११ जानेवारी २०१३
मथितार्थ : अभाव ‘सामुदायिक जीवना’चा!
चित्रकथी : चित्रवीण!
कव्हर स्टोरी
क्रीडा : कल खेल में हम हो न हो..
प्रासंगिक

सादरीकरणाची कला आपल्या रक्तातच!
विकेट ‘कीपर’

संगीत : आठवणी वाद्यवृंदाच्या!
थोडी सजगता आणि पथ्य
सेकंड इनिंग : भीष्मासारखं वार्धक्य!
आरोग्यम् : पोलिओ पॉलिटिक्स
चटक-मटक : चवदार, चटपटीत
युवा : जग थिरकतंय ‘गंगन्म स्टाइल’वर..
भंकसगिरी : थोरांचे संमेलन झाले त्याची गोष्ट..
विज्ञान तंत्रज्ञान : टेक फेस्ट टेक्नॉलॉजीची आषाढी
कवितेचं पान : पहिली गाजलेली कविता

शब्दरंग : आम्हा घरीं धन

एकपानी : बी अ कॅलेंडर!
सिनेमा : मराठी सिनेमात नव्या वर्षांत नव्या जोडय़ा
लग्नाची वेगळी गोष्ट : जीवनात ही घडी..
लग्नाची वेगळी गोष्ट : बायका त्या बायकाच..
पाठलाग :एकच प्याला..
माझं शेतघर : फार्म हाऊस पाहावे घेऊन..
संख्याशास्त्र : मूलांक म्हणजे काय?
भन्नाट : आकाशाला गवसणी
केल्याने रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

कवितेचं पान

पहिली गाजलेली कविता
डॉ. महेश केळुस्कर

मराठीतील बहुमुखी कविता लिहिणारे आघाडीचे कवी. प्रभावी काव्यलेखन आणि सादरीकरण. मोर, पहारा झिनझिनाट मस्करिका आणि कवडसे हे पाच कवितासंग्रह प्रसिद्ध. कथा, कादंबरी आणि आस्वादात्मक समीक्षालेखन प्रकाशित. मालवणी मुलुखातील प्रयोगात्म लोककला या विषयावरील संशोधन प्रबंधास मुंबई विद्यापीठाची डॉक्टरेट व अनेक पुरस्कार. अन्य लेखनासराज्य पुरस्कारासहित विविध सन्मान. ‘कवितांच्या गावा जावे’चे संपादन.

‘झिनझिनाट’ ही माझी मालवणी कविता आजतागायत हजारहून अधिक वेळा मी कुठे कुठे म्हटली असेन. नंतर मॅजेस्टिकने ‘झिनझिनाट’ याच नावाने संपूर्ण मालवणी कवितासंग्रह काढला आणि पुढे २००९ मध्ये ग्रंथायनने त्याची दुसरी आवृत्ती काढली. असं जरी असलं तरी ‘बाळगो नि मालग्या’ या मालवणी कवितेने मला कवी म्हणून पहिल्यांदा महाराष्ट्रात नाव दिलं.
सावंतवाडीतील ‘दक्षिण रत्नागिरी साहित्य संघा’च्या कोजागिरी कविसंमेलनामध्ये, १९७६ साली ही कविता मी पहिल्यांदा सादर केली तेव्हा माझं वय होतं १७ वर्षे पूर्ण. कविवर्य बा. भ. बोरकर त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. कविता म्हणण्यासाठी मी उभा राहिलो आणि माझे हातपाय लटपटू लागले. हुडहुडी भरल्यासारख्या आवाजात मी कविता म्हणायला सुरुवात केली. बोरकरांनी माझा हात घट्ट पकडून ‘बालका स्थिर हो’ असा हुकूम दिला. नंतर माझी कविता मी एका वेगळ्याच तंद्रीत म्हटली. बाकीबाब शाल सावरत उभे राहिले. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि समोरच्या रसिकांना म्हणाले, ‘बघा खरी कविता अशी असते. बघा, इथल्या मातीचा रंग आणि गंध आहे या कवितेला.’
पुढे ‘सत्यकथे’च्या जून १९७९ च्या अंकात ही कविता प्रसिद्ध झाली आणि खूप गाजली. राम पटवर्धन यांनी मनीऑर्डरवर सही करून पाठवलेल्या १६ रुपये मानधनाची पहिली पावती मी अजून जपून ठेवलीय.

बाळगो नि मालग्या

‘‘म्हापुर्साची शप्पत आये, मटको माका म्हायती नाय
छाप-काटो कसलो मिया आजूनतागात खेळाक नाय’’
आयो म्हणता, ‘‘बाळग्या, मगे जातंत खय रे पैशे?
परवाच्या दिस कणगेतसून तांदुळ झाले नायशे..’’

‘‘खराच आये म्हायती नाय इचार तुया बाबाक
सोऱ्याक लागान इकल्यान आसतीत तांदूळ म्हाताऱ्या साबाक.’’
इतक्या इला माली, तेच्या नाकात नयी फुली
तेका बगतुकशणी बाळग्याक फीट येवची पाळी

‘‘फुली गो केवा केलंस मालग्या?’’ आयेक ऱ्हवला नाय
मालग्या पाट्कन बोलान गेला, ‘‘तुका म्हायती नाय?’’
बाळो मारता डोळो, तरी मालग्याक कळला नाय
‘‘अगे वैनी बाळग्याक इचार,’’ मालग्यान केल्यान घाय

‘‘तेनाच मगे इन्सुलेच्या जत्रेत दिल्यान फुली
चवलीभार सोना आसा;’’ बोलान गेला माली
‘‘बाळग्या माज्या ध्येनात इला, पैशे खय गेले
कणगेतले कोलेवरंगळ नायशे कशे झाले.’
आयेन काडल्यान सळपो, तसो बाळगो म्हणता कसो

‘‘पाया पडतंय आये तुज्या, करू नको हसो’’
आये म्हणता, ‘‘बापाशीचा नाव राखलंस बाळग्या’’
इतक्या शिरलो घरात बाबा, आये येकदम लाजली
बाळगो बगता मालग्यार, तेच्या गालाक पडली खळी..

परीक्षा

कितीतरी साचून राहिलंय मनात
जे सांगायचं राहून गेलंय
कितीतरी ऐकायची अपेक्षा आहे मनात
जे विचारायचं राहून गेलंय

कदाचित जे सांगायचं आहे मला
ते तू ऐकून घेशील असं नाही
जे विचारीन मी
ते तू सांगशील असं नाही

तरी एकदा प्रयत्न तर करून बघायला हवं
विषाची परीक्षा एकदा घेऊन बघायलाच हवं
- निर्मला कुपस्त, मुंबई

सुईतून जन्म ओवताना

मेढय़ाच्या आतबाहेर आतबाहेर करताना
स्वत:ला टोकदार करत करत
तीक्ष्ण तीक्ष्ण होत जातो
जिवाचा लवलवता धागा
जगण्याच्या धारदार अग्रावर
अविरत गरगरत राहतो
प्राणांचा सुकुमार ठिपका

टिपूस टिपूस गळून जातात
मलमली इच्छांचे थेंब थेंब
पापणीने उचलून घ्यावेत
इतक्या सूक्ष्म शुभ्र क्षणांनी
विणत विणत घडत जाते
उभ्या जन्माचे सधन अस्तित्व

अवघ्या घनगच्च प्रहरांना बुजवत बुजवत
हेलकावत राहते
मनाची व्याकूळ रेशीम लड
आणि तरीही..

जगून झालेल्या आयुष्यापाशी नसतेच
कुठलेही दिव्य वस्त्र
शेवटी आणि मिळते
पांढरे कफन फक्त
- मंदाकिनी पाटील, बदलापूर

निवडुंग

जिथे तिथे ओतावं पाणी
तरी निवडुंग फणारून उभा!

आभाळ म्हणजे निराकार पोकळी
हे स्वीकारून टाकायचं
नाही मागायचा पाऊसही!
आखून घ्यायच्या चौकटी सक्तीने
अन् पाण्याच्या शोधात मुळांनी..

खोदत जायची जमीन खोलवर
डहाळीवरच्या चार-पाच हिरव्याकंच पानांसाठी
नकळत फुटलेल्या पालवीसाठी
अन् जोपासलेल्या कळ्यांसाठी!
अंजली पेंढरकर, नेरुळ, नवी मुंबई

गझल

जरासे जरासे कवडसे उन्हाचे
जसे दाविती रूप इवल्या सुखाचे

उन्हाळा हिवाळा ऋतू छान सारे
सखीला परी वेड ह्य़ा पावसाचे

म्हणालीस विसरून जा रे मला तू
जिवाला सखे कसे सांग विसरावयाचे

विसरलो जरी तूच म्हणशील मजला
पुरुष तरी उलटय़ाच रे काळजाचे

अजूनी तुझी आस नजरेत ‘एक’
सखी सांगती नाव घे ईश्वराचे
ए. के. शेख, पनवेल

कविता पाठवा..
‘कविता म्हणजे आकाशीची वीज, ती धरू पाहणारे शेकडा ९९ जण होरपळतात’ असं कविवर्य केशवसुतांनी म्हटलं आहे. तुम्ही कधी पेलली आहे ही आकाशीची वीज? तिचं शब्दरुप आमच्याकडे पाठवून द्या. महाराष्ट्रातले नामवंत कवी तुमच्या कवितेची निवड करतील आणि ‘लोकप्रभा’च्या माध्यमातून तुमची कविता महाराष्ट्रभर पोहोचेल. आमचा पत्ता-
लोकप्रभाह्ण, प्लॉट नं. ईएल/१३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई-४०० ७१०
E-mail: response.lokprabha@expressindia.com