११ जानेवारी २०१३
मथितार्थ : अभाव ‘सामुदायिक जीवना’चा!
चित्रकथी : चित्रवीण!
कव्हर स्टोरी
क्रीडा : कल खेल में हम हो न हो..
प्रासंगिक

सादरीकरणाची कला आपल्या रक्तातच!
विकेट ‘कीपर’

संगीत : आठवणी वाद्यवृंदाच्या!
थोडी सजगता आणि पथ्य
सेकंड इनिंग : भीष्मासारखं वार्धक्य!
आरोग्यम् : पोलिओ पॉलिटिक्स
चटक-मटक : चवदार, चटपटीत
युवा : जग थिरकतंय ‘गंगन्म स्टाइल’वर..
भंकसगिरी : थोरांचे संमेलन झाले त्याची गोष्ट..
विज्ञान तंत्रज्ञान : टेक फेस्ट टेक्नॉलॉजीची आषाढी
कवितेचं पान : पहिली गाजलेली कविता

शब्दरंग : आम्हा घरीं धन

एकपानी : बी अ कॅलेंडर!
सिनेमा : मराठी सिनेमात नव्या वर्षांत नव्या जोडय़ा
लग्नाची वेगळी गोष्ट : जीवनात ही घडी..
लग्नाची वेगळी गोष्ट : बायका त्या बायकाच..
पाठलाग :एकच प्याला..
माझं शेतघर : फार्म हाऊस पाहावे घेऊन..
संख्याशास्त्र : मूलांक म्हणजे काय?
भन्नाट : आकाशाला गवसणी
केल्याने रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

पाठलाग

निशांत सरवणकर
ही घटना आहे १९९९ ची. मालाड पश्चिमेकडच्या स्वामी विवेकानंद मार्गावरील सुरभी अपार्टमेंटमध्ये लक्ष्मीबाई आणि दयाराम मंडल हे वयोवृद्ध जोडपे राहत होते. त्यांची दोन्ही मुले परदेशात होती. परदेशात मुले असलेल्या कोणत्याही वयोवृद्ध जोडप्याचे होते तसेच यांचेही झाले होते. वयोमानानुसार आलेल्या शारीरिक मर्यादा, हाताशी असलेला भरपूर वेळ, परदेशी निघून गेलेली मुले, त्यातून आलेल्या आपल्या एकटेपणावर हे जोडपे कशीबशी मात करत होते. त्यांनी आपलं आपलं एक रूटीन लावून घेतलं होतं. दयाराम हे दररोज आपल्या मित्रांना भेटण्यासाठी जात असत. मित्रांना भेटणं, गप्पा मारणं, पत्ते खेळणं हे सगळं करून ते परत येत ते तब्बल चार ते पाच तासांनंतरच. त्यांचे मित्रही समवयस्क. साहजिकच वृद्धत्व, एकटेपणा, परावलंबित्व, कौटुंबिक ताणतणाव अशा सगळ्या गोष्टींनी त्रासलेले. त्यामुळे सगळ्यांचा एकमेकांबरोबर चांगला वेळ जाई. तर लक्ष्मीबाई घरातल्या कामांमध्ये स्वत:ला गुरफटून घेत. त्यांचाही त्यात चांगला वेळ जात असे.
त्या दिवशीही दयाराम नेहमीप्रमाणे मित्रांना भेटायला गेले. जाता जाता त्यांना बँकेची कामंही करायची होती. तेवढय़ात त्यांना आठवलं की विजेचं बिलही भरायचं होतं आणि ते नेमकं बिल बरोबर घ्यायला विसरले होते. घराच्या जवळ असतानाच ही गोष्ट लक्षात आल्यामुळे ते परत तसेच फिरले. त्यांनी दरवाजावरील बेल वाजविली. बेल वाजली की एरवी लक्ष्मीबाई पटकन येऊन दार उघडत. त्या दिवशी तसं झालं नाही. बराच वेळ दयाराम बेल वाजवत होते. परंतु काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आधी त्यांना वाटलं की लक्ष्मीबाईंना बेल ऐकू आली नसेल. नंतर वाटलं की बाथरूममध्ये असतील. एकदा वाटलं की सहज डोळा लागला असेल. पण दहा मिनिटं होऊन गेल्यावर मात्र ते अस्वस्थ झाले. आता काय करायचं? तेवढय़ात त्यांना आठवलं की अरेच्या आपल्याकडेही घराची एक किल्ली आहे. असं कसं लक्षात नाही आलं आधीच, असा विचार करत त्यांनी स्वत:जवळ असलेल्या चावीने दरवाजा उघडला आणि ते आत शिरले. लक्ष्मीबाई हॉलमध्ये नव्हत्या. त्यांनी बेडरूममध्येही पाहिलं. किचनमध्ये असतील म्हणून ते किचनमध्ये गेले आणि आतलं दृष्य बघितलं आणि हबकले. डोक्याला मार लागलेल्या लक्ष्मीबाई रक्तबंबाळ होऊन किचनमध्ये पडल्या होत्या.
त्यांना वाटले की, लक्ष्मीबाई खाली पडल्यामुळे रक्तस्राव होऊन बेशुद्ध झाल्या असाव्यात. त्यांना इस्पितळात नेण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले होते. आपल्या पत्नीचा अपघाती मृत्यू झाला असावा, असेच दयाराम यांना वाटत होते. घरातील कुठलीही वस्तू चोरीला गेली नव्हती. त्यामुळे चोरीच्या हेतूने कुणीतरी येऊन काही केले असावे, अशी शंकाही त्यांना आली नाही.
मालाड पोलिसांनी मात्र खबरदारीचा उपाय म्हणून मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठविला. दोन दिवसांनंतर अहवाल मिळाला आणि पोलिसांचा संशय खरा ठरला. लक्ष्मीबाई यांची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या डोक्यावरही तीक्ष्ण वस्तूने प्रहार करण्यात आला होता. मालाड पोलिसांकडे या प्रकरणाचा तपास होता. घरी कुणी आल्याची पुसटशी खूणही आढळून आली नाही वा हातांचे ठसेही सापडले नाहीत. अगदी श्वानपथकही घटनास्थळी नेण्यात आले. परंतु काहीही दुवा मिळाला नाही. अखेरीस हा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला.
त्या वेळी प्रमोद तोरडमल, मारुती आव्हाड, प्रदीप मोरे, महेंद्र मोरे यांच्या पथकाने अंधेरीच्या तेली गल्ली येथील कार्यालयात हा तपास सुरू केला. लक्ष्मीबाई आणि दयाराम यांचे संबंध कसे होते, त्यांच्यामध्ये वाद होते का, घरी कोण कोण येत होते, शेजारच्यांशी काही भांडण होते का, अशा अनेक दुव्यांच्या आधारे तपास सुरू झाला. इमारतीचा पहारेकरी, सुरक्षा रक्षक तसेच दूधवाले, भाजीवाले, पेपरवाले आदी साऱ्यांच्या चौकश्या सुरू झाल्या. परंतु हाती काहीही लागत नव्हते. अखेरीस तपासात काहीच प्रगती होत नसल्यामुळे तूर्तास फाइल बंद करण्यावाचून पोलिसांपुढे पर्याय नव्हता.
याच पथकाने एकदा मालाडमधीलच एका बारमध्ये कट्टर गुंडाच्या शोधासाठी पाळत ठेवली होती. तो गुंड काही आला नाही. मात्र मद्याच्या नशेत असलेल्या व्यक्तीच्या संवादाने त्यांचे लक्ष वेधून घेतले. सुदैवाने त्या व्यक्तीच्या समोर बसलेली व्यक्ती ही त्यांची खबरी होती. ती व्यक्ती खूपच अस्वस्थ होती. तिची चलबिचल सुरू होती. खबऱ्यानेही त्याला त्याबाबत विचारले. तो काहीच सांगत नव्हता. परंतु दारूचा एक घोट पोटात गेला आणि असंबद्ध बडबडू लागला. ‘..त्याच्यामुळे आपणही तुरुंगात जाणार.. त्याला मी सांगितले होते, मारू नको.. म्हातारी मरेल’ अशी त्याची बडबड ऐकताच अधिकारीही सावध झाले. काहीतरी गडबड आहे, त्यांनी त्या खबऱ्याला कार्यालयात बोलाविले.
खबऱ्यामार्फत ‘त्या’ व्यक्तीलाही बोलाविण्यात आले अन् मग बंद झालेल्या लक्ष्मीबाईंच्या हत्येची फाइल उघड झाली. संतोष तिवारी याबाबत बोलत होता. मालाड येथे एका वयोवृद्ध महिलेची हत्या त्याने कशी केली, हेच त्याने उघड केले. संतोष तिवारीसह सुरेश पटेल, कुमार शाह आणि अजय ठक्कर या सर्वाना मग अटक करण्यात पोलिसांना अडचण आली नाही. त्यापैकी अजय हा या दाम्पत्याचा भाचा होता. त्यानेच हा कट रचला होता. या दाम्पत्याकडे असलेल्या संपत्तीची त्याला कल्पना होती. दयाराम रोज न चुकता तीन ते चार तास घराबाहेर जातात आणि लक्ष्मी या घरी एकटय़ाच असतात, याची कल्पना असलेल्या अजयने त्या दिवशी या सर्वाना घरी नेले होते. अजय आल्याने अर्थात लक्ष्मीबाईंनी दरवाजा उघडला. पाणी आणण्यासाठी किचनमध्ये गेलेल्या लक्ष्मीबाईंच्या डोक्यावर एकाने प्रहार केला तर अन्य दोघांनी वायरीने त्यांचा गळा आवळला. परंतु त्याच वेळी बेल वाजल्याने ते ग्रील नसलेल्या खिडकीतून उडी टाकून पळून गेले. कारण त्याच वेळी विजेचं बिल घेण्यासाठी दयाराम परत आले होते. तब्बल दोन वर्षे मूग गिळून बसलेल्या यापैकी एकाला न राहवल्यानेच हत्याप्रकरणाची फाइल बंद होण्यापासून वाचली.
response.lokprabha@expressindia.com