११ जानेवारी २०१३
मथितार्थ : अभाव ‘सामुदायिक जीवना’चा!
चित्रकथी : चित्रवीण!
कव्हर स्टोरी
क्रीडा : कल खेल में हम हो न हो..
प्रासंगिक

सादरीकरणाची कला आपल्या रक्तातच!
विकेट ‘कीपर’

संगीत : आठवणी वाद्यवृंदाच्या!
थोडी सजगता आणि पथ्य
सेकंड इनिंग : भीष्मासारखं वार्धक्य!
आरोग्यम् : पोलिओ पॉलिटिक्स
चटक-मटक : चवदार, चटपटीत
युवा : जग थिरकतंय ‘गंगन्म स्टाइल’वर..
भंकसगिरी : थोरांचे संमेलन झाले त्याची गोष्ट..
विज्ञान तंत्रज्ञान : टेक फेस्ट टेक्नॉलॉजीची आषाढी
कवितेचं पान : पहिली गाजलेली कविता

शब्दरंग : आम्हा घरीं धन

एकपानी : बी अ कॅलेंडर!
सिनेमा : मराठी सिनेमात नव्या वर्षांत नव्या जोडय़ा
लग्नाची वेगळी गोष्ट : जीवनात ही घडी..
लग्नाची वेगळी गोष्ट : बायका त्या बायकाच..
पाठलाग :एकच प्याला..
माझं शेतघर : फार्म हाऊस पाहावे घेऊन..
संख्याशास्त्र : मूलांक म्हणजे काय?
भन्नाट : आकाशाला गवसणी
केल्याने रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

एकपानी

माधवी घारपुरे
‘जगी सर्व सुखी असा कोण आहे?’ रामदास स्वामींनीच विचारलंय ना? मी सांगते, की जगी सर्व सुखी मीच आहे. आता हे माझं निवृत्तीचं वर्ष! प्रत्येक वर्षी अनेकानेक सुखदु:खांची उलथापालथ होते आहे, पण एक निश्चित की मी आनंदी आहे. सुखी आहे.
माझ्या वयाची पहिली चार र्वष चांगली गेली असावीत, कारण चार वर्षांपर्यंत काय आणि किती लक्षात असतं कुणाच्या? माझ्या चौथ्या वर्षी माझी आई गेली. भाऊ दोन वर्षांचा होता. मधल्या दोन वर्षांतल्या हकिगती विस्तारानं आठवत नाहीत, पण कधी ही आजी, कधी ती आजी असं फिरलेलं आठवतंय. लोकांच्या नजरेत आम्ही बहीणभाऊ ‘बिच्चारे’! एकदा तर ‘तुम्ही कोण रे मुलांनो?’ असं विचारल्यावर ‘आम्ही बिच्चारे’ असंच उत्तर मी दिलेलं होतं. असं आजी सांगायची. असं उत्तर दिल्यामुळे आजीनं मारलेलं मात्र पक्कंआठवतं. पण मी सुखी होते. पुढे मी दुसरीत गेल्यावर बाबांनी आम्हा दोघांना एक नवी आई आणली. हळूहळू जुनी आई पूर्ण विसरली. चांगली, वाईट, सावत्र-सख्खं असले भाव मनात नव्हते. या आईनं खूप मारलंय, छळलंय असं ध्यानात नाही, पण तिनं कामं मात्र माझ्याकडून, भावाकडून खूप करून घेतली.
माझं शिक्षण अख्खं घर सांभाळत सांभाळत एसएससीपर्यंत आलं. आश्चर्य वाटेल, पण घडय़ाळाच्या काटय़ाप्रमाणे न चुकता प्रत्येक जानेवारीत नवीन काहीतरी समोर वाढून ठेवलेलं असायचं. एक वर्षांआड जानेवारीतच आईची तीन बाळंतपणं मी केली. एक वर्ष माझ्या भावाला अ‍ॅक्सिडेंट, एक वर्ष आईला मोठेपणी कांजिण्या, एक वर्ष बाबांना दोनदा टायफॉइड उलटला. पण सगळय़ातून मार्ग निघाले. संकटं पार पडली. डिसेंबर आला की नव्या उत्साहानं नवीन वर्षांकडे पाहात होते, पण समोर काही असायचंच.
एसएससीला ७० टक्के मार्क्‍स मिळवून मी पास झाले. बाबांनी मला मोठय़ा कौतुकानं कॉलेजला घातलं. आईची इच्छा होती, की मी छोटी-मोठी नोकरी करावी. ते घडलं नाही. मी बारावीला असताना हृदयविकाराच्या झटक्यानं बाबा अचानकपणे आम्हाला सोडून गेले. आईला बोलायला चांगली संधी मिळाली. बाबांच्या ऑफिसनं मला वर्षभरच नोकरी देऊन मदत करू असं सांगितलं. बारावीनंतर मी डीएड केलं आणि एका शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून नोकरी करायला लागले. आई आणि चार भावंडं असं खटलं सांभाळायचं होतं. शाळेत दरवर्षी नवी मुलं, नवे चेहरे, नवा आनंद, नवे खेळ, नवे उपक्रम, अर्थात मुलांत रमणाऱ्या शिक्षकासाठीच नवा सूर्योदय नव्या दिवसाचा, इतरांसाठी रोजचाच.
भावंडं मार्गी लागली आणि माझं लग्न मीच ठरवलं. वयाच्या पस्तिशीनंतर. हे एलआयसीमध्ये ऑफिसर होते. विनापत्य विधुर. आई-वडील, हे आणि ब्रह्मचारी दीर. सारे छान होते. मी सुखी होते. आई-वडील मात्र यांचा जीव की प्राण होते. ‘श्रावणबाळा’पेक्षा दुसरी उपाधी नाही म्हणून. नाहीतर तीच दिली असती. सुख बोचावं अशीच स्थिती. तसं सुख बोचलंच.
आई-बाबांना काशीयात्रा घडवायची होती. ऑफिसच्या र्अजट कामामुळे हे येऊ शकले नाहीत. आम्ही तिघं अलाहाबादला पोहोचलो. पुन्हा अलाहाबादला येईपर्यंत कार ठरवली. सर्व यात्रा व्यवस्थित पार पडली. प्रयागहून परत येताना कारला अपघात झाला. मी पुढे होते. आई-बाबा मागे होते. ड्रायव्हर आणि मी वाचलो. ते दोघंही जागीच गेले. जाताना शब्द होते, ‘आमचं चांगलं झालं, यात्रेत मरण, विश्वेश्वराची कृपा.’ अर्थातच घडली ती गोष्ट वाईटच होती, पण नियतीपुढे कुणाचं चाललं आजपर्यंत?
फक्त ‘हय़ांना’ कळलं नाही. ‘तू माझ्या आई-बाबांच्या’ मृत्यूस कारण ठरलीस म्हणून माझ्याशी बोलणं टाकलं. सभ्य गृहस्थ असल्यानं इतर कुठलाही त्रास नाही, पण हा न दिसणारा, मला सलणारा त्रास मोठा होता. तरी मी सुखी होते.. पुढे मराठी शाळांना गळती लागायला सुरुवात झाली. मी अतिरिक्त (सरप्लस) शिक्षिका ठरले. गेली चार र्वष प्रत्येक वर्षी नवीन शाळा. जिथं गरज तिथं मी.. कुणी सामावून घेत नव्हतं, पण शाळेची मुलं मला सामावून घेत होती.. मी सुखी होते.. आता माझं निवृत्तीचं वर्ष.. नवीन वर्षी काय असणार?.. मी काय होते? मी कोण होते? माझा परिचय काय?..
सापडला, शोधला, समजला, कळलंय मला मी कोण आहे? मी आहे, मी आहे एक नववर्षांचं भलंऽऽ मोठ्ठं ‘कॅलेंडर’ काय फरक त्यांच्यात- माझ्यात? नवीन वर्षांचं, कोरं करकरीत कॅलेंडर माणसं भिंतीवर आनंदानं लावतात. त्याची गरज, त्याचं अस्तित्व सर्वाना हवंसं असतं. संपूर्ण वर्षांचं टाइमटेबल ते तुमच्यासमोर ठेवतं. या महिन्यात काही नाही झालं तरी पुढच्या महिन्याच्या पानाकडे अपेक्षेनं पाहिलं जातं. दर महिन्याला, दर वर्षांला तेच दिवस, तेच वार, तीच तारीख, पण वर्ष बदलतं. घटना बदलतात. नव्या पानावर हिशोब लिहायला सुरुवात होते. खाडे लिहायला सुरुवात होते. टाचण्या-सुया टोचून ठेवायला सुरुवात होते. महिन्यात ते पान थकतं तोवर आनंदानं दुसरं पान पुढे येतं. परत तेच ते.. १२ पानं उलटली की कॅलेंडरच नव्या रूपात पुन्हा येतं. लोकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी. मी तरी दुसरं काय करते?..
आयुष्यभर इतरांचा आनंद फुलवण्यासाठी सोसत राहिले. तारीख-वार-महिने-र्वष माझ्या कॅलेंडरची लोटली. लोकांच्या बोलण्याच्या सुया टोचल्या, आईनं कामाच्या-दोषांच्या टाचण्या टोचल्या, शाळेतल्या मुलांनी पानं उलटली. नवऱ्यानं आई-वडिलांच्या मृत्यूचा हिशोब मांडला तो माझ्यावरच. वाटायचं, पुढचं पान स्वच्छ असेल, पण तेच ते अन् तेच ते.. पण कॅलेंडर बनण्यात मोठी मजा आहे. उद्याची आशा.. नवीन पान चांगलं असेल त्याचा उत्साह.. १२ पानं संपली तरी नवीन वर्षांचं पान उघडेल म्हणून उत्साह. हे करतानाच सतत सुखाची जाणीव होते म्हणूनच सारं सोसूनही मी आनंदी.
मीच कशाला? माझाच का टेंभा? प्रत्येकजण हेच करतो.
म्हणूनच म्हणावंसं वाटतं, बी अ कॅलेंडर.
पण एक विसरले- वर्षांनंतर पहिलं कॅलेंडर फेकून देतात. कवटाळत नाही कोणी. गेलेलं वर्ष कवटाळण्यात तरी काय हशील? नव्याचं स्वागत करावं!
प्रत्येक क्षणाचा सण साजरा करावा, कणभराचा आनंद मणभराचा मानावा आणि मनाशी म्हणावं, ‘बी अ कॅलेंडर’!
response.lokprabha@expressindia.com