११ जानेवारी २०१३
मथितार्थ : अभाव ‘सामुदायिक जीवना’चा!
चित्रकथी : चित्रवीण!
कव्हर स्टोरी
क्रीडा : कल खेल में हम हो न हो..
प्रासंगिक

सादरीकरणाची कला आपल्या रक्तातच!
विकेट ‘कीपर’

संगीत : आठवणी वाद्यवृंदाच्या!
थोडी सजगता आणि पथ्य
सेकंड इनिंग : भीष्मासारखं वार्धक्य!
आरोग्यम् : पोलिओ पॉलिटिक्स
चटक-मटक : चवदार, चटपटीत
युवा : जग थिरकतंय ‘गंगन्म स्टाइल’वर..
भंकसगिरी : थोरांचे संमेलन झाले त्याची गोष्ट..
विज्ञान तंत्रज्ञान : टेक फेस्ट टेक्नॉलॉजीची आषाढी
कवितेचं पान : पहिली गाजलेली कविता

शब्दरंग : आम्हा घरीं धन

एकपानी : बी अ कॅलेंडर!
सिनेमा : मराठी सिनेमात नव्या वर्षांत नव्या जोडय़ा
लग्नाची वेगळी गोष्ट : जीवनात ही घडी..
लग्नाची वेगळी गोष्ट : बायका त्या बायकाच..
पाठलाग :एकच प्याला..
माझं शेतघर : फार्म हाऊस पाहावे घेऊन..
संख्याशास्त्र : मूलांक म्हणजे काय?
भन्नाट : आकाशाला गवसणी
केल्याने रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

मथितार्थ

अभाव ‘सामुदायिक जीवना’चा!
इंद्रा नुई पेप्सीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्वेसर्वा. त्यांची गाडी बंद पडल्याने पंजाबमधील एका खेडय़ात अडकून पडल्या. गाडीत बराच वेळ बसण्याचा उबग आल्याने गावची हवा अनुभवावी म्हणून त्या क्षणभरासाठी बाहेर उतरल्या. शेजारच्याच शेतात काही पुरुष मंडळी काम करत असतात. त्यातील काही जणांनी आधुनिक पेहेरावातील नुई यांच्याकडे पाहिले आणि ‘काय ‘बाई’ आहे..’ असे त्यांच्या मनात आले. त्याच वेळेस तिथे असलेल्या एका तरुणाचे लक्ष त्यांच्याकडे गेले आणि त्याच्या आनंदाला भरते आले.. जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंद्रा नुई ज्या एरवी कधीही आपल्या गावात येण्याची शक्यता नाही, त्या थेट आपल्याच गावात आहेत हे पाहून त्याला थेट देवच भेटल्याचा आनंद झाला. आधीच्या पुरुषांची प्रतिक्रिया नंतर व्यक्त झाली ती नंतर प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या मुलाखतीतून, जी त्यांनी प्रांजळपणे कबूल केली होती!
एक महिला कर्मचारी कार्यालयीन कामकाज संपवून सीएसटी स्थानकावरून लोकल ट्रेन पकडून घरी परतत होती. खिडकी मिळाली म्हणून खूश असलेल्या या महिलेच्या आनंदावर क्षणातच विरजण पडले. कारण बाजूने जाणारा एक पुरुष त्याच खिडकीतून तिच्या अंगावर थेट थुंकला होता! थुंकणे ही कदाचित किरकोळ गोष्ट वाटेल आपल्याला. पण त्या कृतीमुळे तिच्या मनात आता भीतीने घर केले..
बलात्काराच्या घटनांच्या संदर्भात आजवर अनेक अभ्यास झाले आहेत. त्यातील दोन निरीक्षणे ही खूप महत्त्वाची आहेत. त्यातील पहिले निरीक्षण असे सांगते की, अनेकदा ते ओळखीच्या किंवा परिचयाच्या व्यक्तीकडूनच होतात आणि दुसरे निरीक्षण असे सांगते की, सुमारे ६५ टक्के प्रकरणांमध्ये ‘पुरुषी अहं’ दुखावलेला असतो आणि म्हणून चिडून जाऊन त्या पुरुषाने कधी स्वत:, तर कधी त्याच्या साथीदारांच्या साहाय्याने बलात्कार केलेला असतो.
पहिल्या दोन घटना आणि बलात्काराच्या घटनांसंदर्भातील तिसरा संदर्भ हे सारे आठवण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नवी दिल्लीत घडलेली बलात्काराची घृणास्पद घटना. त्यानंतर देशभरात उफाळून बाहेर आलेला जनक्षोभ. नवी दिल्लीमध्ये झालेल्या आंदोलनात प्रामुख्याने तरुणाईचा समावेश होता. सलग १३ दिवसांची झुंज दिल्यानंतर त्या दुर्दैवी मुलीचे सिंगापूर येथील रुग्णालयात दु:खद निधन झाले. नवी दिल्ली इथे झालेल्या आंदोलनाचा उत्स्फूर्त आंदोलन म्हणून देशविदेशातही उल्लेख झाला. संवेदनशीलता जिवंत आहे असे वातावरण देशभरात निर्माण झाले. हे चांगले लक्षण आहे, संवेदनशीलता अद्याप शिल्लक आहे, हा दिलासा खूप मोठा आहे, असे त्याचे कौतुक झाले. कुठून आले होते हे आंदोलनकर्ते?
ते कुठूनही आले असले, त्याचे मूळ ट्विटर, फेसबुक किंवा माहिती तंत्रज्ञानाने दिलेले नेटवर्क हे असले तरी ते चांगले आहे, असाच सर्वाचा सूर होता. ..पण यामध्ये सहभागी बहुतांश जण हे भारतातील नवमध्यमवर्गाचे आणि त्यांच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व करणारे होते. कदाचित हा उल्लेख कुणाला खटकेलही पण घटना ज्या वेळेस घडतात त्याच वेळेस आपण त्याबाबतची कटूसत्येही बोलावीत, अन्यथा आपण भ्रमात राहतो. हा तोच नवमध्यमवर्ग आहे जो ‘हलकट जवानी’च्या आयटम साँगवर बेधुंद होऊन नाचत असतो. या आयटम साँग्जमधील प्रमुख भाग काय असतो? कॅमेरा थिरकणाऱ्या पावलांवर कमी आणि उर्वरित भागावर अधिक असतो. त्या बाबत कुणी आक्षेप घेतला की, आपण त्यांची कथित ‘संस्कृतीरक्षक’ अशी संभावना करतो. किंवा मग अगदी दुसरे टोक तरी गाठतो आणि मग आपल्याला थेट आविष्कारस्वातंत्र्य आणि कलात्मकता याचाच साक्षात्कार होतो. बलात्काराच्या संदर्भातील घटनांवर मध्यंतरी मुंबईच्या टाटा समाजविज्ञान संस्थेने एक व्यापक सर्वेक्षण केले होते. त्या या प्रकरणातील आरोपींच्या प्रेरणांचाही अभ्यास करण्यात आला होता. या प्रेरणा प्रभावी असलेल्या दृकश्राव्य माध्यमांमध्ये असलेल्या आढळल्या. मग आविष्कार स्वातंत्र्याचे गोडवे गाताना आणि कलात्मकता जपताना आपण या मुद्दय़ांचा विचार करणार की, नाही हेही कधी तरी एकदा ठरवावे लागेल.
एका डिओडरंट कंपनीने केलेली एक जाहिरातही सध्या लोकप्रिय आहे. त्यात त्या कंपनीच्या ब्रॅण्डचे दोन वेगवेगळे डिओडरंट एकत्र वापरले की, थेट महिला तुमच्याकडे आकर्षित होतात आणि थेट कपडेच उतरवतात.. खरे तर एखाद्या लॅपटॉपची जाहिरात असेल तर त्यात काय असायला हवे? त्या लॅपटॉपमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे, प्रोसेसर कोणता आहे, तो किती वेगात काम करतो, तो दिसायला किती देखणा आहे किंवा त्याच्याशी संबंधित इतर बाबी. पण अलीकडे आलेल्या एका लॅपटॉपची जाहिरात तुम्हाला काय सांगते. की, हा लॅपटॉप वापरणाऱ्याच्या बाबतीत काय घडले, स्मार्ट असलेली अनिता स्वाहा.. सुंदर दिसणारी नीतादेखील स्वाहा.. फॅशनेबल असणारी अमुकतमुकपण स्वाहा. ही नेमकी कशाची जाहिरात आहे? आपण यातून नेमके काय सांगण्याचा प्रयत्न करतोय? केवळ या आणि अशा जाहिराती किंवा आयटम साँग्जमुळे बलात्कार होत नाहीत. पण बलात्काऱ्याच्या मानसिकतेचे बीजारोपण मात्र या अशा वातावरणात अगदी सहज होते. या जाहिराती म्हणजे बलात्काऱ्याची मानसिकता तयार करण्यासाठीची वातावरणनिर्मितीच ठरतात. आणि सध्याचा नवमध्यमवर्ग किंवा नवश्रीमंत मध्यमवर्ग याच वातावरणावर पोसलेला आहे. कारण या वातावरणाला ग्राहक हवा आहे आणि त्यासाठी वाट्टेल ते करण्याची आणि वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी आहे. मग याचीच एक साखळी पुढे सुरू होते.
सध्याच्या नवमध्यमवर्गाबद्दलही आणि नवश्रीमंत मध्यमवर्गाबद्दलही सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. गेल्या पाच वर्षांतील अपघातांची आकडेवारी काढून पाहा मग लक्षात येईल यातील अनेक अपघात महाविद्यालयीन तरुणांकडून घडलेले आहेत. ते पिऊन तर्र तर होतेच पण वयाची १८ वर्षेही पूर्ण केलेली नव्हती. त्यामुळे चालक परवाना असण्याचेही काही कारण नव्हते.. आपल्याला जे हवे ते मिळवण्याची आणि त्यासाठी वाट्टेल ते करण्याची मानसिकता समाजात मूळ धरते आहे! मग त्यासाठी प्रसंगी नियम मोडले तरी चालतील, अशी ही मानसिकता आहे. कधी तरी एकदा नीट विचार करून या वास्तवालाही सामोरे जायला हवे. अन्यथा होते काय की, समोर असलेल्या महिलेमध्ये आपल्याला केवळ ‘बाई’च दिसते अगदी खरे सांगायचे तर ‘मादी’; ही अशी पुरुषी मानसिकता निगरगट्ट होत चालली आहे. आणि शिक्षणामुळे आलेली जाणीवजागृती असेल तर ती ‘बाई’ ही इंद्रा नुई आहे, याची जाणीव होते आणि पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो!
लैंगिकतेवर चर्चा व्हायला हवी म्हणून त्याचा समावेश आपण शालेय शिक्षणात केला आणि ‘समावेश केला’ यावरच आपण आनंदी आहोत. पण खरोखरच वैज्ञानिक पद्धतीने ते विद्यार्थ्यांसमोर पोहोचते आहे का? एका सामाजिक संस्थेने केलेल्या अभ्यासात असे लक्षात आले की, लैंगिक शिक्षण झाले आहे, असे पटावर दिसत असले तरी प्रत्यक्षात फारच कमी माहिती त्याबाबत विद्यार्थ्यांना आहे. मग पटसंख्येच्या घोळासारखेच हेही प्रकरण आहे का?
बलात्कारासारखी प्रकरणे थांबावीत अशी आपली खरोखरच इच्छा असेल तर केवळ कायद्याने प्रश्न सुटणार नाही, याचेही भान ठेवायला हवे. कायद्याने प्रश्न सुटणार असते तर आधीच आपल्याकडे एवढे कायदे आहेत, त्यामुळे समाजातील गुन्ह्य़ांची संख्या कमी होणे अपेक्षित होते. पण ती वाढतेच आहे. कारण कायद्याने प्रश्न सुटत नाहीत. पण प्रश्नांची सोडवणूक करण्याचा तो एक प्रभावी मार्ग आहे एवढेच. बलात्काराच्या प्रकरणांमध्ये त्यांच्या पाळामुळांपर्यंत आपल्याला पोहोचायला हवे. मग लक्षात येईल की, मुळाला हात घालायचा तर आपण मग माणसाच्या अहंपर्यंत पोहोचतो. अहंकार असणे ही माणसासाठी तशी नैसर्गिक अशी बाब आहे. प्रत्येकाला तो थोडय़ा-फार फरकाने असतोच. त्याचा एक भाग माणसाच्या प्रगतीसाठी आवश्यक ही मानला जातो. पण या अहं जेव्हा ‘निव्वळ पुरुषी’ असतो किंवा होतो तेव्हा तो सर्वाधिक घातक ठरतो. बलात्काराच्या घटनांच्या अभ्यासातून लक्षात आलेली बाब म्हणजे हा ‘पुरुषी अहंकार’ प्रभावी ठरला त्या वेळेस बलात्कार झाला आणि त्या पुरुषी अहंला खतपाणी घातले ते मोह, मद, मत्सर या गोष्टींनी. त्या आल्या आजूबाजूच्याच वातावरणातून. महाभारताच्या बाबतीत असे म्हणतात की, जलमहालात दुर्योधनावर आलेल्या नामुष्कीच्या वेळेस द्रौपदी हसली आणि त्याचा पुरुषी अहं दुखावला गेला, त्यात महाभारताचे बीज आहे. द्रौपदीने हसणे साहजिक होते पण दुर्योधनाला त्याच्या अहंवर नियंत्रण ठेवता आले नाही.. या ‘पुरुषी अहं’ला रोखण्यात यश येणे हे सर्वात प्रमुख उद्दिष्ट असायला हवे!
पूर्वी शाळेमध्ये पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथीपर्यंत ‘सामुदायिक शिक्षण’ नावाचा एक विषय होता. सार्वजनिक ठिकाणी असताना आपण एक सुजाण नागरिक म्हणून कसे वागावे, त्याचे धडे त्यात होते. त्याची क्रमिक पुस्तके होती. शेवटी संस्कार म्हणजे काय असते तर स्त्री-पुरुष आकर्षण हे नैसर्गिक असले तरी केव्हा, काय, कधी, कुठे आणि कसे वागावे याचे भान असायला हवे. मनात एखादा विचार येणे साहजिक असू शकते पण त्यानंतर विचार करून स्वत:चा अहं नियंत्रणात ठेवून दुष्कृत्य टाळणे हा संस्कार असतो. हा सामुदायिक संस्कार पूर्वी क्रमिक शिक्षणाचा भाग होता. आता तो विस्तारित रूपात पुन्हा देण्याची नवी गरज निर्माण झाली आहे. बलात्काराच्या घटनांचे एक मूळ हे सध्या समाजात असलेल्या सामुदायिक शिक्षणाच्या या अभावाच्या दिशेने जाते!