११ जानेवारी २०१३
मथितार्थ : अभाव ‘सामुदायिक जीवना’चा!
चित्रकथी : चित्रवीण!
कव्हर स्टोरी
क्रीडा : कल खेल में हम हो न हो..
प्रासंगिक

सादरीकरणाची कला आपल्या रक्तातच!
विकेट ‘कीपर’

संगीत : आठवणी वाद्यवृंदाच्या!
थोडी सजगता आणि पथ्य
सेकंड इनिंग : भीष्मासारखं वार्धक्य!
आरोग्यम् : पोलिओ पॉलिटिक्स
चटक-मटक : चवदार, चटपटीत
युवा : जग थिरकतंय ‘गंगन्म स्टाइल’वर..
भंकसगिरी : थोरांचे संमेलन झाले त्याची गोष्ट..
विज्ञान तंत्रज्ञान : टेक फेस्ट टेक्नॉलॉजीची आषाढी
कवितेचं पान : पहिली गाजलेली कविता

शब्दरंग : आम्हा घरीं धन

एकपानी : बी अ कॅलेंडर!
सिनेमा : मराठी सिनेमात नव्या वर्षांत नव्या जोडय़ा
लग्नाची वेगळी गोष्ट : जीवनात ही घडी..
लग्नाची वेगळी गोष्ट : बायका त्या बायकाच..
पाठलाग :एकच प्याला..
माझं शेतघर : फार्म हाऊस पाहावे घेऊन..
संख्याशास्त्र : मूलांक म्हणजे काय?
भन्नाट : आकाशाला गवसणी
केल्याने रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

कव्हर स्टोरी

मनावरचे बलात्कार!
वैशाली चिटणीस

response.lokprabha@expressindia.com
अजाणत्या- जाणत्या वयात गर्दीमध्ये, रस्त्यावर, ओळखीच्या ठिकाणी, कधीही, कुठेही येणारा एखादा अनुभवदेखील तिच्या मनावर कायमचा आघात करून जातो आणि त्यानंतर एक राक्षस कायमचा तिचा पाठलाग करत राहतो. तो शरीरावरचा बलात्कार नसतोही पण तिच्या मनावर झालेल्या बलात्काराचं काय?

ती असेल १२-१३ वर्षांची. गणपती बघायला चालली होती. आई, बाबा, तिचा लहान भाऊ, आजी. आजीबरोबर तिचं गूळपीठ जास्त. त्यामुळे ती आजीचा हात धरून आणि छोटा आई-बाबांबरोबर असे ते सगळे मजेत फिरत होते. वेगवेगळय़ा गणपती मंडळांचे गणपती, सजावट बघत होते. गप्पा चालल्या होत्या. कोण कोण ओळखीचं भेटत होतं. आणखी एक-दोन गणपती बघायचे. मस्तपकी काहीतरी खायचं आणि मग घरी जाऊन झोपायचं असा प्लान होता. गणपती बघायला ठिकठिकाणी ही गर्दी होती. पण ती काय असणारच. ते काय या वर्षी पहिल्यांदा थोडेच आले होते गणपती बघायला. पण यावर्षी नेहमीपेक्षा तिला जास्त गंमत वाटत होती. एक तर गणपतीबद्दल पेपरमध्ये येणाऱ्या बातम्या ती वाचत होती. मत्रिणींबरोबर चर्चा व्हायची. आपल्यालाही बरंच समजतंय असं वाटायचं. त्यामुळेच आई-बाबांच्या मागे लागून आज ते सगळे दुसऱ्यांदा गणपती बघायला बाहेर पडले होते. आजीचा हात धरून त्या गर्दीतून त्या दोघी हळूहळू फिरत होत्या. तेवढय़ात.. तिला काहीतरी विचित्र जाणवलं. पाठीमागून कुणाचातरी ओंगळवाणा स्पर्श.. ती एकदम शहारली. हा काय प्रकार आहे.. तिनं एकदम मागे वळून पाहिलं. सगळेच चेहरे काहीच न घडल्यासारखे. तो भास होता की काय.. ती तशीच पुढे सरकली. शक्य तेवढं अंग चोरून घेत.. दोन-तीन मिनिटं गेली..पुन्हा तेच..यावेळी तिनं मागे वळूनही पाहिलं नाही. नकळत वेग वाढवला. पण त्या गर्दीत म्हाताऱ्या आजीचा हात धरून ती किती वेगाने चालणार. इतक्या वर्षांत कधीच न जाणवलेलं गर्दीचं ओझं तिला जाणवायला लागलं. तेवढय़ात एक हात मागून तिच्या खांद्यावरून पुढे आला, तिची छाती दाबत फिरला आणि परत मागे गेला. यावेळी तिने झपकन मागे वळून पाहिलं. एक विशीचा मिशावाला मुलगा तिच्या अगदी मागे होता. तिच्याकडे बघून हसत त्याने तिला डोळा मारला. म्हणजे हाच तो.. त्या भयंकर गर्दीत काय करावं तिला कळेना. तिनं आजीचा हात धरला आणि तिला गर्दीबाहेर ओढायला सुरुवात केली. ती असं का करतेय हे आजीला कळेना. पण दोघीजणी गर्दीबाहेर आल्या आणि चुकामूक झाली तर जिथे भेटायचं ठरलं होतं त्या ठिकाणी थांबल्या. थोडय़ा वेळाने आई-बाबा आल्यावर तिचा बांध फुटला आणि ती ढसाढसा रडायला लागली. तिच्या रडण्याचं कारण कळल्यावर सगळेजण घरी परत आले.
त्यानंतर ती कधीही गणपती बघायला गेली नाही. कुठल्याही गर्दीत शिरायचं म्हटल्यावर तिच्या अंगाला दरदरून घाम फुटतो आणि तिला सगळय़ा गर्दीचीच किळस वाटायला लागते. मिशी असलेले पुरुष घाणेरडे असतात हा समज तर तिला आजही पुसून टाकता आलेला नाही.
****
तिचं वय १८ वष्रे. आई-वडील, भाऊ-बहीण, ती असं कुटुंब. वडील बँकेत मोठय़ा हुद्दय़ावर. आई गृहिणी. तिन्ही मुलांची शिक्षणं सुरू होती. स्वभावाने धार्मिक असलेली आई एका बाबा महाराजांकडे जायची. तिची त्या महाराजांवर अत्यंत श्रद्धा. ती रोज त्या बाबांच्या दर्शनाला जा, आपल्या कुटुंबातल्या इतरांनीही त्यांच्याकडे यावं अशी आईची इच्छा असायची. पण आपल्याला ऑफिसच्या कामाचा व्याप आहे असं म्हणून बाबांनी ती उडवून लावली. वेळ नाही असं म्हणत मुलांनीही ती धुडकावून लावली. उरल्या दोन्ही मुली. त्यांना कधी ना कधी आईच्या इच्छेपुढे मान तुकवावी लागायची. आईची श्रद्धा आहे म्हणून जाऊ या असं म्हणत त्या जायच्या. एक दिवस आईला काही कारणाने जमणार नव्हतं म्हणून आईने तिला बाबांकडे फुलं, प्रसाद घेऊन पाठवलं. बाबा त्यांच्या नेहमीच्या दर्शन द्यायच्या खोलीत नव्हते. ते ज्या दुसऱ्या खोलीत होते तिथं तिला जायला सांगण्यात आलं. ती तिथे गेली. बाबा तिथे एकटेच होते. त्यांनी तिला थोडा वेळ थांबवून घेतलं. ती थोडी निवांत झाल्यावर तिला उभं करून तिचं सगळं अंग चाचपलं. तिला ते अजिबातच आवडलं नाही. तिनं त्यांना हटकायला सुरुवात केल्यावर सिद्ध पुरुष म्हणून ते तिच्या अंगावरची लक्षणं चाचपून बघत होते असा युक्तिवाद त्यांनी केला. आपल्याला तसा अधिकारच आहे असं त्यांचं म्हणणं होतं. त्या सगळय़ा प्रकाराचा धसका घेतच ती घरी आली. घरी आल्यावर आईला, बहिणीला तिने झाला प्रकार सांगितला. तिच्या बहिणीलाही असाच अनुभव आला होता. पण ज्याच्यावर इतर लोकांची श्रद्धा आहे, त्याच्याबद्दल कसं बोलायचं म्हणून ती गप्पच बसली होती. त्यावरची त्यांच्या आईची प्रतिक्रिया फारच धक्कादायक होती. असं काही घडणं शक्यच नाही. तुम्हीच खोटं बोलता आहात असं आईचं म्हणणं होतं.
तेव्हापासून कुणाही नवीन माणसाला भेटायचं तर तिच्या जिवावर येतं. कुणाच्याही धार्मिकपणावर विश्वास ठेवणं हे तेव्हापासून तिच्यासाठी अशक्य ठरलं आहे.

एका पाहणीमध्ये स्त्रियांना असं विचारलं गेलं होतं की, तुम्हाला तुमच्या आयुष्यात सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते? त्यांच्यासमोर दोन पर्याय होते. १- मृत्यू. २- बलात्कार. बहुतांश स्त्रियांनी दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय निवडला होता.
****
ती असेल २१ वर्षांची. शिक्षण पूर्ण झाल्या झाल्या तिला नोकरी लागली. एका एनजीओतली नोकरी. नोकरीनिमित्त तिची सहकारी आणि ती दोघींनाही बाहेरगावी फिरायला लागायचं. पण दोघींना एकमेकींची सोबतही व्हायची. कधी कधी त्यांच्याबरोबर त्यांचा बॉसही असायचा. सगळे मिळून भरपूर काम करायचे. मनासारखं काम, िहडणं.. तिची सगळी ऊर्जा ओतून ती काम करत होती. मजेत चाललं होतं. वर्षभर गेलं. नेहमीसारखीच एक टूर. यावेळी तिची सहकारी मत्रीण काही कारणामुळे दुसऱ्या दिवशी पोहोचणार होती. ती आणि तिचा बॉस दोघेही आदल्या दिवशी पोहोचले. काम आटोपलं. हॉटेलमध्ये आपापल्या रूमवर पोहोचले. आता फ्रेश व्हायचं, खाली जाऊन जेवून यायचं आणि झोपायचं. नेहमीचंच रुटीन. तिच्या रूमची बेल वाजली. दार उघडलं तर दारात बॉस. जेवायला जायचं ना असं विचारत तो आत शिरला. आत शिरता शिरताच त्याने दार थोडंसं ढकललं आणि सहज केल्यासारखं दाखवत तिला मिठीत ओढलं आणि तिचा कान चाटायला सुरुवात केली.. एक सेकंदभर तिला काय चाललं आहे तेच कळलं नाही. दुसऱ्या सेकंदाला तिने त्याला जोरात ढकललं आणि ती बाहेर धावली. तिने ढकलल्यामुळे धडपडलेला तोही तिच्यामागे धावला. तो बाहेर आल्याचं बघून ती पुन्हा विद्युत वेगाने आपल्या रूममध्ये शिरली आणि तिने दार आतून लावून घेतलं. बाहेरून तो विनंत्या करत राहिला. त्याने माफी मागितली. चुकून झाल्याचं सांगितलं पण ती बधली नाही. तो दारातून निघून गेल्यावर तिने फोन करून आई-वडिलांना फोन करून आपण उद्या लगेचच परतत असल्याचं सांगितलं. इकडे येण्यासाठी निघत असलेल्या आपल्या सहकारी मत्रिणीला झाल्या प्रकाराची कल्पना देऊन येऊ नकोस असं सांगितलं. रात्रभर ती तशीच बसून राहिली. कुठेही खुट्टं वाजलं तरी तिला धडधडत होतं. दर थोडय़ा वेळाने आईचा नाहीतर त्या सहकारी मत्रिणीचा तिला सोबत देणारा फोन येत होता. सकाळ झाल्यावर तिनं विमानतळ गाठला आणि पहिल्या फ्लाइटने ती परत आली.
******
तिला लहानपणापासूनच ड्रेस डिझायिनगची आवड. वेगवेगळय़ा रंगसंगती, कुणाला काय चांगलं दिसेल, काय दिसणार नाही, हे सगळं तिला आपोआपच जाणवायचं. तिनं ड्रेस डिझायिनगचा कोर्स केला. कुठे कुठे काम केलं. या क्षेत्रातले सगळे बारकावे शिकून घेतले. तिला स्वत:चं बुटिक काढायचं होतं. त्यासाठी भरपूर पसे लागणार होते. कुणीतरी तिला काही काळासाठी फिल्म इंडस्ट्रीत काम करायचा सल्ला दिला. तिलाही ती कल्पना आवडली. आपण डिझाइन केलेले कपडे पडद्यावरचे सितारे घालणार, आपण दिलेल्या स्टाइल्स तरुण वर्गात रूढ होणार ही कल्पनाच रोमांचक होती. मराठी सिनेमाच्या क्षेत्रात कामं मिळणं तिच्यासाठी अगदीच अशक्य नव्हतं. एकतर ती त्या क्लासमधली होती आणि तिच्या तशा ओळखीदेखील होत्या. तिनं एक-दोन ठिकाणी शब्द टाकला. तिला संधी मिळण्याची शक्यताही निर्माण झाली. पण तिला संधी मिळण्यासाठी तिला संधी देणाऱ्यांना जे हवं ते द्यावं लागणार होतं. तिच्याकडे टॅलेंट आहे हे त्यांनाही मान्य होतं. पण नुसत्या टॅलेंटवर ते संधी द्यायला तयार नव्हते. अगदी ओळखीतून गेल्यावरही तिच्याकडे झालेली मागणी होती ती.
तिने ती मागणी धुडकावली आणि तिच्या आवडत्या क्षेत्रातही मिळेल ते छोटं-मोठं काम करत राहण्याचा पर्याय स्वीकारला. आपल्या आवडत्या क्षेत्रात आपल्याला फार पुढे जाता येणार नाही हे तिने स्वीकारले आहे.
******
ती असेल दहा-बारा वर्षांची. एका नातेवाइकांकडे गेली होती. उन्हाळय़ाच्या सुट्टीचे दिवस होते ते. मुलामुलांनी सगळय़ांनीच गच्चीत झोपायची टूम निघाली. वरती खुलं आकाश, चंद्र, तारे बघत, गप्पा मारत कधी झोप लागायची ते कळायचंही नाही. झोपेत असताना तिला जाणवायचं की आपल्या बोटांशी कुणीतरी चाळा करतंय. दिवसभर खेळून खेळून दमून झोपल्यावर हा बोटांशी होणारा चाळा खरा आहे की झोपेतला भास आहे तेच तिला कळायचं नाही. तिसऱ्या-चौथ्या दिवशी मात्र ती झोपेतून ताडकन उठून बसली तर काय.. शेजारच्या घरातले आजोबा तिच्या जवळ बसून तिच्या बोटांशी चाळा करत होते. आसपास सगळीच भावंडं, शेजारपाजारची छोटी मुलं दमून झोपलेली. कुणालाही जाग येणं शक्य नाही. आली तरी काय चाललंय ते कळणं शक्य नाही, अशी परिस्थिती. तिला एकदम भीती वाटून आली. गेले तीन-चार दिवस बोटांना होणारा तो स्पर्श आणि बाजूला बसलेले ते आजोबा.. तिला सगळय़ाचीच एकदम किळस वाटली. पण ती ओरडणार तेवढय़ात आजोबांनी तिच्या तोंडावर हात ठेवला. ते उठले आणि निघून गेले. दुसऱ्या दिवशीपासून तिला गच्चीत झोपण्याचं धाडसच झालं नाही.
त्यानंतर कधीही कुठेही तिच्या घरापासून लांब गेली तरी रूमला आतून घट्ट कडी घातल्यावरही ती शांत झोपूच शकत नाही. अक्राळ विक्राळ होत गेलेली बोटं तिच्या स्वप्नात येत राहतात.

गेले तीन-चार दिवस बोटांना होणारा तो स्पर्श आणि बाजूला बसलेले ते आजोबा.. तिला सगळय़ाचीच एकदम किळस वाटली.

त्या मुलीचे काय झाले?
समाजात वावरताना स्त्रिया, मुली किती असुरक्षिततेला तोंड देत असतात, हे सोबतची लहान लहान उदाहरणं सांगतात. दिल्लीमधली घटना चर्चेत असताना एक पत्र हाती लागलं. एका मुलीच्या काकाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला-बाल कल्याणमंत्री, महिला-बाल कल्याण आयुक्त यांना लिहिलेलं. सोलापूरमधल्या शासकीय महिला वसतिगृहात असलेली त्यांची पुतणी तिथून गायब झाली आहे. या मुलीचे आई-वडील मरण पावले. तिला सांभाळणं शक्य नाही म्हणून तिच्या आजोबांनी तिला शासकीय महिला आश्रमात आणून ठेवलं. तिथे तिची नावानिशी नोंद आहे. पण प्रत्यक्षात ती मुलगी तिथे नाही. ही मुलगी कुठे गेली, हे शोधण्यासाठी मुलीचे नातेवाईक, सोलापुरातले कार्यकर्ते जंग जंग पछाडत आहेत. पण महिला वसतिगृहाचे अधिकारी तोंड उघडायला तयार नाहीत. महिला वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या पुतणीचं दुप्पट वयाच्या माणसाशी लग्न लावून दिलं. पण त्या लग्नाची कुठेही नोंद झाली नाही. लग्नानंतर काही काळाने सासरी छळ होतो म्हणून मुलगी परत वसतिगृहात आली. पण तिचं लग्न उघडकीला येऊ नये म्हणून अधिकाऱ्यांनी तिला जळगावच्या शासकीय महिला वसतिगृहात पाठवलं. तिथे तांत्रिक कारणामुळे तिला प्रवेश दिला गेला नाही. उलट पोलिसांबरोबर परत सोलापूरला पाठवलं गेलं. जळगाव पोलिसांनी तिला वसतिगृह अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलं आणि ते निघून गेले आणि त्यानंतर ती मुलगी कुठे आहे, तिचं काय झालं ते कुणालाच माहीत नाही, असं तिचे काका आपल्या पत्रात म्हणतात. या सगळ्या प्रक्रियेत मुलीची दोन वेगवेगळ्या नावांनी नोंद झाली. पण वसतिगृहात या दोन्ही नावांच्या मुली अस्तित्वातच नाहीत, असं सोलापुरातले सामाजिक कार्यकर्ते सांगत आहेत. कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत इतर राज्यांच्या तुलनेत प्रगत असलेल्या महाराष्ट्रात शासकीय वसतिगृहात ही परिस्थिती असेल तर इतर ठिकाणची कल्पनासुद्धा करता येत नाही.

*****
खरं तर ते दोन-तीन वेगवेगळे रस्ते होते, पण शाळेत यायचा जायचा तिचा रस्ता ठरलेला होता. शाळाही फार लांब नव्हती. त्यामुळे चौथी-पाचवीपासूनच ती शाळेला एकटी जायला लागली. पाचव्या-सातव्या मिनिटाला ती घरून शाळेत किंवा शाळेतून घरी पोहोचायची. खूपदा शाळेतले मित्र-मैत्रिणीही बरोबर असायचे. सगळे मिळून हसत-खेळत, गप्पा मारत जायचे यायचे. आपापलं घर आलं की एकमेकांना अच्छा, बाय - बाय, टाटा करत निरोप घ्यायचे. ती नववीत असतानाची गोष्ट. काहीतरी कारणामुळे तिला उशीर झाला होता. ती एकटीच भराभर निघाली होती. खरं तर शाळेत लवकर पोहोचण्यासाठी धावतच होती. रस्त्यावर अगदी तुरळक गर्दी होती. समोरून येणाऱ्या एका मुलाला तिची धडकच झाली असती. पण ती एकदम थांबली. तो मुलगाही थांबला. त्याने तिच्याकडे ‘एकूण’ नजर टाकली आणि अत्यंत अचकट विचकट बोलला. ते बोलणं धावल्यामुळे धपापणाऱ्या तिच्या छातीबद्दल होतं. तिला एकदम वरमल्यासारखं झालं. तो मुलगा निघूनही गेला. पण तिला ते त्याचं बोलणं, बघणं दिवसभर जाचत राहिलं. ते कुणालाही सांगणार तरी कसं? किती तरी दिवस ती ते सगळं विसरूच शकली नाही.
त्यानंतर कधीही त्या रस्त्यावरून जायचं ती टाळायला लागली. शाळेत जातानाही तिला कुणीतरी बरोबर लागायचं. उशीर झाला म्हणून किंवा अगदी खेळतानाही धावणं हे तर तिने सोडूनच दिलं.