्यांचा ठामपणा. त्या प्रत्येक गोष्टीवर ठाम असतात कारण आपल्याला आयुष्यात काय करायचं हे त्यांना माहीत आहे. उदाहरणच द्यायचं तर त्या झुंपा लाहिरी यांच्या कादंबरीवर आधारित ‘द नेमसेक’ हा चित्रपट करत होत्या तेव्हाचं देता येईल. त्या वेळी त्यांना ‘हॅरी पॉटर’ या चित्रपटाच्या पाचव्या भागाचे दिग्दर्शन करण्यासाठी विचारणा झाली. वास्ताविक ती एक चांगली संधी होती. पण मीरा नायर यांनी ती नाकारली. त्याबद्दल त्या म्हणाल्या की, ‘हॅरी पॉटर’ नाकारण्याचा निर्णय माझ्या मुलाच्या सांगण्याने पक्का झाला. माझा मुलगा झोहरन ममदानी हा त्या वेळी १४ वर्षांचा होता. मी जेव्हा त्याला हॅरी पॉटर न करण्याचा निर्णय सांगितला त्या वेळी तो म्हणाला, ‘‘बरोबरच आहे तुझं. कोणताही चांगला दिग्दर्शक हॅरी पॉटर करू शकेल, पण ‘नेमसेक’ केवळ तूच करू शकतेस. ते इतर कुणीही नाही करू शकणार.’ त्याच्या या बोलण्यामुळे मला लक्षात आलं की माझा निर्णय बरोबरच होता. हॅरी पॉटर करण्याचं मला आकर्षण वाटलं नाही, त्यापेक्षा मला नेमसेक करावासा वाटला कारण मला संवेदनशील चित्रपट करायला आवडतात.’’
‘द रिलक्टंट फंडामेंटलिस्ट’ हा चित्रपट मीरा नायर यांच्यासाठी एक आव्हान होता. त्याबद्दल त्या म्हणाल्या, ‘‘चित्रीकरण सुरू होण्याच्या काही दिवस आधी चित्रपटाचं बजेट कमी केल्याचं सांगण्यात आलं. याशिवाय चित्रपटाचं पोस्ट प्रॉडक्शन भारतात होणार होतं. सगळ्यात अवघड काम होतं ते चित्रपटाचा नायक शोधणं. भारत, पाकिस्तान आणि इंग्लंड या तीन देशांमध्ये सुमारे एक वर्षांच्या शोधानंतर ब्रिटिश-पाकिस्तानी अभिनेता रिझ अहमद सापडला.’’
‘द रिलक्टंट फंडामेंटलिस्ट’ या चित्रपटाची सुरुवातच कव्वालीने होते. प्रसिद्ध पाकिस्तानी गायक फरिद अय्याझ आणि अबू महोम्मद या दोघांनी चित्रपटातील चार गाणी गायली आहेत. चित्रपटाचं संगीत विशाल भारद्वाज यांचं आहे. त्याबद्दल मीरा नायर म्हणाल्या, ‘‘संगीत हा माझा श्वास आहे, असं मी म्हणीन इतकं मला संगीत आवडतं. मला जे आवडतं ते सगळं करायला मला आवडतं. पण म्हणूनच कधीकधी मनात भीती वाटत असते की आपल्याला आवडणारी गोष्ट आपल्याला उद्या करायला मिळेल की नाही? मग ती आजच करून टाका ही प्रेरणा मला स्वस्थ बसू देत नाही. त्या अस्वस्थतेतूनच मी नवनवीन गोष्टी शोधत आणि करत राहते.’’

‘‘आपले विषय आपण नाही मांडणार तर कोण मांडणार? चांगल्या कथेकडे आकर्षति होणं हा माझा स्वभाव आहे. मी आशा करते की तो दर्दी प्रेक्षकाचादेखील असेल.’’ मीरा नायर

मीरा नायरना कामात झोकून द्यायला आवडतं. त्या सतत वेगवेगळ्या कामांमध्ये व्यग्र असतात. नवनवीन कथानकांचा शोध घेत असतात. त्यांच्या हाताला लागलेलं आणि बाजूला पडलेलं एक कथानक आहे शांताराम या कादंबरीचं. त्याच्यावर त्यांनी त्यांच्या परीने कामही सुरू केलं पण काही बाह्य़ गोष्टींमुळे तो चित्रपट बाजूला पडला. त्याची त्यांना खंत तर वाटतेच पण आज ना उद्या तो चित्रपट करता येईल अशी त्यांना आशाही वाटते. त्या सगळ्याबद्दल त्या म्हणाल्या ‘‘ग्रेग्ररी डेव्हिड रॉबर्ट यांच्या शांताराम या कादंबरीवरील मी करत असलेल्या चित्रपटात जॉनी डेप शांतारामची भूमिका करणार होते. पण हॉलीवूडमधले लेखक संपावर गेले. त्यामुळे पटकथेचं काम थांबलं. डेप यांनी त्या काळामध्ये दुसरं काम हाती घेतलं, त्यामुळे नंतर ते शांतारामवरील चित्रपटासाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत. आता जेव्हा आम्हा दोघांना वेळ मिळेल त्या वेळी आम्ही या चित्रपटावर काम करू.’’
ग्लोबलायजेशननंतर भारतामध्ये चित्रपट व्यवसायाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ तयार झाली आहे. अनेक भारतीय चित्रपट परदेशामध्ये चांगला व्यवसाय करत आहेत. पण नायर यांनी ८० च्या दशकामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपटांची निर्मिती केली. भारतीय चित्रपट आणि आंतरराष्ट्रीय मार्केट याबद्दल त्या सांगतात, ‘‘भारताची वेगाने विकसित होणारी बाजारपेठ पाश्चिमात्यांना खुणावत आहे. ही भारतीय निर्मात्यांच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी व्यापक विचार केला पाहिजे. जागतिक पातळीवर पोहोचायचं तर त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रेक्षकांना काय बघायला आवडेल हे समजलं पाहिजे.’’
मीरा नायर यांची कंपाला येथे मइशा फिल्म लॅब आहे. तेथे त्या होतकरू चित्रपट निर्मात्यांना, दिग्दर्शकांना प्रशिक्षण देतात. त्यांचं असं म्हणणं आहे की त्या भारतीय आहेत आणि संवेदनशील चित्रपट बनवतात म्हणून तिसऱ्या जगातील देशांमधून त्यांच्याकडे पटकथा घेऊन येतात. ते एखाद्या आफ्रिकन दिग्दर्शकाकडे जात नाहीत, मीरा नायर यांच्याकडेच येतात, कारण भारतीय मुळं असलेल्या कोणाही व्यक्तीला कोणतीही कथा उत्तम मांडता येऊ शकते.
कारण सादरीकरण ही गोष्ट आपल्या परंपरेतच आहे..