११ जानेवारी २०१३
मथितार्थ : अभाव ‘सामुदायिक जीवना’चा!
चित्रकथी : चित्रवीण!
कव्हर स्टोरी
क्रीडा : कल खेल में हम हो न हो..
प्रासंगिक

सादरीकरणाची कला आपल्या रक्तातच!
विकेट ‘कीपर’

संगीत : आठवणी वाद्यवृंदाच्या!
थोडी सजगता आणि पथ्य
सेकंड इनिंग : भीष्मासारखं वार्धक्य!
आरोग्यम् : पोलिओ पॉलिटिक्स
चटक-मटक : चवदार, चटपटीत
युवा : जग थिरकतंय ‘गंगन्म स्टाइल’वर..
भंकसगिरी : थोरांचे संमेलन झाले त्याची गोष्ट..
विज्ञान तंत्रज्ञान : टेक फेस्ट टेक्नॉलॉजीची आषाढी
कवितेचं पान : पहिली गाजलेली कविता

शब्दरंग : आम्हा घरीं धन

एकपानी : बी अ कॅलेंडर!
सिनेमा : मराठी सिनेमात नव्या वर्षांत नव्या जोडय़ा
लग्नाची वेगळी गोष्ट : जीवनात ही घडी..
लग्नाची वेगळी गोष्ट : बायका त्या बायकाच..
पाठलाग :एकच प्याला..
माझं शेतघर : फार्म हाऊस पाहावे घेऊन..
संख्याशास्त्र : मूलांक म्हणजे काय?
भन्नाट : आकाशाला गवसणी
केल्याने रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

लग्नाची वेगळी गोष्ट

बायका त्या बायकाच..
प्रभाकर ओक
‘लग्नाची वेगळी गोष्ट’ या उपक्रमांतर्गत कथा-
response.lokprabha@expressindia.com

यशवंत पाटील ठरल्याप्रमाणे बरोबर तीन वाजता अंधेरीच्या जिव्हाळा आश्रमात आले.
‘‘या, बसा. अगदी तीन म्हणजे तीन, कोठे सैन्यात नोकरी करत होतात की काय?’’ गोरे सरांनी पाटलांचे स्वागत केले.
‘‘छे छे, पण आयकर विभागाच्या भरारी पथकाचा मी प्रमुख होतो. तेथे गुप्ततेला व वेळेला महत्त्व असते. सहा-सात वर्षांपूर्वी निवृत्त झालो.’’
‘‘वा! मग आमची कशी आठवण झाली?’’
‘‘सांगतो ना. पण त्याआधी माझी माहिती सांगतो. माझं वय चौसष्ट. बी. ए. एलएल. बी. झाल्यानंतर आयकर खात्यात चिकटलो आणि चौतीस वर्षांनी आता निवृत्तिवेतन उपभोगतोय. मी कांदेवाडीतील दर्शना चाळीत राहतो. माझा मुलगा शरद सी. ए. आहे. तो दादरला पोर्तुगीजजवळ एका सोसायटीत राहतो. आता मला नातूही आहे. कोकणात हर्णे येथे एक छोटंसं घर आहे. आंब्याची कलमं, फणस, काजू अशीही काही झाडे आहेत.’’
पाटील हे आपल्याला का सांगत आहेत हे गोरे सरांना समजेना. आपण ऐकत आहोत हे दाखविण्यासाठी त्यांनी ‘‘मग काय तुम्ही कोकणात वारंवार जात असालच.’’ गोऱ्यांनी प्रश्न केला.
‘‘हो तर! माझे आई-वडील असेपर्यंत माझी बायको व मुलगा शरद दरवर्षी उन्हाळ्यात तिकडेच मुक्कामाला जात असत. मी आपला पंधरा एक दिवस आंबे खायला जायचो इतकेच. आता आई-वडील दोघेही नाहीत म्हणून निवृत्त झाल्यामुळे मला वरचेवर जावे लागते.’’ पाटील.
आता हे गुऱ्हाळ संपायलाच पाहिजे. काय करावे हे गोरे सरांना समजेना. पण पाटलांचे पुराण चालूच.
‘‘तीन वर्षांपूर्वी माझी बायको अचानक वारली आणि माझ्या संसाराचे चित्रच बदलून गेले. मुलगा दादरला येऊन राहण्याचा आग्रह मनापासून करत होता तरी मी गिरगावातच राहण्याचे पसंत केले. कंटाळा आला की हण्र्याला जाऊन राहतो.’’
‘‘अशा परिस्थितीत जेवणा-खाण्याचे काय?’’
‘‘नाही. तो प्रश्न मला फारसा पडला नाही कारण मला माझ्यापुरता स्वयंपाक करता येतो. परत कधी कंटाळा आला तर मुलाचे घर आहेच. पण मी बराच काळ हर्णे येथेच राहतो.’’
‘‘पाटील साहेब, रागावू नका पण या सगळ्याशी माझा किंवा आश्रमाचा काय संबंध?’’ गोरे सरांचा आता संयम सुटला.
‘‘आहे.. म्हणून तर तुमच्याकडे मी आलो आहे. गेली तीन वर्षे मी मुंबईला असो वा हण्र्याला असो माझा कार्यक्रम मी व्यवस्थित आखून ठेवला होता. सकाळी वर्तमानपत्र वाचन, देवळात जाणे, दुपारी भटारखाना आणि संध्याकाळी चौपाटी मित्रमंडळ किंवा कुठेतरी एखादे व्याख्यान वगैरे काही असेल तर तेथे हजेरी. रात्रीही मला व्यवस्थित झोप लागते. आमच्या हण्र्याचे बंदरसुद्धा छान आहे हवा खायला. पण खरं सांगू, आता मला आता सोबतीची गरज वाटू लागली आहे. या बाबतीतच आपले मार्गदर्शन हवे आहे.’’
खरं तर गोरे सरांना धक्काच बसला हे ऐकून. पण तसे काहीही न दाखविता ते पाटलांना म्हणाले ‘‘पाटील साहेब, आमच्याकडे विवाह होतात हे खरं. पण ते आमच्या आश्रमकन्यांचे ज्यांचे वय असते २० ते २५ च्या दरम्यान. आपलं वय ६३ च्या आसपास. रागावू नका, पण आपल्या डोक्यात या कामासाठी आमच्या आश्रमात येण्याचा विचार आलाच कसा़’’
‘‘सर, अहो माझे पुरते बोलणे तर ऐकून घ्या.’’ पाटलांनी आपली गाडी पुढे चालू ठेवली. ‘‘हे पाहा माझ्या डोक्यात आपल्याकडील आश्रमकन्यांचा विचारही आला नाहीए. आपला बदलापूर येथे वृद्धाश्रम आहे असे मी ऐकतो. एखादी वृद्धा ५५ वर्षांच्या आसपास असेल आणि इतर काही अडचणी म्हणा किंवा पाश नसतील तर अनुरूप अशा एखाद्या व्यक्तीशी तिची संमती असेल तर तिचा विवाह हाही एक पुनर्वसनाचा मार्ग असू शकतो.’’
‘‘मग तुम्ही वृत्तपत्रात जाहिरात का देत नाही? किंवा अनेक विवाह मंडळे आहेत ज्यांच्यापाशी तुम्हास अनुरूप अशी अनेक स्थळे सहज उपलब्ध असतील. अर्थात तुम्ही असा प्रयत्न केला असणारच.’’ गोरे सरांनी सहज उपाय सुचविला.
‘‘नाही, असे मी कोणतेही उपाय केलेले नाहीत. त्यालाही कारणे आहेत. एक म्हणजे अशा बाईला कोणी ना कोणी तरी नातेवाईक असणार. ते माझ्या घरी हक्काने राहण्यास येणार आणि मला ते नको आहे. कारण त्यातले काहीजण विशेषत: स्त्रिया तिला काहीबाही शिकविणार आणि त्यामुळे आमच्या सुखाने चाललेल्या संसाराचे बारा. तिच्या मदतीला यांच्यापैकी एकही जण खऱ्या अर्थाने धावून येणार नाही. या उलट माझे तुमच्यासारख्या अनाथाश्रमातून लग्न झाले तर कठीण प्रसंगी तुमची तिला मदत-मार्गदर्शन मिळेल. तुमच्या बाबतीत ते एक पुनर्वसनच आहे. इतरांच्या बाबतीत तो एक धंदा आहे.’’ पाटलांनी गोरे सरांना निरुत्तर केले.
गोरे सर म्हणाले, ‘‘तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण अशा प्रकारात काही अडचणी येऊ शकतात. आश्रमाच्या नियमानुसार आश्रम सोडून गेलेल्या व्यक्तीला परत आश्रमात घेतले जात नाही. तरुणपणी लग्न झालेल्या जोडप्यात मतभेद पराकोटीला जाऊन घटस्फोट झाला तरी तरुण वयात स्त्रीला काहीतरी मार्ग काढून मानाने जगता येण्याची शक्यता असते. प्रौढपणी भांडण वा घटस्फोट झाला तर ती स्त्री काय करू शकणार?’’
‘‘तुमच्या शंका रास्त आहेत. हे बघा माझ्या होणाऱ्या बायकोची सोय माझ्या पश्चात केवळ आर्थिक बाबीसंबंधी केली नसून तिच्या कायमच्या वास्तव्यासंबंधीही मी व्यवस्था केलेली आहे आणि त्याचबरोबर माझ्या मुला-नातवाच्या हिताला बाधा येणार नाही याचीही काळजी घेतली आहे. मी सरकारी पेन्शनर असल्याने माझ्या मृत्यूनंतर पत्नीला जरी ती दुसऱ्या लग्नाची असली तरी तिला फॅमिली पेन्शन कायद्याने मिळू शकेल. शिवाय माझ्या गिरगावातील जागेवर माझी पत्नी हक्काने राहू शकेल. माझ्या बचतीतील पुरेशी रक्कम मी तिच्या इतर खर्चासाठी ठेवत आहे. हे सर्व तुमच्या सल्ल्याने केले म्हणजे झाले.’’ गोरे सरांच्या प्रतिसादासाठी पाटील थोडे थांबले.
पाटलांना थांबायला सांगून गोरे सर आश्रमाच्या अधीक्षिका माई रेगे यांच्याकडे गेले. थोडय़ा वेळाने परत येऊन म्हणाले,
‘‘आश्रमाच्या अधीक्षिका साधारण पंचावन्न-साठ वयाची कोणी आमच्या वृद्धाश्रमात आहे का हे रजिस्टर बघून सांगतील. आपण पुढील आठवडय़ात माझ्याशी संपर्क साधा.’’
तरीसुद्धा पाटील उठण्याची चिन्हे दिसेनात.
‘‘क्षमा करा हं सर. मला आणखी एक गोष्ट स्पष्टपणे आत्ताच सांगणे भाग आहे. माझ्या भावी पत्नीला सकाळी-संध्याकाळी स्वयंपाक हाताने करावा लागेल. मी स्वयंपाकाला बाई ठेवणार नाही. माझी जातीपातीची अट नाही पण घरात मांस-मच्छी शिजवता येणार नाही. तिने बाहेरून आणलं किंवा बाहेर जाऊन खाल्लं तर माझी काहीच हरकत नाही. बरं, आता मी येतो.’’
कार्यालयीन सर्व कामे संपल्यानंतर गोरे सरांनी माईंना बोलावून त्यांचे मत विचारले. माईंनी स्पष्टपणे नाही पण आडपडद्यांनी दर्शविले की पुरुष मंडळी वरवर सांगत असली तरी त्यांची स्त्री सहवासाची हाव सुटत नाही. पण तरीसुद्धा त्या स्वत: वृद्धाश्रमात जाऊन अशी वयस्क बाई तिकडे आहे का याची प्रत्यक्ष पाहणी करणारच होत्या.
उपअधीक्षिका सावंत बाईंना माईंनी बोलावून बदलापूरला जात असल्याचे सांगितले.
‘‘अरे, तुम्ही तर गेल्याच आठवडय़ात जाऊन आलात ना? ’’ सावंत बाईंनी आश्चर्य दाखविले.
‘‘एक म्हातारा गुडघ्याला बाशिंग लावून बसलाय. त्याच्यासाठी बायको शोधायला जातेय.’’
‘‘मी नाही समजले.’’ सावंत
‘‘मला तरी काय कुठे समजलंय. मधल्या सुट्टीत बोलू. सर आले आहेत, त्यांच्यासमोर नको.’’ मधल्या सुटीत रीता गायकवाड, सुजाता लेले, ललना माने या सर्व सोशल - वर्कर, सावंतबाई आणि माई येण्याची वाट बघत बसल्या.
माईंनीसुद्धा वेळ न दवडता सुरुवात केली. ‘‘ते वृद्ध गृहस्थ आश्रमात आले होते ना, पाटील, त्यांना रिटायर होऊन सात वर्षे झाली, दोन एक वर्षांपूर्वी त्यांची बायको वारली. गिरगावात राहतात ते तर त्यांचा मुलगा व सून दादरला राहतात. त्यांना स्वयंपाक करण्याचा कंटाळा आलाय म्हणून त्यांना आता लग्न करावयाचे आहे. त्याला म्हणे स्त्री सहवासाचे आकर्षण नाही. पण हातपाय दुखतात म्हणून कोणी मदतीला पाहिजे. असं ते सांगतात.’’
‘‘यासाठी बाई कशाला पाहिजे? गिरगावात वाट्टेल तेवढी हॉटेलं, खानावळी आहेत. आणि म्हाताऱ्या बायकोचे नाही का हात दुखायचे कामं करून?’’ बाकीच्यांनी खो खो हसून पाठिंबा दिला.
‘‘त्याला काय स्वयंपाक करायलाच बाई पाहिजे ना? मग आपल्याकडेच येथे काशी आहे ना. अगदी मस्त जेवण करते. आता थोडी वेडसर आहे. पण पाटलांना त्याचा त्रास होणार नाही कारण त्यांना सहवास नकोच आहे.’’ परत एकदा हशा
‘‘नाही गं, काशीपेक्षा सखूबाई चांगली. ती पण स्वयंपाक छान करते. तिला दहा वर्षांचा मुलगा आहे, तोही जोग आजोबांच्या उपयोगी पडेल दुकानातून काही सामानसुमान आणण्यासाठी’’
पाटलांची टिंगल आश्रमात पुढील आठ दिवस होत होती. माई बदलापूर वृद्धाश्रमात गेल्या आणि अनपेक्षितपणे पाटलांच्या दिवास्वप्नातील एक उपवरवृद्धा सापडली. आश्रमाच्या विवाह उपसमितीत हा प्रस्ताव ठेवावयाचा आणि नंतर कार्यकारिणीत ठराव आणायचा असे ठरले.
साधारण दहा एक दिवसांनी पाटील आजोबा वेळ ठरवून परत आश्रमात आले. गोरे सरांचं आणि पाटलांचं बोलणं सुरू असताना आश्रमातल्या लेलेबाई, रीता अशा एकामागून एक काहीतरी किरकोळ समस्या घेऊन येऊन गेल्या. त्यांचा हेतू पाटलांना बघणं हाच होता. गोरे सरांनी शिपायाला बोलावून कोणालाही त्यांच्याकडे येऊ द्यायचे नाही अशी सक्त ताकीद दिली. पाटील गेल्यानंतर त्यांनी सर्वजणींची बैठकच बोलाविली.
बाहेरील पाहुण्यांशी आश्रमातील अधिकारी काही बोलत असतील तर कार्यालयीन शिस्तीचे भान आपल्या सुशिक्षित कर्मचाऱ्यांना नसो याबद्दल सरांनी प्रथम नापसंती दाखवून आपल्याकडील आश्रितांच्या पुनर्वसनाचा एखादा प्रस्ताव आला तर त्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक असल्याचे सांगितले. पाटलांचा सगळा प्रस्ताव सांगितला आणि विचारलं, ‘तुम्ही सोशल सायन्स विषयातील पदवीधर. तुमचा या विषयावर अभ्यास असेलच. तेव्हा तुमचं मत मला पाहिजे.’’
सर्वजणी एकमेकींकडे पाहातच राहिल्या.
‘‘अरे, गेल्या आठवडय़ात त्या म्हाताऱ्याला म्हातारचळ लागलाय म्हणून टिंगल करत होतात मग आज अशा गप्प गप्प का?’’
‘‘सर, आपण म्हणता ते खरे आहे.’’ रीता गायकवाडने शेवटी तोंड उघडले. ‘‘पण पाटील साहेब जे सांगतात की केवळ मदतनीस वा सोबती या हेतूने लग्न करावयाचे आहे तो कांगावा आहे.’’
‘‘रीता म्हणतेय ते खरे आहे. पाटील कितीही म्हणोत, त्यांचा मूळ हेतू हा स्त्री सहवास मिळावा असाच आहे.’’ ललना माने म्हणाली.
‘‘छान! मला या चर्चेतून नेमकं काय पाहिजे होते ते तुम्ही बोलून दाखवलंत तर. तुम्ही ज्या समस्येबद्दल बोलताय तिचा विचार संबंधित स्त्री करेलच की, तिचं ओझे तुम्ही का वाहताय? पुरुष जे लग्न करतात ते वासनेपोटी आणि स्त्री लग्न करते ते प्रेमापोटी असं एक अजब विधान गेल्या काही दशकांत केले जाते हे तुमच्या बोलण्यावरून दिसते.. पुरुषाकडे प्रेम ही चीज नसते तर स्त्रीला कामेच्छा नसते या गैरसमजुतीची तुम्ही री ओढताय आणि तीसुद्धा तुमच्या वाचनात फार तर पाहण्यात आली असेल म्हणून तुमच्याच सुखी वैवाहिक जीवनावरून तरी हे विधान खोटं ठरते. पुरुष आणि स्त्री या दोघांकडेही प्रेम व वासना या देहधारणा समान प्रमाणात असतात म्हणूनच कुटुंब संस्था आहे आणि ती स्थिर आहे. बळजबरी किंवा बलात्कार वगैरे बातम्या आपण प्रत्यक्षही वाचतो. त्यावरून तुमच्या विधानात तथ्य आहे हे खरे आहे. हा विषयच मुळी वादग्रस्त आहे. त्यातून मी पुरुष असल्याने पुरुषांचीच बाजू घेणार असं तुम्हाला वाटणे साहजिकच आहे. पण ते जाऊ द्या. आजचा मुख्य मुद्दा असा आहे की चाळीसएक वर्ष साथ करणारी बायको कायमची सोडून जाणे, मुलगा, सून वेगळी, तरीही कुरकुर न करता स्वत:च्या हिमतीवर इतर कोणाच्या मदतीची अपेक्षा न बाळगता पाटलांसारख्या इसमाला आता जर एकटेपणा जाणवू लागला आणि त्यावर मात करण्यासाठी त्यांनी एक व्यवहारी तोडगा, आपल्यासारख्या संस्थेपुढे ठेवला तर तो एका आणि एकाच हेतूने म्हणजे वासनेपायी असला पाहिजे असं गृहीत धरण्यात शहाणपण ते काय?’’ गोरे सरांनी सविस्तरपणे आपले विचार मांडले.
‘‘सर, पण एकटेपणावर पाटलांसारख्या श्रीमंत इसमाकडे इतर अनेक पर्याय उपलब्ध आहेत ना!’’ माने बाईंनी फुसकुली सोडली.
‘‘हे बघा, एकटेपणाची व्यथा ही अनुभवल्याशिवाय समजण्यासारखी नाही. अनेक कथा, चित्रपट, नाटके, कादंबऱ्यातून हा विषय हाताळलेला आहे. फार कशाला आपल्या बदलापूरच्या वृद्धाश्रमातून त्या गंगूबाई न्हाणीघरांतसुद्धा आपल्या लेकीचा फोटो घेऊन जातातच ना. तेव्हा कोणत्या उपायांनी एकटेपणा जाणवणार नाही हे कोणीच ठामपणे सांगू शकणार नाही.’’ काळे सरांनी बैठकीचा समारोप केला.
काळे सरांनी पाटलांचे चिरंजीव शरद यांची भेट घेतली. त्याने आश्चर्य दाखविले पण त्याचबरोबर ‘‘बाबा अतिशय व्यवहारी आहेत, त्यांच्या लग्नामुळे आम्हाला त्रास होईल असं ते काही करणार नाहीत’’ सांगून आपली प्रतिक्रिया उघड करायचे टाळले.
मासिक कार्यकारिणीच्या बैठकीत या प्रकरणासंबंधी गोरे सरांनी सविस्तर माहिती मांडली. परचुरे यांनी काही कायदेशीर मुद्दे उपस्थित केले.
‘‘मी या बाबतीत एका वकिलाचा सल्ला घेतला त्यावरून पुढे जर एखादा तंटा निर्माण झाला तर पत्नीपेक्षा पाटलांनाच जास्त त्रास होईल. नवीन कायद्याप्रमाणे पत्नीला घराबाहेर काढता येत नाही घटस्फोट अवघड, झाल्यास पोटगी द्यावी लागेल तसेच वडिलोपार्जित मिळकतीत तिचा हक्क असेल.’’ सरांनी माहिती काढून ठेवली होती. चर्चेनंतर विवाहाला कार्यकारिणीने संमती दिली.

हे लग्न झाले काय किंवा न झाले काय, माईंना त्याचे सोयरसुतक काहीच नव्हते. सरांना मात्र वाईट वाटले कारण एका आश्रयार्थीचे पुनर्वसन खऱ्या अर्थाने झाले असते.

वारणा मगर नावाची पंचावन्न वयाची एक अनाथवृद्धा बदलापूरच्या आश्रमात होती. दैनंदिन जुजबी कामात तिची मदत होई. वाचावयाची आवड फार. तसंच बडबडी. माईंनी तिला अंधेरीच्या आश्रमात बोलावून घेतले.
‘‘हे बघ वारूताई’’ संध्याकाळी सर्व कर्मचारी गेल्यानंतर माईंनी विषयाला हात घातला. ‘‘बदलापूरला तू सर्वाशी खेळून, मिसळून वागतेस, रोज संध्याकाळी आज्यांना फिरावयास नेतेस. भाजी आणतेस, दवाखान्यात आजारी आजींना घेऊन जातेस. तर मग तुला आश्रमापेक्षा मुंबईत येऊन राहणे आवडेल का? बघ, माझ्याकडे एक योजना आहे. ’’ माईंनी नंतर पाटलांविषयी सर्व गोष्टी सविस्तरपणे सांगितल्या.
‘‘लग्न करशील पाटलांशी? कोकणात त्यांचे घर आहे. कधी मुंबईत तर कधी कोकणात राहावे लागेल. वेळ जायला तुम्हा दोघांचा नाश्ता, स्वयंपाक करणे आहेच. भरपूर वाचावं, गिरगावात देवळं आहेत. थिएटर आहेत तर कोकणातसुद्धा वेळ जाण्यासाठी देवळं, समुद्र आहे. घरचे आंबे, फणस, काजू वगैरे सर्व रेलचेल आहे. आपले गोरे सर.. त्यांनाही असंच वाटतं की पाटील यांचे स्थळ फार चांगले आहे. त्यांच्या पश्चात तुला सरकारकडून पेन्शनही मिळेल. गिरगावातल्या जागेत स्वतंत्र राहता येईल. विचार कर घाई नाही. मात्र कोणाशीही या विषयावर बोलू नकोस.’’
दोन दिवस विचार करून वारूंनी होकार दिला. पाटलांची वारूशी ओळख त्यांच्या गिरगावातल्या घरीच करून देण्यात आली. दोघांची पसंती झाली. आवश्यक ते सोपस्कार उरकण्यात आले. मुलगा व सून यांचीही रीतसर संमती घेतली गेली.
इकडे वारू परत बदलापूरला वृद्धाश्रमात गेली. बाकीच्या आज्यांनी अंधेरीला अचानक कशाला गेली होतीस हे परत परत खोदून विचारलेच पण वारू मात्र आपली गप्प. पण ते सुद्धा एका दिवसासाठीच. ‘दुसऱ्या कोणाला सांगायचे नाही’ या अटीवर तिने सीताकाकूंना सांगितले, तर त्याच अटीवर सीताकाकूंकडून ठमाबाईंना, नंतर राधाकाकूंना. मग काय आश्रमात एकच विषय. जाता-येता वारूला टोमणे. चेष्टेला इतका ऊत आला की आजारी विठाबाईंनी ‘मी आता नातू बघितल्याशिवाय मरणार नाही’ असे घोषित केले. पर्यवेक्षिका गोडेबाईंना सर्वाना दम देऊन गप्प करावे लागले. तरी कुजबुज चालूच राहिली.
गोडेबाईंनी वारूला एकटे गाठून अंधेरी आश्रमात जे काही घडले याची वारूकडून माहिती काढून घेतली, चर्चा केली. वारूताईंनी आडपडदा न ठेवता पाटलांविषयी सर्व माहिती सांगितली व लग्न ठरल्याचेही सांगितले. ‘‘आश्रमाला तुझ्याबद्दल एकदम कळवळा का आला? पाटलांनी आश्रमाला वा इतर कोणत्या तरी व्यक्तीला पैसे दिले असणार. लग्नाला होकार देताना ही गोष्ट तू विचारात कशी घेतली नाहीस. लग्नानंतर उष्टी -खरकटय़ापासून तुलाच सर्व करावे लागणार. कोकणात तर बायकांचे किती हाल होतात हे मी तिकडचीच असल्यामुळे मला पक्के माहीत आहे. शहाणी असशील तर अजून विचार कर.’’ गोडेबाईंनी आग लावून दिली.
‘‘पण मी आता तसं करणार? मी आता नाही म्हणाले तर गोरे सर मला आश्रमातून काढून टाकतील ना?’’ वारू
‘‘ती काळजी तू करू नकोस. मी आहे ना येथे. लग्नाला नकार दिल्याने तुला येथून कोणीही काढू शकणार नाही.’’ गोडे
‘‘पण मी कारण काय सांगू?’’
‘‘अगं, अगदी सोपे आहे. तू अंधेरीला परत जा आणि माईंना सांग की पाटलांनी कोकणातील सर्व प्रॉपर्टी माझ्या नावावर करून द्यायला पाहिजे. म्हाताऱ्याची खात्री काय सांगावी? तसं नसेल तर मी लग्न करणार नाही.’’ गोडेबाईंनी जाम तोडगा सुचविला. त्यांची खात्री होती की पाटील अशी अट मान्यच करू शकणार नाहीत.
दुसरे दिवशी वारूंनी माईंना फोन करून आपली अट सांगितली. या पाठी कोण असणार याचा अंदाज माईंना आलाच. त्यांनी तसं सरांना बोलूनही दाखविले. हे लग्न झाले काय किंवा न झाले काय, माईंना त्याचे सोयरसुतक काहीच नव्हते. सरांना मात्र वाईट वाटले कारण एका आश्रयार्थीचे पुनर्वसन खऱ्या अर्थाने झाले असते.
त्यानंतर काही दिवसांनी पाटलांचा फोन आला. लग्न करण्यासाठी ते गोडेबाईंची चौकशी करत होते. गोरे सरांनी कपाळाला हात लावला, मनात म्हणाले, ‘शेवटी बायका त्या बायकाच.’