११ जानेवारी २०१३
मथितार्थ : अभाव ‘सामुदायिक जीवना’चा!
चित्रकथी : चित्रवीण!
कव्हर स्टोरी
क्रीडा : कल खेल में हम हो न हो..
प्रासंगिक

सादरीकरणाची कला आपल्या रक्तातच!
विकेट ‘कीपर’

संगीत : आठवणी वाद्यवृंदाच्या!
थोडी सजगता आणि पथ्य
सेकंड इनिंग : भीष्मासारखं वार्धक्य!
आरोग्यम् : पोलिओ पॉलिटिक्स
चटक-मटक : चवदार, चटपटीत
युवा : जग थिरकतंय ‘गंगन्म स्टाइल’वर..
भंकसगिरी : थोरांचे संमेलन झाले त्याची गोष्ट..
विज्ञान तंत्रज्ञान : टेक फेस्ट टेक्नॉलॉजीची आषाढी
कवितेचं पान : पहिली गाजलेली कविता

शब्दरंग : आम्हा घरीं धन

एकपानी : बी अ कॅलेंडर!
सिनेमा : मराठी सिनेमात नव्या वर्षांत नव्या जोडय़ा
लग्नाची वेगळी गोष्ट : जीवनात ही घडी..
लग्नाची वेगळी गोष्ट : बायका त्या बायकाच..
पाठलाग :एकच प्याला..
माझं शेतघर : फार्म हाऊस पाहावे घेऊन..
संख्याशास्त्र : मूलांक म्हणजे काय?
भन्नाट : आकाशाला गवसणी
केल्याने रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

लग्नाची वेगळी गोष्ट

जीवनात ही घडी..
नंदा हरम

‘लग्नाची वेगळी गोष्ट’ या उपक्रमांतर्गत कथा-
response.lokprabha@expressindia.com

‘आली हासत पहिली रात..’ या ओळी मनाच्या कोपऱ्यात रुंजी घालत होत्या. एक अनामिक हुरहुर मनाला लागली होती, पण ती पहिल्या रात्रीची की आणखी कसली, हे सुखदाला कळत नव्हतं. मनावर वेगळं दडपण होतं. अनंताला लग्न मनापासून हवं होतं की नाही, हेच तिला कळलं नाही. तिच्या बाबांनी अगदी शेवटच्या घटकेला तिचा हात त्याच्या हातात दिला होता. ही गोष्ट होती, तीन महिन्यांपूर्वीची. तिच्या बाबांना ट्रकने उडवलं होतं. ती आणि अनंत जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेले, तेव्हा ते शेवटच्या घटका मोजत होते. गेल्या गेल्या त्यांनी ‘सुखदा.’ म्हणून आर्त साद दिली. तिचा हात हातात घेतला. अनंतालाही जवळ बोलावलं. म्हणाले, ‘अनंता, माझं काही आता खरं नाही.’ अनंत बोलणार, त्याआधीच ते म्हणाले, ‘अनंता, थांब. माझ्याकडे वेळ कमी आहे. मला बोलू दे. काही दिवसांपूर्वीच मी विचार करत होतो. तुझ्याशी दोन दिवसांत बोलणार होतो, पण हे सर्व अकल्पित घडलं.’ बोलताना त्यांचा श्वास वाढला. अचानक त्यांचा चेहरा कसानुसा झाला. पुढे बोलायचं त्राणच राहिलं नाही. त्यांनी फक्त पटकन सुखदाचा हात त्याच्या हातात दिला. आशीर्वाद द्यावा तसा हात वर केला आणि तुटक म्हणाले, ‘हीच माझी इच्छा!.’ एवढं बोलेपर्यंत त्यांचा वर गेलेला हात घरंगळला. सुखदाने तर टाहोच फोडला. पुढील सर्व गोष्टी अनंताने पार पाडल्या. एखाद महिन्यानंतर सुखदाच्या आईने, उषाताईंनी अनंताच्या आईजवळ विषय काढला. सुमतीकाकूंना खरं म्हणजे सुखदा सून म्हणून पसंत होती. त्या म्हणाल्या, ‘उषाताई, मी अनंताशी बोलेन. मग आपण ठरवू सगळं.’ संध्याकाळी अनंत आल्यावर त्यांनी विषय काढला. अनंत म्हणाला, ‘आई, काकांनी एवढे उपकार केल्येत ना आपल्यावर, की मी काही बोलूच शकत नाही. तू ठरव लग्नाचं.’
तसं पाहिलं तर सुखदा त्याची लहानपणापासूनची मैत्रीण होती, पण त्याने कधी तिचा बायको म्हणून विचार केला नव्हता. त्याच्या मनात चंदाविषयी काही भावना होत्या. चंदा, त्याची वर्गमैत्रीण. दोघांनीही मेकॅनिकल इंजिनीअरिंग पूर्ण केलं होतं. दोघांनीही छोटा व्यवसाय चालू केला होता. वर्कशॉप उघडलं होतं. अर्थात चंदाचं प्रस्थ वेगळं होतं. ती खूप श्रीमंत होती, पण तिला वडिलांच्या बळावर मोठं व्हायचं नव्हतं. अर्थात, तिच्या वडिलांचा तिला पाठिंबा होता. अनंताने काही दिवसांपूर्वीच विचार केला होता. थोडंसं व्यवसायात स्थिरावल्यावर चंदालाच आधी विचारू, पण काकांच्या निधनामुळे परिस्थिती अचानक बदलली.
दिवस जात होते, मुहूर्त जवळ येत होता. अनंताला काय करावं कळत नव्हतं. त्याच्या वडिलांच्या निधनानंतर काकांनीच तर त्यांना खूप मोठा आधार दिला होता. सुमतीबाई नोकरी करणाऱ्या असल्यामुळे त्यांचं जीवन पार उद्ध्वस्त झालं नव्हतं, पण तसा अनंता दहावीत असतानाच सारं घडलं होतं. त्याची कॉलेजची अ‍ॅडमिशन, नंतर १२वीच्या वेळी वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा, इंजिनीअरिंगची अ‍ॅडमिशन, सर्व काकांनीच पाहिलं होतं. त्याला वडिलांचं प्रेम दिलं होतं, तर त्याच्या आईमागे भावासारखे उभे राहिले होते. जाणतं झाल्यावर त्यांच्या वागण्यातील हे बारकावे त्याला प्रकर्षांने लक्षात आले होते. त्याने आत्ता जेव्हा वर्कशॉप उघडलं तेव्हाही त्याला कमी पडणारे पैसे त्यांनीच दिले होते. आईने जवळपासची पुंजी सगळी त्याला दिली, तरी १ लाख रुपये कमी पडत होते. मागचापुढचा विचार न करता काकांनी त्याला दिले होते.
अनंताने चंदाला लग्नाचे निमंत्रण दिले, तेव्हा ती थोडी गडबडल्यासारखी वाटली, निदान अनंताला तसे वाटले; पण ती विशेष काही बोलली नाही. अनंताचं सुखदाशी लग्न झालं. अजून त्याचं मन चंदाजवळच रेंगाळत होतं. तसं त्याला चंदाच्या मनात त्याच्याविषयी काय आहे, हे माहितीही नव्हतं. बेडरूमचा दरवाजा उघडून अनंत आत गेला, तर सुखदा विचारात बुडून गेलेली दिसली. त्याने दरवाजा लावला आणि सुखदापासून थोडय़ा अंतरावर उभा राहिला. सुखदाची समाधी भंग पावली. डोळ्यांत आलेले अश्रू तिने पुसले.
अनंत म्हणाला, ‘बाबांची आठवण येत होती ना?’
सुखदा मनात म्हणाली, ‘किती मनकवडा आहेस, अनंता!’
एवढय़ात अनंत म्हणाला, ‘सुखदा, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे.’ सुखदाला वाटलं होतं, तो आपला हात हातात घेईल आणि काहीतरी बोलेल, तर हा दुरूनच. तरी संयम दाखवीत ती म्हणाली, ‘बोल ना’
अनंत म्हणाला, ‘सुखदा, आपलं बालपण एकत्र गेलं. तू माझी चांगली मैत्रीणही आहेस, पण मी तुझा बायको म्हणून कधी विचार केला नाही. माझ्या मनात अजूनही किंतु आहे. त्यामुळे मी तुझ्याशी मित्र म्हणूनच राहणार आहे. माझ्या मनाची जेव्हा पूर्ण तयारी होईल, तेव्हा मी तुझा बायको म्हणून स्वीकार करेन, नाही तर तुला मी या बंधनातून मुक्त करेन. याकरिताच मी तुला स्पर्श करणार नाही.’
सुखदाला नेमकं काय बोलावं कळत नव्हतं. अर्थात सगळं आलबेल नाही, हे आधीच तिच्या लक्षात आलं होतं. तरी कुठेतरी ती दुखावली गेली, पण तिला अनंताचं म्हणणंही पटत होतं. लहानपणापासून ‘शब्द पाळणे म्हणजे अनंता’ असं समीकरण होतं. त्यामुळे तिला जाणवलं की, याने शब्द पाळलाय. त्याच्या सच्चेपणाची झलकही तिला पाहायला मिळाली. तिने त्या क्षणी ठरवलं, जे काही होईल ते आपण बघून घेऊ. नियती जणू माझी सत्त्वपरीक्षा बघतेय, पण मी हे अग्निदिव्य पार पाडणारच.
ती रात्र दोघांकरिता अतिशय वाईट गेली. ज्या रात्रीची नवविवाहित दाम्पत्य आराधना करीत असते, ती रात्र एखाद्या वैरिणीसारखी भासत होती. दुसऱ्या दिवसापासून त्याचं रुटीन चालू झालं. दरवाजाआडची गोष्ट बाहेर समजणं कठीण होतं, त्यामुळे वरकरणी सर्व आलबेल होतं. आठ-एक दिवसांनंतरची गोष्ट. अनंतला एक छोटासा अपघात झाला. तो स्कूटर चालवीत असताना रिक्षाची धडक बसली. लिगामेंटस् दुखावल्यामुळे पायाला प्लॅस्टर घालावं लागलं. झालं, तीन आठवडय़ांकरिता त्याला घरात अडकावं लागलं. सुखदा त्याची सगळी शुश्रूषा करत होती. अनंताला आता हक्काची बायको असताना आपण का लुडबुड करायची म्हणून सुमतीबाई दुरूनच सर्व हवं-नको बघत होत्या. अनंतचा सहवास मिळत असल्यामुळे सुखदा तशी मनातून खूश होती. अनंतला अपघात झाला, तेव्हा त्याचं एक काम चालू होतं. ती ऑर्डर त्याला पंधरा दिवसांत पूर्ण करायची होती.
त्याने पटकन चंदाला फोन लावला आणि विचारलं, ‘जरा माझं कामाचं बघशील का? ऑर्डर पूर्ण करायची आहे.’
चंदाने स्पष्ट सांगितलं, ‘माझंही जोरात काम चालू आहे. त्यामुळे मला ही जबाबदारी नाही घेता येणार.’
अनंतचा चेहरा खाड्दिशी पडला. सुखदा आतल्या खोलीत होती. तिने सर्व ऐकलं होतं. बाहेर आल्यावर त्याचा एवढासा चेहरा बघून तिच्या लक्षात आलं, काय उत्तर मिळालं असेल ते?
ती सहज विचारल्यासारखं म्हणाली,
‘अनंता, ऑर्डर पूर्ण करायची आहे ना?’
अनंत खिन्नपणाने म्हणाला, ‘हो ना! पण मी असा घरात अडकलो. कसे जमणार सारे?’ सुखदा तत्परतेने उत्तरली, ‘अरे, मी आहे ना! मी बघेन सारं, तू मला एकदा सर्व दाखव.’
हो-नाही करत सुखदा त्याला रिक्षात घालून दोघंही वर्कशॉपला गेले. तिने सगळं काम समजावून घेतलं. काय सूचना द्यायच्या, नंतर पॅकिंग कसं करायचं इ. इ. दुसऱ्या दिवसापासून सुखदाची धावपळ चालू झाली. सकाळी सर्व अनंतचं काम पूर्ण करून त्याचं जेवण आटोपून बारा वाजता ती वर्कशॉपला जात असे. संध्याकाळी ६-७ वाजता घरी येऊन नंतर घरचं काम. तिचं वेळापत्रक एकदम टाइट झालं, पण तिने अगदी मनावर घेऊन ऑर्डर पूर्ण केली. अनंत खूश झाला. पुढे एक आठवडय़ात त्याचं प्लास्टरही निघालं. तो परत वर्कशॉपला जाऊ लागला. वर्कशॉपमधील कामगार अनंतला म्हणालेही, ‘साहेब, मॅडमना चांगलं जमतं काम!’ अनंताला सुखदाची कामातली निष्ठा जाणवली होती. राहून-राहून त्याला चंदा आपल्याशी अशी का वागली, असं त्याला वाटत होतं, पण तो चंदाला तसं विचारूही शकत नव्हता!
तिला जाब विचारायला, त्याची ती कोण होती?
दिवस जात होते. सुखदा संगीत विशारद परीक्षेच्या तयारीला लागली होती. लेखी परीक्षेचा अभ्यास, तसाच सकाळचा रियाझही चालायचा. आहे त्या परिस्थितीत तिने जुळवून घेतले होते. लग्न होऊन ४-५ महिने झाले, तसं इतरांचं तिला वेगळंच चिडवणं चालू होतं. सुखदा हसून साजरं करत होती.
त्या दिवशी गुरुपौर्णिमेचा दिवस होता. तिच्याकरिता तो धावपळीचा होता. तिच्या गुरूंची जी संस्था होती, ते दरवर्षी गुरुपौर्णिमेला गाण्याचा कार्यक्रम करत. सुखदाने अनंतला कार्यक्रमाची आठवण करून दिली. तसा तो दरवर्षी तिच्या कार्यक्रमाला आवर्जून जात असे. सुखदा घराबाहेर पडणार, एवढय़ात अनंतचा फोन आला. काही महत्त्वाची बोलणी चालू आहेत. कदाचित थोडा उशीर होईल. कार्यक्रमाकरिता सदिच्छा द्यायलाही तो विसरला नाही. त्यामुळे तिला बरं वाटलं. ती आईला, सासूबाईंना घेऊन कार्यक्रमाला गेली. सुरुवातीला गुरुवंदना झाली आणि मग कार्यक्रमाला सुरुवात झाली. अध्र्या-पाऊण तासाने अनंत आला. कार्यक्रम छान झाला. सुखदाचं गाणंही रंगलं. ती बाहेर आल्यावर अनंतने तिचं अभिनंदन केलं. तो आज चांगल्या मूडमध्ये होता. येतानाच तो पेढे घेऊन आला होता. जास्त सर्वाची उत्सुकता न ताणता त्याने जाहीर केलं की एक चांगल्या कंपनीची मोठी ऑर्डर मिळाली आहे. दसऱ्यापर्यंत ती पूर्ण करावयाची आहे.
दुसऱ्या दिवशी तो लवकर उठला. सुखदाला म्हणाला, ‘आता खूप काम पडणार आहे.’
सुखदा म्हणाली, ‘तू म्हणशील तेव्हा मी उठून तुझा डबा करून देईन. गरज असेल तर मला सांग. मीही येईन मदतीला.’
‘हं!’ म्हणून त्याने सोडून दिलं.

मनातल्या मनात त्याला सुखदाचा रांग आला. त्याला वाटलं, मी असा अडचणीत आहे आणि हिला वाढदिवसाला जायचं सुचतंय्! अचानक तो भांबावला, अरे, आपण अगदी टिपिकल नवऱ्याच्या थाटात विचार करतोय..

वर्कशॉपमध्ये जाऊन कामाचा सर्व आराखडा तयार केला. वेळापत्रक ठरविलं, माल कधी, किती आणायचा, किती टप्प्यांत काम करायचं, सर्व तपशील काढले. दोन दिवस त्यातच गेले. मग ठरलं, जो यांत्रिक भाग बनवून द्यायचा होता, त्याचा आधी एक नमुना करून बघावा आणि मग पुढचं ठरवावं. कामगारांनी कामाला सुरुवात केली. अनंतला जशी डिझाइन हवी होती, तशी नेमकी येत नव्हती. थोडंसं चुकत होतं. त्याला पटकन आठवलं, की चंदाकडे याकरिता लागणारी सामग्री आहे. तो चंदाच्या वर्कशॉपमध्ये गेला. त्याने तिला सर्व कल्पना दिली व अडचण सांगितली.
चंदाने हसत सांगितलं, ‘अनंत, मला शक्य नाही. मलाही एक ऑर्डर पूर्ण करायची आहे.’ वरून हेही सांगायला विसरली नाही, ‘अनंता, आपण आता एकाच बिझनेसमध्ये आहोत. आपण मित्र नाही, प्रतिस्पर्धी आहोत.’
हताशपणे तिच्या वर्कशॉपमधून बाहेर पडल्यावर वाटेत कॉलेजमधील एक प्रसंग त्याच्या डोळ्यांसमोर तरळला. तिसऱ्या वर्षांला असताना एका स्पर्धेत तेच दोघं शेवटच्या फेरीत आमनेसामने होते. तेव्हा त्यांना जवळपास अशीच सिच्युएशन सांगण्यात आली होती अन् प्रश्न विचारला होता की, तुम्ही एकमेकांना मदत कराल की नाही? अनंतने ‘हो’ म्हटलं होतं अन् चंदाने ‘नाही’. ती त्या स्पर्धेची विजेती ठरली होती. त्या वेळी परीक्षकांनी अनंतला खास बजावलं होतं की, व्यवसायात परिस्थिती बघून ‘माणुसकी की व्यावसायिकता’ हे धोरण आखायचं असतं. त्याला आपली चूक उमगली अन् चटकन त्याच्या मनात आलं, ही बया कोठल्याही थराला जाईल! त्याला जाणवलं, अरे, आपण चंदाला ‘बया’ म्हटलं. तो आणखीनच अस्वस्थ झाला. त्याला काही सुचेना. ही ऑर्डर हातची जाऊन चालणार नाही. विमनस्क स्थितीत तो घरी आला. सुखदाला त्याच्याकडे बघताच कळलं की, काही तरी बिनसलंय स्वारीचं! हळूहळू लाडीगोडीने तिने सर्व त्याच्याकडून काढून घेतलं. रात्रभर ती विचार करत होती. गेल्या वेळी तिने वर्कशॉपमध्ये सर्व गोष्टी पाहिलेल्या होत्या. तिला प्रश्नाचं उत्तर मिळालं. फक्त अनंतच्या नकळत तिला सर्व करायचं होतं. तसं पाहिलं तर सुखदालाही इंजिनीअरिंगमध्ये इंटरेस्ट होता, पण गायनावरील प्रेमाने त्यावर मात केली होती. म्हणून संगीत घेऊन तिने बीए केलं, तेच आपलं क्षेत्र निवडलं. तिला पक्कं ठाऊक होतं, शिकून कुणी इंजिनीयर होत नसतो, ती एक वृत्ती असते.
दुसऱ्या दिवशी अनंत बँकेतील काम संपवून वर्कशॉपला जाणार होता. ती त्याच्याआधी वर्कशॉपमध्ये गेली. सगळा प्रश्न कामगारांकडून समजावून घेतला. एक छोटा यंत्राचा भाग आवश्यक होता, तो बरोबर घेतला अन् ती तिथून सटकली. कोल्हापूरला तिची मैत्रीण, कल्पनाकडे जायचा बेत आखला. त्याआधी तिला फोन करून सगळ्या गोष्टीची कल्पना दिली. तिच्याकडून अपेक्षित असलेल्या मदतीबद्दल सांगितलं, कल्पनाने सुखदाच्या घरी फोन लावला व सुमतीबाईंशी बोलली. तिच्या मुलाच्या वाढदिवसाचं बोलावणं केलं. एक दिवस मुक्काम करावा लागणार होता. तिने अनंतला फोन करून कल्पनाच्या आमंत्रणाविषयी सांगितलं. त्यालाही बोलावलं आहे, असं ती म्हणाली. अनंत कामाच्या विवंचनेत होता. मनातल्या मनात त्याला सुखदाचा राग आला. त्याला वाटलं, मी असा अडचणीत आहे आणि हिला वाढदिवसाला जायचं सुचतंय्! अचानक तो भांबावला, अरे, आपण अगदी टिपिकल नवऱ्याच्या थाटात विचार करतोय..
सुखदा कोल्हापूरला कल्पनाकडे गेली. तिच्या नवऱ्याची मोठी कंपनी होती. त्या कंपनीत यंत्रांचे तऱ्हेतऱ्हेचे पार्टस् बनवत असत. गेल्या वेळी ती जेव्हा कोल्हापूरला गेली होती, तेव्हा तिने हे सर्व बघितलं होतं. तिने तिला हवा तसा तो पार्ट बनवून घेतला. तातडीने करून घेतल्यामुळे त्याचे दामदुप्पट पैसे मोजले. कल्पनाचे आभार मानत ती परतली. घरी आली, तेव्हा अनंत घुश्शातच होता, पण जेव्हा तो पार्ट त्याच्या हातात ठेवला, तेव्हा त्याला आकाश ठेंगणे झाले. सुखदाचं काय आणि कसं कौतुक करू, तिचे आभार कसे मानू, असं त्याला झालं. बरं, एक मोठी चिंता मिटली, पण या सर्व गडबडीत काही दिवस हातातून निघून गेले होते. आता युद्धपातळीवर काम करावं लागणार होतं.
सुखदा म्हणाली, ‘अनंत, विचार कसला करतोस? आपण दोघं मिळूून हे शिवधनुष्य नक्कीच उचलू.’ वर्कशॉपमध्ये एक-दोन कामगार वाढवले होते, ते कामगारही जास्त काम करू लागले. दोन शिफ्टमध्ये कामाला सुरुवात झाली. एक शिफ्ट सुखदा बघत होती, तर दुसरी अनंत.
या दरम्यान सुखदाची ‘संगीतविशारद’ची परीक्षा होती. कामाच्या व्यापात ती परीक्षेला बसली नाही. तिने अनंतला अजिबात कळून दिलं नाही. वरून आईला आणि सासूबाईंनाही बजावलं की, तुम्ही अनंतला याविषयी काही बोलू नका. परीक्षा पुढच्या वेळी देईन. ऑर्डर पूर्ण झाली. अगदी दिलेल्या वेळेत! अनंतने सुटकेचा नि:श्वास टाकला. त्याला हे नक्की समजलं की, केवळ सुखदामुळेच हे सर्व शक्य झालं. आता त्याला सुखदा अन् चंदामधील फरक जाणवत होता. आपण सुखदावर एवढे दिवस अन्याय केला, अशी बोच निर्माण झाली. तिला बायको म्हणून स्वीकारायचं हे वेगळ्या गोष्टीतून त्याला सांगायचं होतं. एवढय़ात ज्या कंपनीची ऑर्डर पूर्ण केली होती, त्या कंपनीचं पत्र आलं की, ते अनंतचा सत्कार करू इच्छितात. त्यांनी अशा प्रकारची ऑर्डर काही जणांना दिली होती. वेळ आणि संख्या पार्टस्ची तेवढीच, पण कोण, कशा प्रकारे व किती दिवसांत पूर्ण करतो, हे त्यांना पाहायचं होतं, तेही क्वालिटीशी तडजोड न करता! नवीन टॅलंट शोधायचा तो एक मार्ग होता. अनंत त्यात सफल झाला होता.
मुंबईत हा सत्कार होणार होता. अनंत सर्वाना घेऊन मुंबईला गेला. कार्यक्रमाच्या ठिकाणी चंदा दिसली. कार्यक्रमात स्पर्धेचे महत्त्व विशद केले. इतर सर्व माहिती दिली गेली अन् मग सत्कार समारंभ. सत्काराला उत्तर देताना अनंतने सुखदाचा आवर्जून उल्लेख केला. हा सत्कार खरा तिचाच आहे, ती खऱ्या अर्थाने माझी अर्धागिनी आहे, हे त्याने अभिमानाने सांगितले. सूत्रसंचालक चाणाक्ष होता, त्याने तेवढय़ात फेरबदल करून दोघांचा सत्कार केला. चंदाचा दुसरा नंबर लागला होता. अनंतने तिचंही अभिनंदन केलं.
कार्यक्रमाच्या वेळी सुखदा व अनंत दोघेही खुशीत होते. अनंतने प्रथमच चंदावर मात केली होती, तर सुखदाला तिचा नवरा मिळाला होता. तिला वाटलं, खऱ्या अर्थाने आज आपलं लग्न झालं. घरी आल्यावर अभिनंदन करण्याकरिता कल्पनाचा फोन आला. सुखदाशी बोलून झाल्यावर ती अनंतशी बोलू लागली. अनंत सर्व क्रेडिट सुखदाला देत होता. तेव्हा कल्पनाही अभावितपणे म्हणाली, ‘हो ना! खरंच आहे ते. सुखदाची संगीतविशारदची परीक्षाही हुकली ना या गडबडीत!’ अनंतने काही प्रतिक्रिया दर्शविली नाही, पण मनातल्या मनात तो खजील झाला. आपण तिचे अनन्य अपराधी आहोत, असं वाटलं. सुखदाने कधी काही दर्शविलंही नाही, याचं आणखीनच अप्रूप वाटलं.
कधी एकदा सुखदा एकांतात भेटते, असं झालं. सुखदाने आज सर्व साजशृंगार केला. आजची हुरहुर हवीहवीशी होती, मन उचंबळून आलं होतं. अनंत आत आला आणि दार लावलं. परत एकदा सुखदापासून थोडय़ा अंतरावर उभा राहिला. सुखदा प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे बघू लागली. आता काय? हे तिच्या चेहऱ्यावरील भाव अनंतने ताडले. त्याने खिशातून गुलाबाचे फूल काढले. एक पाय खाली दुमडून तिच्याकडे पाहून गुलाब समोर धरून ‘प्रेम कबूल?’ अशी विचारणा केली, अगदी एखाद्या सिनेमात दाखवितात त्याप्रमाणे! सुखदाने गुलाब हुंगत, त्याचा हात हातात घेऊन उठविले आणि ‘एकदम कबूल!’ म्हणत त्याच्या मिठीत विसावली.